ह्यासोबत
- आखाती मुशाफिरी (१)
- आखाती मुशाफिरी (२)
- आखाती मुशाफिरी (३)
- आखाती मुशाफिरी (४)
- आखाती मुशाफिरी (५)
- आखाती मुशाफिरी (६)
- आखाती मुशाफिरी (७)
- आखाती मुशाफिरी (८)
- आखाती मुशाफिरी (९)
- आखाती मुशाफिरी (१०)
- आखाती मुशाफिरी (११)
- आखाती मुशाफिरी ( मध्यंतर )
- आखाती मुशाफिरी (१२)
- आखाती मुशाफिरी (१३)
- आखाती मुशाफिरी (१४)
- आखाती मुशाफिरी (१५)
- आखाती मुशाफिरी (१६)
- आखाती मुशाफिरी (१७)
- आखाती मुशाफिरी (१८)
- आखाती मुशाफिरी (१९)
- आखाती मुशाफिरी (२०)
- आखाती मुशाफिरी (२१)
- आखाती मुशाफिरी (२२)
- आखाती मुशाफिरी (२३)
- आखाती मुशाफिरी (२४)
- आखाती मुशाफिरी (२५)
- आखाती मुशाफिरी ( २६ )
- आखाती मुशाफिरी ( २७ )
- आखाती मुशाफिरी ( २८ )
- आखाती मुशाफिरी ( २९ )
- आखाती मुशाफिरी ( ३० )
उद्या मला तुरुंगात पाठवले जाणार होते.
--------------------------------------
मार्स्टर्न साहेबांनी चौकशीचा जो कांही फार्स केला त्याचे मला कांही नवल वाटले नाही. तो माणूस तसा कोणालाच आवडत नसे. दिवसभर वातानुकूलित कक्षांत खुर्ची उबवत बसणे आणि कोणत्याही कामांत विनाकारण लक्ष घालून चमत्कारिक निर्णय देऊन चालत्या गाडीला खीळ घालणे हे त्याचे उपद्व्याप. खरं पाहता मुदीर म्हणजे सर्वेसर्वा असतो. कंपनीचा मालक-शेख कधीही कामकाजांत अथवा निर्णय प्रक्रियेत लक्ष घालीत नसें. एकतर तो आणि त्याचा ज़नानखाना कांही सणावारापुरतेंच कतारमध्यें वास्तव्याला असत. एरवी इंग्लंड फ्रान्स अशा देशांत मौजमजा करीत कालक्रमणा करीत असें. सर्व प्रकारची मुखत्यारी (power of attorney) मुदीरला दिलेली असें. मुदीर जर मनांत आणतां तर या मार्स्टर्न साहेबालाही इंग्लंडला परत पाठवू शकला असता. पण तसें करणे तर दूरच, मुदीर मार्स्टर्न साहेबाला, त्याच्या मनमानीला किंचितसाही विरोध करू शकत नव्ह्ता. कारण मार्स्टर्न शेखच्या खास मर्जीतला माणूस होता. आणि ती मर्जीही अशा करतां कीं मार्स्टर्नची बायको इंग्लंडला एक यशस्वी पर्यटन व्यवस्थापक (travel task master) म्हणून व्यवसाय करीत होती आणि शेखच्या सर्व पर्यटनांची व्यवस्था ती बघत असे. पण तें कांहीं कां असेना, मुदीरचे तटस्थ वागणे मला आवडले नाही. कदाचित् हा मामला त्याच्या दृष्टीने फार किरकोळ असेल. म्हणून तो कांही बोलला नसावा अशी मी मनाची समजूत करून घेतली. शेवटी ’याला आता तुरुंगात जाऊ देत’ असें मुदीर म्हणाला तेंव्हा त्याच्या चेहऱ्यावर एक मिस्कील स्मित मात्र नक्की होते.
उद्यापासून मला स्थानिक करागृहावर जावे लागणार होते. ज्या पद्धतीने ही बदली झाली होती ती उद्वेगजनक होती. गेले तेरा चौदा दिवस त्या पठाणाच्या सहवासांत काढलेले होते. आत्ता कुठें त्यांच्याशी मैत्री होऊ लागली होती. मी सदा माणसांच्या काळपात रमणारा माणूस होतो. पठाणांच्या सहवासात मी रमलो होतो. शिवाय त्या कार्यस्थळावर मी एकटा राजा होतो. एक मुदीरचा अपवाद सोडला तर बाकी कुणीही तिथे येऊन कामांत ढवळाढवळ केली नव्हती. नाही तर एरवी शहरालगत काम असले कीं कोणी ना कोणी येऊन फालतू चौकशी करणारच. आम्हा भारतीयांची संभावना, मग तो इंजीनियर कां असेना, चतुर्थ श्रेणी कामगारासारखी केली जायची. त्यामुळे मुख्यालयातून आलेला प्रत्येकजण जमेल तितकी टर्रेबाजी करण्याची संधी सोडीत नसें आणि आम्हाला मात्र नम्रपणे उत्तरे द्यावी लागत. ’ समर्थाचिये घरचे श्वान, त्यास सर्वही देती मान’ ही उक्ती मनांत ठेवावी लागे.
हे नव्याने जें काम मला दिले जाणार होते त्यात अशा आगंतुकांचाच काय पण कोणाचाच त्रास होणार नव्हता. कारण तेथील स्थानिक कारागृहांतील सध्याची वातानुकूल करणारी यंत्रणा काढून टाकून नवी यंत्रणा बसविण्याचे काम करावयाचे होते. हे काम आम्हाला (कंपनीला) मिळावे म्हणून मुदीर हरतऱ्हेने प्रयत्न करीत होता हे मला माहिती होते. या कामासाठी कॅरियर, मित्सुबिशी अशां सारख्या मातब्बर कंपन्यांनी निविदा दिलेल्या होत्या. पण तें काम आम्हालाच मिळाले होते याचा मलाही आनंद वाटत होता. कारागृहाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने काम करतांना अनेक बंधनात राहून काम करावे लागणार होते. तसें हें काम बऱ्यापैकी मोठे होते त्यामुळे निदान चार आठवडे तरी हा कारावास मला भोगावा लागणार होता. कारावासांत फारसे कैदी नसणार हे मी ऐकले होते पण कारागृहातील अधिक्षक, कर्मचारी यांच्या कथा मी ऐकून होतो. आरक्षी (पोलीस), जेलर, सैनिक वगैरे पदांसाठी सहसा येमेन, सूदान, इथिओपिया अशा देशातून आयात केलेल्या कृष्ण्वर्णीयांची भरती केलेली असें. या लोकांचे एकूणच रंग, रूप, देहयष्टी दहशत वाटावी अशी असें. त्यांच्या तावडीत जो सांपडला तो त्यांच्या लहरीपणाची आणि क्रौर्याची शिकार झालाच म्हणून समजा. अर्थात मला त्याचा त्रास होण्याची शक्यता नव्हती कारण आमच्या कंपनीचा शेख राजघराण्याशी संबंधित होता. त्यामुळे आम्हाला सार्वत्रिक वागणुक जरा आदरयुक्त मिळे. आम्हा सर्वांच्या मोटारीवर कंपनीचे नांव ठळकपणे रंगवलेले असें. त्यामुळे वाहतुक शाखेचे आरक्षी देखील आम्हाला विनाकारण अडवीत नसत. पण तरीही या नव्या राक्षसांसमवेत उद्यापासून काम करावयाचे होते. याचे थोडे दडपण मनावर आले होते. हे असें विचार घोळवीत माझी मोटार निवासापर्यंत कशी आली मला कळलेही नाही.
घरी येऊन जरा विसावतो न विसावतो तोच दूरध्वनी घणघणला. खरं म्हणजे मी आता इतका थकून गेलो होतो की आता अंघोळ आणि जेवण करून मी झोपी जाणार होतो. अगदी अनिच्छेने मी रिसीव्हर उचलला. क्षणभर माझ्याच कानावर माझा विश्वास बसेना. फोनवरचा आवाज मुदीरचा होता. माझी नजर सहजच घड्याळाकडें गेली. संध्याकाळचे आठ वाजत होते. इतक्या उशीरा नेहमीचा शिरस्ता मोडून मुदीर सारख्या आसामीने मला फोन करावा हे आक्रीत होते.
मुदीरने उद्या सकाळी सहा वाजतां मुखालयांत बैठक आयोजीत केली होती आणि तो मला प्रत्यक्ष बैठकी पूर्वी मी त्याला त्याच्या दालनांत भेटणार होतो. शेखच्या आणि मुदीरच्या दालनांची ख्याती आम्ही किंवदंतीच्या स्वरूपात अनेकांच्या तोंडून ऐकली होती. त्या दालनांचे स्थापत्य विशारदांनी चितारालेली आरेखनांच्या प्रती (architectural drawings) मी वतानुकूल अघियंता या नात्याने मी पहिलेली होती त्यामुळे मला दालनांच्या भूमितीची थोडी माहिती होती. एकट्या मुदीरचे दालन सुमारें सोळा हजार चौरस फुटांचे होते. दोन अभ्यागत कक्ष, दोन मजलिस (conference room) एक त्याचे स्वत:चे शिवाय त्याच्या सचीवांसाठी एक वेगळे कार्यालय. असें प्रशस्त आणि अत्यंत सुसज्ज असा मुदीरचा महाल होता. अशा काऱ्यालात मला उद्या जायला मिळणार ही कल्पनाच इतकी सुखद होती की कांही वेळेपूर्वीची उद्विग्नता कुठच्या कुठे पळून गेली. प्रत्यक्ष मुदीरची भेंट आणि तीही त्याच्या दालनांत! या अलभ्य लाभाच्या योगायोगाचे मला नवल वाटले.
आता हें सारं आक्रित माझ्या वीतभर पोटांत मावणे शक्य नव्हते. हे आता सडेफटिंग युनियनच्या कानावर न घालणे दंडनीय अपराध झाला असता. आणि दंड म्हणजे या महाभागांना एखाद्या मोठ्या उपाहारगृहात नेऊन जेवण द्यावे लागले असते. निवासी फोन केवळ पेशव्यांकडे होता. त्यांना फोन लावला तर समजलें की स.फ.यू. माझ्याच फोनची वाट होती. किशाच्या कंपनीतला कोणीतरी सुटीवर भारतांत जाऊन परत आला होता आणि सोलापूरहून किशाच्या घरून बेसनाचे लाडू, शंकरपाळे आणि चिवडा घेज़ुन आला होता. अशा गावाकडून येणाऱ्या खाऊच्या गाठोड्या जो आनंद देत असत तो अवर्णनीय असें. हा अनुभव घ्यायला परदेशीच जायला हवें. सगळा अनुत्साह मी कोपऱ्यात भिरकावून बेसनाचे लाडू खायला निघालो. तुकाराम महाराजांच्या ’शेवटचा दीस गोड व्हावा’ या अभंगात थोडा बदल करून मी म्हणत होतो ’दिसाचा शेवट तरी गोड व्हावा’.
क्रमश: