आखाती मुशाफिरी (१४)

उद्या मला तुरुंगात पाठवले जाणार होते.
----------------------------------

         रात्री किशाकडे लाडूचिवड्याचा फराळ तर झालाच पण मग जेवण्याचा आग्रहही झालाच. मग गप्पा आणि रमत गमत चाललेले जेवण यांत रात्रीचे दोन कधी वाजले तें समजलंच नाही. आता घरी कशाला जातोस, झोप इथेच असा आग्रह झाला नसता तरच नवल होते. पण माझ्या डोळ्यासमोर मुदीरचा मिस्किल चेहरा आला. उद्या सकाळी सहा वाजता त्याला भेटायचे होते. सहा म्हणजे अगदी सहा. इथे, मला एक अनुभव आला. व्यापार-उदीमावर आणि शासनावरही अद्याप ब्रिटीशांचा जबरदस्त प्रभाव असल्यामुळें वक्तशीरपणावर कटाक्ष असायचा. अगदी सुरुवातीच्या काळांत मला एकदां डेनिस हर्ले नांवाच्या ब्रिटीश अधिकाऱ्याची सकाळी नऊ वाजतां भेंट घ्यावयाची होती आणि मी जरा उशीराने, म्हणजे साडेनऊ वाजतां पोहचलो तर स्वारी दुसरीकडे निघून गेलेली होती. तेंव्हापासून मी वक्तशीर पणा कसोशीने पाळू लागलो. मला घरी जाऊन थोडी विश्रांती घ्यायला हवी होती. तरच उद्या सकाळी मी मुदीरच्या भेटीसाठी ताजा तवाना असणार होतो. मी निवासावर आलो आणि तात्काळ झोपी गेलो.

         सकाळी सहाच्या आधी ठीक दहा मिनिटे आधी मी मुदीरच्या कक्षापाशी  पोहोचलो. नेहमीचे कार्यालयीन कामकाज सात वाजतां सुरु होत असे. मी एक तास आधी आलो असल्याने मुदीरची स्वीय सहायिका तिच्या जागेवर भेटणार नव्हतीच. काय करावें, सरळ मुदीरच्या कक्षात जावें की न जावें या विचारात असतांनाच पाठीवर एक दणदणीत थाप पडली.दचकून वळून पाहातों तो मुदीर! मला या माणसाची मोठी मजा वाटली. आतिशय कर्तव्यकठोर, कडक, रुक्ष अशी याची प्रतिमा रंगवली गेलेली होती. आणि इथे हा कांही निराळाच दिसत होता. आम्ही दोघे त्याच्या स्वीय कक्षांत जातांच सर्वप्रथम या माणसाने कार्यालयाच्या कोपऱ्यातील छोटेखानी अन्नपूर्णा (cafeteria) मधील कॉफी यंत्र सुरु करून दोन प्याले कॉफी करून आणली आणि मग कॉफीचे घुटके घेत घेत संभाषणाला सुरुवात झाली. आधी तो त्याच्या स्वत: बद्धल आणि मग कारागृहाच्या कामाबद्ध्ल बोलला.

         तो आर्मेनियन होता. पण बरीच वर्षे इंग्लंडमधे होता. तेथूनच त्याने व्यवसाय-व्यवस्थापनाची पदवी मिळवली होती. अरेबिक, पर्शियन आणि आङ्ग्ल वाङ्ग्मयाचा व्यासंगी वाचक होता. भारताबद्धल, भारतीय संस्कृती बद्धल कुतुहल होते. त्यामुळेच तो माझ्याशी ममत्वाने वागत होता. त्यांच्या प्रमाणे मी रोज नमाज़ (प्रार्थना) पढतो की नाही आणि पढत असेन तर कसा याबद्धल त्याला जिज्ञासा होती. त्याच्या निवासावर तो एकदा मला नेणार होता आणि मी त्याला हिन्दी (हिन्दू) नमाज़ पढून दाखवणार होतो.

         कारावासातील वातशीतक यंत्रांचे काम वस्तुत: एका जपानी उद्योग समूहाकडे जाणार होते. मुदीरने मोठ्या युक्तीने मिळविले होते. त्यामुळें ते व्यवस्थितपणे पार पडणे हा त्याचा प्रतिष्ठेचा मुद्दा होता. वीजवाहिनी टाकण्याच्या कामांतील माझा सहभाग आणि माझी कामाची पद्धत त्याला आवडलेली होती. मी कार्य-व्यवस्थापनाचे (works management) विधिवत्‌ शिक्षण घेतले असावे असा त्याचा समज होता. म्हणूनच ही नवी जबाबदारी मी नीट पार पाडेन असा त्याला विश्वास वाटत होता. पण तसें कांहीही नव्हते उलट मी भोळा, भित्रा (timid) आहे अशी माझी ख्याती होती. डोंगऱ्याने तर मला ’भोटमामा’ अशी उपाधी दिलेली होती. त्या कृष्णवर्णीय कारागृह अधिक्षकांचे सहकार्य मिळवून तें काम पार पाडणे अवघड होते. पण मी जर पठाणांना कामासाठी हवे तसें वळवू शकलो तसा या अर्ध-यवनांनांकडून (half mohomadian) देखील सहकार्य मिळवू शकेन असें त्याला वाटत होते. मुदीर मला शक्य ते सहकार्य़ करणार होता. पण ते काळे होते आणि हा त्यांच्या दृष्टीने गोरा होता. म्हणजे त्या वर्णद्वेषाला तोंड देत देत मी काम करणार होतो. मीच तें काम यशस्वीपणे हाताळू शकेन असें त्याला ठामपणे वाटत होते. मी ते काम तडीस नेले तर मला एक रोख रकमेची खास बक्षीसी मिळणार होती. मुदीर माझी जी स्तुती करीत होता ती मनापासून होती की स्वार्थापोटी होती कुणास ठाऊक. मला मात्र त्या भल्या रामप्रहरांत घाम फुटायला लागला होता.  मी मुदीरच्या मोटारीत बसून कारागृहाकडे निघालो तेंव्हा बळी जाणाऱ्या बोकडाला जसें खाऊपिऊ घालून वर सजवतात तसा मी एक बोकड आहे असें मला वाटायला लागले.  

          कारागृहापर्यंत पोहोचेपर्यंत भांबावलेल्या मन:स्थितीतच होतो. राहून राहून एकच विचार मेंदू पिंजून काढीत होता तो म्हणजे ही असली ससेहोलपट माझ्याच वाट्याला कां यावी. माझे बाकी मित्र त्यामानाने बऱ्यापैकी स्वस्थतेची नौकरी करीत होते. बाकीचे इथें आले तसें छोट्या नाजुक मोटारी चालवीत होते. माझ्या वाट्याला पहिले वाहन आले होते, ते म्हणजे लॅन्डरोव्हर नांवाची युद्धांत वापरली जाते तशी मोटार. ती मी पहिल्यांदा पाहिली तेंव्हा मला माझ्या लहानपणी हनुमान जयंतीला गांवाबाहेरच्या एका मोठ्ठ्या पटांगणांत रेड्यांच्या टक्करी होत, त्या आठवल्या. त्यातला धष्ट पुष्ट माजवलेला आणि मद्य पाजून टक्करीसाठीं चेव आणवलेला, नाक आकाशाकडे करून फुरफुरणारा रेडा आणि ही लॅन्डरोव्हर ही दोन्हीही ब्रह्मदेवाने एकाच मुशीतून काढल्या असाव्यात. ती लॅन्डरोव्हर काय आणि आता हे कारागृहाचे काम काय,  माणसांना भेदरवून टाकणाऱ्या यच्चयावत्‌ गोष्टी माझ्यासाठींच जन्माला आलेल्या असाव्यात.

         ’भित्यापाठीं ब्रह्म राक्षस’  ही म्हण सार्थ व्हावी अशी घटना कारागृहाच्या तोंडाशीच घडली. आम्ही दोघी एका महाकाय बंद दरवाजापाशी पुरतें पोहोचण्यापूर्वीच,

         " हेय्‌ ! व्हाऽट्‌ड्या ठिंक यूऽआ‌ऽऽ डूऽईंऽग हिय्‌आऽऽऽऽऽ?"

         असा एक ध्वनिस्फोट कानावर येऊन आदळला. आवाजाचा उगम, एक सुमारें सव्वासहा फुटी, गडद काळपट निळ्या गणवेशांत अगदी फिट्ट बसवलेली काळी कभिन्न देहाकृती होती. तो तेथील सर्वप्रमुख अधिक्षक होता आणि आम्हाला पाचारण करण्यासाठीं स्वत: जातीने बाहेर आला होता. या माणसाचे नांव ’इदी जमील थुंबाना’ होते. खरं म्हणजे, जमील या शब्दाचा अर्थ ’सुंदर, सौंदर्य’ असा होतो पण इथें याच्या शेजारी उभा केला असता तर आपला धर्मेंन्द्र अगदी मदनाचा पुतळा दिसला असतां. त्याचे डोळे, नाक, गाल, ओठ जितके जाड होते तसा त्याचा आवाज आणि स्वरही तितकाच जाड होता. मुदीरची आणि त्याची थोडावेळ अरबी भाषेंत बातचीत झाली. मग त्याची नि माझी रीतसर ओळख झाली. मग त्याच्या कार्यालयांतील इतर लोकांची ओळखदेख झाली. मी, तसेंच उद्यापासून माझ्या देखरेखीखाली काम करण्यासाठीं मला देण्यात येणारे चार कर्मचारी यांच्यासाठीं आवश्यक ती कागदपत्रें, ओळख पत्र इत्यादि देण्यात आले. एव्हाना सकाळचे नऊ वाजत आले होते. आमच्या परतीच्या प्रवासांत मी सहज म्हणून तो कागद पत्रांचा लिफाफा उघडून, उद्यापासून मला सहाय्य करणाऱ्या चारही कर्मचाऱ्यांची नांवे वाचू लागलो तर आश्चर्याचा सुखद धक्का बसला.
         ती चारही नांवे मराठी होती. सावंत, सुर्वे, कांबळी आणि महाडिक. म्हणजे चक्क कोकणी ’गांवकर’! मी हळूंच मुदीरकडें पाहिले. मुदीरच्या चेहऱ्यावर तेंच मिश्किल हसूं होतें. या माणसाच्या व्यवस्थापन कौशल्याला मी मनोमन सलाम ठोकला.

         मुख्यालयांत येईपर्यंत जेवणाची सुटी होत आली होती. आतां दुपारच्या वेळांत उद्याच्या कामाची आंखणी करावी. साधने, सामुग्री यांची पहाणी करवी असा विचार करीत असतांनाच मुदीर म्हणाला " जा आतां घरी जाऊन मस्त झोप. विश्रांती घे. उद्यापासून तूं गजाआड असणार आहेस." असं म्हणून तो गडगडूम हसला. आता मात्र मला या माणसाच्या स्वभावाची बऱ्यापैकी कल्पना आली.

क्रमश: