आखाती मुशाफिरी (९)

वास्तवाला तोंड देण्यासाठी दुस-या दिवशीची सकाळ उजाडे पर्यंत.
-------------------------------------------------------

        दुसरे दिवशी नेहमीप्रमाणे कार्यस्थळावर पोहोचलो. माझ्या पठोपाठ कामगारांची गाडी येऊन ठेपली. आज कामगार बिनबोभाट कामाला लागलेले. काल हुस्नीने त्याचे काम चोख केलेले होते. त्याने काय केले ते समजलेले नव्हते. पण परवा ज्या ठिकाणी तो हाडांचा सापळा होता ती जागा स्वच्छ झालेली होती. पठाण त्या जागी जाऊन पाहून आले आणि फारशी चर्चा न करता कामाला लागले. मी एकदा पाहणी करावी म्हणून कामाच्या जागेवरून चक्कर मारीत होतो. तोंच प्यून, मुख्यालयाचा फोन आला आहे म्हणून सांगत आला. मी झालेल्या कामाचा धांवता आढावा घेतला आणि फोन घेण्यासाठी केबीनवर गेलो.  आस्थापनेचे जनरल मॅनेजर मि. बरनार्ड मार्स्टर्न यांचा होता. त्यांनी मला ताबडतोब मुख्यालयात बोलावले होते. इतक्या वरिष्ठ दर्जाच्या अधिका़-याने मला कां बोलावले असावे याचा अंदाज लागेना. मनांत जरा धडकीच भरली. कारण ज्या असामीचे एरवी
दर्शनही दुर्लभ असायचे त्याने चक्क भेटीला बोलावले होते. मी पळतच साईटवर गेलो आणि कादरखानला ती हकीकत सांगितली आणि मी परतेपर्यंत काम व्यवस्थित चालू राहील असे पहा असे बजावले. कादरखान ती जबाबदारी नीट पार पाडू शकेल आणि बाकी कामगारही त्याचे ऐकतील असा विश्वास एव्हाना वाटायला लागला होता. साहेब कदाचित कामासंबंधी कांही विचारतील म्हणून
एका कागदावर कांही नोंदी करुन कागद बरोबर घेतला आणि निघालो.

        मुख्यालयात मार्स्टर्न साहेबांच्या कक्षापर्यंत पोहोचलो तर त्यांच्या स्वीय सहायिकेने सांगितले की साहेब मजकूर माझी वाट पहातच आहेत. तिने ज्या चर्येने सांगितले ती पाहून मी आधीच एक ग्लास पाणी पिऊन घेतले आणि साहेबांच्या कक्षात गेलो साहेबांच्या कक्षाच्या दरवाजावर टक टक केले. साहेबाने परवानगी दिल्यावर आंत गेलो आणि त्याच्यासमोर उभा राहिलो. साहेब सुमारे अर्धातास बोलला. तो बहुदा आयरिश असावा. त्याचे इंग्रजीचे उच्चार समजणे महा कठिण. त्याने
उच्चारलेल्या एका शब्दाचा उच्चार समजाऊन घेऊन त्याचा अर्थ लागेपर्यंत हा पाठ्ठ्या चार वाक्ये पुढे गेलेला असायचा.

        गोष्ट अशी होती की मी काल लेबर कॅंपवर पठाणांनी दिलेल्या मेजवानीला गेलो ही गोष्ट षट्कर्णी झालेली होती आणि ती जेंव्हा साहेबमजकूरांपर्यंत गेली तेंव्हा ते आवडलेले नव्हते. मुळातच वर्णभेदाचा अंगिकार आणि पुरस्कार करणाऱ्या या गोऱ्यांना माझें बहुजनांत मिसळणे मान्य होणारे नव्हते. समाज श्रेणींतील भेदाभेद कटाक्षाने  जपणाऱ्या ही पाश्चिमात्य संस्कृतीत माणुसकीचा लवलेशही नसणे स्वाभाविक होते. हें मला ज्ञात नव्हते असें नाही. पण त्या विचारसरणीला
इतक्या क्षुल्लक पातळीवर आणून ठेवले जाईल असें मला कधी वाटले नाही. उलट हुकुमशाही प्रवृत्तीच्या या माणसांना माझे माणुसकीला धरून वागणे द्रोहाचे वाटणेच शक्य होते. त्यात साम्यवादाची भीती शोधू पाहणारी भीरुता नक्कीच होती. अगदी साध्या भाषेंत सांगायचे तर पायातली वहाण पायातच ठेवली पाहिजे या तत्वज्ञानाची भलामण त्यांच्या पथ्थ्यावर होती.

        मार्स्टर्न साहेबांच्या बौद्धिकाचा सरळ अर्थ असा होता की, मी पठाणच काय पण इतर कोणाचीही वागतांना पायरी सोडून वागू नये. कामगारांना मी कामगारासारखेंच वागवले पाहिजे. त्यांना त्यांच्या लायकीपेक्षा अधिक मान आणि सवलती देउ नये. हा खटला एकतर्फी होता. त्यात मला माझी बाजू माझी बाजू मांडण्याची मुभा असण्याचा प्रश्नच नव्हता. तूर्तास तोंडी समज दिली गेली. तिचे उल्लंघन म्हणजे गंभीर परिणाम! कदाचित्‌ निरोपाचा नारळ. मी खिन्न मनाने कार्यस्थळावर परतलो.

        कार्यस्थळावर आल्यावर मात्र खिन्नता कुठच्या कुठे पळून गेली. पठाण अत्यंत जोमाने काम करीत होते. कामाचा मागील अनुशेष जवळ जवळ भरून निघाला होता. कालच्या मेजवानीचा हा परिणाम असावा वाटून गेले. ते एक कारण होतेच पण आणखीही एक कारण होते. ते म्हणजे जिथे
तो अस्थिपंजर सांपडला होता तेथपासून पुढे जमीन भुसभुशीत लागलेली होती. पण पठाणांची तर्कमिमांसा निराळीच होती. कादरखान म्हणाला,

       " अच्छा हुवा जो उस मरहूमकी साया निकाल बाहर हो गई. वो सखत
         जमीन उस सायाका अंज़ाम. अब सारा काम मुकम्मल होगा. "

        ही भुताखेताची भीती हास्यास्पद नक्कीच होती. पण ती तशीच राहू देणे हिताचे होते. त्या भीतीनें कां होईना. काम भराभर होत होते.

        जेवणाच्या सुटीला थोडा अवधी बाकी होता. एवढ्यात कादरखान माझ्या जवळ आला. विचारू लागला,
         " क्या हुवा मक्‌तब में ? "
 
मुख्यालयात झालेला प्रकार खरा खरा सांगून टाकावा असें एकदा वाटले. पण मी एक लोणकढी ठेऊन दिली.

    " हमारा काम इन्शाल्ला, बाअंदाज अच्छा चल रह है खान! मुदीरको बहुत  खुशी है. ये काम जल्दी जल्दी तमाम करो. आगे दूसरा काम करना है.  हुकूमतका ज़दीद (मोठें) कलोनी (निवासी आवास संकुल) बनानेका काम  मिला है. हमारा कारवॉं उधर जाना होगा. सुकून मिलेगा."  
 
खान खुश झाला.  उड्या मारीतच जेवायला पळाला.

 गोरे कांही म्हणोत पण माझ्या पद्धतीने मी कामगारांशी जवळीक साधत होतो.  त्याचे खूप चांगले परिणाम दिसून येत होते. साहेबांचा धर्म निराळा होता.  त्यांचे तंत्र निराळे होते.  माझ धर्म निराळा होता. विदुरा घरी उष्टें वेंचणारा  श्री कृष्ण माझा आदर्श होता.

       सहनाववतु सह नौ भुनक्तौ सहवीर्यं करवावहै ।
       तेजस्वीना वधितवमस्तु मा विद्‌विशावहै ॥
 
हा माझा मंत्र होता.

क्र्मशः