आखाती मुशाफिरी (८)

पठाणी सहभोजनासाठी आता वसंताही मजबरोबर थांबणार होता.
------------------------------------------------------------------

       पठाणांच्या वस्तीवर पोहोचलो तेंव्हा अंधारून यायला सुरुवात झाली होती. एका
मोठ्या भूखंडावर चहूबाजूंनी सुमारे बारा फूट उंचीची वीटकामाची तटबंदी, मधोमध
एक भलामोठा दिंडी दरवाजा आणि आंत अत्यंत ओबडधोबड अशा बराकी. अशी
एकूण त्या वसाहतीची रचना. भारतांतील कोणत्याही शहरांतील कारावासाची  आठवण व्हावी अशी. माणसांच्या जेमतेम मूलभूत गरजा पुऱ्या व्हाव्यात इतपतच केली गेलेली सोय. काल इथे आलो होतो तेंव्हा दिंडीदरवाजा खुला होता. आज मात्र बंद होता. अर्थात गाडी आज बाहेरच ठेवावी लागली. दिंडीतून वाकून मी आंत दाखल झालो तसा वश्या बाहेर घुटमळतच राहिला. त्याच्या चेहर-यावर
संदेह अगदी स्पष्ट दिसत होता. आत घोळक्या घोळक्याने वावरणारे पठाण तो निरखीत होता. मी त्याने आंत यावे म्हणून खुणावले तर तो मलाच बाहेर ये म्हणाला. जावेच लागले.
     " कांही खरं नैये बे भोट्या. तुले काय सांगाव आता. पार्टी काय्ची खातं बे,  भ++ ! तुलेच   फाडून खातीन ते. पैन लाव."
       वश्या पोटतिडकीने बोलला यात शंकाच नव्हती. कारण ’भ’काराने सुरु होणारी संबोधने आपसुकपणे त्याच्या तोंडून बाहेर पडणे आणि ’पैन लाव’हे त्याचे शब्द त्याच्या निरागस मनस्विततेचे लक्षण होते. एखाद्या विधानाला हे ’पैन लाव’ (म्हणजे पैज लाव) हे शब्द जोडले की अगदी ठामपणा येणारच अशी त्याची समजूत होती. 
 " कांही तरी काय बोलतो आहेस. अरे असं कांही होणार नाही. मी त्यांना चांगलं ओळखतो तसं काहींही करणार नाहीत आणि कांही झालंच तर तूं आहेसच की." मी त्याला दिलासा दिला. तेंव्हा स्वारी आंत दाखल झाली.
 " मरहब्बा या हबीबी "  म्हणत कादरखानाने पुढे होत  आमचे हात हातांत घेत स्वागत केले. त्यांच्या रिवाजाप्रमाणे त्याने मला आलिंगनही दिले. एरवी मळकट दिसणारे पठाण स्वच्छ आणि स्वच्छ कपड्यात दिसत होते. सगळ्याच पठाणांना ही दावतची कल्पना पसंत पडलेली नसावी.
तशी वसती बरीच मोठी होती पण आमच्या साईटवर दिसणारे सगळेच तिथे दिसत नव्हते. तरी साईटवर दिअसणारे दहा अकरा चेहरे होतेच. त्यांत नुरुलखान, मोईन खान होता. बाकी खानांचीही ओळख करून देण्यात आली. सर्वांनी हस्तांदोलनाने स्वागत केले.

 या कामगारांच्या निवासासाठी एक भली मोठी खोली, प्रत्येक खोलीत सहा दुमजली खाटा (बंकर बेड), म्हणजे बारा असामी एका खोलीत.खोलीला एक वातशीतक आणि वसाहतीच्या मागे सामाईक स्वच्छतालये. अशी सोय केलेली असें.  त्यापैकी एका खोलीतील सामानाची थोडे हलवाहलव करून
दावतीसाठी जमीनीवर एक भली मोठी चटई अंथरलेली. सगळे कडेने बसले. कादरखान आणि नुरुलखान बाहेरून खाद्यपदार्थांची भांडी आणून मधल्या जागेत मांडू लागले. मुसलमानात साळे एकाच थाळीत जेवतात असें मी ऐकले होते आणि आपण भारतीय तर वेगळी थाळी घेऊन जेवतो. आता कसें काय होणार या विवंचनेत वश्या तर असणारच होता पण मीही तशी वेळ आली
तर कसें तोंड द्यायचे याचा विचार करू लागलो. पण जेंव्हा पदार्थांच्या हंड्या मधें मांडून झाल्यावर प्रत्येकासमोर एकेके थाळी मांडली आणि दोन दोन कटोरे आले तेंव्हा जीव भांड्यात पडला. केलेले सगळे पदार्थ एकाच वेळी पण भरपूर वाढले गेले आणि सगळे जेवायला बसले. जेवणाची सुरुवात जरा दाटसर सूप असावे अशा पदार्थाने झाली.त्याला शोरबा म्हणतात असें समजले. गांवी आई निरनिराळ्या डाळींच्या भरड्याचे (कळण्याचे) कढण करीत असें तसा तो प्रकार होता. पण फार चविष्ट
होता. दोन प्रकारच्या भाज्या, एक कोशिंबिरीसारखा प्रकार त्यात सफरचंदाचे तुकडे आणि सुक्यामेव्याचेही तुकडे होते. लुबनानी खबूस म्हणजे लांबट आकाराची मैद्याची खरपूस भाजलेली आपल्या नानसारखी जाड रोटी. ती इथे बेकरीत तयार मिळे. तिचे दोन तुकडे करून लोण्यावर (बटर) जराशी शेकलेली. आणि तुपावर परतून पाकात घोळवलेले खजुराचे काप असा एक गोड पदार्थ. असा एकूण बेत होता. भाज्या मात्र जरा तिखटच आणि तेलच तेल असलेल्या.  वश्या मात्र सुरुवातीला जरा धास्तावलेला. मी खातोय की नाही हे पहातच जेवत होता. भाजीची एकेके तुकडा बोटाने दाबून पाही. जेवतांना कांही हलके फुलक्या गप्पा चाललेल्या.  मात्र एक गोष्ट मला आवडलेली. गप्पा मोडक्या तोडक्या होईना उर्दूतून चाललेल्या. कांहींना बोलता येत नसले तरी दाद देत होते. त्याअर्थी त्यांना बोलणे समजत होते. तेथील चालीरीती, हुकुमतीची राजवटीचे कांही एककल्ली विनोदी मासले. अनिवासी परदेशियांना, मग तें मुस्लिमी देशंतुन आलेले असले तरी, मिळणारी दुय्य्म दर्जाची वागणूक असें कांही बाही विषय होते.  इतका वेळ वश्या गप्पच होता. शेवटी कादरखान म्हणाला
      " शाजी, ये मेहमानको बुत क्युं बनाके रक्खाए. इस्को बोलनेकी जुबान हय के नही. के तारीफ है तुम्हारे दोस्त की "
        खरच एक चूक झालेली होती. खरं म्हणजे ज्याची त्याने स्वत:च ओळख करून द्यायची हा इथला प्रघात. वश्या आधीच भांबवलेला त्याला हे सुचणार नव्ह्तंच. आणि सुचलंच तो काय म्हणणार होता !
       " ही तरकारी कायची केल्ली हो भौ. थे आलु गिलु घातले वाट्टे. लेकिन थे अदरक गिदरकचा ज़ायका काई येऊन नही राह्यला बाप्प्पा. अन थे सांभारचाही काही ठिकाना लागला नाही. काऊन हो भौ ?"
        आता वश्याची ही रसवंती ऐकल्यानंतर त्या पठाणाची काय अवस्था झाली असती ते एक अल्लाच जाणे. कारण वश्याला फक्त दोनच भाषा येतात असा माझा समझ होता. एक इंग्रजी आणि ही असली मराठी. त्याचं इंग्रजीही फक्त शेक्स्पिअरलाच समजलं असतं. ’ मला माहित नाही ’
या वाक्याचं भाषांतरही तो ’ आय डझ्नॉट नो ’ असं करीत असे. मात्र त्या नंतर वश्या उर्दूतून असा कांही ’पेश’ आला की, तें अमीर खुश्रो, मीर, गालिब बिलिब नागपूरला धंतोलीत याच्या शेजारीच राहत होते आणि रोज पान खायला वश्याच्या घरी येत होते.  

      " बंदेको वसंत केहते है. वसंतका मतलब है बहार. आपने जो खातिरदारी पेश की वो काबिले तारीफ है. ता कयामत  हम आपके शुक्रगुज़ार रहेंगे " वगैरे वगैरे.
        वश्याची ही रसवंती माझ्या तर पार डोकयावरून गेली. पण पुढे आश्चर्य असें की त्या बैठकीचा वश्याने ताबाच घेतला. त्याच्या भौगोलिक सामन्यज्ञानाचे अद्भुत दर्शन आम्हा सर्वांनाच घडले. त्याला कज़गिस्तान, अफगाणिस्तान,तुर्कमेनिस्तान, इराण, इराक, या देशांबद्धल बरीच माहिती होती. हे पठाण बहुतांशी पाकिस्तानच्या सरहदी लगतच्या गांवतून आलेले होते हे त्याला माहिती होते. तुर्कमेनिस्तानामधून वहात अफगणिस्तानमधें येणा-या मर्गब, अमन्दर्या सारख्या नद्यांची त्याला माहिती होती. त्याला अबेस्तादा सरोवर, हिंदुकुश पर्वताच्या रांगा, सिन्काई हिल्स जवळील ज़बुक,  मध्य अफगाणिस्तान मधील गज़नी, तिच्या उत्तरेकडील काबूल,कंदाहार सारखी शहरे, ख्वाजा मोहम्मद नांवाचे धर्मस्थळ, असं आणि यापेक्षा कितीतरी अधिक माहिती होती. बापरे. मी तर थक्कच झालो. पठाणांचे तर विचारायलाच नको. या तिनशे पौंडाच्या ऐवजाला त्यांनी डोक्यावर घेउन नाचायचेच बाकी ठेवले होते.
         अखेर हात तसेंच खरकटे ठेऊन रंगलेल्या गप्पांना आवर घातला गेला तेंव्हा रात्रीचे अकरा वाजले होते. इतक्या उशीरा रस्त्याने घरी जाणे सोपे नव्हते. गस्त घालणारे पोलीस किती ’प्रेमळ’पणें वागतात याची कल्पना होती. वश्याला त्याच्या ठिकाणावर सोडून आलो ते मनोमन त्याची तारीफ करतच.
         या मस्त रंगलेल्या मेजवानीची कुणकुण दुसऱ्या दिवशी मुख्यालयाला लागेल आणि तो गुन्हा समजला जाऊन मला चौकशीसाठी बोलवलं जाईल असं स्वप्नही त्या रात्री मला पडलं नाही. मस्त झोप लागली. वास्तवाला तोंड देण्यासाठी दुसऱ्या दिवशीच्या सकाळ पर्यंत.

क्रमश: