आखाती मुशाफिरी ( मध्यंतर )

राम राम हो मनोगतवाले,

आशे काय पाहून राह्यले माह्याकडे बाप्पाहो तुमी? काय पेहचान नै लागून राह्यली माह्यी तुम्हाले?
नाचीज़को वसंत गडकरी......! छोडो बाश्शाहो ! थे भोट्या ऐकंन तं माह्या कानाखाली जाय काढाले धावंन.
एक तं याले उर्दू काई हजम होत नाही आन्‌ कोनी बोल्लं तं याहीचा भेजा सरकते.

पण कांही म्हना देवाहो, याहिचा भेजा म्हंजे बिलकुल मसाला पट्टी. तब्बेतीनं ज़ायका घ्यावी अशी.  सुपारी गिकारी, चुना गिना एकदम्‌ कायदेसे. हा पैदा होनेके वखत, देवाने याच्या वासते भेजा तयार केला, तं हा भिडू, देवाले भेजाचा सेप्सिकेशन (specification)विचारून राहला. आता देव काय देतो, थे गलत राह्यते कां बाप्पा ? पन भोट्या काई सीधी बात मानंन तं त्याहिचे पितर नाही उद्धरणार ? देवाले आला गुस्सा. त्याहिनं याचा भेजा फ्राय केला आन्‌ टाकला याच्या गाडग्यात.  आन्‌ मंग काय होते? हे अस्ले ऐबी नमूने पैदा होतेत. नै तं काय होते!

बाप्पाहो, तुमी तं खाली माह्यी बातच सुनून राहिले. काई विचारून तं नैच राह्यले. का आता मी कोन अन्‌ थे भोट्या कोन. थे भोट्या? याने मतलब?  दुबईत याहीने काय झमझमा केला थे सांगून नै राह्यला का तुम्हाले?

दुबई?

काय सांगावं राजेहो, तुम्हाले! पोट्टा कोठे गेला तं दुबईत गेला, असंच सांगावं लागते इंडियातले मान्सान्‌ले.
थे बहरीन गिहरीन, सौदी गैदी, कांही समजतं का आपल्या मानसान्‌ले? एक पोट्टा ’रास-अल्‌-खयमा’ ले गेला. तं त्याहिची माय पडोशान्‌ले सांगे, का,  माहा पोट्टा ’रस्सा खीमा’ गेला. काय समजतीन पडोसी बापडे? थे समजले कां पोट्टा हररोज खीमा रस्सा खाऊन ऐश करून राह्यला. आन्‌ मायले तं खायाले आलूची तरकारी मुश्किल झाली.

माले एक सांगा बाप्पाहो तुम्ही, तुमचा पोट्टा का पोट्टी अमेरिकेत गेली, तं काय सांगता तुम्ही ? अमेरिकेला गेली अशेच ना? नेमका कोठे गेला हे सांगता का ? थो सदाशिवपेठ्या पेशवा सांगे का त्याहिची चुलती स्टेट्‌स मधे राह्यते. आता ही माय इश्टेट्मधे राह्यते का मकानीत राह्यते, मालूम करून काय करू मी! अरे, पन थी राह्यते कोण्या देशात? बरं याले तसं इचारलो तं माह्याकडे असा पाहे कां गयात कवड्याची माळ आन्‌ डोक्याले पिसांची टोपी पहेनून राह्यलो मी!

तं काय बोलून राह्यलो मी तुम्हाले?

हां, तं या भोट्याले परवा फोन केला तं सांगे का, तुम्हाले दुबईतला झमझमा सांगून राह्यला. नाही कां ?
लेकिन सच बोले तो, या भोट्याले रायटिंगचा भल्ला कंटाळा. याले शायेत मास्तरनं ’मी पाहिलेली मुंबई’ असा निबंध ल्येहे म्हून सांगितलं तं या गैब्य्यानं भुसावळ पासून बोरीबंदर पोत्तो स्सग्‌ळ्या ठेसनांची सिरिफ नांवं लिहून काढली आन्‌ मास्तरांची कानाखाली खाल्ली. आन्‌ हा भोट्या, हकीकती लिहून राहिला ? हां आता आदमी बुढाप्यात काई पागलपना करते खरा. पण रायटिंग स्टोरीज ? या भोट्याले हिफाज़तीनं घ्या बाप्पाहो.

पण या भोट्याले फोका मारायची भल्ली आदत. आदमी एकदम सोला आना! पण त्याहिच्या जबानीचा लगाम जरा ढिल्ला राहून गेला. साला राईसपलेट खाऊन येईन. लेकिन तरफदारी अश्शी पेश करीन का जसा कांही हा ताजले नही तो शेरेटनले ब्यांकेट खाऊन आला. या भोट्याले मी भोट्या का म्हन्‌तं मालूम? स्सांगतो. ऐका.

बचपनीत या भोट्याले याच्या मायनं एक रोज़ बझारमधून पावशेर घी आणायला सांगलं. आता हा कां शिद्धा घी आणीन ? याले पंचाईतीच फार. सुटला याले त्याले पुसत, बेहतरीन घी कोठे भेटेल म्हणून. आन्‌ कोणीतरी याचा केला मामा. याले खबर देल्ली का नंदू हलवाया कडे भेटेन बेहतरीन घी. आता नंदू हलवाई होता दोन कोस दूर. भोट्यानं केला टांगा. झेऊन आला बेहतरीन घी. सहा रुपैयाचा घी, आन्‌ नऊ रुपैये देल्ले टांगेवाल्याले! आता याले भोटमामा म्हणावं नै तं काय अकबर बाश्शा म्हणावं. आन्‌ ही ष्टोरी भोट्यानं मला तं सांगितलीच पण त्याच्या पोट्या पाट्ट्याले बी मालूम पडली. बेशरमीकी हद हो गयी और जनाब उसके झंडे लेहरा रहे है.

आता तुम्हीच सांगा जनाबे अलि, थ्या पठानाने काय तर्कीब गिर्कीब सुचवली आन्‌ फत्ते भी केली. तं काय तुम्ही जेबातल्या नोटा गिटा उधळान्‌ कां. पण भोट्याले हे सांगावं कोणी ? तुम्ही तरी सांगा त्याले बाप्पाहो. थ्या टायमाले जवानीत काय दिल्लगी केली ती केली, आता बुढाप्यात भी अशी दिल्लगी हा करीन तं पोट्ट्यांचे पोट्टे पाट्टे मजाक करतीन याचा.

बाप्पाहो, भोट्या आदमी सोला आने है. तुम्ही छू म्हट्ले कां छाती फोडून धावन्‌ असा ईमानी आहे. बेट्यानं बहोत पापड बेले जिंदगीभर. आता थे भुनून खाऊ घालून राह्यला तुम्हाले. काय गलती गिलती केली तं माफ राजे. थ्या वक्ती भोट्या नसता भेटला तर हा डोंगऱ्या (नाचीज़की डोंगऱ्या नामसे भी पेहचान है) तुम्हाला भेटला नसता. या एकदा नागपूरले. संत्री गिंत्री खाऊ. कन्हानचे पाणी पिऊ.

राम राम !