आखाती मुशाफिरी (१५)

ती चारही नांवे मराठी होती.
----------------------------------------
 मुदीर जरी मला घरी जाऊन आराम कर म्हणाला होता तरी मी  कारागृहाच्या कामाचे आरेखन, नकाशे, त्या कामासाठीं निवडली गेलेली संयंत्रे, त्यांच्या माहिती-पुस्तिका पाहावीत या उद्देशाने कार्यालयातच कांही वेळ बसणे पसंत केले. सध्या कारागृहात कॅरियर कंपनीची संयंत्रे बसविलेली होती. ती कारागृहाच्या मध्यवर्ती कार्यालयाला थंड हवा पुरवीत होती. कालांतराने आणखी कांही कक्ष विस्तारित केले गेले होते. त्यातील खोल्यांना गवाक्ष-वातशीतक (window airconditioners) बसवले गेले होते. त्यांची संख्या सुमारे चाळीस होती. त्यातील कांही नादुरुस्त होते. त्यांची दुरुस्ती करण्यापेक्षा तो विस्तारित प्रभाग मध्यवर्ती वातशीतक घटांना (central airconditioning plant)  जोडून द्यावयाचा होता. अर्थात्‌च नवीन वात-वाहिकांची ( air circulating ducts) उभारणी करावयाची होती आणि सध्याची संयंत्रे काढून त्या ऐवजी मोठी अधिक क्षमतेची संयंत्रे बसवावयाची होती. या साऱ्या योजनेची आरेखने मी नीट पाहून घेतली. ही योजना ज्याने आंखली होती त्या विल्यम्‌स क्लार्क या अभियंत्याला मी भेटलो. जी चार माणसें माझ्या बरोबर हे काम करणार होती त्यांनाही मी मुख्यालयांत बोलावून घेतले.

 गजानन सावंत, केशव सुर्वे, महादू कांबळी आणि वामन महाडिक अशी ती मंडळी होती. गजानन सावंत, केशव सुर्वे हे दोघे चांगले अनुभवी होते. मुंबईला त्यांनी व्होल्टास मधे काम केलेले होते. महादू कांबळी आणि वामन महाडिक हे दोघे मात्र नवीन होते. त्यांना अनुभव फारसा नव्हता. त्यांनी नौकरी मिळवितांना, कामाच्या प्रत्यक्ष अनुभवाची जी प्रमाणपत्रें सादर केली त्यावरील व्यावसायिकाचे नांव माझ्या परिचयाचे नव्हते. पण मुंबईतील सर्वच तत्सम व्यावसायिक मला माहिती असण्याची शक्यता नव्हती म्हणून मी त्याचा फारसा विचार केला नाही. त्या सर्वांना मी सकाळी दुसऱ्या दिवशी साडेसहा वाजता तयार राहावयास सांगितले. त्यांना त्यांच्या कामगार तळावरून (labour camp) मी कामाच्या ठिकाणी घेउन जाणार होतो. त्यासाठीं मला एक छोटी मालवाहू मोटार (pickup van) देण्यात आली.

 दुसरें दिवशी सकाळी मी कामगार तळावरून ही फौज घेउन कारागृहाकडें कूच केले. मुदीर परस्पर तेथें आला होता. तो आज आमची सर्वांची तेथें व्यवस्था लावून देणार होता. ओळखपत्रें, कार्य-अनुज्ञा (work permit)  तेथील मुख अधिक्षकाकडें सुपुर्त करणे इत्यादि सोपस्कार पार पडे पर्य़ंत हे चार जण कांवऱ्या बावऱ्या नजरेने तो परिसर न्याहाळीत होती. त्यांना विधिवत्‌ आंत दाखल करण्यापूर्वी नियमाप्रमाणें त्यांनी आपली झडती देणे गरजेचे होते. या कामासाठीं तेथील दोन आरक्षी त्यांना आंत घेऊन गेले, मी व मुदीर इदी जमीलशी बोलत बसलो. इदी जमीलला इथें सगळे केवळ इदी नांवाने संबोधित होते.

  इथें हा इदीच केवळ इंग्रजी बोलू शकत होता. बाकी सारे अरेबिक भाषिक.  या कामगारांना तपासणी कक्षांत जाउन कांहीं मिनिटेंच झाली असतील नसतील इतक्यात आंतून मोठमोठ्याने बोलण्याचा आवाज येऊ लागला. आधी इदी तिकडें धावला आणि त्याच्या पाठोपाठ आम्ही दोघें. ही कोकणी जनता आणि तें कृष्णवर्णीय आरक्षी यांच्यामधें तुंबळ भांडण सुरू झाले होते. आम्ही आंत गेल्यावर आधी सगळ्यांना शांत व्हायला सांगितले. मी त्या चारही जणांना जरा बाजूला घेतले आणि काय झालें तें विचारू लागलो.

 महादू आणि वामन फारच प्रक्षुब्ध झालेले होते आणि संतापाने थरथरत होते. मी विचारले, "काय झाले?" महादू पुढें झाला. सांगू लागला,

 " हा काम माका नाही जमायचा. मेले कपडे काढा म्हणालें.मिया सांगान ठेंवतंय. मेल्यांची नजर कांही ठीक नाहीं असां. हांऽ! "

 " गप्प रहा " मी ओरडलो आणि कपाळावर हात मारून घेतला. काय सांगावं आता यांना. अरे बाबांनो  हा तुरुंग आहे आणि सुरक्षिततेच्या नियमाप्रमाणे आंत जातांना झडती द्यावीच लागते. हे मी त्यांना सांगत होतो इतक्यात इदी आमच्या जवळ आला आणि कडाडला,

 " चालते व्हा तुम्ही सगळे इथून. या मूर्ख माणसाच्या खिशात कांही तरी आहे. कदाचित्‌ बॉम्ब! नाही, मी तुम्हाला काम करायची परवानगी देऊ शकत नाही."

 एव्हाना बाकी आरक्षी आणि मुदीर यांच्यात अरेबिकमधें चर्चा चालू होती. नंतर मुदीर माझ्या पाशी येऊन ओरडू लागला. त्याच्या चेहऱ्यावरच्या मिश्किल भावाने आता क्रुद्ध स्वरूप धारण केले होते. तो गरजला,

 " काय तमाशा आहे हा? हा माणूस झडती कां घेऊन देत नाही? काय आहे याच्या खिशात? आणि ते मला कांही माहीत नाही. या कामाची सुरुवात अशी झालेली मला खपणार नाही. ही माणसें बऱ्या बोलाने काम करत असतील तर ठीक आहे. नाही तर मी या माणसांना इथल्या इथें याच तुरुंगात डांबण्याची व्यवस्था करतो.
आणि, अरे देवा, मी कां ही डोकेफोड करतो आहे. तें मला कांही माहिती नाही. काम झाले पाहिजे म्हणजे झालेंच पाहिजे. काय करायचे तें तुझं तू ठरव. मी चाललो."

  असं म्हणून मुदीर निघून गेला आणि आता काय करावें या विचारात पडलो. विचार केला, प्रश्न झडतीचा आहे. काढूं काहिंतरी मार्ग. मी इदीला म्हणलो,

 "  घ्या तुम्ही झडती. माझ्या देखत घ्या. यांच्या खिशात बॉम्ब सांपडला तर तुम्ही याला गोळ्या घाला. मी कांहीही म्हणणार नाहीं.  मग तर ठीक आहे ना?"

 इदीने माझ्या प्रस्तावाला मान्यता दिली आणि झडती सत्र सुरूं झाले. महादू कांबळीला मी मुद्दाम मागे ठेवले आणि बाकी तिघांची तपासणी सुरु झाली. धातूशोधक यंत्राच्या (metal detector) तपासणीतून ते तिघे निरपवाद पार पडले मग अंगझडतीही वरवर झाली. आता पाळी आली महादू कांबळीची. तो धातुशोधकापाशी जातांक्षणी ते यंत्र धोक्याचा इशारा देउ लागले. महादूचा चेहरा आक्रसला. तो आरक्षींना अंगाला हात लावू देणार नाही हे माझ्या लक्षांत येताच मीच पुढें होऊन महादूच्या खिशाला हात घातला आणि तो  ’बॉम्ब’  बाहेर काढून टेबलावर ठेवला. तंबाखूची डबी होती ती.

क्रमश: