आखाती मुशाफिरी (११)

 मात्र हा खेळ संपू नये असं आता वाटत होतं.
--------------------------------------

 मुदीरचे किंवा आमच्या शेखचे दर्शन घडणे हेंच पठाणांसाठीं मोठे अप्रूप होते. आणि इथें तर मुदीर चक्क पठाणांशी गप्पा मारून गेला होता त्यामुळे तर आनंदाला पारावार नव्हता. मुदीर पठाणांशी काय बोलला तें मला मोईनखानाकडून कळले. पठाणांनी मला दावत दिली हे मुदीरला आवडले होते. तो त्यांना म्हणाला होता,

  "मेहमाननवा़ज़ी हा प्रत्येक सच्च्या मुसलमानांचाच काय पण साऱ्या जगाचा आद्य धर्म आहे. फक्त तुमचा हेतू स्वच्छ असला पहिजे. एक माणूस म्हणून तुमचा नवा साहेब कसा आहे तें तुमचे तुम्हीच ठरवा. तो माणूस असेल तर तुम्ही माणूस बना. नाही तर तुम्ही राक्षस तर आहातच. तुम्ही केलेले कामही उत्तम आहे. हे काम लवकर संपवा. मी तुम्हा सर्वांना खास बक्षीश देणार आहे." 

 हे सारे मोईनखानने सांगितले. तें ऐकून माझ्या मनांत मुदीरबद्धल आदर निर्माण झाला. आखातातील आतापर्यंतच्या मुशाफिरीत मी पाहिलेला तो पहिला सहृदय माणूस होता. शिवाय त्याला कामगारांचे मानसशास्त्र चांगलेच अवगत असावे. कामगारांना प्रोत्साहित (motivate) करण्याची त्याची हातोटी मला फार आवडली. त्याने बक्षीश देण्याचे कबूल केले त्याचे मात्र मला नवल वाटले नाही. मुदीर किंवा शेख खुश झाला तर कांही ना कांही बक्षीस नक्की देत असें. इथें तशी पद्धत होती. देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी आणि आजही इथे सरंजामशाही होतीच. देशाला राजा होता आणि संस्थानिकही होते. बक्षीसे देणे हे राजेशाही औदार्याचे आणि मिजाशीचे लक्षण होते. बक्षीस सहसा रोख रकमेंतच असायचे. ते सामुदायिक असेल तर सहसा त्याचा विनियोग जल्लोषी मेजवानीसाठीं केला जाई. 
 
 मोईनखान आताशा तो माझ्याशी बोलण्याचा बराच प्रयत्न करीत असे. त्याची प्रकृती आता बरी होती. जी कांही औषधयोजना त्याला सरकारी दवाखान्यातून मिळाली होती त्यामुळे त्याला बरें वाटत होते. खरें तर यांत मी कांहीच केले नव्हते पण तो उगीचच माझे आभार मानीत असे. या पठाणांना वैद्यकीय उपचार मिळण्याची सोय असूनही ती त्यांना दिली जात नव्हती. इथें कष्ट करण्यासाठी येणारा प्रत्येक माणूस तंदुरुस्त असायलाच पाहिजे हे तत्व बरोबर होते.  पण वेळ कांही सांगून येत नाही. त्याला योग्य तो उपचार मिळायला पाहिजे असें मला वाटें. पण त्याचा काय उपयोग होता. इथें कामासाठीं येणाऱ्या सर्वच माणसांना कमीअधिक प्रमाणांत गुलामासारखेंच वागवले जात होते. सगळेंच कांही मुदीर सारखे नव्हते. हाती आलेल्या अधिकाराचा उपयोग इतरांना छळण्यासाठी वापरण्याची हौसच अधिक दिसून येते आणि या विकृतीला बळी न पडणारा विरळाच.

 वीज वाहिनी जमीनीतून टाकण्याचे काम जसजसें संपत आले तसतसा कामाचा जोश वाढत गेला. कांही अडचण आली तरच मी कामाच्या ठिकाणी असावे. एरवी मी केबीनमधें निवांत वसावे, आराम करावा असा आता पठाणांचा आग्रह असें. पण माझा बहुतेक वेळ त्यांच्या वरोवरच जात असें. कारण कांही काम न करता बसून राहण्याची संवय नव्हती. तो माझा स्वभाव नव्हता. काम जसें एक दिवसावर येऊन ठेपले तसे कामगारांची गडबड वाढली आणि वातावरणच बदलले. ज्या गांवासाठी ती वीजवाहिनी टाकली जात होती तें गांवही जवळ आल्याने कांही गांवकरीही आता कुतुहलाने कामाच्या ठिकाणी घोळक्याने फिरकत. त्यांत पोरेटोरेच अधिक. आपल्याकडेंही असेंच चित्र अनेकदा दिसते. खेडेगांवात अगदी पोस्टमन जरी बटवड्यासाठी गांवात आला तर चिल्ली पिल्ली त्याच्या सायकलच्या मागे पळणारच आणि शहरांतही एखादी जरा वेगळी  विदेशी असामी दिसली की भल्याभल्यांनाही आपले काम विसरून त्यांच्याकडे पाहाण्याचा मोह आवरत नाही. माणसाच्या नाविन्याच्या या नैसर्गिक कुतुहलाचे मला नेहमीच नवल वाटत आले.

 अशाच एका संध्याकाळी. कांही कामागार राहिलेले काम उरकण्याच्या मागे आणि कांही शेवटी न लागणाऱ्या साहित्याची आवरासावर करण्यात मग्न. सगळ्यांनाच कधी एकदा हे उघड्यावरचे उन्हातान्हातले काम संपवतो असें झाले होते. कारण त्यानंतरचे काम इतके जिकिरीचे असणार नव्हते. तसें कुणालाच कांही माहिती नव्हते. पण पण यापुढील वीजवाहिन्या आरोहित्राला (transformer) जोडणे, गांवात त्या आधीच विस्तारलेल्या कमी दाबाच्या वाहिन्या आरोहित्राला जोडणे अशी कांमे सुरु होणार होती. श्रम त्या मानाने कमी होणार होते. शिवाय कामांत विविधता असणार होती. कामातील विविधताही मनोरंजक असते आणि श्रमांचा ताण जाणवत नाही. सगळेच पठाण त्यासाठी लागणार होते असें नव्हते. पण कोण कुठे जाईल याची उत्सुकता होती. अशा रितीने सारे कांहींना काहीं व्यवधानात होते.  एवढ्यात कामाच्या शेवटच्या टोकाशी कांही तरी अघटित घडले असावा असा कोलाहल झाला. सगळे हातातले काम टाकून तिकडे धावले. मीही कामाच्या गस्तीसाठी मिळालेली जीप तिकडे पिटाळली.

 शेवटच्या टप्प्यातली धांदल, बघ्यांची झालेली गर्दी. त्यातून अति उत्साही कार्टी चरावरून इकडून तिकडे उड्या मारण्याचा खेळ खेळू लागली. त्यांना हांकारताना पठाणांची दमछाक झालेली. अशातच एक कार्टं चरांत पडलं.  त्याला वाचवण्यासाठी उडी मारण्याच्या भरांत एक पठाण माती ढकलणाऱ्या यंत्राच्या चाकाखाली आला. चाक कसले ते!  चाक म्हणायचे पण रणगाड्याला असतो तसा तो कांटेरी चाकावर फिरणारा पोलादी पट्टाच असतो. आणि त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाने ते यंत्र तात्काळ थांबवण्याचा जो प्रयत्न केला त्यांत ते एकाबाजूने चरांत घसरले. बघे घाबरून पळाले. मात्र काम ठप्प झाले.

 कांही क्षण कोलाहलात गेल्यावर कोलाहल थांबला आणि शांतता पसरली. जो तो एकमेकाकडे पहात होता, यदृच्छयेने झालेल्या अपघाताचा विचार करू लागला. माती-ढकल्या (बुलडोजर)चा एक भाग घसरून  चरांत टाकलेल्या वीज वाहिनीवर पडला होता. वीज वाहिनीवर विटांची रांग होती म्हणून तिला सध्यातरी कांही इजा पोहोचलेली नव्हती. तो पुन्हा चालू करून बळाने वर काढता येणे शक्य होते पण विटा चक्काचूर होऊन वीज वाहिनीला  चांगलीच इजा पोहोचणार होती. आता ते धूड उचलून सरळ करणे भाग होते. त्यासाठी क्रेन लागणार होती. क्रेन खूप दूरच्या एका दुसऱ्या साईटवर होती. तिला निरोप देऊन ती येई पर्यंत कदाचित्‌ दीड-दोन दिवस लागणार होते. साऱ्यांचा हिरमोड झाला होता. क्रेन येईपर्यंत बाकी आवरासांवर करून घ्यावे म्हणून कामगार बेसकॅंपवर पिटाळले आणि मीही फोन करून अपघाताची खबर मुख्यालयाला द्यावी म्हणून केबीनकडें वळालो.

 मी केबीनामधे जातांच आधी दोन पेले पाणी घटाघटा प्यालो आणि खुर्चीत बसलो. खरं म्हणजे मी अगदी चिडून गेलो होतो. अडचणी माझी पाठ सोडीत नव्हत्या. आता हे क्रेन मागवण्याचे प्रकरण म्हणजे वैताग होता. काय झालें, कसें झालें याचा जाब जबाब देणे, चौकशी झालीच तर तिलाही तोंड देणे. या सगळ्या तपशीलाची नोंद करणे. अहवाल तयार करणे. मला ही असली कारकुनी करण्याचा मनस्वी कंटाळा. पण ’ज्याचा कंटाळा त्याचाच वानवळा’ या म्हणीचा प्रत्यय येणार होता. मुख्यालयाला खबर देण्यासाठी फोन लावणार इतक्यात एक आडदांड पठाण केबीनमधे घुसला आणि अरबी भाषेंत तावाने कांही तरी सांगू लागला. मी आधीच इतका वैतागलेला, त्यात हा माझ्या वैतागात भर टाकायलाच जणू आलेला. मी त्याला  हाकलून देण्याच्या विचारात असतांनाच पाठोपाठ कादरखान अवतरला आणि सांगू लागला,
  
 " शाबजी ये महंमदखान!  कुच तर्कीब ले के आया है. "

 हा आता आणखी काय दगडाची तरकीब सांगणार होता कुणास ठाऊक! पण म्हटले, सांग बाबा ! त्याच्या तरकीबीने क्रेनचा द्राविडी प्राणायाम वाचणार असेल तर तो मला हवाच होता. मग त्या दोघांचा अरवी भाषेत एक लडिवाळ संवाद झाला आणि कादरखान मला ती तरकीब सांगू लागला. ती अशी होती की, केबल ओढणारे यंत्र सुटे करून घ्यायचे. साईटवरच्या भांडारात एक भली मोठी पोलादी दोरी (sling) होती ती या यंत्राच्या आणि अपघातग्रस्त यंत्राच्या मधे बांधायची आणि या यंत्राने ते यंत्र (बुलडोजर) ओढून धरायचे. ते पुरेसे वरती उचलले गेले की निर्माण होणाऱ्या सांपटीत विटांचा केबलवर संरक्षक थर टाकायचा आणि नंतर ती पोलादी दोरी काढून घ्यायची. केबलवर विटांचा संरक्षक थर दिला तर बुलडोजर चालू करून बाहेर काढून घेता येणार होता. मी जरासा विचार केला, कल्पना चांगली आहे, पण जरा धाडसाची आहे. केबल ड्रम उतरवणे आणि पुन्हा वर चढवणे कष्टाचे होते. पण केबल कमी झालेली असल्याने त्याचे वजनही कमी झालेले असणार हा युक्तिवाद बरोबर होता. ते कष्टाचे काम पठाण विनातक्रार करतील असा भरवसा कादरखानाने दिला. मी त्या योजनेला मान्यता दिली. ही सारी मोहीम कादरखानाने राबवावी, मी इतका थकलो आहे की मी तिथे येणारही नाही या माझ्या म्हणण्यालाही कादरखानाने मान डोलवून मान्यता दिली.

 त्यानुसार जमवाजमव करून कादरखानाने मोहीम फत्ते केली तेंव्हा झालेल्या जल्लोषाच्या आवजाने मी त्या जागेवर गेलो. त्या महंमदखानाने खरोखर मला एका फार मोठ्या त्रासातून वाचवले होते. त्याने अभिमानाने हस्तालोंदनासाठी हात पुढे केला तर मी त्याला मिठीच मारली. पठाण जल्लोष करीत माझ्याभोवती नाचत होते. कळत नकळत मीही त्यांच्या समवेत नाचत होतो. पठाण ’बक्शीश, बक्शीश !’ ओरडत बक्षीस मागू लागले, त्यासरशी मी खिशातून माझा बटवा काढून त्यांत होत्या नव्हत्या तितक्या नोटा काढून महंमदखानाकडे भिरकावल्या.

क्रमश: