ह्यासोबत
- आखाती मुशाफिरी (१)
- आखाती मुशाफिरी (२)
- आखाती मुशाफिरी (३)
- आखाती मुशाफिरी (४)
- आखाती मुशाफिरी (५)
- आखाती मुशाफिरी (६)
- आखाती मुशाफिरी (७)
- आखाती मुशाफिरी (८)
- आखाती मुशाफिरी (९)
- आखाती मुशाफिरी (१०)
- आखाती मुशाफिरी (११)
- आखाती मुशाफिरी ( मध्यंतर )
- आखाती मुशाफिरी (१२)
- आखाती मुशाफिरी (१३)
- आखाती मुशाफिरी (१४)
- आखाती मुशाफिरी (१५)
- आखाती मुशाफिरी (१६)
- आखाती मुशाफिरी (१७)
- आखाती मुशाफिरी (१८)
- आखाती मुशाफिरी (१९)
- आखाती मुशाफिरी (२०)
- आखाती मुशाफिरी (२१)
- आखाती मुशाफिरी (२२)
- आखाती मुशाफिरी (२३)
- आखाती मुशाफिरी (२४)
- आखाती मुशाफिरी (२५)
- आखाती मुशाफिरी ( २६ )
- आखाती मुशाफिरी ( २७ )
- आखाती मुशाफिरी ( २८ )
- आखाती मुशाफिरी ( २९ )
- आखाती मुशाफिरी ( ३० )
मी आज्ञाधारक मुलाप्रमाणे ते कागद फाडून टाकले आणि कामाच्या ठिकाणी निघालो.
---------
बॅटीने गजानन-महादू या जोडगोळीकडून ब्रॅंच डक्ट्स्चे काम जवळ जवळ संपवत आणलेले होते. तिकडे मी दाखवल्याप्रमाणे सुर्वेने वामनच्या मदतीने मेन डक्टस्चे उचकलेले जोड ठीक करण्याचे काम सुरू ठेवले होतेच. आता आभासी-छत (false ceiling) लावण्याचे काम सुरू होणे गरजेचे होते. त्यानंतर वात प्रसारक जाळ्या (air diffuser grills) लावण्याचा कामाचा शेवटचा टप्पा सुरू करत आला असता. मला तिकडे येतांना पाहून बॅटी सामोरा आला. त्याचाशी थोडी चर्चा करायचीच होती.
" तर मग, हरून! मी एक प्रश्न विचारू शकतो काय तुला? " बॅटीनेच सुरुवात केली.
" कां नाही. तू नक्कीच विचारू शकतोस. "
" काय ठरलं त्या ओपनिंगच्या बाबतीत? आपण मेन डक्टस् लहान करणार आहोतच कां? "
" नाही, तसं करणं हा कांही शहाणपणाचा निर्णय होऊ शकणार नाही. निदान इदीला तर तसं नक्कीच वाटतंय आणि मलाही ते पटतंय."
" पण मग ओपनिंग्ज्...? "
" मोठी करायची. ती जबाबदारी इदीने स्वीकारली आहे. ओह्, क्षमा कर मला! ते काम आपणच करणार आहोत आणि इदी त्यात आपली मदत करणार आहे."
" छान! अगदी छान! चांगला निर्णय. बरं, हे इकडचे काम आता जवळजवळ संपत आलेलं आहे."
" पाहिलं आहे मी ते. आता आपण कामाचे नियोजन असें करू. मी मुख्यालयाला फोन करून आभासी छ्त उभारणार्या आपल्या टोळीला पाचारण करतो. त्या दोघांचे (सुर्वे-वामन) कामही तासाभरात संपेलच. ते दोघे इकडे येऊन तुझ्या कामावरील या दोघांना मदत करतील. इम्तियाजचे कामही एव्हाना संपायला आलेले असेलच. तेंव्हा आपण दोघे आता संयंत्राची चांचणी घेऊ शकतो. तो पर्यंत इदी काय करायचे ठरवतो ते पाहू. त्याला दोन माणसे द्यावी लागतील. यातलीच दोन माणसे आपण सुटी करून देऊ शकतो. काय वाटतं तुला ? ठीक आहे ना ही योजना ?"
" ठीक ? अप्रतीम! तू मधे जरा गोंधळलासा वाटालास. पण तुझे हे नियोजन अगदी छान आहे आणि तू नियोजनात वाकबगार आहेस असं दिसतंय. "
" या स्तुती बद्धल आभार, पण, मरो ती माझी स्तुती. चल आपण कामाला लागू. "
आम्ही दोघे संयंत्राच्या कोठी (AHU plant room) कडे निघालो. इम्तियाज आमची वाट पाहात होताच. इम्तियाजने केलेले काम, विद्युत जोडण्या बॅटी काळजीपूर्वक तपासू लागला.मध्येच तो म्हणाला,
" अरे हरून, मेन डक्ट जोडाण्यापूर्वीच आपण चांचणी घेणे कितपत बरोबर आहे? "
" कां? काय हरकत आहे? "
" हवा ? अरे या संयंत्राचा पंखा (blower) प्रति मिनिट ऐंशी हजार घनफूट हवा फेंकणार आहे. मेन डक्ट जोडलेली नसेल तर एवढा मोठा हवेचा झोत इथे एक फार मोठे वादळ निर्माण करू शकतो आणि ते कदाचित् धोक्याचेही ठरू शकते."
" तू म्हणतोस ते बरोबर आहे पण ही चांचणी कांही मिनिटेच घेणार आहोत. संयंत्राचा हवेचा उत्सर्ग ऊर्ध्वगामी
(top discharge) आहे. त्यामुळे हवेचा झोत वरती आकाशाकडेच जाईल. शिवाय मुख्य वातवाहिका जोडलेली नसल्याने हवेचा पुरेसा प्रतिसारी-दाब (back pressure) निर्माण होणार नाही आणि प्रतिसारी-दाबाचा संवेदक
(back pressure censor) प्रभावित होऊन तो संयंत्र आपोआप बंद पाडील."
" पण मग त्याने काय साधणार आहोत आपण ? "
" संयंत्राची बैठक नीट झालेली आहे की नाही ते समजेल. बैठक समपातळीत झाली असेल तर उत्तमच. ती तशी झालेली नसेल तर ती आत्ताच ठाकठीक करता येईल. डक्टस् जोडल्यानंतर तसे करता येणे जरा कठिण असते."
" तू म्हणतोस त्यात कांही तथ्य आहे खरे. पण मी अशी चांचणी कोणी करतांना पाहिले नाही. तुझी ही भारतीय युक्ती दिसते. अर्थात् माझ्यापेक्षा तुला त्यातला अनुभव जास्त आहे हे मी जाणतो."
मला अशा कामाचा प्रत्यक्ष अनुभव असल्याने मी त्या बाबतीत नि:शंक होतो. संयंत्राचा पंखा सुरु होताच हवेच्या झोताने जवळपासचा धुरळा उडणार होताच पण त्याबरोबरच आणखी काहीं उडून गोंधळ होऊ नये म्हणून मी उडू शकणार्या वस्तू तिथून हलवू लागलो. विशेषत: कांही भागांच्या आवरणासाठी वापरलेली कागदी व इतर आवरणे इत्यादि. इम्तियाजही मला मदत करू लागला. सगळी तयारी झाल्यावर मी इम्तियाजकरवी इदीला बोलावणे धाडले. याला दोन कारणे होती. तो आता माझा जणू मित्रच झाला होता. त्यामुळे या रोमांचकारी प्रसंगात तोही सहभागी व्हावा असे मला वाटले. शिवाय तो या कारागृहाचा अधिक्षक होता. ही चांचणीच काय पण तिथे घडणारी प्रत्येक घटना त्याच्या समोर किंवा अनुमतीनेच होणे क्रमप्राप्त होते. तो लगेचच आला.
संयंत्र सुरु होताच आधी काय बघायचे, कशा कडे सर्वात आधी लक्ष द्यायचे हे मी दोघांनाही विषद केले. सगळी तयारी झाली. इदी कुतुहलाने इकडून तिकडून डोकावून पाहात होता. संयंत्र चालू करण्याचा इशारा मी इम्तियाजला केला. सगळे जणु श्वास रोखून उभे होते. इम्तियाजने कळ दाबली आणि... फुस्स्स ! कांहीच घडले नाही.
क्षणभर आम्ही एकमेकाकडे पाहातच राहिलो. इदीच्या नजरेत विस्मय, बॅटीच्या नजरेत कुतुहल, इम्तियाज भांबावलेला आणि मी किंचितसा त्रस्त. काय झाले असावे ते माझ्या ध्यानात लगेचच आलेले होते. तापमान नियंत्रक (thermostat) उपकरणाची जोडणी केलेली नव्हती. ती सर्वात शेवटी करण्याचे ठरले होते. मी इम्तियाजला तिथे तात्पुरती बांध-जोडणी (shunt) करायला सांगितली. त्याने तत्परतेने ती केली देखील आणि माझ्या इशार्या प्रमाणे संयंत्र चालू करण्याची कळ पुन्हा दाबली.
एक प्रचंड झंजावाती आवाज सुरु झाला इदी नेमका त्याचवेळी कुतुहलाने हवा कुठून येते ते पाहायला गेला आणि आपल्याकडे उन्हाळ्यात अचानक घोंघावलेल्या वावटळीत अंगणात ऊन दाखवायला घातलेली गोधडी जशी त्या भोवर्यात उंच उंच भरकटते तशी वार्याच्या झोताने इदीची टोपी आकाशात भरकटली. काय झाले आहे हे त्याच्या गावीही नव्हते. तो मात्र हर्षवायू झाल्यासारखा "वल्लाह्, वल्लाह्" असा जल्लोष करीत नाचत होता. काळ्याशार बारीक कुरळ्या केसांचा प्रफुल्लित इदी नाचतांना मोठा छान दिसत होता. झालेल्या आवाजाने प्रभावित झालेले आमचे कामगार आणि त्या परिसरातील कारागृहाचे अन्य आरक्षीदेखील कुतुहलाने तिकडे धावले. पण माझ्या अंदाजाप्रमाणे प्रतिसारी दाबाच्या अभावी संयंत्र बंद झाले. तिथे असलेल्या सगळ्यांच्या चेहर्यावर कुतुहल आणि आनंद याचे एक अनोखे मिश्रण दिसत होते. तो भर कांहीसा कमी झाला तसे मी आमच्या कामगारांना पुन्हा कामाकडे पिटाळले.
प्राथमिक चाचणी तर ठीक झाली होती. पण मला आणखी कांही बाबी तपासून पहायच्या होत्या. त्यासाठी संयंत्र आणखी कांही वेळ चालवावे लागणार होते. त्यासाठी प्रतिसारी दाब संवेदकाच्या प्रभावाने संयंत्र कांही काळ चालवण्यासाठी त्याला तात्पुरता बांध (shunt) द्यावा लागणार होता. तशी सूचना मी इम्तियाजला देत असतांनाच बॅटी जवळ आला.
" झकास ! झकास हरून. ही तुझी कामाची पद्धत खूपच निराळी आणि धाडसाची आहे खरी, पण मला ती आवडली. अमेरिकेत असे धाडस कोणी केले नसते. संयंत्रात कांही त्रुटी आढळल्या असत्या तर ते पुरवणार्या कंपनीने त्या तात्काळ दुरुस्त करून दिल्या असत्या किंवा सगळेच्या सगळे संयंत्र बदलून नवीन मिळाले असते."
बॅटीचे म्हणणे बरोबर होते पण माझ्या कामाची ही अशीच पद्धत होती. प्रत्येक टप्प्यावर तपासणी करून मगच पुढे सरकायचे ही मला मिळालेली शिकवणूक होती. मी कांही बोलणार इतक्यात इम्तियाज माझ्या सूचने प्रमाणे बदल केल्याचे सांगत आला. मी बॅटीला खुणेनेच इशारा करून संयंत्राकडे वळालो. इम्तियाजने संयंत्र चालु करताच मी त्याला विद्युत प्रवाह मापकाने (tong tester) कांही ठिकाणचे प्रवाहाचे मान तपासायला सांगू लागलो. तो जी माने सांगत होता ती मी माझ्या वहीत टिपून घेत होतो. सारे कांही ठीक होते. पण कांही फेरफार करावे लागणार होते ते नंतरच करता येणार होते. मी इम्तियाजला संयंत्र बंद करायला सांगितले.
एक समाधानाचा सुस्कारा टाकून मी इदी आणि बॅटीकडे पाहिले. दोघेंही नि:शब्द. मी कांही बोलणार त्याआधीच इदीचा एक आरक्षी जणू धावतच तिथे आला आणि त्याने इदीला अरबी भाषेत कांही तरी सांगितले. ते ऐकून इदीने मला आणि बॅटीला मागोमाग येण्याचा इशारा केला आणि लगबगीने त्याच्या कार्यालयाकडे निघाला. आम्ही दोघे जरा रमत गमतच त्याच्या कार्यालयाकडे निघालो. वाटेत बॅटी संयंत्राच्या तपासणी बाबत कांही माहिती विचारीत होता आणि मी त्याला उत्तरे देत होतो.
आम्ही इदीच्या कार्यालयात पोहोचलो तेंव्हा तो फोनवर कोणाशी तरी बोलत होता. मात्र तो कुणा फार महत्वाच्या व्यक्तीशी बोलत असावा इतपत अंदाज आला.
" काय रे कांही विशेष ?" मी विचारले.
" विशेष तर आहेच आणि ते तुझ्यासाठीं आहे."
" माझ्यासाठी? खरं की काय ! काय आहे?"
" उद्या एक पाहुणे येणार आहेत. तुझ्यासाठी वधू दाखवायला."
" चेष्टा काय करतोस. नीट सांग ना. "
ओठातले हसूं दाबत इदी म्हणाला,
" गृहखात्याचे सचिव उद्या येणार आहेत. तुझे काम बघायला."
क्रमश: