या सुखांनो...

आज सकाळी ऑफ़िसला थोडं उशिरा जायचं असल्यामुळं टि. व्ही. वर झी मराठी पहात बसलो होतो. भारतात संध्याकाळी/रात्री दिसणारे कार्यक्रम अमेरिकेत सकाळी सकाळी साडेसात पासून दिसायला लागतात.
दिवसाची सुरुवात होते त्या " आम्ही सारे खवय्ये" पासून! त्यानंतर 'होम मिनिस्टर'. मग  येणारी 'वहिनीसाहेब' तर टिपिकल एखाद्या हिंदी सिरियलचं तंतोतंत भाषांतर असावं असं कथानक. म्हणजे घडत जातं बरंच काही पण आजच्या भागात काय झालं असं विचारलं, तर अगदी एका वाक्यात उत्तर देता येईल असं मांडलेलं. त्यातल्या त्या फ़ुल्ल मेकप केलेल्या व्हॅम्प कॅटेगरीत मोडणारी सुंदर जानकी. (स्त्री व्हिलन अशा सुंदर का असतात ते मला अजून काही कळलेलं नाहीये. मी अशा कथानकात असतो तर नक्की मिस्टर व्हिलन झालो असतो. त्यामुळं ऍटलिस्ट त्या सुंदर सुंदर व्हिलन स्त्रियांच्या बरोबर जास्तीत जास्त दृष्य तरी करता आली असती)बरं, ते 'वहिनीसाहेब' झालं की, थोडा वेळ तो चिडलेला प्रसाद ओक उर्फ़ हर्षवर्धन भोसले (सिरियलमधलं नाव) पहायचा त्या अमृता सुभाष बरोबर फ़ायटिंग करताना! "अवघाचि संसार" नावाच्या सिरियलमध्ये. कधी कधी तर तो एवढं मारतो वगैरे तिला कि एखादा "डाय हार्ड" आठवावा. या सिरियल्सनाही 'ए" वगैरे ग्रेडिंग द्यावं, काय चाललंय काय या मराठी सिरियल्समध्ये असा विचार मनात येतो आणि-

" या...SS सुखांनो S...याS..."  चालु होतं. टायटल साँग ऐकून छान वाटतं. समोर दादा धर्माधिकारी (विक्रम गोखले) यांचं घर. त्यांची भावंडं आणि त्यांच्या बायका. सगळ्या सुशील, सात्त्विक अशा. घरी आलोय की देवळात असं वाटावं, अशी दादांची बेडरूम. दादांच्या तोंडून आपल्याला सारखं "महाराज", "महाराजांची कृपा" असे शब्द ऐकू येतात आणि कोण महाराज असा विचार मनात डोकावतो. दादांच्या बेडरूममधे कॅमेरा जातो तेव्हा आपल्याला कळतं की 'ओह, अच्छा, अच्छा महराज म्हणजे दत्त महाराज, ओके, ओके". हुश्श करत मनुष्यपुजा न मानणारा मी पुढं काय घडतंय याकडं लक्ष देऊ लागतो. कुठल्यातरी नाटकाला गेलो असताना तिथं कुणाचातरी मोबाईल वाजल्यावर कडक शब्दांत आधी सांगूनही कोण हा मुर्खोत्तम मोबाईल चालु ठेवून माझं नाटक पहायला बसला आहे', अशा आविर्भावात पूज्य (इथं मला झिरो म्हणायचं आहे) विक्रम गोखलेंनी तिथल्या तिथे थांबवलेलं नाटक आणि त्यामुळे तिथल्या सहकलाकारांची उडालेली तारांबळ आठवली. त्यावर शेजारच्या सीटवरून आलेली "येड-टिंबटिंबटिंब..आहे थेरडा" अशी काहितरी शिवी आठवली आणि मनात गुदगुल्या झाल्या. "देवा, थँक्यू! गोखलेंनी नाटकांऐवजी सिरियलमध्येच कामं करावीत. तिथं त्यांना कुणाच्या मोबाईल वाजल्यामुळं डिस्टर्ब व्हावं लागणार नाही कि त्यांच्याच चमत्कारिक प्रतिक्रियेमुळं त्यांना खाव्या लागणाऱ्या शिव्या आमच्या कानांवरून जाणार नाहीत." असं वाटून गेलं. पण माझं कुठलं आलंय एवढं भाग्य?

सिरियल पुढे चालु होते. विक्रम गोखले(कथेत - अविनाश उर्फ़ दादा धर्माधिकारी) आज संन्यास घेऊन घर सोडून जाण्याचा हट्टच करून बसलेले असतात.सगळे लोक (घरातले, बाहेरचे वगैरे) खूप मनधरणी करायचा प्रयत्न करतात, पण दादा कशालाही बधत नाहीत.

आणि अचानक घरात "माऊली" प्रकट होते. दादा त्याना एकदा माउली तर एकदा महाराज असं संबोधतात. त्यावर ती माऊली उर्फ़ महाराज (चंद्रकांत गोखले; वास्तविक आयुष्यात विक्रम गोखलेंचे पिताश्री!) म्हणतात - "मी कैलास पर्वतावर गेलो होतो. तिथं मला एक भणंग (भिकारीसम)भेटला. त्याच्या बरोबर एक कुत्रं होतं. तो भणंग मला म्हणाला की मुंबईला जा. तिथे अविनाश तुझी वाट बघतोय. वगैरे...

गेले चार भाग(एपिसोड) 'मी निघालो, मी निघालो' असं म्हणुन सगळ्यांना (आम्हां प्रेक्षकांना) छळणारा (बोअर करणारा) विक्रम गोखले आता त्या सिरियलमधूनच नाहीसा होतोय असं खात्रीनं वाटत असतानाच माऊली दादाचं (पर्यायानं चक्रम गोखलेचं) मन वळवण्यात यशस्वी होते आणि आपण एकच उसासा टाकतो. ह्म्म्म

पुढचा सीन. माऊली उर्फ़ महाराज उर्फ़ चंद्रकांत गोखले सरिता (दादांची लाडकी, सात्त्विक , सोज्वळ सून)ला बेसनाचे लाडु आणि पुरणपोळ्या करायला सांगतात. ती करायला निघून जाते. जाहिरातींची वेळ तर झालेली नसते अजुन. मग आता तोपर्यंत काय करायचं, असा दादा (जे या सिरियलचे महानायक असतात)ना प्रश्न पडतो. ते माऊलीला अधिकारानं विनवतात- "माऊली. मला तुमच्या पायांची पुजा करायची आहे". माउलीही मग थोडेफ़ार आढेवेढे घेत होकार देते. मग बऱ्याच वेळ दादा पाय वगैरे धुतात, पुजा करतात. तोपर्यंत मागं आरतीचं इंस्ट्रुमेंटल चालु असतं. मग पुजा झाल्यावर प्रत्येकजण पेशल आपापल्या ष्टाईलमधे नमस्कार करतो. बसून, आडवं होऊन, दोन वेळा हात आपटुन (यात स्त्रियांची पेशलिटी)वगैरे. बरं, दोघं तिघं नाहीत घरातले सगळे जण.‌..९-१० जणं. त्यात बराच वेळ जातो. आपल्याला जरा अवघडल्यासारखं होतं. मग अधे मधे दादांना आपुलकीनं 'अव्या' म्हणणाऱ्या महाराजरूपी माऊलीला नैवेद्य दाखवला जातो. मग तो पुन्हा लहान मुलीच्या हस्ते घरातल्या ९-१०जणांना वाटला जातो.  सहनशक्तीचा अंत गाठला जाऊन आपल्या तोंडून त्या सिरियलला, कथा/पटकथाकाराला आणि भावार्थाने विक्रम गोखलेसाहेबांना (ज्यांनी कथा पटकथाकाराला कदाचित डॉमिनेट केलं असावं) उद्देशून अपशब्द बाहेर पडतात.

आणि तेवढ्यात - " सरिता, बाहेर जा. तिथं एक कुत्रा थांबलाय. अथर्व नाव त्याचं. त्याला पुरणपोळी वाढ" असं माऊली उर्फ़ महाराज उर्फ़ चंद्रकांत गोखले अतिशय सालस, निष्पाप, वन ऑफ़ इटस काइंड अशा त्या सुनेला सांगतात. आणि मी जोरात ओरडतो- "नो. नॉट अगेन".
मोबाईलवर नंबर डायल करतो. "बॉस्स...",
"काय रे, आवाजावरून तर तुला ताप वगैरे आल्यासारखं वाटतंय?" बॉसचे शब्द ऐकून आधीच आऊट झालेलं डोकं अधिकच ठणकायला लागतं आणि हात अमृतांजनाची बाटली शोधायला झेपावतात...

का असा उच्छाद मांडलाय वर्षोंनी वर्षे चालणाऱ्या या टिकाऊ आणि टाकाऊ सिरियल्सनी?