अमेरिकायण! (भाग ६: नूतनवर्षाभिनंदन)

हा हा म्हणता म्हणता वसंत-ग्रीष्म-वर्षा ऋतू सरले आणि शरद ऋतूची चाहुल लागली(इथे आपल्या शरदाच्या वेळीच पानगळ होते त्यामुळे त्याला फ़ॉल म्हणतात, आपला शिशिर म्हणा हवतर). या दरम्यान मला काहि प्रोजेक्टमधील अडचणींमुळे भारतात परत जावं लागलं. त्यामुळे इथला सेंट्रल पार्क मधला फ़ॉल बघणं राहुनच गेलं  (ते अजूनही रहिलेलं आहे.) तेव्हा जाताना रुखरुख होती, अनेक पुस्तकांत वाचलेला परदेशातील नाताळ बघता येणार नाहि याचा. पण नशिबाने साथ दिली आणि माझं ऐन नाताळात पुनरागमन झालं.

नाताळ हा इथला एकमेव सार्वजनिक 'सण'. त्यामुळे या काळात लोकांचा उत्साहदेखील थंडीइतकाच मी म्हणत असतो. घरोघरी रोषणाई, सुंदर देखावे, मित्रमंडळी-नातेवाईकांचा गोतावळा, हास्यविनोद असं एकुणच आनंदाच वातावरण असतं. भारतात सण, संम्मेलनं, सोहळे अनेकदा होत असल्याने आपण सतत एकमेकांना भेटतो. पण इथे नाताळ बऱ्याच कुटूंबांसाठी एकत्र यायचा सण असतो. इथे आई-वडील मुलांपासून वेगळे रहाणं तर सोडाच पण नवरा बायकोही बरेच दिवसात एकमेकांना भेटलेले नसतात. नाताळ सगळ्यांसाठी प्रेमाची भेट घेऊन येतो. नाताळ इथे वयस्क आईला मुलाची मिठी मिळवून देतो, मुलाला स्थिरस्थावर झालेलं पाहून बापाला अभिमान मिळवून देतो, मुलांना आजी-आजोबांचे लाड मिळवून देतो आणि आजी आजोबांना नातवांचा हट्ट मिळवून देतो.... अमेरिकेतील विभक्त घराला घरपण मिळवून देतो.

मी या काळात पुन्हा एकदा नुकताच आल्याने हॉटेलमध्ये रहात होतो. तिथला कर्मचारीवर्ग नाताळ असल्याने भलताच आनंदात दिसत होता. सगळ्यांनी डोक्यावर लांब ख्रिसमस-कॅप्स चढवल्या होत्या. बाहेरच मोठ्ठा चॉकलेटचा ढिग रचला होता. सगळ्या प्रकारची चॉकलेटस होती. रोज रात्री इथे ख्रिसमस-केक कापला जायचा... आणि त्या रमची फ़ोडणी दिलेल्या केकचा घमघमाट अख्या हॉटेलमध्ये पसरायचा. अहाहा! तो केकचा विशिष्ट घमघमाट आता मनात कायमचा भरून राहिला आहे. याच हॉटेलमध्ये चार अमेरिकन आज्यांचा एक ग्रुप होता. त्या अगदी मजेत बागडत होत्या. येता जाता नुसतं मेरी-ख्रिसमसच नाही, तर हात पकडून एखाद गाणं म्हणत गिरकी देखील घ्यायच्या. एकदा मी लॉबीमध्ये काहीतरी वाचत बसलो होतो, तर समोरून ह्या आज्या आल्या आणि मला घेरलंच. (काय पण बघा ना.. इथे इतकं सौदर्य नांदत असताना आम्हाला मात्र आज्याच घेरतात  ). कोण-कुठचा आदि प्राथमिक चौकशीअंती कळले की मी भारतातून आलो आहे. झालं!! त्या आज्यांनी मला प्रश्नांनी भंडावून सोडलं. त्यांना भारताबद्दल फ़ार कुतुहल होतं. पण त्यांना सगळ्यात जास्त उत्सुकता होती ती आपल्या लग्नपद्धतीवर. "आई-वडील तुझ्यासाठि मुलगी बघुच कसे शकतात?!?" हा कुतुहलमिश्रित आश्चर्याचा प्रश्न हा त्या एकुणच चर्चेचा गाभा होता. "असं असुनही भारत जगातील सगळ्यात कमी घटस्फोट घेणाऱ्या देशांपैकी आहे" हे मी त्यांना सांगीतल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरचं कुतुहल कमी होण्या ऐवजी अजूनच वाढलं. ह्यासंबधी कुतुहलदर्शक प्रश्न  मी पुढे अमेरिकेतील अनेकांच्या कडून ऐकले.

असो. तर ह्या अश्या आंनंदी वातावरणात ३१ डिसेंबर येवून ठेपला. "टाईम स्वेअर" मधला नववर्षसोहळा तर चुकवता येणारच नव्हता. (हॉटेलातील आजीमंडळ तर इतकं उत्साही दुपारी ४ वाजल्या पासून त्या टाईम स्वेअरला जागा अडवून बसल्या होत्या.) माझे काहि मित्र फिलाडेल्फिआ वरून येणार होते. ते येताच सधारणपणे ७-७:३० ला निघालो. टाईम स्वेअर ४२व्या रस्त्यावर आहे. (न्यूयॉर्क मध्ये सरळ दक्षिणोत्तर जे लांब पसरले आहेत ते ऍवेन्यू आणि त्यांना फ़ासळ्यांसारखे कापत जातात ते स्ट्रीट. त्यामुळे पत्ता शोधण एकदम सोप्पं). मी 'पाथ' (भुमीगत रेल्वे)ने ३३व्या रस्त्यावर गेलो. बाहेर येतो तो काय... हीऽऽऽऽ तोबा गर्दी. ७:३० म्हणजे आम्ही लवकर निघतोय आटलं होतं पण गर्दी मुळ कार्यक्रमाच्या १० रस्ते लांबपर्यंत आली होती. अक्षरशः लाखोंचा जमाव. संपूर्ण रस्ता आणि तिथल्या मंडळींचा उत्साह दुथडी भरून बहात होता. थंडी देखील जबरदस्त होती (इतरांच्या मते हा हिवाळा सौम्य होता .. पण माझ्यासाठी ही थंडी पण खूप होती) आम्ही ठरवलं की ४२व्या रस्त्याच्या शक्य तितक्या जवळ जायचं. आम्ही वेगळा ऍव्हेन्यू पकडून टाईम स्वेअरच्या समांतर गेलो. पण समाधान होईना. म्हणून तसेच पुढे चालत राहीलो.

पुढे ४५व्या रस्त्यावर आत सोडत होते. ठरवलं गर्दीत घुसायचं आणि टाईम स्वेअरपर्यंत पोहोचायचं. घुसलो आत.. अबब!!! आत्तापर्यंत शिवाजी पार्क किंवा चौपाटी भरेल इतका जमाव बघीतला होता. पण इथे त्यापेक्षा कैक पटीने अधीक जमाव होता. आपल्या गणपती विसर्जनाला असतो ना तसा. आनंद, उत्साह, उत्सुकता इत्यादी गोष्टींनी ठासून भरलेला जमाव. आत तर पुर्ण चेंगरा चेंगरीच होती म्हणा ना! सगळ्यांच्या नजरा घड्याळाला खिळलेल्या होत्या. अजून तासभर होता. गर्दी पुढे सरकत नव्हती. इथे ठिक १२ वाजता एक "क्रिस्टल बॉल" खाली सोडतात. त्यासाठी हि गर्दी. तिथे तो बॉल तेथे आहे हे सिद्ध करणारा एक टिव्ही स्क्रीन समोर होता. माझी आपली उगाचचं पुढे जाण्याची पराकाष्ठा चालली होती. पण इथल्या साऱ्या स्थिरचर सृष्टीला काहीही फरक पडत नव्हता. सारी मंडळी, गात होती, नाचत होती, हास्यकल्लोळ चालला होता. काहि ग्रुप्स ने एकसारखा पोशाख केला होता. आमच्या पुढेच कॉलेज कुमार-कुमारींचा घोळका होता. फ़ार मजा करतं होती मंडळी. एकदा कुठलंसं गाण लागलं तेव्हा तर समस्त जमाव गायला आणि नाचायला लागला. गाणं माहित नसलं तरी नाचायला काय जातं या विचारांनी आम्हीही मग थोडे पाय मोकळे करून घेतले. (अर्थात त्या अमेरिकन मंडळीमध्येही कोणाला नाचता येत नसल्याने आमचा गोविंदाछाप नाचही खपून गेला  )

हा जल्लोश चालू असताना एकदम शांतता झाली आणि सारा जमाव  उलटी-गणती करू लागला. १०-९-८-७-.... इतक्या प्रचंड जमावाकडून इतकी नादबद्ध गणना चालू होती की बस्स! अंगावर त्या नादाने शहारा आला.....६-५.... सारा जमाव एका क्षणाची वाट पहात होता... या गणनेमध्ये एक पर्व संपतय याचा पूर्ण प्रत्यय येत होता....४-३.... प्रतेक जण २००६ला अच्छा करायला सरसावला.. २.....१....... मी नंतर अनुभवला तो निखळ आनंद... आकाश फटाक्यांचा आतषबाजीने भरून गेले. इथे खाली टिव्हिवर क्रिस्टल बॉल फ़ेकला गेलेला दिसला.. जमावाचं त्याकडे लक्षच नव्हतं.. मी 'क्रिस्टल बॉल' बघत असताना समोरच्या एका युवतीने "हॅप्पी न्यू इयरऽऽऽऽऽ" असं किंचाळत आलिंगनच दिलं (   )मी एकदम झालेल्या हल्याने बावरलो खरा पण पाहिलं तर इथे जोतो एकमेकांना 'अश्याच' शुभेच्छा देतं होता. मग आम्ही पण त्या आनंदाच्या सोहळ्यात स्वतःला लोटून दिलं..

आत्तापर्यंत नववर्ष मी वेगवेगळ्या प्रकारे साजरं केलं आहे पण इतक्या मोठ्या जमावाबरोबर इतक्या आनंदात साजरा केलेला हा नववर्षसोहळा एक चिरंतन आठवण देऊन गेला हे खरं. वेगवेगळ्या धर्माचे, वंशाचे, रंगांचे लाखो लोक केवळ नवीन वर्ष चालू झालं ह्या आनंदात होते. मी इतकं मनापासून नववर्षाचं स्वागत केलेलं कधीच पाहिलं नव्हतं. मी ही त्या सोहळ्यात खुल्या दिलाने "नूतनवर्षाभिनंदन न्यूयॉर्क" अशी आरोळी ठोकून दिली आणि नव्या वर्षातील नव्या आव्हानांना-अनुभवांना तोंड द्यायला सिद्ध झालो.

(क्रमशः)
--ऋषिकेश

टिप: शुद्धलेखन तपासणी व्यवस्था चालत नसल्याने काही ठिकाणी शुद्धलेखनाच्या चुका आढळण्याची शक्यता (खात्री) आहे.