अमेरिकायण! (भाग५ : जर्सी सिटी, मुक्काम पोस्ट भारत)

आतापर्यंत 'जर्सी' ह्या शब्दाशी माझा परिचय फक्त जर्सी गायींविषयी शिकताना आला होता. (मी शेतकी इ. विषय शिकलो नसलो तरी सामान्य विज्ञान नावाच्या विषयात गर्भशास्त्रापासुन ते भूगर्भशास्त्रापर्यंत सारी स्थिरचर सृष्टी कोंबली असल्याने, 'जर्सी गाय' याविषयी मुंबईकरांना सामान्य (वि)ज्ञान असणं त्यांनी गरजेचं समजलं असावं). त्यामुळे की काय कोण जाणे, पण जर्सी सिटी हे नाव मी पहिल्यांदा ऐकलं तेव्हा उगाचच डोळ्यासमोर हिरवी गार कुरणं, टुमदार घरं, त्यात चरणारे घोडे / गायी (जर्सी) इ. चित्र डोळ्यांपुढे आलं होतं. पण इथे आल्यावर मला इतका वेगळा धक्का बसला, की केवळ रस्त्यावर गायी नाहीत म्हणून या शहराला अमेरिकेतील शहर म्हणायचं!

अमेरिका हि मुख्यत्वे काळे आणि गोरे यांनी बनलेली असून, त्यात पिवळे (पक्षी: चिनी, जपानी) आणि तपकिरी (पक्षी: भारतीय, मेक्सिकन) तोंडी लावण्यापुरते आहेत अशी जी एक खूण मनाशी बांधलेली होती, ती जर्सी सिटीमध्ये आल्यावर सुटली. जर्सी सिटी ही मुख्यत्वे भारतीय लोकांनी बनलेली असून, त्यांत इतर वर्णीय केवळ पर्याय नसल्याने राहत आहेत अशी माझी ठाम समजूत आहे. मी सुरवातीला जेव्हा घर शोधत होतो, तेव्हा एका दुकानात पत्ता शोधायला शिरलो. नेहमीचं किराणामाल सदृश दुकान (डेली शॉप). आत मालक अमेरिकन वाटत होता. (तो स्पॅनिश आहे हे तेव्हा माहीत नव्हतं), त्याने मला पाहिल्यावर "हे! हाय! हाऊ यू डुईंग?" वगैरेच्या ऐवजी सरळ "हाय, मॉऽर्निंग, केम छो?" विचारलं आणि मी पत्ता विचारायचंच विसरून गेलो.

आपल्याकडे भाषेचा बाज काही मैलांवर बदलतो, पण इथे हडसन रिव्हर पार करा, पूर्ण भाषाच बदलते. इंग्रजी परकीय वाटायला लावणारा असा हा प्रदेश. पण ह्याचा माझ्यासारख्या नवख्याला सगळ्यात मोठा आधार होता. अगदी कुठेतरी नवीनच दुनियेत आल्यासारखं तरी वाटत नव्हतं. जर्सी सिटीचे ढोबळपणे न्यूपोर्ट, हबोकन आणि जरनल स्वेअर असे तीन भाग आहेत. त्यात जरनल स्वेअरवर तर भारत सरकारने अधिकार सांगावा इतक्या प्रमाणात भारतीयांची वस्ती आहे. याच भागात प्रसिद्ध "इंडियन स्ट्रीट" आहे.

या स्ट्रीटचं काय वर्णन करावं! सिग्नल वगैरे तुच्छ गोष्टी न बघता ट्रॅफिकमधून वाटेल तसं बागडता येणारा हा अमेरिकेतील एकमेव रस्ता असावा. इथे काय भारतीय नाही! रस्त्यावरचा कचरा, पटेलची दुकानं, पानाचे ठेले, कोपऱ्यातील पिचकाऱ्या, साड्या-पंजाबी ड्रेसची दुकानं, उदबत्त्या-निर्माल्यातील फुलं-कापूर-धुप-दूध-दही इ. गोष्टींचा एकत्र वास येणारं देऊळ, आल्या-आल्या पाणी देणारी भारतीय हॉटेलं, भिंतीवर (एकावर एक) चिकटवलेली पोस्टरर्स, वाहतं सांडपाणी, व्हिडियो पार्लर नी त्यांनी जोरात लावलेली गाणी, दुकानदाराशी इंग्रजी बोलणाऱ्याकडे कुतूहलाने बघणारी गिऱ्हाईके, नवीन हिंदी चित्रपटाच्या चोरीच्या तबकड्या, सोमवारचा बंद बाजार, "आमचे येथे लग्नसमारंभासाठी ऑर्डर घेतली जाते (सवलतीच्या दरात)" अश्या अर्थाचे सूचना फलक, कढीपत्ता-आमसूल-हवाबाण हरडे-सुतशेखरची मात्रा अश्या गोष्टी (कदाचित हे अश्या गोष्टी मिळण्याचं एकमेव ठिकाण), जय रामजी की किंवा जय जिनेंद्र, "ह्यांना नाऽऽऽ कितीदा सांगितलं पण नाहीच....."अशी निष्फळ बडबड करत रस्त्याच्या भर मध्यात उभ्या असलेल्या बायका आणि पिशव्या घेऊन बेजार होऊन त्यांची वाट पाहणारा नवरे संप्रदाय, "अगोबाईऽऽऽ किती कोवळी गवार मिळाली गं तुला" चे चित्कार, "तेरा लॅपटॉप का रिबेट आया क्या?" "कल साला वो प्रोडक्शन इश्यू आया इसलिये नहीतो ये विकएंड पक्का बैठते" असे खास देशी संवाद, रस्त्यात हुंदडणारी पोरं आणि त्यांच्या मागे पळता पळता जेरीस आलेले नवं-वडील आणि मुख्य म्हणजे "माणसांचा गजबजाट" अश्या अनेक भारतीय गोष्टींनी हि गल्ली नटली आहे. पण शेवटी कितीही गलिच्छ असूदे, तिथे माणसांच्या गजबजाटात 'माणसात' आल्या सारखं वाटतं एवढं मात्र खरं (शेवटी सवयीचा परिणाम  )

अश्या भारतीय रस्त्याव्यतिरिक्त इथे न्यूपोर्ट आणि हबोकन सारखे सुंदर नीटनेटके भागही आहेत. न्यूपोर्ट म्हणजे तर हडसन नदीच्या किनारी वसलेली उच्चभ्रू वस्ती. समोर हडसन नदी, त्या मागे न्यूयॉर्क ची आकाशरेषा, मधूनच गिरकी घेणारी नाव, नदीचा रम्य काठ, काठावर जॉगिंग, स्केटिंग आदी करणारी मंडळी, नातवंडांना फिरवायला आलेल्या नवं-आज्या, मालक-मालकिणींना फिरवायला आलेले कुत्रे, काठावर बसून आपल्याच भविष्याच्या स्वप्नात हरवलेलं एखादं जोडपं, स्वच्छ हवा, टोलेजंग सदनिका आणि त्यात राहणारी उच्चभ्रू मंडळी, त्यांचे स्विमिंग पुल.. आणि... त्याच्या काठावर सूर्यस्नान घेणाऱ्या.... असो .. ह्या सूर्य तारकांच्या तपशिलाच्या नादात मूळ मुद्दा राहायचा  . तर अश्या या न्यूपोर्टलाही भारतीय काही कमी नाहीत. इथल्या मॉलमध्ये अजूनही मला आर-मॉलचा भास होतो. जसं न्यूपोर्ट तसंच हबोकन. इथे रेल्वे आणि पाणवहातुकीची महास्थानके आहेत. ह्या भागालाही न्यूयॉर्कच्या आकाशरेषेचं वरदान लाभल्यामुळे हा भागही उच्चभ्रू लोकांनी समृद्ध आहे.

मला फार वाटायचं की जरनल स्वेअरसारख्या भागात इतरांना कसं वाटत असेल?. एकदा मी माझ्या ऑफिसमधल्या एका सहकाऱ्याला याबद्दल विचारलं (हा पठ्ठ्या भारतीय भोजनाचा फार मोठा भोक्ता असल्याने इंडियन स्ट्रीट त्याचा फार आवडता. हा सहकारी मुळातला ब्रझिलियन. ) त्याला मी विचारलं, तुला जरनल स्वेअरमधे कसं वाटत? त्याच उत्तर फार आवडलं. तो म्हणाला "आय फ़ील लाइक होम. आय मीन व्हेअर आय लिव्ह फॉर लास्ट ६ इयर्स, आय स्टील फ़ील दॅट आय'म गेस्ट. बट हिअर यू फ़ील फ्री लाइक यू आर ऍट यूअर होम".

खरंच! काहीही असलं तरी जर्सी सिटी हे भारतीयांचं माहेरघरच म्हणावं लागेल. म्हणून कोणी माझा पत्ता विचारला की आनंदाने सांगावंसं वाटत, "जर्सी सिटी, मुक्काम पोस्ट भारत"

(क्रमशः)

नवरात्रीची गर्दी: इंडियन स्ट्रीट