अमेरिकायण! (भाग १८ : मध्य-न्यूयॉर्क-१)

"न्यूयॉर्कच्या मॅडम तुसाँमध्ये सध्या ऐश्वर्या आणली आहे" अशी खबर आमच्या कळपाला कुठुनशी लागली आणि ऐश्वर्या ही आमच्यापैकी कोणाचीही सगळ्यात आवडती नटी नसताना पुन्हा एकदा त्या तुसाँबाईंच्या मेणाच्या प्रदर्शनाला भेट द्यायचं ठरवलं. माझा एक मित्रही न्यूयॉर्कमध्ये आला असल्याने न्यूयॉर्क दाखवणं माझं कर्तव्यच होतं. मलाही न्यूयॉर्क दाखवायला आवडतं. त्यातही मिडटाऊन ही माझी खास आवडती जागा. टाईमस्वेअरचा गजबजाट, एम्पायर स्टेटची उत्तुंगता, क्रायस्लर्स टॉवरची नजाकत, ब्रायंट पार्कमधल्या जत्रा, रॉकफेलर सेंटरवरील वेगवेगळे खेळ, ब्रॉडवे शोजची न उतरणारी धुंदी, यूनोचं सगळे राष्ट्रध्वज असलेले मुख्यालय, व्हीटी ची आठवण करून देणारं ग्रँड सेंट्रल स्टेशन, अविश्रांत लगबग आणि उत्सवी वातावरण यामुळे मिडटाऊनला जायला मी कधीही तयार असतो.

मॅडम तुसाँ, जगप्रसिद्ध मेणाच्या प्रतिमांचे प्रदर्शन! तुम्ही इथे आत शिरतानाच एक माणूस तुमच्याकडे टक लावून पाहतोय असं वाटतं. असा काय हा? हा विचार डोक्यात असतानाच लक्षात येतं अरेच्या हा तर पुतळा आहे! आणि आपले डोळे विस्फारतात. आणि हे विस्फारलेले डोळे पुढचे २-३ तास तसेच विस्फारलेले असतात. माणूस कोण आणि पुतळा कोण या संभ्रमातले काही क्षण गेल्यावर त्या माणसासारख्या पुतळ्यावर खूश व्हावे की तो पुतळा बनवणाऱ्या माणसापुढे नमावे हे सांगणे कठीण होवून बसते. आत शिरल्यावर हॉलिवूड तारकादळ प्रत्यक्षात समोर असल्याचं भासतं आणि प्रत्येक जण त्यांच्याबरोबर आपली छायाचित्रं काढून घ्यायला सरसावतो. हॉलिवूडच्या तारे-तारकांबरोबरच प्रसिद्ध खेळाडू, शास्त्रज्ञ, विचारवंत, नेते, गायक, वादक सगळेच क्रमा क्रमाने भेटू लागतात. त्यातल्या बऱ्याच जणांचे पुतळे तर अगदी "डिट्टो" असतात. सुरवातीचे उत्साही क्षण निवल्यानंतर आम्ही त्या मेणाच्या गर्दीत भारतीय चेहरे शोधू लागलो. महात्मा गांधी भेटले. पण त्याचा वर्ण फोटोपेक्षा बराच गडद वाटला आणि तब्येतही सुधारल्यासारखी वाटली. पुढे दलाई लामा मात्र खासच! तीच शांत दृष्टी.. स्मितहास्य वगैरे मस्तच! शेवटी एकदाच्या मिस वर्ल्डबाई दिसल्या. आपल्या देशी मंडळींपेक्षा फिरंग्यांनीच तिला वेढले होते. त्यामुळे कसा बसा तिचा शेजार मिळवून छबीयंत्र चालवून घेतली. ही ऐश्वर्या म्हणजे मला ऐश्वर्या सोडून कोणीतरी वेगळीच स्त्री असावी असे वाटले.. या तुसाँबाईंच्या प्रदर्शनातील कलाकारांना आपली मंडळी मात्र नीट जमलेली दिसत नाही आहेत (अपवाद सल्मान खान)

मला मात्र यात सगळ्यात दोन ठिकाणचे पुतळे आवडले. पहिले म्हणजे इथे घाबरवण्यासाठी एक विभाग आहे. तिथे बरेच चित्रविचित्र चेहऱ्यांची भुतं, राक्षस, प्राणी मेणाचे बनवून ठेवले आहेत. इथे चार चार जणांना आत एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून (गाडी-गाडी करत) सोडतात. आत एकदम भयप्रद वातावरण असतं, वेगवेगळे आवाज येत असतात, मंद प्रकाशात अचानक विजा चमकत असतात. आजूबाजूला अक्राळ-विक्राळ चेहऱ्यांचे मेणाचे पुतळे असतात. अचानक एक पुतळा हालू लागतो आणि आपल्यावर चाल करून येतो. आपण जीवाच्या भयाने किंकाळ्या फोडू लागतो. असे दोन तीनदा जिवंत भुतांचे हमले होतात. या मेणाच्या जंगलात कधी मेणाचा पुतळा असेल व कधी "खरं भूत" असेल हे सांगणं कठीण असतं. मनसोक्त घाबरून तुम्ही बाहेर येता. आणि मग जे स्वतःवरच हसत सुटता त्याला तोड नाही.
दुसऱ्या अश्याच एका मजल्यावर आम्ही चाललो होतो. एक वळण घेतलं आणि पाहिलं तर चार व्यक्ती फोटो काढत होत्या. माही थांबलो, म्हटलं मधून कशाला जा. जरावेळ झाला पण फोटो निघेना. जरा नीट पाहिलं तर कळलं की चार व्यक्तींमध्ये खरी व्यक्ती कोणीच नव्हती तर चारही पुतळेच होते. आम्ही स्वतःवरच हसू लागलो. आता त्या फोटो काढणाऱ्या मुलीचे फोटो काढून झाले की आपणही काढूया असं ठरवलं. १-२ मिनिटं झाली तरी बया डोळ्याला कॅमेरा लावून उभी. मग लक्षात आलं की ही फोटो काढणारी बया देखील पुतळाच आहे .

या प्रदर्शनातून बाहेर आल्यावर एखादी शांत उभी असलेली व्यक्ती देखील पुतळा वाटू लागते . तर २-३ तास या प्रदर्शनात फिरून पाय दुखल्यावर आराम करण्याची माझी आवडती जागा म्हणजे ब्रायंट पार्क. टाइम स्वेअर जवळच असलेलं एक छोटेखानी उद्यान. इथे सतत कसले ना कसले खेळ चालू असतात. मी डोंबाऱ्याच्या खेळांचे अमेरिकन रूप इथेच सर्वप्रथम पाहिलं होतं. जवळच आपल्याकडे जसा भेळपुरी-पाणीपुरीच्या गाड्या असतात तश्या गायरोज, फलाफल, हॉट-डॉग वगैरेच्या गाड्या लागलेल्या असतात, मंडळी एकत्र बागेत जेवत असतात, मुलांची पळापळ असते, पियानो/व्हायोलिन च्या ऐवजी डबे-कंगवे यांतून निघणारं "म्युझिक" पार्श्वसंगीत असतं, समोरच एखादा डोंबाऱ्यांचा उड्या मारणाऱ्यांचा खेळ चालू असतो. थोडक्यात जेवताना कंपनी नसेल तरीही एकटं न वाटता जेवण होईल याची हमी.

Grand-Central-Station

इथूनच जवळ "ग्रँड सेंट्रल स्टेशन" आहे. इथलं स्थापत्य काय वर्णावं. तुम्ही आत शिरताच दोन अतिशय सुंदर झुंबरं तुमचं लक्ष वेधून घेतात. मला तर या झुंबरांनी नेहमीच भुरळ घातली आहे, संमोहित केलं आहे. खरंतर १९१३ साली बांधलेलं हे स्थापत्य जागोजागी केवळ सौंदर्याचं दर्शक आहे. पुढे मुख्य मंडपात छतावर तारका आणि राशींची सुंदर चित्र रंगवली आहेत. इथे मध्यभागी असणारा गोलाकार चौकशी कक्ष, प्रकाशासाठीची तावदाने-झरोके, सुंदर कलात्मक जिने सारं सारं काही केवळ सुंदर आहे. इथे या मंडपाचे जुने चित्र आहे जे मला फार आवडले. त्यातली प्रकाश किरणे कशी हळूच आत डोकावून आतील सौंदर्य भरून घेताहेत असं वाटते. इथून आपल्या व्हिटी सारखेच अनेक फलाट आहे आणि तिथे अनेक प्रांतात जायला गाड्या सुटतात. खरंतर आपल्याकडचे हमाल, भिकारी काढले..जाहिराती आणि फेरीवाले यांना सजावटीचा भाग असल्यासारखे नीट मांडले आणि जळमटे-धूळ साफ केली तर व्हीटी याच्या तोंडात मारेल असे वाटले.

असो रॉकफेलर सेंटर, यूनो मुख्यालय, इंपायर स्टेट - क्रायस्लर्स टॉवर अश्या इतरही अनेक उत्तमोत्तम जागा आहेत. पण पुन्हा कधीतरी तूर्तास विस्तारभयाने इथेच थांबतो. 

-ऋषिकेश

टिपाः
१. चित्रे विकिपीडियातून घेतली आहेत
२. शु.चि. ने चुका केल्या असल्या तरी मी दिलगीर आहे  
३. कोणत्याही वसंतात दिसणाऱ्या डोंबाऱ्यांचा खेळ इथे टिचकी मारून पाहू शकाल