अमेरिकायण! (भाग २१ : लास वेगास २ - कसिनोंच्या शहरात)

दुपारच्या मस्त झोपेनंतर जेव्हा सायंकाळी वेगासच्या रस्त्यांवर बाहेर पडलो तेव्हा हेच का ते सकाळी पाहिलेलं वेगास असा प्रश्न पडला. संध्याकाळ होता होता सुरू झालेल्या रोषणाईने त्या शहराचा नूर  पूर्णपणे पालटला होता. शहर एकदम जिवंत झाले होते. स्ट्रीपवरून फिरायला सुरुवात केली. एकेक कसीनो म्हणजे अबब!! प्रत्येक कसीनोला संपूर्ण शहराचा दर्जा देता येईल.

समोरच "मिराज" नावाचा कसीनो होता. याचं वैशिष्ट्य म्हणजे या कसीनोच्या बाहेर ज्वालामुखी आहे तो ही जागृत!! त्यातून चांगला लाव्हा वगैरे येत असतो. वेळोवेळी गडगडाटासह तो फेसाळून बाहेर येतो. आपलं ज्वलंत, उष्ण, दाहक असं स्वरूप दाखवतो. पण घाबरू नका हा तर निव्वळ देखावा आहे. पाण्याच्या फवाऱ्यांवर उत्तम दर्जाच्या प्रकाशयोजनेने हा ज्वालामुखी प्रचंड ताकदीने उभारला आहे. भोवतीचा प्रकाश, आवाज आणि जवळ असल्यास जाणवणारा मंद थरथराट हा प्रसंग किती भयप्रद असेल याची पुरेपूर जाणीव करून देतो.   तिथूनच पुढे अजून एका कसीनो बाहेर सिंदबादचं जहाज होतं. तिथे थरारक खेळ चालले होते. खूप धमाल येत होती. तेव्हा त्याने कोणाला जहाजावर यायचे आहे काय विचारले. माझ्याच नकळत मी उत्साहाने हात वर केला. त्याने चक्क मला वर बोलावले. आणि एका दोराला गच्च धरून ठेवायला सांगितले. तो प्रेक्षकांशी बोलत असतानाच एका मुलीने हळूच मला त्या दोराला आणखी एका बेल्टने बांधले. आणि मग तो खलाशी जहाजाच्या दुसऱ्या टोकाला गेला आणि म्हणाला ये इथे. आता मी तिथे कस जाणार बॉ! पण इतक्यात माझा दोर ज्या दोराने खेचून ठेवला होता तो अचानक सुटला आणि मला काही कळायच्या आत मी टारझन सारखा दुसऱ्या टोकाला. लोकं जाम खूश!!! पहिला झटका ओसरल्यावर पडणार नाही याची खात्री पटली आणि मग मीही मजेत चारदोन उड्या जहाजभर मारून घेतल्या. मुंबईला जन्मलो वाढलेलो असल्याने सुरपारंब्या ह्या गोष्टीतच वाचलेल्या! अमेरिकेत ती हौस काही अंशाने पूर्ण झाली ती अशी :)

त्यानंतर आम्ही रात्री स्ट्रॅटोस्फिअर नावाच्या टॉवरच्या वर जाण्यासाठी रांगेत उभे राहिलो. हा टॉवर लास वेगास मधील सर्वात उंच टॉवर आहे. याच वैशिष्ट्य म्हणजे हा केवळ वेगास बघणे याच कामासाठी बनवला आहे. ना यात कुठले ऑफिस आहे ना फारश्या खोल्या. एक सरळसोट टॉवरवरची ऑब्झरवेटरीच म्हणा ना! पण त्या उंचीवरून वेगास अप्रतिम दिसते. अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या टॉवरचा तळदेखील काचेचा आहे त्यामुळे तुम्ही वर गेल्यावरही पायाखाली  देखील वेगासच दिसते.

ह्या टॉवरचे वैशिष्ट्य इथेच संपत नाही तर इतक्या उंचीचा रोमांच कमी होता की काय म्हणून १०६व्या मजल्यावर त्यांनी "वेडे खेळ" ठेवले आहेत. माझ्यासारख्या वेड्याला हे खेळ म्हणजे पर्वणीच. यातील पहिला खेळ  बऱ्याच ऍम्युझमेंट पार्क्स मध्ये दिसतो. यात गुरुत्वाकर्षणाच्या ३ पट वेगात वर खाली करतात. पण हाच खेळ इथे १०६  व्या मजल्याच्या  टॉवरच्या वर बांधला होता. गुरुत्वाकर्षणाच्या ३ पट वेगात  इतक्या उंचीवर जाणवणारा थरार हा अनुभवण्यासारखा आहे. इथे तुम्ही बसता. सीटबेल्ट येऊन अडकतात आणि ते मशीन काही फास-फूस असे आवाज करते आणि मग पुढील २/२. ५ मिनिटे जे काही वर खाली करते त्यात तुम्ही फक्त आणि फक्त ओरडायचाच विचार करता. सारं वेगास क्षणात अदृश्य होतं नि जाणवतो तो फक्त वेग

दुसऱ्या एका खेळात तुम्ही एका घसरगाडीत बसता. ती घसरगाडी एका दांड्याच्या एका टोकाला असते. राईड सुरू होताच दांडा अचानक कलतो आणि तुम्ही क्षणार्धात खाली!.. दांड्याच्या टोकाला ती गाडी येते आणि आता तुम्ही १०६व्या मजल्यावरून फेकले जाताय की काय असे वाटेपर्यंत एकदम टोकाला जाऊन थांबते. भीतीने तुमचे डोळेच बाहेर यायचे बाकी असते   पण या खेळानंतर आम्ही जे हसत सुटलो होतो त्याला तोड नाही.

याशिवाय एक चक्र तुम्हाला इतक्या उंचीवर आकाशात नेऊन फिरवते.. पायाखाली काहीही नाही आणि तुम्ही एकदम हँगरला लटकवल्यासारखे जमिनीपासून कैक फुटांवर लटकत असता. हा खेळ वर्णन करण्या जोगा नसून चलतचित्रातच पाहण्यासारखा आहे. अमेरिकेतील जवळजवळ प्रत्येक शहरात असे(असा) उंचच उंच टॉवर आहेत (आहे). ज्यावरून तुम्ही शहर पक्ष्याच्या नजरेने बघू शकता. मला असा आपल्या शहराचा असा एक टॉवर असणे फार आवडले/ते.

स्ट्रॅटोस्फीयरची धुंदी कशीबशी बाजूला ठेवत इतर कसीनोजचा समाचार घेत होतो त्यात मला आवडले ते बाँड प्रसिद्ध "कसीनो रॉयल". आता पर्यंतच्या कसीनोमध्ये बरेचसे खेळ अतिशय शांतपणे खेळले जात होते. तेथील वातावरणही खेळाडूंप्रमाणे "सुटातले" होते. मात्र कसीनो रॉयल मध्ये शिरल्यावर एकदम "अहा! " असे वाटले. लोक घोळक्या घोळक्याने उभे आहेत. एखाद्या टेबलवर खेळणारे चौघे आणि बघणारे पंचवीस असा जिवंत देखावा आहे. लोक जिंकल्यावर गदारोळ घालत आहेत. जल्लोष चालू आहे. तेथील मदिराक्षी उत्साहिताचे थवे-धक्के चुकवत मदिरेने भरलेली  पेले  त्याच्या मालकापर्यंत सुखरूप पोचवत आहेत. एकेका सरशीबरोबर सबंध पेला हा हा म्हणता संपत आहे. हरलेले त्वेषाने तर जिंकलेले बेभान होऊन पून:पुन्हा पैसे लावत आहेत. अश्याप्रकारच्या "भारलेल्या" कसीनो रॉयलने आमच्याही उत्साहाला उधाण आणले. तसे पत्ते हा  माझा आवडता खेळ. मुंबईकर असल्याने पत्ते व नियम नवे नसले तरी  इथले शब्द नवे होते. पण काही वेळाच्या निरीक्षणाने संज्ञा कळल्यावर ब्लॅक जॅक मांडलाच   एखादा डाव हरून पुढे मस्तपैकी जिंकत गेलो.. खूप मजा आली.. पुन्हा काळी वेळाने हरू लागल्यावर शांतपणे जमलेले डालर घेऊन बाहेर पडलो.

मनसोक्त खर्राखुर्रा पत्त्याच्या जुगार खेळल्यावर वेगासमध्ये आल्यासारखं वाटू लागलं  .. रात्र आता उतरू लागली होती. एखाद तासात फटफटणार होते आणि दुसऱ्या दिवशी ग्रँड कॅन्यन करायचे होते त्यामुळे हाटीलात परतलो. डोक्यात दिवे, हास्य, आरोळ्या, उन्मेष आदींचा कैफ होता आणि उद्याच्या प्रवासाची उत्सुकता देखील

(क्रमशः)
टीपः

  • शुद्धीचिकीत्सक वापरला आहे. शुद्धलेखनाच्या चुका आढळल्यास दोष शुद्धीचिकित्सका समजावा
  • अमेरिकायणाचे शेवटाचे काही भाग लिहायचे बाकी असताना भारतात परतलो. इथे आल्यावर मुड आणि वेळ यांची सांगड घालता घालता आजचा दिवस उजाडला आहे. आता नेटाने लिहून पुढील २-३ भागात अमेरिकायणाची सांगता करेन. दरम्यानच्या काळात व्यनी वगैरेंनी चौकशी करून मनात खुणगाठ जागवणाऱ्यांचे, ओली ठेवणाऱ्यांचे अनेक आभार