अमेरिकायण! (भाग १०: द्युतक्षेत्री)

जसजस वसंताचं आगमन झालं, बाहेरचं वातावरण पूर्ण बदलू लागलं. झाडांना कोवळी पालवी, त्यावर काही पक्षी  असं चित्र पुन्हा दिसू लागलं. हे सगळं फार आल्हाददायक होतं. मग आम्हीही जवळपासची ठाणी काबीज करायचा चंग बांधला. पहिलं ठाणं होतं 'अटलांटिक सिटी'. समुद्रकिनाऱ्यालगतचं वसवलेलं शहर. हे शहर म्हणजे पूर्व अमेरिकेतील द्यूतक्षेत्रापैकी एक अग्रणी! (अहो खरंच! आपल्याकडे तीर्थक्षेत्री भाविक जितक्या भक्तिभावाने दरवर्षी जातात ना, तितक्याच भक्तिभावाने ही मंडळी 'कसिनो' असं आधुनिक नाव असलेल्या द्यूतक्षेत्री जातात). ह्याला काहीजण पूर्वेचं वेगास म्हणतात (पण बहुतेक असं म्हणणारे वेगासला गेले नसावेत असं वेगास पहिल्यावर वाटलं). 

अमेरिकन्सना पैसा खूप साठलाय असं जाणवलं की ते फार बेचैन होतात, आणि लगेच मोर्चा एखाद्या कसिनोत वळवतात. अश्या द्यूतप्रिय अमेरिकेत असं खास पैसे उडवण्यासाठी वसवलेलं शहर नसेल तरच नवल.  हे शहर १८५४ मध्ये बांधलं गेलं. हेच ते वर्ष ज्यावर्षी लोकल ट्रेन सेवा चालू झाली आणि हे शहर 'फ़िलाडेल्फ़िआ'ला रेलमार्गे जोडलं गेलं. सोपं दळणवळण आणि समुद्रकिनारा यामुळे साहजिकच श्रीमंत अमेरिकन्सचं हे आवडतं पर्यटनस्थळ ठरलं. तिथे समुद्रकिनारा सोडल्यास काही विशेष असल्याशिवाय शहर प्रगती करणार नाही हे चाणाक्ष लोकांनी ओळखलं आणि किनाऱ्यावरच कसिनो चालू झाले. पुढे कसिनोवाल्यांनी मिळून केवळ चालायची सोय म्हणून लाकडी "बोर्डवॉक" बांधला. आणि पुढे हा बदलत बदलत इतका वाढला की हा सध्या जगातील सर्वात लांब "बोर्डवॉक" आहे.

आम्ही अटलांटिक सिटीला जायचं ठरवलं ते एका टूर कंपनीकडून कारण त्यांचं पॅकेजच जबरदस्त आहे. जर्सी सिटीहून ते अटलांटिक सिटीला घेऊन जातात नि परत आणतात फक्त $२५ मध्ये. त्यातही. $२५चं कसिनोमधे खेळायचं कूपन आणि $५चं खाण्याचं कूपनही फुकट. तर अश्या या कंपनीबरोबर आम्ही निघालो. सोबत जितक्या प्रमाणात तरुण मंडळी होती तितक्याच संख्येने एकही केस काळा नसलेल्या आज्या-आजोबा होते. वयाच्या या मुक्कामावरही जुगार खेळण्याची आणि ती जिंकण्याची जिद्द बाळगणाऱ्या त्या मंडळींकडे मी पाहतच राहिलो. ज्या वयात आपल्याकडे आपण तीर्थयात्रा करू लागतो, तिथे त्याच वयात ही मंडळी खिशातून आणलेल्या बाटलीतील 'तीर्थ'प्राशन करून पूर्णं प्रवासभर गाणी म्हणत होती. आमच्या पुढे कोण्या कॉलेजातील मंडळी होती. पण तिथे अगदी शांतता होती, सुस्ती होती.. खरंतरं प्रचंड मरगळ होती. केवळ दिवस उजाडला आहे तर जगूया अशा मरगळलेल्या आविर्भावात असलेली ही तरुणाई आणि उजाडलेला प्रत्येक दिवस जगून बघायचा या उत्साहाने गाणारं वार्धक्य यातील खरी अमेरिका कोणती?

असो. तर अश्या मंडळींबाबत विचार करत असताना अटलांटिक सिटी आलं. हे तसं छोटं शहर असेल असं वाटलं नव्हतं. आपलं सोलापूर नाहीतर कोल्हापूरही यापेक्षा मोठं असावं, पण इथे होणारी उलाढाल, ती मात्र काहीशे कोटींच्या घरात असते. बस फिरत असताना सिझर, ताज अशी नावं असलेल्या इमारती सरकत होत्या. आम्ही एका कसिनोपुढे थांबलो. आम्हाला $२५चे पासेस देण्यात आले. आता वेळ होती नशीब अजमावायची. पण इथे करायचं काय हे आमच्यापैकी कुठे कोणाला ठाऊक होतं?

आम्ही कसिनो मध्ये शिरलो. आतमध्ये केवढा तो झगझगाट! समोर वेगवेगळे दिवे असलेली मशीन्स ठेवली होती. त्यावर काही ठिकाणी हजारो डॉलर्सचे 'जॅकपॉट' असलेले दिसत होते. पण आता खेळायचं कसं असा अस्सल देशी प्रश्न डोळ्यासमोर उभा राहिला. जुगार वाईट.. वाईट म्हणून ओरडणाऱ्या देशातून अगदी जुगार चालणाऱ्याच नाही तर अविभाज्य भाग असलेल्या देशात आलेल्या आम्हा बिचाऱ्यांकडे कोणी सुद्धा बघत नव्हते. आमची स्थिती म्हणजे त्या मॉजिनिजमधे पुलंची झाली होतीना तशी झाली. इतके शिकूनही स्लॉट मशीन्स चालवायची कशी हे शिक्षण कधी मिळालं नव्हतं, त्यामुळे त्या रंगेबीरंगी दुनियेत आमचे चेहरे मात्र बिनतिकिटाच्या पॅसेंजरसारखे झाले होते. त्यामुळे फक्त फोटो काढणे याशिवाय आम्ही काहीही करू शकत नव्हतो. पण ३-४ फोटो झाले असतील काढून एक सुंदर पोलिस (म्हणजे पोशाखातली कोणीतरी, आम्हाला पोलीस काय नि बँडवाले काय सगळे गणवेशधारी तितकेच घाबरवतात) तर एक सुंदर पोलिस अवतीर्ण झाली (मनात आम्ही "ही!!! पोऽऽलिस?!?!? वाह इथलं पोलिस खातं बरंच तरुण आणि लाघवी आहे  ). आणि आम्हाला इथे फोटो काढू नका हं! अशी गोड धमकी देऊन गेली. मग काय पोलिसांनी आणि तेही इतक्या गोड पोलिसांनी दिलेली सूचना नाही ऐकायची तर कोणाची ऐकायची?

हातात तर $२५चं कार्ड होतं ते संपवल्याशिवाय त्या कसिनोच्या बाहेर पडून फायदा नव्हता. अचानक मला आमच्या बसमधल्या एक आजीबाई दिसल्या. त्यांनी ते कार्ड केव्हाच उडवलं होतं आणि वर स्वतःचे पैसे घालून खेळत होत्या. त्यांचा एक गेम संपला आणि मी त्यांची मदत मागितली आणि मग त्यांनी स्लॉट मशीन्स वापरायची अमूल्य माहिती दिली आणि त्यापुन्हा त्या खेळाच्या वारकरी झाल्या. माझं तर डोकंच फिरलं, ज्या मशीन्सकडे पाहून हे कसं खेळायचं याचा विचार करत होतो, ते मशीन चालवायला फक्त २-३ बटणंच आहेत नी केवळ एका बटणावर हा 'बिनडोक' गेम चालतो. केवळ नशीब आणि नशिबावरच चालणाऱ्या या खेळात मजा येईना. यात स्वतःचा निर्णय / कसब / डोकं काहीही असायची गरज नव्हती केवळ नशिबावर हवाला. त्या मशीनवर ते पैसे उडवले. आणि आश्चर्य म्हणजे मला त्यातले $१८ रोख रकमेने परत मिळाले . ते कसं झालं हे माहीत नसलं तरी पैसे मिळालेले मात्र आवडलं

आता आम्ही बाहेर बोर्डवॉकवर आलो. समोर अटलांटिक महासागर पसरला होता. आणि शुभ्र वाळूचा बीच आम्हाला खुणावत होता. तशी अजून थंडी असली तरी स्वेटरची गरज पडेल इतकं गार नव्हतं. माझा हा अमेरिकेतील पहिला बीच. तसा खास अमेरिकन बीच. चित्रपटात 'दिसणाऱ्या' बीच सारखाच, प्रशस्त आणि 'मोकळा'. थोडावेळ तिथल्या पहुडलेल्या प्रेक्षणीय स्थळांचं दर्शन झाल्यावर स्वतः पाण्यात जायची हुक्की आली. बरीच मंडळी तरंगारोहण (सर्फ़िंग) करत होती. आम्हीपण कपडे उतरवले (तसंही व्हेन इन रोमन्स डू लाईक रोमन्स डू  ) आणि पाण्यात झेपावलो.. अस्स्स्स्स्स्स्स!!! प्रचंड थंड पाणी!!! आणि फारच वेगात बाहेर फेकणाऱ्या जोरदार लाटा. (इतका जोर मी लाटांना कधीच पाहिला नव्हता. हा महासागर असल्याने असेल अशी स्वतःचीच समजूत करून घेतली). आता कळलं कोणी पाण्यात का डुंबत नाही आहे ते! एकतर तरंगारोहण करा नाहीतर गुपचुप बीचवर आराम करा! आम्हीही मग आराम फर्मावला.

हळूहळू जसजशी संध्याकाळ होऊ लागली हे शहर खरं रंगात येऊ लागलं. जिथेतिथे जल्लोषाचे जाम फसफसू लागले. प्रत्येक कसिनो आपल्याच रंगात रंगू लागला. त्याबरोबर प्रत्येक व्यक्तीही निराळ्याच रंगात रंगून गेली! आम्ही बोर्डवॉकवर भटकत होतो. त्यावर जत्रा भरल्यासारखी गर्दी होती. मंडळी पाचोळ्यासारखी बागडत होती. सगळीकडे क्लिकक्लिकाट चालू होता. आम्हीही या जत्रेत सामील झालो. मग तो एखादा बाहुला (स्टफ़ टॉय) मिळवायसाठीचे खेळ असो, नाहीतर नेमबाजी असो, वेगवेगळ्या खेळात मनसोक्त पैसे हरल्याजिंकल्यावर आपण खरे द्यूतक्षेत्राचे वारकरी झाल्यासारखं वाटलं. आता कळलं अशा ठिकाणी पैसे हरण्या-जिंकण्यापेक्षा ते खेळण्याचा कैफ काय असतो. आणि हेही कळलं की इथे जिंकणारा कधी कायमचा जिंकलेला राहत नाही आणि कोणी सतत हरतही नाही.

तिथे वेगवेगळ्या कसिनोमध्ये हजारो जमत होते, हजारो उधळले हात होते. तिथे फक्त एकच कसोटी होती 'नशीब'! स्वकर्तृत्वाने जग पादाक्रांत करणारी ही लोकं आपल्याच मिळकतीचा काही भाग केवळ नशिबावर हवाला ठेवून उधळत होती. इथे कोणी कायमचा गरीब राहणार नव्हता आणि कोणीही कायमचा श्रीमंत. इथे फक्त एकच गोष्ट चिरंतन होती ती म्हणजे जिद्द! जिंकण्याची जिद्द, हरण्या-हरवण्याची जिद्द, काही नवं पाहण्याची जिद्द, काही नसलेलं मिळवण्याची आणि असलेलं गमावण्याची जिद्द, गेलेल्या पैशांबरोबरच गेलेला आनंद मिळवण्याची जिद्द, हरवलेल्या पैशात हरवलेलं तारुण्य शोधून ते उपभोगण्याची जिद्द. या जिद्दी दुनियेत आम्हीही एका अनामिक उत्साहाने भारावलो होतो.

केवळ आनंद देण्यासाठी वसवलेल्या ह्या नगरीतून आम्ही कसे बरं आनंदापासून वंचित राहणार! आम्हाला इथे आनंद तर मिळालाच पण विनाकारण पैसा खर्च करण्याची सवय नसलेल्या मला कधीकधी थोडा हात सैल केल्यास फार काही तोटा होत नाही आणि झालाच तर आनंदी राहिल्याचा फायदाच होतो, हेही शिकायला मिळालं (चंगळवाद असाच फोफावतो बहुतेक  ). आम्ही या नगरीला टाटा केलं ते पुन्हा आल्यास आतापेक्षा अधिक जिंकण्याच्या जिद्दीनेच!

ऋषिकेश

(शु.चि. चालत नसल्याने चुकांबद्दल क्षमस्व)