अमेरिकायण! (समारोपः कोलाज)

ग्रँड कॅन्यन ही माझी अमेरिकेतील एखाद्या नव्या स्थळाची शेवटची सहल! त्यानंतर काही दिवस या स्थळाचं मनावर इतकं गारूड होतं की एखाद्या ठिकाणचं वर्णन वाचून कुठे जावेसेच वाटेना. आता पुन्हा थंडी सुरू झाली होती. घराबाहेर हवं तेव्हा हवं तसं भटकणं कमी झालं होतं. गेल्या वेळप्रमाणे ना बर्फाचं अप्रूप होतं ना थंडीचं. तशी नवी ठिकाणं बघायची इच्छा नव्हती असं नाही मात्र उत्साह कमी झाला होता. हा हा म्हणता दीड वर्ष सरलं होतं आणि आता नाही म्हटलं तरी घरची आठवण प्रमाणापेक्षा तीव्र होऊ लागली होती.

थंडी जसजशी वाढू लागली तशी झाडे पूर्ण बोडकी झाली. निसर्ग सुस्तावला. सगळीकडे असणारी उत्स्फूर्त गर्दी कमी झाली. हॅलोवीन, थॅंक्स गिविंग, ख्रिसमस वगैरे सणही झाले..  आता मात्र परतीचे वेध लागू लागले. नवं वर्ष नव्या आशा घेऊन उजाडलं. ऑफिसने मला माझ्या प्रोजेक्टमधून रिलीज करायच्या मागणीला होकार दिला. एका महिन्याच्या ट्रांझिशन नंतर मी पुन्हा परतणार होतो. माझ्या देशात, माझ्या लोकांत, माझ्या मित्रांत, माझ्या मुंबईत, माझ्या घरांत... जाताना प्रत्येक गोष्ट नवीन म्हणून त्यातलं नावीन्य वेचणारा जीव आता जुन्याकडे खेचला जात होता.

शेवटची खरेदी सुरू झाली.  अनेकांसाठी भेटी खरेदी करून झाल्या. भारतातून केशर, वेलच्या, लवंगा असल्या गोष्टीपासून इलेक्ट्रिक रेझर, डिजीटल-फोटोफ्रेम, कॅमेरे वगैरे गोष्टीची "ऑर्डर" येणे देखील सुरू झाले. तसेच अमेरिकेतल्यांकडून हा तिथे जातोच आहे तर "हे" हि पाठवू असा सुज्ञ आणि काहीसा वजनदार हिशोब सुरू झाला होता. तेव्हा ह्या अतिउत्साहींना जमेल तितके आवरून दीड वर्षांच्या आठवणी दोन ब्यागांमध्ये कोंबल्या. परतीचा दिवस जवळ येऊ लागला. ऑफिसातही बातमी फुटली होती. अनेक काळ्या-गोऱ्या-तपकिरी मित्र-मैत्रिणींचा गोतावळा गेल्या दीड वर्षात जमला होता. तो सोडून निघालो होतो. त्यांनी दिलेल्या भेटी हा वाढणाऱ्या ब्यागांसाठी संकट होते पण त्या भेटी काही मला जड नव्हत्या.. त्या भेटी नव्हत्या तर अनेकांनी कल्पकतेने त्यात आठवणी गुंफल्या होत्या. आपल्यासाठी एखाद्याने वेळ काढून आपल्यावर इतका विचार करून मिळालेल्या भेटी फार आनंद देतात हेच पुन्हा नव्याने जाणवले.

दिवस भरभर उडत होते आणि जायचा दिवस आला. विमानतळावर मुंबईतून जाताना जसा घोळका होता तितका नसला तरी त्याच्या अर्धा घोळका झालाच. आता मात्र गेले अनेक दिवस मनात चरचरणारी हुरहुर पटकन डोळ्यांवाटे प्रकट रूप घेईल की काय असे वाटू लागले. त्यामुळे फारसा  घोळ न घालता बॅगा चेक-इन करून सरळ आत शिरलो.

विमानात बसलो. पुन्हा एकदा शांतता समोर उभी होती.. अशी शांतता असते जेव्हा फक्त ती असते आणि आपण असतो. एकटे, विचाराधीन... डोळ्यासमोरून दीड वर्ष सरकत होते.. माझे येणे, सारे नावीन्य, पाहिलेली पहिली बर्फवृष्टी, वेड्या खेळांमधला थरार, साकुरा, शिकागोचे रस्ते, वेगास, नायगारा, ग्रँड कॅन्यन सारे सारे माझ्याभोवती फिरत होते, मला पुन्हा ये असे आवर्जून सांगत होते.

"काय दिले मला अमेरिकेने? काय मिळाले तुला अमेरिकायणात? " मी स्वतःला विचारले
"आनंद आणि आत्मविश्वास! " लगेच दुसऱ्या कोपऱ्यातून उत्तर आले देखील..

खरंच अमेरिकेने हातचं काहीही न राखता मला दिला तो निव्वळ, निखळ, निर्व्याज, निर्विष आनंद! इथे भेटलेले प्रत्येक जण अजूनही मला आठवतात. अमेरिकेत मी मनसोक्त  फिरलो अक्षरशः बागडलो. आणि हा आनंद देतानाच मला या अमेरिकेने एक नवा आत्मविश्वास दिला. स्वतः काहीतरी करू शकतो यावर माझा इथे पूर्ण विश्वास बसला.

विमानात उडाल्यावर देखील डोक्यात एकाचवेळी असंख्य विचार येत होते.. इथला प्रत्येक क्षण मनात इतका ओला होता की एका क्षणावर मन स्थिरावेना. एकेक एकेक आठवणी गर्दी करू लागल्या होत्या मन म्हणजे त्या असंख्या आठवणींचे कोलाज झाले होते.

Collage

त्या कोलाजमध्ये प्रत्येक जण होते, प्रत्येक प्रसंग होता, प्रत्येक क्षण होता. मी तिथे आल्याआल्या भासलेली हुरहुर, मला सोडणारा बांगलादेशी टॅक्सी ड्रायवर, फलाफलवाला ऍलन, जर्सी सिटी भेटलेली आणि माझ्यावर मुलासारखे प्रेम करणारी रंजनबेन, मला हळूच एखादा प्रिटझेल फुकट देणारी ऍना, "यू आर बेसिकली अ गुड गाय, सो इव्हन इफ यू वॉंट यू कांट चीट" असे मला नेहमी म्हणणारा निनावी लिफ्टमन, स्वतःला फास्ट बोलर समजणारा वेस्ट इंडीजचा ऑझी, प्रत्येक कंडा मुलगी हि कशी "हॉट चिक" आहे याचे "सविस्तर" वर्णन ऐकवणारा टोनी, मी नॉनवेज खात नाही असे समजून ऑफिसातील पहिले काही दिवस सलाडवर काढलेली लॅट्रीस, भावासारखी काळजी करणारा माझा आधीचा रूममेट सागर, मला माश्याच्या आगरी रेसिपीज सांगणारी लविना, वेड्या खेळांमध्ये जाणवलेला थरार, तिऱ्हाईत देशात केलेली भटकंती, मॅगीवर केलेले प्रयोग, लॉंड्रामर्टमधले पराक्रम अशा एक ना अनेक व्यक्ती, प्रसंग त्या कोलाजमधून डोकावत होते, मला सांगत होते.. "तुला शुभेच्छा! मात्र आत परत आलास तर या देशात आता तू एकटा नाहीस". खरंच कोण कुठल्या गावचे.. तरीही एकमेकांत जीव गुंतले.  काही रस्ते एकमेकांना का भेटतात ते कळत नाही पण त्या छोट्याश्या भेटीत जन्माचं नातं बांधून जातात.. मला भरून आले पण विमानसुंदऱ्या खरंच सुंदर असल्याने त्यांच्यासमोर रडायचे टाळले  .

मुंबई जवळ आली. मी काचेला नाक लावले. खालचे दिवे दिसले आणि मग मात्र ते धूसर दिसू लागले. अचानक भोवतालचे जग, विमान, लोक सगळं विसरलो आणि डोळ्यामधील निर्धाराचा पारा फुटला. पोटासाठी भटकत दूरदेशी गेलेल्या एकाची एक प्रदक्षिणा पूर्ण झाली होती. दूर सोडून आलेल्या अमेरिकेला पुन्हा भेटण्याचे मनातल्यामनात वचन देऊन मी विमानाबाहेर पडलो.. सोपस्कार आटपून बाहेर आलो. मुंबईच्या हवेचा काहीसा कुबट, काहीसा दमट, उष्ण, उबदार  असा आपलासा वास घेतला. समोरच वडील आणि काका घ्यायला आले होते.  माझ्या दीड वर्षाच्या आठवणींनी भारलेले डोके आणि भरलेल्या ब्यागा घेऊन मी त्याच्याकडे वळलो आणि  "अमेरिकायण! "च्या या पर्वाला पूर्णविराम दिला.

(समाप्त)

टीपः
१. संपूर्ण अमेरिकायण! च्या दरम्यान मला मिळालेल्या तांत्रिक सुविधांसाठी मी प्रशासकांचा आभारी आहे.
२. मनातील भावना व्यक्त करायला मला मिळालेलं मनोगत हे पहिलं जालावरील मराठी व्यासपीठ. त्यासाठी त्याचप्रमाणे ही अनुभवशृंखला वाचून प्रोत्साहन दिल्याबद्दल  मनोगत आणि मनोगतींचे अनेक आभार.

कळावे,
लोभ असावा,
ऋषिकेश दाभोळकर