अमेरिकायण! (भाग १९ : मध्य-न्यूयॉर्क- २)

१९२९साली जेव्हा भारतासारखे अनेक देश स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी इंग्रजांशी झगडत होते तेव्हा दूर अमेरिकेत माणसाने एक स्वप्न घडवायला सुरुवात केली होती. एंपायर स्टेट! एम्पायर स्टेट टॉवर ही केवळ इमारत नसून मानवी महत्त्वाकांक्षेचं अभिमानस्थळ आहे असं मी तरी मानतो. मी जेव्हा हा टॉवर प्रथम पाहिला तेव्हाच त्याला मनापासून सलाम केला आणि आजतागायत जेव्हा जेव्हा हा टॉवर दिसतो, तेव्हा तेव्हा मनाला एक उभारी येते, आत्मविश्वास मिळतो. उंचीने अधिक असे ढीगभर टॉवर अमेरिकेतच नाही तर सार्‍या जगभर आहेत. पण एम्पायर स्टेटची दृश्य उंची जरी जगातील काही टॉवरपेक्षा कमी असली तरी ह्या टॉवरला पाहून मनाला मिळणारी उभारी या टॉवरला वेगळ्याच 'उंची'वर नेऊन ठेवते. 

न्यूयॉर्क बघावं तर इथून. या टॉवरवरून दिसणारे न्यूयॉर्क हे अथांग आहे आणि त्याचं वर्णन तुम्ही प्रत्येक ठिकाणी वाचलं असेल. दूरपर्यंत पसरलेले न्यूयॉर्क! एका बाजूला ईस्ट रिव्हर आणि एका बाजूला हडसन नदी अश्या दोन ललना कवेत घेऊन आपल्या अनेक टॉवर्सने मान उंचावून अभिमानाने उभे असलेले मॅनहॅटन, जिवलग मित्रांसारखे खांद्याला खांदे लावून समांतर वाटचाल करणारे मॅनहॅटन ब्रिज आणि ब्रुकलिन ब्रिज, उगवत्या सूर्याबरोबर जिवंत होणारे शहर गेले अनेक वर्ष बघत उभी असलेली स्वातंत्र्यदेवी, एम्पायर स्टेटसारख्या देखण्या राजपुत्राला शोभावी म्हणून तितकेच नटून सजून लखलखणारी- आपल्या विलक्षण सौंदर्याने शहराला शोभा आणणारी राजकन्या- क्रायस्लरची इमारत, अत्यंत आखीव रेखीव हिरवाईने शहराला तजेलदार बनवणारे सेंट्रल पार्क, मनसोक्त खेळणार्‍या मुलाप्रमाणे सतत उत्साही असा प्रकाशाने लखलखता टाइम स्वेअर, डोळ्यांत अनेकविध स्वप्ने घेऊन येणार्‍या प्रत्येकाचे स्वागत करणारी जे.एफ्.के आणि ला ग्वार्डिया ही विमानतळे, हिरव्याकंच वनश्रीने नटलेले गार्डन-स्टेट 'न्यू जर्सी' अश्या अनेक जागा, वास्तू या उंचीवरून दिसतात.

मला या अविस्मरणीय दृश्याव्यतिरिक्त इथे जाणवली ती मनुष्यप्राण्याची दुर्दम्य जिद्द!! जगात अनेक अशी स्थापत्ये आहेत ज्याने मनुष्याला मनुष्याच्याच क्षमतेवर स्तिमित केलं आहे. ताजमहाल काय, पिरॅमिड्स काय अथवा एम्पायर स्टेट काय.. ही स्थापत्ये घडवताना दगड-विटा, संगमरवर, शिलाखंड याहिपेक्षा जास्त काहीतरी वापरले गेले, आणि ती गोष्ट होती मानवी महत्त्वाकांक्षा. या टॉवरला मी अजूनही जाता येता मन भरून पाहतो आणि पाहतच राहतो.

न्यूयॉर्कमधील दुसरं एक मला आवडणारं ठिकाण म्हणजे सेंट्रल पार्क! न्यूयॉर्कची फुप्फुसे! शहराच्या मध्यभागी असलेले हे उद्यान म्हणजे केवळ उद्यान अथवा हिरवळ इतकेच नसून शहराचे एक प्रमुख सांस्कृतिक केंद्रही आहे. इथे उन्हाळ्यात जी बहार असते ती अन्यत्र कमीच! सेंट्रल पार्क मध्ये शिरतानाच तुमचं लक्ष वेधून घेतात ते इथले घोडे. अत्यंत उमदं जनावर! असे तगडे, राजबिंडे, अबलख घोडे खरंतर एखाद्या राजाच्या पागेत शोभणारे अथवा रणांगणात वीराला वाहणारे हवेत. इथे मात्र त्यांना तुच्छ घोडागाडी ओढायला लावून त्या अश्वशक्तीचा खरंतर अपमानच केला आहे. असो. ह्या घोडागाडीवाल्यांना मात्र गिऱ्हाईक पटवायचं ट्रेनिंग मिळालेलं दिसत नाही. सगळे शांत उभे असतात. पुढे अनेक ठिकाणी हिरवळी, मैदाने आणि भोवताली वृक्षराजी आहे. त्यात मनसोक्त हुंदडणारी जनता, पोराबरोबर मूल होऊन खेळणारे अमेरिकन बाप, गतकाळाच्या आठवणीत रमून गेलेले वयस्क जोडपे, आपल्या प्रेयसीला प्रेमाने जवळ "ओठ"णारे प्रेमवीर, उन्हे साजरे करायला लोळणाऱ्या आरक्त गौरांगना, सावलीमध्ये सहकुटुंब चालणारे वनभोजन अशी दृश्य ठिकठिकाणी दिसतात.

याशिवाय इथे मधे काही तळी आहेत. त्यात मंडळी मस्तपैकी नौकाविहार करत असतात. काही ठिकाणी एखादा नवखा बँड आपली कला सादर करत असतो, ते डोंबारी असतातच, शिवाय कुठे जादूचे खेळ चालू असतात तर कुठे तायक्वांडोचे अथवा एखाद्या डान्सचे प्रशिक्षण शिबीर, एखाद्या कोपऱ्यात एखादा चित्रकार समोरचे दृश्य कुंचल्याने रेषांत बांधू पाहत असतो तर आमच्या सारखे पर्यटक छबीयंत्रात.

आम्ही एकदा तिथे गेलो असताना एका तळ्यात रिमोटवर चालणाऱ्या छोट्या शिडाच्या बोटींची स्पर्धा चालू होती (आठवा: स्टुअर्ट लिटिल ). एकदम मारामारीचा सीन होता. ही स्पर्धा दोन गटांत होती १४+ आणि १४-! १४+ ची रेस पाहायचा योग नाही आला.पण १४- मध्ये सुद्धा असणारी स्पर्धा बघून डोळ्याचे पारणे फिटले. हि मुलं बोटींवर नियंत्रण ठेवताना जे कसब दाखवत होती त्याला मी सलाम ठोकला. मला ही स्पर्धा बघायला जास्त मजा आली कारण मीही हि शिडाची होडी रिमोटवर चालवायचा प्रयत्न केला होता. इथे अश्या होड्या चालवायला भाड्याने मिळतात. या रिमोटवर शीड वळवणे, होडी वळवणे आणि होडी चालू-बंद करणे इतकीच नियंत्रणे असतात. हवा नसताना ही होडी चालवणे सोपे असावे असा समज असल्याने तेव्हा चालवून पाहिली पण कमी हवे मुळे कमी वेग आणि कमी वेगात असल्याने अचानक वारा आला तर कलंडेल म्हणून जास्तच नियंत्रण ठेवावं लागे. पण जास्त वाऱ्यात तर शिडावर तुफान नियंत्रण लागते त्यामुळे वारा असताना होडी कलंडायची.

याशिवाय या पार्क मध्ये वेगवेगळी ऑडिशन्स चालू असतात, तर काही अनवट ठिकाणी गेलात तर अगदी गर्दुल्ले देखील दिसतात. हे पार्क इतकं प्रचंड आहे की याचा कानाकोपरा मी इतक्या वेळा जाऊनही अजून पाहिलेला नाही. आणि कदाचित पाहू शकणारही नाही. दरवेळी एका नवीन गेटने आत जाऊन हे पार्क वेगळ्या रंगात मी पाहतो. हेच पार्क "फॉल" मध्ये तर खऱ्या अर्थाने रंगतं. यातील वृक्षराजी लाल, पिंगट, गुलाबी, पिवळ्या, जांभळ्या.. थोडक्यात निळा सोडल्यास जवळजवळ प्रत्येक रंगात नटलेली दिसेल. आणि थंडीत हिमपुष्पे ल्यालेलं सेंट्रल पार्क पौर्णिमेच्या रात्री बघावं.. चांदणं आणि बर्फ ल्यालेली झाडे इतकी प्रकाशमान भासतात. अहाहा! साधारणतः अश्या उन्हाळ्यातील रात्री या उद्यानात एखादी ओपन एअर कंसर्ट असतेच.. ती आवडल्या बँडची असेल तर आनंद काय वर्णावा!

असो. अजून तर केवळ न्यूयॉर्क मधलं मध्य मॅनहॅटन झालं, अजून ब्रुकलिन, क्वीन्स, ब्रॉंक्स, लाँग आयलंड वगैरे भागातील उत्तमोत्तम स्थळे शिल्लक आहेतच. खरंतर, न्यूयॉर्कच्या प्रत्येक भागावर इतका जीव जडला आहे की स्वतंत्र न्यूयॉर्कवर लेखमाला लिहिता येईल. पण या 'अमेरिकायण!' मध्ये मात्र न्यूयॉर्क पुराण इथेच संपवतो. (कोण रे तो सुटलो बुवा एकदाचे म्हणतोय   फक्त न्यूयॉर्क संपवतो आहे बाकी वेगास वगैरे सहन करायचंय  )

-ऋषिकेश

टीप :  चित्र सेंट्रल पार्कचे असून ते एम्पायर स्टेट टॉवरवरून  घेतलेले आहे.