अमेरिकायण! (भाग११ : वॉल स्ट्रिट)

जगात अनेक रस्ते प्रसिद्ध आहेत पण माझ्यामते 'वॉल स्ट्रिट' हा जगातील सर्वात प्रसिद्ध रस्ता असावा. मी जेव्हा वॉलस्ट्रिटवरील ऑफिसमध्ये काम करणार हे कळलं तेव्हा अनेकांनी 'मजा आहे बुआ एका माणसाची 'अश्या आविर्भावात प्रतिक्रिया दिल्या होत्या. आणि इथे आल्यावर मला लवकरच पटलं वॉल स्ट्रिट म्हणजे खरच मजा आहे. ट्रिनिटि चर्च पासून सुरु होऊन  वॉटर स्ट्रिट पर्यत असणारा हा तसा अरुंद रस्ता (म्हणजे बाकी अमेरिकेतल्या रस्त्यांच्या मानाने अरुंद). पण या एका रस्त्यावर अवघी दुनिया एकवटली असते.

वॉल स्ट्रिटला खरं महत्त्वाचं स्वरूप आलं ते इथे दोन महत्त्वाच्या वास्तू उभ्या राहिल्यावर. एक म्हणजे फ़ेडरल हॉल आणि दुसरं वॉलस्ट्रिट-ब्रॉडस्ट्रिटच्या कोपऱ्यावरचं न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज! पुढे ट्रंफ टॉवर आणि जे.पी.मॉर्गन हेडक़्वार्टर्स आली आणि हा भाग फ़ार फ़ार महत्त्वाचा गणला जाऊ लागला. पण माझ्यामते कोणताही भाग वेगळा महत्त्वाचा होतो तो तिथल्या वातावरणामुळे आणि वावरणाऱ्या माणसांमुळे आणि त्याबाबतीत वॉलस्ट्रिट फ़ार नशिबवान आहे. इथे तुम्हाला प्रत्येक प्रकारचा माणूस भेटेल. आणि अमेरिकायणात मला दिसलेल्या ह्या वॉलस्ट्रिटचा, खरंतर वॉलस्ट्रिटवरच्या माणसांचा हा धांदोळा!

सकाळी साधारण आठच्या आधीचा वॉलस्ट्रिट हा कधी वॉलस्ट्रिट वाटतच नाही. नुकती कुठे वर्दळ चालू झालेली असते. वॉलस्ट्रिटवर दोन मोठ्या जिमन्यॅशियम्स आहेत. एवढ्या सकाळी साधारणतः हीच माणसं 'जिमताना' दिसतात. कालच्या साठवलेल्या कॅलरीज संपवायला आलेली ही माणसं आठच्या आत आपलं काम उरकत असावेत. बाकी रस्त्यावर झाडूवाले रस्ता झाडतं आहेत, वेगवेगळ्या टपऱ्यांचे मालक गाडी लावत आहेत असं एक दक्षिण मुंबईतल्या कोणत्याही सकाळी दिसणारं दृश्य वॉलस्ट्रिटवरही असतं.

जसजसा दिवसं चढू लागतो तसतशी मंडळी जमू लागतात. सर्वप्रथम गर्दी येते ती चाकरमान्यांची. आमच्या सारखे दररोज वॉलस्ट्रिटवर येणारे लोकं या प्रचंड गर्दितुनही अलिप्तपणे वाट काढत असतात. यावेळी सहसा तुम्हाला रेंगाळणारी मंडळी फ़ार कमी दिसतील. सगळे जण कसल्या तरी घाईत असतात. कडक इस्त्री केलेले शर्टस, साजेसा नेकटाय आणि सुट असा सर्वसाधारण पोषाख असलेली पुरुषमंडळी, आणि अतिशय फ़ॉर्मल परंतु आकर्षक कपड्यांतील स्मार्ट स्त्रीवर्ग इतर कोठेही लक्ष न देता झपझप पावलं टाकत वेगवेगळ्या इमारतींमध्ये अदृश्य होतात.(मी स्त्रीयांच्या फ़ॉर्मल पोशाखाचं वर्णन करायचं जरा टाळतोच आहे कारण फ़ॉर्मल म्हटलं की जसं पुरुषांसाठी एक ठराविक ड्रेस डोळ्यासमोर येतो तसं बायकांचं नाही हो! एखादा ड्रेस फ़ॉर्मल म्हणावा तर केवळ त्यावर एका कोपऱ्यात कट दिल्या दिल्या तो फ़ॉर्मल रहात नाही. बायकातरी हा ड्रेस फ़ॉर्मल आहे की नाही कसं ओळखतात देव जाणे  ) मला गंमत वाटते ते या कर्मचाऱ्यांच्या अलिप्ततेची. (या म्हणजे त्यात सद्ध्या मीही आलो ). बँकेत "धनपाल" म्हणवणारा कॅशियर जशा लाखांच्या नोटा असोत नाहितर काहीशे असोत एकाच कर्मभावनेने देत असतो त्याच प्रकारे, तितक्याच अलिप्ततेनं या रस्त्यावर काहीही असो/घडो ही मंडळी सरळ आपल्या ऑफिसात घुसतात. तेपण बरोबरच आहे म्हणा वॉलस्ट्रिट म्हणून जर ते गंमत बघत राहिले तर त्या वॉलस्ट्रिटला वॉलस्ट्रिटचं महत्त्व रहाणार कसं?

ही चाकरमान्यांची धावपळ संपते ना संपते तोपर्यंत पर्यटकांची गडबड वाढू लागते. इथे येणारा पर्यटक जगातून कोठूनही आलेला असू शकतो. मला सगळ्यात जास्त मौज या पर्यटकांचं निरिक्षण करण्यात येते. प्रत्येक देशातील पर्यटक निराळा! प्रत्येक जपानी व्यक्तीने उत्तम छायाचित्रकार असणं सक्तीचं आहे बहुतेक. कारण छायचित्र काढण्यासाठी इतकी मेहनत बाकी कोणीही घेत नाही. सर्वसाधारणपणे आपण कसे एखाद्या आवडत्या ठिकाणासमोर उभे रहातो आणि एक पटकन छायाचित्र काढतो. ही मंडळी आधी बराच वेळ अँगल साधण्यात घालवतात. मग "हात किंचीत वर घे..मान थोडि तिरकी ठेव... माझ्या या बोटाकडे बघ... असं म्हणता म्हणताना स्वतः फोटो काढणारा खाली वगैरे बसला असतो.. आता हस.. डोळे (फ़ट) उघड .. ह्म्म्म्म क्लिक!!!!" यातील हरएक क्रिया प्रत्येक फोटो काढताना होते. आणि ही मंडळी इतक्याच तन्मयतेने प्रत्येक फ़ोटो काढत असतात. एकदा मला जापनीझ माणसाने एक फ़ोटो काढायला सांगितला. त्याने अगदी पहिलीतल्या मुलाला समजवावं तसं समजावलं. तो स्वतः आणि त्याची बायको एकज्याक्तली (अस्साच काहीसा उच्चार करतात ते) कुठे येईल ते स्थान, कोणत्या इमारतीच्या कितव्या मजल्यापर्यंत दृश्यमानता असं सगळं मला ऍडजेस्ट करायला लावलं. मी एकदाच क्लिक! केल्यावर फोटो पाहिला. आणि खरचं हो! त्या जापनिज लोकांच्या सौंदर्यदृष्टिला सलाम ठोकला. जो भाग मी रोज पहात होतो तो त्या फ़ोटोत संपूर्णपणे वेगळाच भासत होता. असो तर ही जापनिज मंडळी आपल्या कुटूंबासोबत फ़िरताना दिसतात, तर चायनिज गाईडसोबत. छत्रीचा वापर ऊन पाऊस रोखण्याबरोबरच दिशादर्शनच नव्हे तर नेतृत्वगुण दाखवायलाही होतो हे इथे मला कळलं. चायनिज मंडळींचा मुख्य प्रॉब्लेम इंग्रजी न येणे त्यामुळे त्यांना कुठेही या गाईडला चिकटावं लागतं. पण यांचा घोळका जवळजवळ ३०-४०चा असल्याने गाईड छत्री उघडून चालतो. आणि सगळा घोळका त्या छत्रीमागे मुकाट्याने चाललेला असतो. फार मजेशीर दिसतं सगळं. आणि आपले भारतीय पर्यटक यात सगळ्यात लाजरे! फोटो काढतोय म्हणजे कसलातरी गुन्हाच करतोय असा काहितरी ओशळवाणा चेहरा करतात, आणि वेगात पटकन फोटो काढुन घेतात. आपली मंडळी कोणाला त्रास तर होणार नाही ना, कोणता कायदा तर मोडणार नाही ना या भीती खालीच वावरत असतात (दुसऱ्या देशात कशाला नसता ताप, नाही केल्या चार गोष्टी तर बिघडलं कुठे ही मनोवृत्ती).

तर ह्या मंडळींचा दिवसभर राबता असतो. पण त्यापेक्षा विषेश उल्लेख करण्यासारखे आणखी म्हणजे इथले पोलिस! सतत त्या गर्दिवर लक्ष ठेवणारे ते पोलिस जरी काही बोलत नसले, कोणाच्या मधे येत नसले तरी त्यांचं अस्तित्वच त्या स्ट्रिटला वेगळच परिमाण देतो. कधी कधी ते क्वचित प्रसंगी हसल्यासारखंदेखील करतात. स्प्रिंगमधे बऱ्याचदा काही घोड्यावरचे पोलिस येतात. कसले अबलख घोडे असतात! अहाहा! जातिवंत उमदं जनावर! व्वा!! पण एरवी दिवस-रात्र, पावसात, बर्फ़ात वादळात कसल्याही परिस्थितीत ह्यांना मात्र 'जैसे थे' मधे रहावं लागतं. शिवाय अजून एक मजा म्हणजे ब्रॉडस्ट्रिटवर एक शाळा आहे त्यातल्या लहानग्यांना या पोलिसांच्या बंदुकीचं जाम आकर्षण असतं ते हळुच बंदुकीला हात लाऊन पळून जातात. मग हे पोलीस कधीकधी पटकन बंदुक रोखतात (अर्थात मजेत. पण) बिचारं पोरगं साफ टरकतं.

आणखी विषेश उल्लेख करण्यासारखी जमात म्हणजे पत्रकार मंडळींची. सगळ्या इकोनॉमिक्स न्यूज इथुनच जन्म घेत असल्याने त्यांची वर्दळ ठरलेली. सीएन.एन., एन.बी.सी., बी.बी.सी. अश्या जागतिक मिडियाचे पत्रकार त्यांच्या गाड्या, धावपळ यांची फ़ोडणी त्या रस्त्याला जिवंत करून टाकते. इथले पत्रकारही आपल्या हल्लीच्या नव-पत्रकारांसारखेच उताविळ आहेत. एकदा मलाच बाहेर पडल्या पडल्या पकडलं आणि विचारलं "सो हाऊ आर यू फ़िलिंग टूडे" आता मला काय माहीत काय घडलय ते. मी काय डोंबल सांगणार. मी आपल उगाचच "अं...नॉट शुअर... वी हॅव टू वेट फ़ॉर अ डे ऑर टू" अशी वेळ मारून नेली. ऑफिसमध्ये गेल्यावर कळलं आज बाजार प्रचंड कोसळलाय! बरं झालं "आय ऍम व्हेरी हॅप्पी वगैरे काही बोललो नाही ते  "

याशिवाय काही मधुनच भेट देणारी मंडळी असतात. त्यात प्रामुख्याने येतात ते म्हणजे आंदोलक. आपल्याकडे कसं कोणताही मोर्चा काळाघोड्याला जमतो नि आझाद मैदानात संपतो. तसं इथे प्रत्येक मोर्चा वॉल स्ट्रीटवर एन.वाय.एस.सी समोर झालाच पाहिजे अशी अट असावी. पाणी प्रश्न असो, नाहीतर अल्पसंख्यांक आयोगाची लोकं असो, नाहितर स्त्रीशक्तीचा विजय वगैरे घोषणा असो, प्राणीमित्र असोत नाहितर मानवतावादी संघटना असोत. "गो बॅक बूश" असो नाहितर "मेडिकल इन्शुरन्स मोहीम" असो या रस्त्यावर आपण निषेध नोंदवला नाही तर त्या निषेधाला जोर नाही असं समजलं जातं. जसं मुंबईत प्रत्येक पक्षाला एकदा बंद यशस्वी करून दाखवायला लागे तसं इथे काहीतरी असावं  . वॉल स्ट्रिटचं वर्णन इथल्या नेत्यांशिवाय संपवताच येणार नाही. नेते, सेलिब्रिटिज यांचीही या रोडवर सतत वर्दळ असते. त्यामुळे आमच्या सारख्यांनाही डुब्यामॅन बूश, राईसबाई, हिलरीअक्का, अझीम प्रेमजी आणि वेगवेगळे राष्ट्रप्रमुख वगैरे मंडळींच ओझरतं का होईना दर्शनाचा योग येतो.

या रस्त्यालाच पैशाचा वास आहे असं म्हणतात. पण मला ह्यापेक्षा डोळ्यात भरले ते इथल्या माणसांचे रंग. प्रत्येकजण आपलं काहीतरी या रस्त्यावर आणतो आणि याला सगळ्यात महत्त्वाचा रस्ता बनवतं. खरच, अश्या या वॉलस्ट्रीटला खरंतर शब्दात बांधणं फार कठिण आहे. कोणत्याही बंधनांना न जुमानता जगाला हलवणाऱ्या या रस्त्याला मी बापडा केवळ शब्दात काय बांधणार म्हणा!

तर संध्याकाळ होते.. चाकरमाने घरी जातात... मिडियावाले, पर्यटक, बँकर्स, फेरीवाले, नेते, आंदोलक, उगाचच रेंगाळणारे असे कोणी कोणी इथे उरत नाही. उरतो तो फ़क्त रस्ता. चार रस्त्यांसारखाच एक! रस्ता गर्दुल्ले, पोलीस आणि वॉशिग्टनचा पुतळा यांच्यासोबत रात्र काढणारा सामान्य मृत रस्ता. त्या रस्त्याला जिवंत करणारे कलाकार उद्याच्या सूर्याबरोबर परत येणार असतात!

-ऋषिकेश

नेहेमी प्रमाणे व्य. नि. न चालल्याने ज्या होतात त्याच याही लेखात झाल्या आहेत..  क्षमस्व!