अमेरिकायण! (भाग ९ : जागीच अडकवणारा हिवाळा)

डी.सी. हून परत आलो आणि माझ्या पायाला भिंगरीच लागली म्हणा ना, पुढच्या ३-४ महिन्यात आणि ५-६ महत्त्वाची ठिकाणं पाहून घेतली. एक खरं की न्यूयॉर्कमधलं जलद आयुष्य मला वैयक्तिकदृष्ट्या आवडत असलं तरी हे वेगळं अमेरिकेतलं जग वाटत नसे. डी.सी.ला पहिल्यांदा मला 'बाहेरची' अमेरिका बघायला मिळाली आणि न्यूयॉर्कच्या गर्दीत आल्यावर 'त्या' अमेरिकेची सारखी आठवण व्हायला लागली. पण या फिरण्याआधी अख्खा हिवाळा जायचा होता.

इथे बर्फ हिवाळा वगैरे गोष्टी फार सुंदर असल्या तरी शेवटी नव्याचे नऊ दिवस. आणि हे थंडि प्रकरण संपता संपेना. शुभ्र गालीचे पसरत होते, आणि एक वितळायच्या आत त्यावर नवे नवे चढवले जात होते. याकाळात अमेरिकन मंडळींचा आवडता उद्योग म्हणजे घरी ताणून देणे, मॅच बघणे. अमेरिकन माणसाच्या उत्तम विंटर विकएंडच्या कल्पनेत एका हातात रम/स्कॉच तत्सम मदिरा, समोर फ़ूटबॉलची (अमेरिकन फूटबॉल) मॅच, बायको मधेच पॉपकॉर्न आणून देते, पोरं शांतपणे बाहेर स्कि करताहेत आणि आपली आवडती टिम जिंकत आहे ह्या गोष्टी येतात. याला मुख्य कारण कधीही हवं तेव्हा बाहेर पडता येईलच असं नाही!! मी ही हळूहळू घरकोंबडा होऊ लागलो होतो. पण आता मला नविन जागेचे वेध लागले होते.

मी घर बदलून स्वतः करारपत्रावर सही करून घर भाड्याने घेतलं. आतापर्यंत केलेला हा पहिला स्वतःच्या नावावर असलेला 'व्यवहार'! मुंबईत एकत्र कुटुंब असल्याने "नावावरील जागा" / "स्वतःची (भाड्याने घेतलेली का होईना) जागा" अशी वेळ आलीच नव्हती. या अमेरिकेतील पहिल्या ३-४ महिन्यात मी इतर जागांमध्ये "खोली विभागून" (रूम शेअर) रहात होतो / पेईंग गेस्ट म्हणून राहिलो होतो. पण आता स्वतःची जागा आली होती.
इथे अमेरिकेत बऱ्याचशा पद्धती (प्रोसिजर्स) सोप्या असल्या तरी नविन येणाऱ्यापुढे असणारे "शासकीय स्वछायांकीत ओळखपत्र" (फ़ोटो आयडेंटिटी), "ऋण-इतिहास" (क्रेडिट हिस्टरी), "पत्याचे सिद्धपत्र" (ऍड्रेस प्रुफ), "सामाजिक सुरक्षा पत्र" (सोशल सिक्युरिटी कार्ड) इ. मिळवण्याचे दिव्यही मी गेले अनेक दिवस करत होतो. त्यातही सुरवातीला क्रेडिट कार्ड मिळवणे भलते अवघड, (पण एकदा का तुमचा ऋण-इतिहास तयार झाला की मागे लागतात लेकाचे आणि गरज असताना अंऽहं!!). सुरवातीला कुठेही शासकीय स्वछायांकीत ओळखपत्र मागितलं की पारपत्र दाखवायची वेळ यायची. सतत पारपत्रासारखा महत्त्वाचा दस्तऐवज घेऊन फ़िरणं म्हणजे डोक्याला नसता ताप. अमेरिकन शासकीय ओळखपत्रासाठी पत्याचे सिद्ध होणे गरजेचे होते.  आता स्वतःच्या जागेची भर पडल्याने पत्याच्या सिद्धतेचा प्रश्नही मिटला आणि हातात अमेरिकन ओळखपत्र पडले. इथे जर्सी-न्यूयॉर्क मध्ये पार्कींगची समस्या फ़ार बिकट असल्याने गाडी घेऊन फ़ायदा नव्हता.
(यावरून माझ्या सहव्यावसायिकाने सांगितलेला विनोद आठवला. (विषयांतराबद्दल क्षमस्व) एकदा एक धनाढ्य माणूस बँकेत येतो आणि सांगतो की मला $५००० चे कर्जे हवे आहे. मी माझी गाडी तारण ठेवायला तयार आहे. तो नवी कोरी मर्सिडिज तारण म्हणून ठेवतो व आठवड्याने परत येतो. बँकेने तोपर्यंत त्याची माहिती काढलेली असते. तो कर्ज फ़ेडतो आणि व्याजासकट बँकेला $५०३५  परत करतो. बँक कर्मचारी न रहावून विचारतो, अहो तुम्ही इतके धनाड्य व्यापारी आणि केवळ $५००० च्या कर्जासाठी बँकेत?. तो म्हणतो नाहितर केवळ ३५ डॉलरमध्ये न्यूयॉर्क मधे पार्किंग कसं मिळणार  " )

थोडक्यात मी आता स्थिरस्थावर झालो. यामुळे मला बराच मोकळा वेळ मिळू लागला आणि माझ्यातील पर्यटक आणि बल्लव दोघेही आलटून पालटून जागे होत होते.  नवीन जागेत आल्या आल्या मी नॉनव्हेज करायचा बेत आखला. घरी नॉनव्हेज बनत नसल्याने नक्की कसं बनवतात हे माहीत नव्हतं. पण खवय्येगिरी बरोबर "बनवेगिरी"ही आवडत असल्याने अंदाजाने पहिला प्रयत्न केला तोही एकदम रोस्टेड चिकनचा ('भाजकी कोंबडी' अगदीच विचित्र वाटलं म्हणून इंग्रजी  ). शॉप राईट (इथल्या अनेक खाद्य-महाव्यापारसंकूलातील एक अग्रणी. मला 'लिडिंग फ़ूड मेगामॉल' म्हणायचय ) तर ह्या शॉप राईट मध्ये तंगड्या स्वस्त मिळतात या (आणि इतक्याच) माहितीवर आधारीत अज्ञानातून चांगल्या महागड्या तंगड्या घेऊन आलो! त्यामूळे "खाणेबल" तंगडी करणं आता महत्त्वाचं होतं पण त्यासाठी तंगड्या वेगळ्या तर झाल्या पाहिजेत ना!. शीतकप्प्यात ठेवल्याने त्या एकमेकांना चिकटल्या होत्या. मग मी आणि माझा सहनिवासी (रूममेट) दोघांनी दोन टोकांना धरलं आणि जोर लगाके ऽऽऽ चालू केलं वरून गरम पाण्याची धार सोडली आणि एकदाची ती तंगडी दुसरीपासून वेगळी झाली. हूश्श्श्श!!!! शेवटी एकदाची माझी सगळी मेहनत फ़ळाला (चिकनला) आली आणि फ़र्मास चिकन बनलं. पुढे मला अनेक युक्त्या/कॢप्त्या मिळाल्या ज्यामुळे मी फ़ार छान मांसाहारी जेवणही करू लागलो. (अजूनही मला माझं जेवण आवडतं ), पण हा पहिला मांसाहारी जेवणाचा प्रयोग आणि आमचं ते तंगड्या खेचणं आठवलं की मला फ़ार हसू येतं आणि मजा वाटते.

ह्यावरून भारतात असतानाचा साबुदाण्याच्या चिवड्याचा प्रसंग आठवला. आज फ़ारच विषयांतर होत असेल पण तरी ही मजा सांगितल्याशिवाय रहावत नाही. मी कॉलेजमध्ये होतो, दुपारची वेळ. भूक लागली होती. आज पेपरात 'साबुदाण्याचा चिवडा' कसा करायचा याचं सदर होतं यात चिवड्याचा साबुदाणा तयार मिळतो असं लिहीलं होतं, आणि म्हटलं होतं की  पुर्वी साबुदाणा तळून चिवडा करायचे. झालं! स्वारी तयार. कढईमध्ये तेल टाकून साबूदाणा तळायला घेतला. मला कुठे माहित होतं की तेलात टाकल्या टाकल्या साबुदाणा असा फुटाण्यासारखा उडू लागेल. साबुदाणा ताडताड उडत होता. मी घाबरलो आणि झाकण घालून तळायचं ठरवलं पण पहातो तर अंदाज नसल्याने साबुदाणा जळायचा/कच्चा रहायचा. मग माझ्या सुपिक डोक्यातून कल्पना निघाली! मी चक्क डोळ्याला गॉगल लावला  आणि साबूदाणा तळून काढला. चिवडा चांगला झाला पण अख्खं स्वयंपाकघर साबुदाणामय झालं होतं.
इथे अमेरिकेत असला प्रयोग केला नाही. तरी अजूनही मला वेगवेगळे प्रयोग करायला आवडत असल्याने माझ्या रुममेटचं मुख्य आणि एकमेव कार्य म्हणजे धुम्रदर्शक यंत्र वाजणार नाही याचं!. अजूनही मि नवा प्रयोग करत असलो तर त्याला त्या यंत्राखाली (स्मोक डिटेक्टर) उभं करतो आणि मि तळत असे पर्यंत तो फ़डकं हलवत बसतो  

याच काळात माझं भटकण्याचंही प्रमाण वाढलं. अजून थंडी असल्याने लांब जाता येत नव्हतं तरी न्यूयॉर्क मात्र पिंजून काढणं चाललं होतं. मला असं न्यूयॉर्कमधे निरुद्देश फ़िरायला अजून आवडतं. विषेशतः टाइम स्वेअरमधे! शिआ स्टेडियम नाहीतर न्यूयॉर्क लायब्ररीत जावं पण परत टाइम स्वेअरलाच मस्त भटकावं, काहीतरी न ऐकलेलं खावं, रस्त्यावर चित्र विकणाऱ्याची चित्रे पहावीत, त्या अनामिक गर्दीतलं एक व्हावं. याच थंड काळात पाककलेबरोबरच माझं वाचनही वाढलं. वेगवेगळ्या देशांतीलच नाही तर भाषेतील चित्रपट आवडीने पहायला मी सुरवात केली. याच काळात माझं खरेदी प्रकरणही वाढत चाललं होतं. एकतर इथले मॉल्स इतके मोठे! त्यात सगळं काही इतक्या आकर्षक पद्धतीने मांडून ठेवलं असतं, आणि त्यातही त्या मधूर हास्य करणाऱ्या मॉलगर्ल्स. (मधूर हास्य करणाऱ्या इतरही मुली असू शकतात पण मॉलगर्ल्स म्हणजे मॉलगर्ल्स. मधूर हसणारच, हुकमी एक्का) अश्या मॉलमधून काहीही न घेता बाहेर पडणारा आंधळा तरी असू शकतो किंवा भारतीय तरी! बाकी ह्या अमेरिकन बाजारांमध्ये लोकं भरभरून  घेत असतात. मला कळतच नाही, आम्ही इथे रंग, साइज माहित असला तरी ट्रायल, आणि वाजवी दर याशिवाय कपडा घ्यायचं मनात पण आणत नाही. आणि ही मंडळी जसं शेंगा / मिरच्या घेताना निवडून घेण्याची फ़ारशी भानगड नसते त्याप्रमाणे कपडा दिसला की ट्रॉलीत टाकतात. पण एक खरं त्यांचं सगळ्याबरोबरच केवळ स्वतःसाठी खर्च करण्याच्या मानसिकतेचं कधीकधी कौतुक करावंसं वाटतं. सगळ्यांसाठी घेताना स्वतःला विसरण्यात कसला आलाय मोठेपणा. (आणि केवळ आवडलं म्हणून घेतलं असं आपण कितीदा करतो? एकदा मलातरी 'केवळ' या कारणासाठी काहीतरी घ्यायचंय).

असो तर हिवाळा शांतपणे टळत होता आणि पेपरात कोकिळा गायल्याची बातमी आली. आता अधिकृतरीत्या "स्प्रिंग" चालू झाला होता. आणि हळुहळू ही थिजलेली सृष्टि रंगात येणार होती. नव्या ऋतूमधील नवी अमेरिका पहायला मीही सज्ज होत होतो.

-ऋषिकेश

वि‌.सु.: शुद्धिचिकित्सकाच्या मदतीने जेवढी शक्य झालं तितकी चिकित्सा केली आहे. चुका आढळल्यास दोष चिकित्सकाचा समजावा