अमेरिकायण! (भाग २२ : लास वेगास ३ - हुवर डॅम आणि ग्रँड कॅन्यन)

आमच्यासाठी नवा दिवस उजाडला तेव्हा सकाळचे १० वाजले होते.. खरंतर पाच ते दहा झोप कमीच होती मात्र वेगास ते ग्रँड क्यॅन्यन प्रवास असल्याने नाइलाजाने उठलो आणि निघालो. वाटेत पहिला पडाव होता हूवर डॅम. ऍरिझोना आणि नेवाडा या राज्यांना कोलोरॅडो नदी दुभागते. त्या नदीवर हे १९३५ मध्ये बांधलेले धरण आहे. महामंदीमुळे (कु?)प्रसिद्ध असलेले अमेरिकेचे माजी अध्यक्ष हर्बर्ट हूवर यांच्या वरून त्या धरणाला नाव देण्यात आले आहे. आता पर्यंत भंडारदरा, जायकवाडी वगैरे मोठी धरणे बघितली होती मात्र ह्या धरणाचे स्थळ मला प्रचंड आवडले. ते स्थापत्य पाहून त्याच्या रचनाकाराच्या सौंदर्य दृष्टीला मी सलाम ठोकला.

रुक्ष वाळवंटातील पहाडी दगडांना चिरत जाणारा, त्या वैराण वाळवंटातल्या कोलोरॅडोचा निळाशार रंग अत्यंत सुखद वाटतो. कमनीय ललनेप्रमाणे नाजूक वळणे घेत नदी येत असते आणि एखाद्या टपलेल्या व्रात्य मजनूसारखा हा हूवर डॅम तिला नेमका एका अवघड खिंडीत गाठतो. अत्यंत देखणा डॅम, आपल्या भारदस्तपणातही असणारे नैसर्गिक सौंदर्य खुलवणारा.. दरवाजे उघडणे, पाणी सोडणे, वीज बनवणे अश्या रुक्ष तरीही आवश्यक अश्या यांत्रिक गोष्टी इथेही आहेत पण त्याच बरोबर अंगभूत गोलाईमुळे, जवळच्या पंख असलेल्या राष्ट्रदुतामुळे वगैरे त्याला एक कलात्म किनारही लाभली आहे.

सरकचित्रदर्शन:
(चित्रावर दर्शक रेंगाळेल तितका वेळ सरकचित्रदर्शन थांबेल. तेव्हा चित्रावर टिचकी मारल्यास पुढचे चित्र दिसेल. दर्शक चित्राबाहेर जाईल तेव्हा सरकचित्रदर्शन स्वयंचलित रीतीने चालू राहील. )

या डॅमचे अजून आकर्षण म्हणजे डॅमच्या दोन टोकांना असणारी वेगळी राज्ये आणि त्यांच्या वेगळ्या वेळा. ऍरिझोना व नेवाडा  माउंटन व पॅसिफीक टाइम झोनचे प्रतिनिधी. या टाइम झोन मध्ये एका तासाचे अंतर. मात्र आम्ही गेलो त्या वेळी डे लाइट सेविंग होते पण ऍरिझोना राज्य डे लाइट सेविंग पाळत नाही आणि नेवाडा पाळते त्यामुळे दोन्ही घड्याळे एकच वेळ दाखवत होती.  . दुसरे डॅमजवळचे आकर्षण म्हणजे इथे असणारे राष्ट्रदुत. आपले पंख मुक्तपणे पसरून येणाऱ्या प्रत्येकाचे स्वागत करणारे रक्षणकर्ते. या दूतांचा आकार अतिशय मनस्वी आहे. इथे अशी समजूत आहे की त्यांच्या पायाला घासून एखादे मागणे मागितले असता ते नक्की पूर्ण होते. अश्या लोककथा खऱ्या खोट्याच्या पलीकडे असतात हेच खरे. त्या राष्ट्रदुतांच्या चरणी मी हा सुंदर डॅम असाच टिकून राहून दे अशी इच्छा व्यक्त केली आणि निघालो. या दुतांबद्दल अधिक माहिती इथे वाचता येईल.

या राष्ट्रदुतांना आणि डॅमला निरोप देऊन आम्ही ग्रँड कॅन्यन कडे निघालो. आतापर्यंतच्या अमेरिकेतील केलेल्या ड्राइव्हमधील माझी सगळ्यात स्मरणीय ड्राईव. या ४-५ तासांच्या ड्राइव्हमध्ये मी निसर्गाची बरीच रुपं बघितली. सुरवातीला होते ते दूर दूर पसरलेले रुक्ष वैराण वाळवंट! अगदी क्षितिजापर्यंत फक्त करड्या-तपकिरी रंगात न्हालेलं, उष्ण झळांबरोबर उसासे सोडणारे वाळवंट.

दुतर्फा रुक्ष वाळवंटाच्या रस्त्यातून जात असताना अचानक ब्रेक लागला. दूर दूर पर्यंत एकही गाडी न दिसणाऱ्या त्या रस्त्यावर अचानक ब्रेक का लावला बॉ? असे म्हणायच्या आतच समोर पाहतो तो एक कोल्हीण आणि तिचे पिलू आमच्या गाडीकडे बघत रस्त्यातच थांबले होते. बहुदा रस्ता पार करताना येणाऱ्या आमच्या गाडीमुळे बावचळले असावे. दोन मिनिटे आमचे असे दृष्टीयुद्ध चालू होते अचानक "अगबाई! गॅसवर दूध ठेवलं आहे आणि काय मी तुमच्याशी दृष्टीयुद्ध खेळत बसले ! " असल्या थाटात ती कोल्हीण पटकन लगबगीने रस्ता पार करून तिच्यासारख्या तपकिरी वाळवंटात मिसळून गेली.  

या अनोख्या मार्गावरून आमचे मार्गक्रमण चालू होते. ह्या अफाट वाळवंटापुढे आम्ही मनाने पुरते शरण गेलो होतो. इतक्या वेळा एकही ग्यासपंप न दिसल्याने आम्ही थोडे ग्यासवर होतोच! सरळसोट रस्त्यावर एक छोटासा घाट लागला आणि तो पार होताच माहौल एकदम पालटला. समोर अचानक ढग जमा झाले आणि ढग हातात झारी घेऊन पाऊस पाडण्या ऐवजी फायरब्रिगेडच्या पाइपमधून पाण्याचा मारा करावा तसा चक्क जोरदार पाऊस सुरू झाला. आणि तो हि सगळी कडे नव्हताच आम्हाला तो पलीकडे पडताना दिसत होता मात्र आमच्या गाडीवर पडताना दिसत नव्हता. अचानक त्या "ढगातल्या फ़ायरमनचे" आमच्या गाडीकडे लक्ष गेलं आणि आम्ही आमच्यावर पाऊस अक्षरशः ताडाताड कोसळला. इतका की आमच्या गाडीच्या एका हेडलाईटच्या काचेला तडा गेला आणि वायपर मध्येच अडकला व त्याने दम सोडला.

त्या भयप्रद क्षणांनंतर आम्ही गाडी बाजूला लावली वायपर सरळ केला आणि जरावेळ शांत उभे होतो. निसर्गाच्या क्षणिक तडाख्याने आम्ही इतके भयचकित होतो की पुढे काय करायचे हे देखील सुधरेना.. मात्र शो मस्ट गो ऑन च्या चालीवर एकमेकांना समजावले आणि पुन्हा कॅन्यनच्या दिशेने निघालो. काही क्षणांपूर्वी आघात करणारा निसर्ग आम्हाला पुढे आनंद देत होता.. आता अचानक आम्हाला एकावेळी दोन इंद्रधनुष्य दाखवून तर आमचा दिवस सार्थकी लावला. आता हिरवेगार डोंगर दिसू लागले होते. सूर्यास्ताच्या आत कॅन्यन गाठणे आता सहज शक्य होते.

कॅन्यनला पोचलो आणि कठड्यावर जाऊन उभा राहिलो. आतापर्यंत फक्त चित्रपटांत, चित्रांत, डॉक्युमेंटरीजमध्ये पाहिलेला हा निसर्गाचा अगाध चमत्कार याची देही याची डोळा पाहत होतो. अफाट हा शब्द खुजा वाटावा अशी भव्यता मिरवणारा हा नजारा डोळ्याने पीत होतो. कितीतरी वेळ मंत्रमुग्ध होऊन ती घळ न्याहाळत होतो.

असो. या सुंदर कॅन्यनची शब्दबंबाळ माहिती देऊन मी उगाच तिला खुजे करत नाही. नायगारा,  ग्रॅड कॅन्यन असे नैसर्गिक चमत्कार शब्दातीत असतात हेच खरे! त्यांना शब्दांच्या, कॅमेऱ्याच्या, कुंचल्याच्या फुटकळ चौकडीत बसवायचा प्रयत्न करू नये असे नाही मात्र तो प्रयत्न कधीच यशस्वी होणार नाही याची खात्री बाळगावी. मी या घळीची माहिती, तिला बघून मनात उठलेले तरंग वर्णन करण्याइतक्या ताकदीची माझी शब्दसंपदा नाही. शांताबाई शेळके यांच्या सहजखुण कवितेत म्हणतातच की...

फुल खरे असेल तर सुवास तोही आहे खरा
वाळूइतकाच खरा आहे वाळूमधला खोल झरा
थेंबामध्ये समुद्राची जर पटते सहजखुण
सुंदराचा धागा धागा कशासाठी घ्यावा उकलून?

त्याप्रमाणे हा धागा न उकलता तसाच सोडणार आहे.

(क्रमशः)

टीप
१. शुद्धिचिकित्सक वापरला आहे.