वायरिंग लोचा

समलिंगी हा शब्द तसा मला लहानपणीच ऐकायला मिळाला. झाले काय की आमच्या शाळेत एक बोबडा मुलगा होता. त्याच्याकडे सतत नवनवीन इंपोर्टेड गोष्टी असायच्या. एकदा ह्याचे आणखी कुणाशी तरी भांडण झाले आणि वर्गात आमचे गुरुजी आल्यावर हा रडत त्यांच्या कडे तक्रार घेऊन गेला.
"मास्तर हा बघा ना हा मला म्हणतो की माझे बाबा 'समलींग' करतात"
झालं प्रतीक्षिप्त क्रियेप्रमाणे त्या मुलाला बदडायला उचललेला मास्तरांचा हात एकदम थांबला आणि ते म्हणाले,
" काय? काय करतात म्हणालास? "
ह्याचे भोकाड सुरूच, "समलींग करतात!! "
मास्तरांच्या चेहऱ्याचा रंगच उडाला दोघांनाही मास्तर वर्गाच्या बाहेर घेऊन गेले.
आम्हाला हे काहीच कळेना ह्या बोबड्याने स्मगलींगचे 'समलींग' केले तर मास्तरांच्या चेहऱ्याचा रंग का उडाला? समलींग ही भानगड काय असते हा किडा तिथून आला. म्हणजे तसे आमचे सेक्स एज्युकेशन इयत्ता पाचवी पासूनच सुरू झाले होते.
एकदा ऑफ तासाला वर्गात शिक्षक आले आणि म्हणाले,
'मुलांनो तुम्हाला काहीही गोष्टी, विनोद, गाणी सांगायची असतील तर पुढे या आणि सांगा मी मागच्या बाकावर जाऊन काम करतो (म्हणजे एक झोप काढतो).
ह्यावर ओसवाल नावाचं एक ध्यान पुढं आलं आणि म्हणालं, "मास्तर शेर सांगितला तर चालेल का? "
मास्तर म्हणाले चालेल. काय वाट्टेल ते सांग. ह्याने शेर सुरू केला,
"फुल मे सुगंध नही तो फुल का क्या मजा? "
आम्ही सगळे वा वा वा वा करत होतो आणि त्याचे सुरूच
"फुल मे सुगंध नही तो फुल का क्या मजा? "
..... और बिस्तरपे लडकी नही तो सोनेका क्या मजा?? "
झालं. अर्धवट झोपेत असलेले मास्तर हा शेर ऐकून जवळपास बाकावरून पडलेच. आणि ह्या सगळ्यातले एक अक्षरही न कळलेले आम्ही पाचवीतले धो धो हसत होतो. मास्तरांनी स्वतःला सावरले पुढे आले आणि ह्या ओसवालला एक कानाखाली भडकवली.
"कुणी सांगितला रे तुला हा शेर? "
"दादाने सांगितला इथेच नववीत आहे तो! "
त्यानंतर ह्याची आणि ह्याच्या नववीतल्या दादाची यथेच्छ धुलाई झाली आणि हा शेर मात्र संपूर्ण शाळेत सुपरहिट्ट झाला. त्याचा अर्थ थोडाफार कळायला लागला असला तरी "समलींग" ही काय नवीन भानगड आहे कळत नव्हतं. शेवटी बराच उहापोह केल्यावर एकाला सुचले. 'अरे, बिस्तरपे लडकी नही तो सोनेका क्या मजा? ' असे सगळ्यांचेच नसते काही.
काही जणांचे, 'बिस्तरपे "लडका"नही तो सोनेका क्या मजा? ' असेही असते. आणि आमच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला.

पण हे सगळे सगळे झाले अनधिकृत लैंगिक शिक्षण. अधिकृतरीत्या शिकायला मिळाले १२वीला बायोलॉजीच्या क्लास मध्ये. विषय बायोलॉजीचा असल्याने आमचे मास्तर चावटपणाचे पर्मनंट लायसन्स मिळाले असल्यासारखे सुटलेले असायचे. त्यांच्या एक एक कोट्या आणि पानचट विनोद तसेच वर्गातल्या छान छान दिसणाऱ्या मुली ह्यामुळे हा क्लास मी कधीच चुकवायचो नाही. असो. तर एकदाचा तो ह्युमन रीप्रोडक्शन हा धडा आला आणि मास्तरांनी अगदी डिटेलवार सगळी प्रक्रिया समजावून सांगितली. त्यात शेवटी एक समलिंगी संबंधाचाही उल्लेख होता त्यावरही मास्तरांनी थोडे विवेचन केले आणि त्या दिवशीचा क्लास संपला. मी माझी वह्या पुस्तके पिशवीत भरत होतो आणि नेहमीप्रमाणे एक दोन कार्ट्या क्लास संपल्यावर उगीचच आपण किती शहाणे आहोत हे दाखवायला मास्तरांना प्रश्न विचारायला वर्गात होत्या. माझ्या कानावर त्यांचे बोलणे पडत होते. तर ह्या दिवटीने प्रश्न विचारला,
"का हो सर पुरुष पुरुष समलिंगी संबंध असतात तसे बायका-बायका मध्येही असतात का हो? "
ह्यावर मास्तर एकदम ओरडला "अहो कसे असतील? घालायला काही नको का?? "
वर पूरक हातवारे आणि हॅहॅहॅहॅहॅ!!!
"म्हणजे जोक्स अपार्ट, असतात असे संबंध त्यांना लेजबियन असे म्हणतात पण ते नक्की काय करतात ते मला माहीत नाही!! हॅहॅहॅहॅ"

तर एकंदरीत असे समलिंगी लेजबियन वगैरे विषयी आमचे शिक्षण झाले. पण ह्याचा खरा अनुभव (म्हणजे हे प्रकरण नक्की काय आहे त्याचा, समलिंगाचा नव्हे :) ) आला तो अमेरिकेत आल्यावर. अधून मधून ही रंगीबेरंगी फुलपाखरे दिसायची आणि "ही इज गे" अशी कुजबुजही ऐकू यायची. मग लक्षात आलं की ज्यांना पुरुष असून नटण्या मुरडण्याची आवड असते, छान छान रंगीत कपडे घालणे, केशरचना करणे, भुवया कोरणे, टाईट्ट टी शर्ट घालणे त्यांना इथे गे (समलिंगी) म्हटले जाते. ह्याचा मी इतका धसका घेतला की रोज आरशात पाहून खात्री करत घेत असे, माझे शर्ट प्यांट म्याचींग नाही ना झालेले. शर्ट थोडासा चुरगळलेला आहे ना. थोडक्यात काहीसे अजागळ दिसत आहोत ना? कारण एकदम टापटीप राहिलो तर कुणालातरी यायचा संशय मी गे आहे की काय?

नंतर हळू हळू गप्पांमधून, टीवीवरून, चित्रपटांमधून ह्या गे लोकां विषयी अधिक माहिती मिळत गेली. मुन्नाभाई मध्ये जसा संजय दत्तच्या डोक्यात केमिकल लोचा झालेला असतो तसाच ह्यांच्या डोक्यात वायरिंग लोचा झालेला असतो इतकेच. बाकी ही माणसे सामान्यच. लाल वायरच्या जागी पिवळी वायर आणि पिवळ्या वायरच्या जागी लाल वायर चुकून लावली गेलेली, त्यामुळे सर्किट पूर्णं होते पण इफेक्ट एकदम उलटा असेच काहीसे. आणि ही सगळी निसर्गाचीच करामत त्यामुळे दोन पुरुष एकत्र येणे ह्यात अनैसर्गिक काय ह्याचे मला आश्चर्य वाटते. उलट जबरदस्ती करून ह्या लोकांना स्त्रियांशी लग्न करायला भाग पाडणे हे मात्र अतिशय अनैसर्गिक वाटते. बहुतांश लोक उजवी असतात पण काही लोकं डावखुरी देखिल असतात तितकेच सोपे हे प्रकरण आहे आणि त्याला तितकेच महत्त्व द्यावे. कुणी निव्वळ डावखुरा असल्याने आपला नावडता नसतो की (डावखुरा आहे म्हणून) त्याचे कौतुकही नसते. सिंपल!

असो तर हे सगळे आठवायचे कारण म्हणजे नुकताच दिल्ली हाय कोर्टाने दिलेला निर्णय आणि त्यावर चाललेल्या प्रतिगामी-पुरोगामी चर्चा आणि वाद. त्या निमित्ताने बरीच कपाटे (क्लॉजेटस) भारतातही उघडली जातील आणि बरेच लोक त्यातून बाहेर येतील समाजाच्या विविध स्तरांमधून विरोध होईल हळू हळू तोही निवळून जाईल आणि ह्या मंडळींना समाजात त्यांच्या सेक्शुअल ओरिएंटेशन सकट स्वीकारलेही जाईल. अर्थात हे सगळे अजून बरेच लांब असले तरी निदान ही क्रिया तरी आता सुरू होईल असे वाटते. मुळात असे काही नसतेच (योग्य की अयोग्य हे लांबचे) हा भ्रम जरी दूर होण्यास ह्यामुळे सुरुवात झाली तरी चिक्कार झाले म्हणायचे. दिल्ली हायकोर्टाचे अभिनंदन!