महाभारत कथा
- महाभारत कथा (१)
- महाभारत कथा (२)
- महाभारत कथा (३)
- महाभारत कथा (४)
- महाभारत कथा (५)
- महाभारत कथा (६)
- महाभारत कथा (७)
- महाभारत कथा (८)
- महाभारत कथा (९)
- महाभारत कथा (१०)
- महाभारत कथा (११)
- महाभारत कथा (१२)
- महाभारत कथा (१३)
- महाभारत कथा (१४)
- महाभारत कथा (१५)
- महाभारत कथा (१६)
- महाभारत कथा (१७)
- महाभारत कथा (१८)
- महाभारत कथा (१९)
हस्तिनापुराच्या राजसिंहासनाच्या वारसा हक्काचा प्रश्न आता ऐरणीवर आलेला होता. राजपुत्रांचे अध्ययन पूर्ण झाले होते आणि ते राज्यकारभाराची जबाबदारी स्वीकारण्यायोग्य होते. धृतराष्ट्र अजूनही राज्याचा सर्वाधिकारी होता, आता सिंहासनासाठी उत्तराधिकारी निश्चित करणे आवश्यक होते. सम्राट धृतराष्ट्र आणि महाराणी गांधारी या दोघांनाही त्यांचा पुत्र दुर्योधन यालाच युवराज म्हणून घोषित करण्याची इच्छा होती. परंतु ज्येष्ठतेच्या नियमानुसार युधिष्ठिर त्या पदाचा जन्मसिद्ध अधिकारी होता. दरबारी, अधिकारी, मंत्री आणि प्रजाजन यांचा कल धर्मराज युधिष्ठिराकडे होता. सर्वांसमोर हा एक पेचप्रसंग उभा राहिला होता.
सम्राट धृतराष्ट्राने पांडवांना वारणावत नगरीमध्ये होणाऱ्या घोषयात्रेमधे राजाचे प्रतिनिधी म्हणून सामील होण्याची आज्ञा दिली. पांडव आणि त्यांची माता कुंती यांचे वारणावत नगरीमधील वास्तव्य सुकर व्हावे याकरता तेथील अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या होत्या. त्यांच्या निवासासाठी एक नवीन राजगृह बांधण्यात आले होते ... लाक्षागृह.
या सर्व घडामोडींवर महामंत्री विदुरांचे लक्ष होतेच. विदुरांचे गुप्तहेर, अधिकारी त्यांना माहिती पुरवत होते. विदुरांनी त्यांचा विश्वासू वास्तुरचनाकार पुरोचन याला वारणावतामध्ये जाण्याची आज्ञा केलेली होती. त्यांना सर्व योजनेमध्ये काहीतरी काळेबेरे असावे असे वाटत असावे आणि ते खरेही होते. पांडवांसाठी निर्माण केलेले लाक्षागृह अगदी थोड्या अवधीमध्ये बांधून पूर्ण करण्यात आले होते आणि त्यासाठी वापरलेले सर्व साहित्य ज्वालाग्राही होते.
पुरोचनाने (बहुदा विदुरांच्या सूचनेनुसार) अल्पावधीतच कुणाच्याही नकळत राजवाड्यातून गावालगत असलेल्या जंगलापर्यंत जाता येईल असा एक गुप्त भुयारीमार्ग तयार केला होता. पांडवांना त्यांना असलेल्या धोक्याबद्दल माहिती देऊन सावध राहण्यास सांगितलेले होते.
घोषयात्रा संपन्न झाली, कुंती आणि पाच पांडव विश्रामासाठी लाक्षागृहामध्ये आले होते. त्याच वेळेस एक भिल्लीण तिच्या पाच पुत्रांसमवेत तिथे आली. खूप रात्र झाली असल्याने जंगलातून मार्ग आक्रमणे धोकादायक असल्याचे सांगत तिने एक रात्रीपुरता आश्रय मागितला. कुंतीने त्यांना भोजन देण्याची व्यवस्था करून शयनगृहांमध्ये विश्रांती घेण्यास सांगितले. हा निव्वळ एक योगायोग असावा पण त्यामुळे कौरवांची दिशाभूल करून काहीकाळ सुरक्षित राहणे पांडवांना शक्य झाले होते.
रात्रीच्या सुमारास पुरोचन तिथे आला आणि त्याने सांगितले की दुर्योधनाने काही करण्याच्या आधी आपणच कृती करणे चांगले. त्याने कुंती आणि पांडवांना राजवाड्यातील भुयारामध्ये प्रवेश करण्यास सुचवले. त्या भुयाराचे दुसरे द्वार दूर अरण्यात उघडत होते.
पुरोचन वास्तुरचनाकार होता आणि लाक्षागृह बांधण्याचे कार्य कौरवांनीच त्याच्यावर सोपवले होते. परंतु तो विदुराचाही विश्वासू होता आणि त्याने पांडवांना त्या अग्निकांडातून सुटकेचा मार्ग तयार करून दिला होता.
पांडवांनी भुयारात प्रवेश केल्यावर पुरोचनाने स्वतःच एक मशाल घेऊन लाक्षागृहाला आग लावण्यास सुरुवात केली. पूर्णतः ज्वालाग्राही साहित्य वापरून बांधलेले ते भवन थोड्याच कालावधीत ज्वाळांनी वेढले गेले होते. आग विझल्यानंतर पहिले असता एक स्त्री आणि पाच तरुणांचे मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळून आले. सर्वांना वाटले, पांडव त्यांच्या मातेसह अग्नीमध्ये जळून गेले. जनसामान्यांच्या शोकाला पारावार राहिला नव्हता. कौरव आणि शकुनीमामा आनंदात होते. बाह्यतः दुःखाचे नाटक करणे त्यांना कठीण झालेले होते. महात्मा विदुरांना सत्य माहिती होते परंतु जोवर कुंती आणि पांडव सुरक्षित असल्याची वार्ता येत नाही तोवर ते सुद्धा शोकाचे नाटक करीत होते.
पांडव इतक्या सहज नष्ट होतील यावर दुर्योधनाचा विश्वासच बसत नव्हता. काहीतरी युक्ती वापरून त्यांनी स्वतःची सुटका करून घेतली असेल असा त्याला संशय येत होता, म्हणून त्याचे हेर आणि सैनिक चहूदिशांना शोध घेतच होते. त्याचा संशय खराच होता, पांडव भुयारीमार्गाने सुखरूप अरण्यांमध्ये पोहोचले होते आणि लपतछपत पुढील मार्गक्रमणा करीत होते.
घनदाट निबिड अरण्यातून पांडव मार्ग आक्रमीत होते. वाटचाल करताना आलेला थकवा, अन्नाची कमतरता यामुळे माता कुंतीला सतत वाटचाल करणे अशक्य झाले होते. विश्रांतीची तिला नितांत आवश्यकता होती. अखेर प्रवासी मार्गावर आणि अरण्याच्या सीमेवर असलेल्या एका गावात थोड्या कालावधीसाठी आश्रय घेण्याचे पांडवांनी ठरवले. गावातील एका लहानशा घरात राहणाऱ्या गरीब ब्राह्मणाने त्यांना आश्रय दिला. ब्राम्हणाच्या घरी अठराविश्वे दारिद्र्य होते पण तरीही घरी आश्रयाला आलेल्या अतिथींचे त्याने मनःपूर्वक केले होते.
काही काळाच्या विश्रांतीनंतर पुढील प्रवासास सुरुवात करायची असे पांडवांनी ठरवले होते. एके रात्री पुढील मार्गक्रमणेविषयी चर्चा करीत असताना कुंतीला घरातून कुणीतरी रडत असावे असे आवाज ऐकू येऊ लागले. बहुदा ब्राह्मण स्त्री रडत असावी आणि ब्राह्मण तिची समजूत घालायचा प्रयत्न करीत असावा. कुंतीला ते करुण दृश्य पाहवेना. त्यांना आश्रय देणाऱ्या यजमानांना काही दु :ख असावे, त्यांचा दुःखभार हलका करण्यासाठी मदत करणे हे अतिथींचे कर्तव्य आहे असे म्हणत ती पुढे गेली. तिने त्यांच्या दुःखाचे कारण विचारले तेव्हा ब्राम्हणाने तिला एक विचित्र हकीकत सांगितली.
त्या गावाच्या वेशीलगत जे जंगल होते तिथे एक महाकाय राक्षस राहत असे .. त्याचे नाव होते बकासुर. तो दररोज गावात येऊन पाळीव प्राणी, माणसे पळवून नेत असे, घरे, शेते इत्यादींची नासधूस करीत असे. त्याला विरोध करण्याचे सामर्थ्य कुणाकडेच नव्हते.
एकदिवस धीर करून गावातील काही नागरिक राक्षसाकडे विनंती करायला गेले. राक्षसाच्या उपद्रवामुळे गावकऱ्यांचे जीवन अवघड झाले होते, गाव उजाड होऊ लागले होते. राक्षसाने गावाचे आणि गावकऱ्यांची जीवित आणि वित्तहानी करू नये अशी विनवणी सर्वांनी केली तेव्हा सांगितले तो गावात येणार नाही, कुणालाही उपद्रव देणार नाही परंतू त्याची एक अट मान्य करायला पाहिजे. तो गावात येणार नाही पण गावकऱ्यांनी रोज त्याच्यासाठी गाडाभर अन्न, एखादा प्राणी घेऊन एक माणूस पाठवायचा. तेव्हापासून गावातील एक माणूस दररोज त्याच्यासाठी अन्न घेऊन जातो, तिथे जाणाऱ्या माणसाला सुद्धा राक्षस ठार मारतो.
उद्या ब्राह्मणाला राक्षसाकरता अन्न घेऊन जायचे होते. राक्षस अर्थातच त्यालासुद्धा भक्ष्य करणार होता. घरातील कर्ता गेल्यानंतर त्याची पत्नी आणि मुले अनाथ होणार होती. आणि म्हणूनच सारे कुटुंब दुःखी होते. त्यांचे ते विलक्षण कथन ऐकल्यानंतर कुंतीने निर्णय घेतला, तिने सांगितले उद्या त्या ब्राह्मणाच्या जागी तिचा पुत्र राक्षसासाठी अन्न घेऊन जाईल. ब्राह्मण दंपतीला ते मान्य होत नव्हते, ते म्हणाले आमच्या नशिबात जे आहे ते आम्ही स्वीकारलेच पाहिजे. स्वरक्षणासाठी अतिथीला बळी देणे पाप आहे. कुंतीने त्यांना समजावले, तिचे पुत्र महापराक्रमी आहेत. त्यामुळे चिंता करण्याचे कारण नाही आणि त्यातूनही काही वाईट घडलेच तर तिचे अजून चार पुत्र आहेतच. बराचकाळ समजवल्यानंतर अखेर ब्राम्हणाने तिचे म्हणणे मान्य केले.
दुसऱ्यादिवशी सकाळी राक्षसासाठी गाडाभर अन्न घेऊन बलशाली भीम जंगलाकडे रवाना झाला. अन्नाची गाडी घेऊन आलेल्या भीमाला ठार करण्यासाठी राक्षस सरसावला परंतु आज काही वेगळेच घडले होते. राक्षसाला पाहून गर्भगळित न होता तो माणूस प्रतिकार करू लागला होता, भीमाने राक्षसाबरोबर युद्ध करून त्याचा वध केला आणि समस्त गावकऱ्याची त्याच्या छळापासून मुक्तता केली. सर्व गावकरी आनंदित झाले होते, गावावर पसरलेले मृत्यूचे सावट नष्ट झालेले होते.
हा इतिहास आहे का बाळगोपाळांच्या रंजनासाठी लिहिलेली काल्पनिक कथा आहे ते माहिती नाही. या कथेत राक्षस (त्याचे नाव बकासुर आहे ) सोडून इतर सर्व जण सद्गुणी आहेत. त्या राक्षसाचा त्रास बिचारे सहन करीत आहेत. त्यामुळे बकासुराचा वध करणे हे एक पुण्यकर्म आहे.
-- पांडवांना आश्रय देणारा यजमान ब्राम्हण बिचारा इतका गरीब .. पण तरीही आश्रयासाठी आलेल्या (अनोळखी) अतिथींचे स्वागत करतो, त्यांचे आदरातिथ्य करतो. (अतिथी देवो भव:)
-- त्याच्यावर आलेल्या संकटाची अतिथींसमोर वाच्यता न करता, संकटाला सामोरे जायची तयारी करतो.
-- माता कुंती यजमानांचे दुःख जाणून मदत करायचे ठरवते आणि स्वपुत्राला संकटाशी सामना करायला पाठवते. ती एक क्षत्रिय राजस्त्री आहे म्हणून ती तिचा राजधर्म पाळते (जनतेचे रक्षण करणे). त्याचवेळी तिचा तिच्या पुत्राच्या सामर्थ्यावर असलेला विश्वासही दिसून येतो. अंततः तिचा पुत्र म्हणजे भीम विजयी होणार आहे अशी तिला खात्री आहे.
-- आणि अर्थातच अखेरीस महाबळी भीम विजयी होतो.
त्यानंतर पांडव आणि कुंती पुढील मार्गक्रमणेस प्रारंभ करतात. द्रौपदीच्या स्वयंवरात सहभागी होण्यासाठी त्यांना पांचाळ देशात जायचे असते. त्यांना स्वयंवराची वार्ता कशी समजली असावी माहिती नाही. वारणावतामध्ये येण्याअगोदर त्यांना निमंत्रण मिळाले असावे का? किंवा विदुरांचे हेर नक्कीच त्यांच्या संपर्कात असणार आणि विदुरांनी त्यांना स्वयंवरस्थळी जाण्यास सुचवले असावे का?
कुंती आणि पांडवांना तातडीने ते गाव सोडून निवासस्थान बदलणे जरुरीचे होते कारण बकासुरासारख्या बलाढ्य राक्षसाच्या वधाची वार्ता सर्वत्र पसरणारच. दुर्योधनाला कळणार. बलाढ्य आणि क्रूर राक्षसाचा वध करणे हे काही सहजसाध्य नाही आणि ते काम फक्त भीमच करू शकतो हे सर्वांनाच माहिती होते. दुर्योधनाला पांडवांचा ठावठिकाणा कळला की तो त्यांच्यापर्यँत पोहोचणार हे निश्चित. हे सर्व टाळायचे असेल तर निवासाचे स्थान बदलणे शहाणपणाचे ठरले असते.
त्याच प्रवासात त्यांना आणखी एका राक्षसाबरोबर सामना करावा लागतो . .. त्याचे नाव हिडिंब. अरण्यमार्गाने प्रवास करीत असताना एक बलाढ्य राक्षस त्यांची वाट अडवतो आणि युद्धाचे आव्हान देतो. महाबळी भीम त्याचाही वध करतो, तेव्हा त्याच्या जुलमांना कंटाळलेले त्याच्याच जमातीतील लोक आनंदित होतात. राक्षसाची बहीण हिडिंबा भीमाशी विवाह करण्याची इच्छा व्यक्त करते आणि भीम ती मान्य करतो. भीम आणि हिडिंबा यांच्या पुत्राचे नाव नाव घटोत्कच. (या सर्व घटना द्रौपदी स्वयंवराच्या आधी घडलेल्या आहेत.) घटोत्कचाला चमत्कारी, मायावी शक्ती वश होत्या ज्यांचा उपयोग भविष्यामध्ये घडलेल्या कुरुक्षेत्रावरील युद्धामध्ये होतो.
या सर्व कथानकावरून हे सिद्ध होते की दुर्योधन पांडवांचा द्वेष करीत होता. त्यांना ठार मारून सिंहासनाकडे जाणारा मार्ग त्याला निष्कंटक करायचा होता. परंतु त्याच्या दुर्दैवाने आणि पांडवांच्या सुदैवाने त्याचे सर्व प्रयत्न असफल झाले होते.
***