महाभारत कथा (१९)

महाभारत कथा (१९)
द्रौपदीच्या स्वयंवरात अर्जुनाने मत्स्यवेध केला, पण खरा पेच तर त्यानंतरच निर्माण झाला!
कुंतीच्या एका वाक्यामुळे द्रौपदीला पाच पांडवांची पत्नी व्हावे लागले?
हा निव्वळ योगायोग होता, की हस्तिनापुराचे सिंहासन मिळवण्यासाठी आखलेली कुंतीची दूरगामी खेळी?
कर्णाचा अपमान, श्रीकृष्णाची उपस्थिती आणि एका विवाहातून आकाराला येणारे महाभारताचे राजकारण...
या घटनांमागचे रहस्य काय?

भीमाने बकासुर आणि हिडिंब सारख्या बलाढ्य आणि क्रूर राक्षसांचा वध केला होता. इतकी महत्त्वाची वार्ता लपून राहणे शक्यच नव्हते. दुर्योधनाला आता पांडवांचे वास्तव्याचे ठिकाण कळणे सहज शक्य होते. त्यामुळे पांडवांना पुढची मार्गक्रमणा करणे क्रमप्राप्त होते. त्यांचा पुढील प्रवास मात्र निरुद्देश्य आणि केवळ प्राणभयाने लपण्याकरता नव्हता. त्यांना पांचाळनगरीमध्ये जायचे होते -- द्रौपदी स्वयंवरासाठी. पांडव त्यांच्या मातेसह मजलदरमजल करीत पांचाळनगरीमध्ये पोहोचले त्यावेळी नगरीमध्ये उत्सवाचे वातावरण दिसत होते, त्यासाठी कारणही तसेच होते. पांचाळदेशाची राजकन्या द्रौपदीचे स्वयंवर आयोजित करण्यात आले होते. देशोदेशींचे राजे आणि राजपुत्र नगरीमध्ये जमले होते.

द्रौपदी स्वयंवराची कथा -- 

पांचालदेशीचा द्रुपदराजा निपुत्रिक आणि अपत्यहीन होता. अपत्य प्राप्तीकरता त्याने यज्ञ केला होता. त्या यज्ञातून प्रकट झालेली कन्या म्हणजेच द्रौपदी -- अशी कथा सांगितली जाते. यज्ञातून प्रकटलेली म्हणून याज्ञसेनी, द्रुपद कन्या म्हणून द्रौपदी, पांचाळदेशीची राजकन्या म्हणून पांचाली आणि सावळी अंगकांती असलेली म्हणून कृष्णा अशी तिची अनेक नावे आहेत. द्रौपदी सौंदर्यवती होती आणि बुद्धिमती होती. द्रौपदी गुणवती होती आणि द्रुपद राजाने राजकन्येला आवश्यक ते उत्तम शिक्षण तिला मिळेल याचीही काळजी घेतली होती.

कन्येसाठी वरसंशोधन करण्याचे द्रुपद राजाने ठरवले होते. द्रौपदीला तिच्या रूप आणि गुणांना योग्य असा वर मिळावा अशीच त्यांची इच्छा होती. द्रुपदराजाने द्रौपदीच्या स्वयंवराकरता एक अवघड पण निश्चित केलेला होता ज्याची पूर्तता करणे एखाद्या निष्णात धनुर्धारीलाच शक्य होणार होते. काही कथा सांगतात की द्रौपदीला अर्जुन तिचा पती असावा अशी इच्छा होती  म्हणून असा अवघड पण लावलेला होता जो जिंकणे फक्त अर्जुनालाच शक्य होणार होते. काही कथा सांगतात की पांचाळनगरी मध्ये उपस्थित असलेल्या श्रीकृष्णांनी द्रौपदीकडे अर्जुनाचे गुणवर्णन केले होते आणि म्हणून अर्जुन तिचा पती असावा अशी तिची इच्छा होती.

पांडव कुंतीसह पांचाळनगरीमध्ये दाखल झाले होते. परंतु हस्तिनापुराचे राजपुत्र म्हणून नाही तर ब्राम्हण कुमारांच्या वेषामध्ये. पांडव छद्मवेषात वावरत होते. कारण दुर्योधनाचे हेर अजूनही त्यांच्या मागावर होते. ब्राम्हणकुमारांच्या वेषातील पांडवांना कुणीही ओळखले नव्हते. स्वयंवर मंडपात राजे आणि राजपुत्रांकरता आसने मांडलेली होती आणि एका बाजूला सामान्य प्रजाजनांची गर्दी होती. पांडव त्याच गर्दीमध्ये सामील झाले होते.

द्रौपदीच्या अलौकिक सौंदर्याची ख्याती सर्वदूर पसरलेली होती, तिच्या प्राप्तीच्या अभिलाषेने देशोदेशींचे राजे आणि राजपुत्र तिथे जमलेले होते. त्या उपस्थितांपैकी कुणी एक नशीबवान ठरणार होता. स्वयंवर मंडपात मध्यभागी एक जलकुंड तयार करण्यात आले होते. त्या कुंडाच्या वर एक फिरते चक्र होते ज्याच्यावर एक मासा बांधलेला होता. ते चक्र वेगाने फिरत होते आणि त्याची प्रतिमा त्याच्या खाली ठेवलेल्या कुंडामधील पाण्यामध्ये दिसत होती. फिरत्या मत्स्याची प्रतिमा बघून त्याच्या नेत्रामध्ये अचूक बाण मारायचा असा तो पण होता. स्वयंवराचा पण जिंकून द्रौपदीला प्राप्त करणारा भाग्यवान वीर कोण असेल याची सर्वांनाच उत्सुकता होती. 

एकेक करून राजे, महाराजे, राजपुत्र धनुष्य सावरत होते पण त्यांचा नेम चुकत होता. समय पुढे जात होता आणि मंडपामध्ये निराशेचे वातावरण पसरू लागले होते. दुर्योधन, दु⁚शासन आदी कौरव राजपुत्राची हार झाली होती. आता अंगराज कर्ण पुढे सरसावला. जलकुंडासमोर ठेवलेले धनुष्य तो हाती घेणार, त्याचवेळेस युवराज धृष्ट्यध्युम्नंने जाहीर केले, त्याची भगिनी सूतपुत्राला कदापिही वरणार नाही. अपमानित झालेला कर्ण स्वस्थानी परत गेला होता. द्रौपदीने स्वयंवर मंडपात त्याच्या सामान्य कुळाचा उद्धार करून दिलेला नकार त्याच्या जिव्हारी लागलेला होता.

-- कर्णाला स्वयंवराच्या स्पर्धेमध्ये सहभागी होण्याला प्रतिबंध करणारी घोषणा द्रौपदीच्या सांगण्यावरून करण्यात आली होती? का तिचे पिता आणि बंधूंनी तो निर्णय घेतला होता? माहिती नाही.

-- महाभारताच्या लोकप्रिय कथांमध्ये द्रौपदी स्वतः "मी सूतपुत्राला वारणार नाही" असे बाणेदारपणे जाहीर करते असे सांगतात.

-- प्राचीन काळातील समाजमान्य पद्धती, स्त्रियांचे स्थान आणि स्वातंत्र्य हे लक्षात घेता द्रौपदी मंडपामध्ये सर्वांसमक्ष घोषणा करेल हे अशक्य वाटते.

उपस्थित असलेले सर्वच राजे अपयशी ठरले होते, मोठा पेचप्रसंग उद्भवला होता. स्वयंवराचा "पण" कुणीही जिंकू शकले नाही तर द्रौपदी विवाहाविना स्वयंवर मंडपातून सर्व अतिथी माघारी जाणार होते. अखेर युवराजांनी प्रजाजनांमध्ये उपस्थित असलेल्या ब्रह्मवृंदांना आवाहन केले.

--  त्या काळातील ही एक प्रथा लक्षणीय आहे. नीच जातीतील स्त्रीचा पती उच्च जातीतील असल्यास धर्माची मान्यता होती. परंतु नीच जातीतील पुरुषाशी उच्चकुलीन स्त्रीने  विवाहबद्ध होण्यास मात्र प्रतिबंध होता. जातींच्या उतरंडीमध्ये ब्राम्हण जात सर्वोच्च होती (अजूनही तशीच मान्यता आहे) त्यामुळे क्षत्रिय राजकन्या ब्राह्मणाबरोबर विवाह करू शकते. 

-- कर्णाला स्वयंवर मंडपामध्ये नाकारण्याचे हेच कारण असू शकते. 

ब्राम्हण कुमारांच्या वेषातील पांडव तिथे उपस्थित होते. युवराजांच्या आवाहनाला मान देऊन एक ब्राह्मण युवक  पुढे आला. उपस्थित जनसमुदाय त्या युवकाचा उपहास करत होता. जे महापराक्रमी क्षत्रिय राजांना शक्य झाले नाही ते कार्य एक सामान्य ब्राम्हण युवक पूर्ण करणे शक्यच नाही असे ते म्हणत होते. काहीजण त्याला सांगत होते की स्वतःचे हसे करून घेण्याऐवजी माघार घेणे उत्तम. त्या सर्वांकडे दुर्लक्ष करून तो ब्राह्मण युवक जलकुंडापाशी येऊन थांबला. वर चक्राकार फिरणाऱ्या माशाकडे एकवार पाहून त्याने धनुष्य हाती घेतले. चक्राकार फिरणाऱ्या माशाची जळामधील प्रतिमा तो लक्षपूर्वक पाहत होता. आणि काय आश्चर्य त्याच्या बाणाने त्या मत्स्याच्या नेत्राचा अचूक वेध घेतला होता. संपूर्ण मंडप स्तब्ध होऊन पाहत होता.

काही क्षणांनंतर मंडपामध्ये उपस्थित असलेले निमंत्रित आणि प्रजाजन भानावर आले. द्रौपदीने ब्राम्हण युवकाच्या गळ्यामध्ये वरमाला घातली होती. त्रिभुवनसुंदरी राजकुमारी एका गरीब ब्राह्मणाची पत्नी होणार होती. वस्तुस्थितीची जाणीव होताच सर्वांनी शस्त्रे सावरली आणि मंडपाचे रूपांतर रणांगणामध्ये झाले होते. घनघोर युद्ध झाले, भीम आणि अर्जुनाचा पराक्रम बघताना सर्वांची मनोमन खात्री झाली होती की हे कुणी सामान्य ब्राम्हण कुमार नाहीतच.

विरोध करणाऱ्या सर्व राजांना पराभूत करून पांडव द्रौपदीसह त्यांच्या निवासस्थानी जाण्यास सिद्ध झाले. द्रौपदीसह अर्जुन आणि इतर चार बंधू त्यांच्या निवासस्थानी आले. त्यांच्यासोबत कृष्ण, बलराम होते आणि पाठीमागे द्रुपद राजा आणि युवराज धृष्ट्यध्युम्नं होते.

द्रौपदीसह पांडव निवासस्थानी आले तेव्हा कुंती पूजा करण्यात मग्न होती. तिला चाहूल लागताच तिने सहजच सांगितले "मिळालेली भिक्षा तुम्ही सर्व बंधू वाटून घ्या"

हा एक महत्त्वपूर्ण प्रसंग आहे कारण भविष्यामध्ये घडणाऱ्या अनेक घटनांची तिथे सुरुवात होते आहे.

पांडव मातृभक्त होते आणि मातेची आज्ञा त्यांना सदैव शिरोधार्य होती. पांडव अनेक दिवस लपून, वेषांतर करून राहत होते. उपजीविकेकरता ते भिक्षांदेही करत असणार. कुंतीला वाटले तिच्या पुत्रांनी नेहमीप्रमाणे भिक्षा आणली असेल म्हणून तिने ती वाटून घ्यायला सांगितले होते. अनवधानाने तिने उच्चारलेल्या शब्दांनी पेच निर्माण झाला होता.

तिथे उपस्थित असलेल्या श्रीकृष्ण आणि बलरामांनी स्वर्गलोकी संचार करणाऱ्या नारदमुनींना आवाहन केले. घडलेला प्रसंग, उच्चारलेले शब्द आणि सत्यस्थिती जाणून घेतल्यावर नारदमुनींनी त्यावर तोडगा सांगितला, सर्व पांडवांनी द्रौपदीसमवेत विवाह करावा. नारदमुनी काही चुकीचे सांगतील अशी शक्यताच नव्हती, त्यांची आज्ञा प्रमाण मानून द्रौपदीचा आणि पाच पांडवांचा विवाह संपन्न झाला. अशा अजब विवाहामुळे गृहकलह निर्माण होऊ नये म्हणून नारदमुनींनी काही नियमही सांगितले होते - 

-- एका वर्षाचे पाच भाग केले आणि त्या काळात द्रौपदी कुणा एकाचीच पत्नी म्हणून वावरणार होती.

-- दुसऱ्या नियमानुसार द्रौपदी तिच्या पतीसह (पाच बंधूंपैकी एक) एकांतात असेल, तेव्हा तिथे अन्य कुणी जाणे, त्यांचे संभाषण ऐकणे निषिद्ध असणार होते. जो या नियमाचे उल्लंघन करेल त्याला १२ वर्षे वनवास भोगावा लागणार होता.

अनेक चमत्कारिक प्रसंगांनी युक्तं अशा या कथेमध्ये काही तथ्ये दुर्लक्षित झालेली आहेत असे मला वाटते.

-- द्रौपदी स्वयंवरात सहभागी होण्याच्या उद्देशानेच  पांडव पांचाळदेशी आलेले होते.

-- कुंतीला माहिती असणारच की तिचे पुत्र भिक्षा मागण्यासाठी नाही तर स्वयंवरस्थळी गेलेले आहेत.

-- द्रौपदीच्या स्वयंवराचा पण जिंकणारा जरी गरीब ब्राह्मण असला तरी ती राजकन्या होती. राजा तिची पाठवणी करताना तिचे दास दासी, सेवक, रक्षक पाठवणारच. आणि इतका मोठा लवाजमा येऊनही कुंतीला वाटले तिचे पुत्र भिक्षा घेऊन आले आहेत .. हे असंभव वाटते आहे.

-- समजा असे असूनही कुंती पूजेत मग्नं असल्याने तिला चाहूलच लागली नाही असे गृहीत धरले तरी द्रौपदी म्हणजे काही भिक्षा नव्हती. अर्जुनाने लक्ष्यवेध करून तिला जिंकून आणले होते. त्यामुळे भिक्षा पाचजणात वाटून घ्या असा मातेचा आदेश असला तरी त्याचा अर्थ द्रौपदीने पाचजणांशी विवाह करावा असा होऊ शकत नाही .

त्याच कथेत असेही सांगितले जाते की कुंती एक बुद्धिमान आणि पुत्रांच्या हितार्थ सदैव जागरूक असलेली स्त्री होती. कौरव पांडवांचे वैर आणि धृतराष्ट्राचे आंधळे पुत्रप्रेम तिला माहिती होते. पांडवांना सहजासहजी राज्याचा अधिकार मिळणार नाही याची तिला नक्कीच जाणीव होती. जोवर पांडवांमध्ये एकोपा आहे तोवर ते अजिंक्य आहेत हे सत्य तिला ज्ञात होते आणि म्हणून तिने स्वतःहून तिच्या पाच पुत्रांचा विवाह द्रौपदीशी करण्याचे योजले होते. द्रौपदीचा विवाह एका सुनियोजित कूटनीतीचा प्रथम अध्याय असावा असेच वाटते.

द्रौपदी आणि पांडवांच्या विवाहाला तिचे पिता, महाराज द्रुपद यांचीही संमती होती हे विशेष. विवाह प्रसंगी नारद मुनी, द्वारकाधीश श्रीकृष्ण आणि त्यांचे बंधू बलरामही उपस्थित होते. श्रीकृष्ण आणि पांडव एकत्रित असण्याचा महाभारतामधील हा पहिलाच उल्लेख आहे.

***