महाभारताविषयी मला पडलेले काही प्रश्न

लहानपणापासून मी अनेकदा महाभारत वाचले आहे - सचित्र ' अमर चित्र  कथा'
पासून संपूर्ण महाभारताच्या भाषांतरापर्यंत. (हे सर्व वाचन मराठी व
इंग्रजीत. संस्कृतचे ज्ञान अत्यल्प असल्यामुळे मूळ ग्रंथ वाचणे अशक्य
होते) . गेली अनेक वर्षे मला काही (कदाचित पाखंडी) प्रश्न पडले आहेत ते
खाली मांडतोय. यावर साधक-बाधक चर्चा आणि जाणकारांकडून मार्गदर्शन व्हावे
ही इच्छा आहे.

  1. विदुर कुरू कसा?  नियोग
    पद्धत ही त्या काळी समाजमान्य होती हे मान्य.  त्यानुसार धृतराष्ट्र व पंडू हे अनुक्रमे अंबिकेस व अंबालिकेस व्यासांपासून झालेले पुत्र हे कुरू 

    मानले गेले इथवर ठीक कारण त्या दोघी कुरूवंशाच्या सुना
    होत्या.मात्र अंबालिकेची दासी काही कुरुकुलाची स्नुषा नव्हती.मग तिचा पुत्र
    विदूर हा कुरू कसा? विदुर हा महात्मा होता, धर्मज्ञ होता हे सारे मान्य
    परंतु ह्या गोष्टी मूळ मुद्याला उत्तर होऊ शकत नाहीत.
  2. लाक्षागृहात खून
    - दुर्योधनाने लाक्षागृहात पांडवांना जाळून मारण्याची योजना आखली. ह्यास
    निदान त्याचा पांडवांबद्दलचा द्वेष आणि सिंहासनाची हाव ही कारणे तरी
    होती.पण स्वतःचा जीव वाचवण्यासाठी 'धर्मरत' पांडवांनी त्यांच्या आश्रयास
    आलेली एक भिल्लीण व तिची पाच मुले यांचा थंड डोक्याने, निर्घृण खून करावा?
    मग त्यांच्यात आणि 'खल' कौरवांत काय फरक उरला? किंबहुना मग दुर्योधन सरस
    ठरतो कारण त्याने निदान पांडव सोडून इतर कुणास छळल्याची नोंद नाही. राजा
    म्हणून तो वाईट होता, निरपराध प्रजाजनास त्रास देणारा होता असे महाभारतात
    कुठेही म्हटले नाही.
  3. कर्णास अंगराजपद
    - दुर्योधनाने कर्णाला अंगराजपद कोणत्या अधिकाराने दिले? ही घटना घडली
    तेंव्हा नुकते कुठे कौरव-पांडव द्रोणाचार्यांच्या प्रशिक्षण वर्गातून
    बाहेर पडत होते.तेंव्हा दुर्योधन हा केवळ एक राजपुत्र होता, युवराज
    नव्हता. युवराज होण्याची शक्यताही नव्हती कारण युधिष्ठिर ज्येष्ठ राजपुत्र
    होता‌. असे देश-प्रदेश खिरापत म्हणून वाटत सुटण्याची साऱ्या राजपुत्रांस
    मुभा होती का?
  4. जयद्रथवधाचीच प्रतिज्ञा का? अभिमन्यु
    मारला गेल्यानंतर अर्जुनाने जयद्रथवधाचीच प्रतिज्ञा का केली? जयद्रथास
    शंकराचा वर होता की अर्जुनाच्या अनुपस्थितीत तो बाकी सर्व पांडवांना
    युद्धात एक दिवस  अजय ठरेल. त्यानुसार चक्रव्यूह भेदून अभिमन्यु आत
    गेल्यानंतर जयद्रथाने बाकी साऱ्या पांडव योद्ध्यांना थोपवून धरले.तो
    युद्धशास्त्रानुसार लढला यात काय चूक केली त्याने? शेवटी ते युद्ध होते,
    कौरव-पांडवांचे स्नेहसंमेलन नव्हते! अभिमन्यूला युद्धशास्त्राचे नियम
    भंगून ज्यांनी मारले ते वेगळे होते - लक्ष्मण, द्रोण, कर्ण इत्यादी.
    अर्जुनाला प्रतिज्ञाच करायची होती तर ह्यांपैकी कुणाच्यातरी वधाची करायची!

  5. अर्जुनाच्या priorities
    (प्राधान्यक्रम?) - महाभारत युद्धात एकदा युधिष्ठिर  अर्जुनाकडून कर्णाचा
    वध होत नसल्यामुळे त्याच्या गांडीव धनुष्याबद्दल टोचून बोलला. आपल्या
    धनुष्याचा अपमान सहन न झालेला अर्जुन थोरल्या भावाच्या अंगावर तलवार उपसून
    धावून गेला. कृष्णास मध्ये पडून त्याला आवरावे लागले.द्युतात मात्र जेव्हा
    ह्याच थोरल्या भावाने द्रौपदीस पणाला लावली होती तेंव्हा हे महाशय खाली
    मान घालून शांत होते. इतकेच नाही तर जेव्हा कृद्ध भीमाने 
    युधिष्ठिराचे हात जाळण्याकरता सहदेवाला अग्नी आणण्यास सांगितले तेंव्हा
    अर्जुनाने त्यास वडील भाऊ कसा वंदनीय असतो, त्याच्या सर्वांनी आज्ञेत
    राहावे वगैरे डोस पाजले.

असे अजूनही काही प्रश्न आहेत पण तूर्तास चर्चेस इतके पुरावे.



ता. क. माझे पाखडीपण गृहीत
धरले तरी चालेल पण चर्चा/वाद शक्यतोवर  उपस्थित प्रश्नांच्या रोखाने
चालावी, मी  कसा धर्म बुडवायला निघालो आहे यावर हवे तर वेगळी चर्चा करता
येईल.