डाव

डाव


'उद्या मी असा डाव खेलतो की तू बघतच रहा बेट्या', शर्टाच्या बाहीने डोळ्यातून आणि नाकातून वहाणारे पाणी पुसत अपमानाच्या आगीत होरपळणारा बबन्या मला म्हणाला. मी काहीच न बोलता मूक डोळ्यांनीच माझा पाठिंबा दर्शवला.


वस्तीच्या कोपर्‍यावरच्या त्या ओसंडुन वहाणार्‍या कचराकुंडीवर काल परवापर्यंत आमचे राज्य होते. बबन्याची आणि माझी पहिली भेट ही तिथलीच. बबन्याची आय गावभर हिंडत कचरा गोळा करून निवडायचे काम करायची अन् रांगता असल्यापासुनच बबन्या त्यात खाण्यायोग्य वस्तू शोधुन खायचा.   मग ती जिवंत रहाण्याच्या ओझ्याखाली दबुन एकदा फटकन् मरून गेली अन् बबन्या आपल्या जगण्याच्या कलेसह या उकिरड्याला चिकटला.


मी तसा चांगल्या घरातला, पण परीस्थितीने असा रस्त्यावर आलेला. भेटल्या भेटल्या आमचे लगेच जमले आणि या कचराकुंडीच्या आश्रयाने जिवंत रहाण्याची सारी कौशल्ये आम्ही लगेचच आत्मसात केली.


जरा बर्‍यापैकी वस्तीच्या कोपर्‍यावर असलेली ही कचराकुंडी. कुठल्या घरातल्या बाया सकाळी कचरा आणून टाकतात, कुठल्या रात्री टाकतात, कुठले खाणे त्यातल्या त्यात कमी आंबलेले आणि कमी फसफसलेले असते तर कोण पार अळ्या पडल्याशिवाय कचर्‍यात काही देत नाहीत हे आम्हाला चांगलेच माहीत झाले होते. कधीतरी एखादा बाप्याही रात्री घरी येताना आपला डबा आजुबाजूला सावधपणे बघत मोकळा करी आणि मग जणु काही ते टाकलेले पदार्थ आता त्याच्या तोंडात स्वत:ला कोंबुन घेण्यासाठी त्याच्या पाठी लागल्यासारखा तो घाईघाईने चालू लागे. केवळ एक जोडपेच रहाणार्‍या एका घरात रात्री खूप उशीरापर्यंत भांडणाचे आवाज ऐकु आले तर दुसर्‍या दिवशी सकाळाच्या कचर्‍यात कालच्या ताज्या अन्नाची मेजवानी मिळण्याची शक्यता असे.


अशा सुबत्तेमुळेच माशा, झुरळे, उंदीर, घुशी यासारख्या आमच्या सह भोजन करणार्‍या निरुपद्रवी प्राण्यांबरोबरच  दुष्ट भटकी कुत्री आणि डुकरेहि तिथे घोटाळत, पण बबन्या त्याच्या वयाहून अधिक शूरपणा दाखवुन त्यांना पिटाळुन लावत असे. एकंदर ही सारी प्राणीसृष्टी आणि स्वत:चा कचरा टाकण्याचा क्षण वगळता इतर वेळी ती कचराकुंडीसुध्दा त्या स्वच्छ वस्तीच्या डोळ्यात माशाचा काटा चोखताना घशात अडकावा तशी सलत असे.


पण आमचे ते घर होते, त्यावर आमची सता होती आणि त्याच्या आश्रयाने जगत आमचे दिवस सरकत होते. असे सर्व सुरळीतपणे चालू असतांना कालची ती घटना घडली. पहाट व्हायला आली होती, रस्त्यावर अजून अंधार होता. आंम्ही अजून उठून उकीरड्याकडे येतच होतो, काल रात्री काहीच न मिळाल्यामुळे आमची पोटे पेटली होती. अशातच एक गाडी आमच्या कोपर्‍यावरून वळली, चालकाच्या शेजारी बसलेल्या माणसाची आणि माझी क्षणभर नजरानजर झाली, त्याला काय वाटले कुणास ठाउक पण त्याने हातातला पावाचा का बिस्किटाचा पुडा कचराकुंडीच्या दिशेने माझ्याकडे फेकला आणि देवदुतासारख्या चेहेर्‍याच्या त्या इसमाला घेउन ती गाडी क्षणात दृष्टीआड झाली. आम्ही पुड्याकडे धाव घेतली,  बबन्या खाली वाकुन तो पुडा उचलणार तोच बाजुच्या अंधारातुन खांबामागून काठी परजत एक खवीस म्हातारा बाहेर आला. मी कचराकुंडीआड लपलो तर बबन्या धूम पळाला. मागचे दृष्य बघुन आमचा डोळ्यावर विश्वास बसेना. त्या म्हातार्‍याने आमचा पुडा बेशरमपणे चक्क स्वत:च्या शबनम पिशवीत टाकला आणि झपाझपा पावले टाकत तो निघून गेला.


बबन्या माझ्याजवळ आला. कचर्‍यामध्ये मोसमातल्या पहिल्या हापूस आंब्यांच्या साली आणि बाठी दिसल्यावर आनंदाने त्यावर मोठ्या आशेने झडप घालावी आणि नेमक्या त्या कुण्या कवडीचुंबकाच्या घरच्या पूर्ण चावून चोखून चोथा केलेल्या निघाव्यात अशी त्याच्या मनाची गत झाली होती. तो दिवसच भयाण्ण गेला, बबन्या काहीच बोलला नाही.  मागे एकदा एका आजींनी रस्त्यात गोमातेला केळीच्या पानावर वाढलेल्या सुग्रास अन्नाला हात घालण्याचे पातक त्याने केले होते. 'असली पोरे जन्माला घालुन आईबाप कुठे उलथतात ?' त्याच्यावर हात उगारीत आजी कडाडल्या होत्या आणि डोळ्यांनीच त्याच्यावर थुंकल्या होत्या.  त्या वेळेलाही तो असाच दिवसभर गप्प होता.


आजही लवकरच उठुन आम्ही आळोखे पिळोखे देत होतो तर पुन्हा एकदा नवल घडले, तो कालचा मायाळू चेहेर्‍याचा सखा पुन्हा त्याच्या गाडीतून गेला, त्याने पुन्हा माझ्याकडे पाहिले, तो किंचितसा हसल्यासारखा वाटला आणि आजही त्याने चक्क त्याचा अख्खा पुडा माझ्याकडे बघुन कचराकुंडीकडे टाकला. लागोपाठ दोन अमावस्या येउन सलग दुसर्‍या दिवशी चौकात गुलाल आणि काळे उडिद घातलेला बचकभर भात खायला मिळाल्यासारखा आनंद आम्हाला झाला. दुरून बबन्या धावत आला, ठेचकाळुन खाली पडला आणि तेवढ्यात पुन्हा एकदा कालचा तो थेरडा खांबाआडून पुढे झाला आणि त्या पुड्यावर हावरी झडप घालुन काठी गरागरा फिरवत चालता झाला.


आजही आमच्या तोंडचा घास त्या संभावित दिसणार्‍या म्हातार्‍याने पळवला होता.  त्याचा डाव आमच्या लक्षात आला होता. जीवाची लाही लाही होत होती, पण आता आम्ही गप्प बसणार नव्हतो.


'उद्या मी असा डाव खेलतो की तू बघतच रहा बेट्या', शर्टाच्या बाहीने डोळ्यातून आणि नाकातून वहाणारे पाणी पुसत अपमानाच्या आगीत होरपळणारा बबन्या मला म्हणाला. मी काहीच न बोलता मूक डोळ्यांनीच माझा पाठिंबा दर्शवला. तोही दिवसभर काही बाही विचार करत राहिला, त्याचे कशातच लक्ष लागले नाही, समोरच्या घरातून टाकलेल्या चार नासक्या अंड्यामुळेही त्याच्या तोंडाला पाणी सुटले नाही. तो त्याच्या पाठीला जाउन भिडलेल्या त्याच्या बरगड्यांवरुन बोटे फिरवत तसाच पडून राहिला.


''म्हातारा तसा मजबूत आहे, आपल्याला ताकद नाय वापरून चालणार, पन मी उद्या त्याचा डाव उलटवनारच"  बबन्या त्याच्या योजनेबद्दल रात्रभर काही तरी बोलत राहिला. पहाट व्हायच्या खूप खूप आधीच तो उठला, मला मागे येउ नको म्हणुन खूण केली आणि दबक्या पावलांनी कचराकुंडीच्या दिशेने नाहीसा झाला.


बर्‍याच वेळाने गाडीचा परिचित आवाज ऐकू येताच मी आळस झटकून कचराकुंडीकडे धावलो, गाडी थोडी पुढे गेलीच होती, पण माझ्या त्या दयाळू मित्राने मला पाहिले आणि पुन्हा त्याचा पुडा कचराकुंडीकडे भिरकावला. पुढच्याच क्षणी तो खांबाआड लपलेला आमचा दुश्मन म्हातारा निर्ढावलेल्या सराईतपणे पुढे आला आणि कचराकुंडीकडे वळला. पण आज चकित व्हायची पाळी त्याची होती.  अचानक त्या कचर्‍याच्या ढिगातुन बबन्या प्रकटला, कचर्‍याचा एक भला थोरला डोंगरच त्याने त्या म्हातार्‍याच्या चेहेर्‍यावर ओतला, आणि काय होतेय हे ते त्या चोरट्याला कळायच्या आत बबन्याने तो पुडा उचलला आणि आम्ही दोघे मागच्या नाल्याकडे पळू लागलो. नाल्यावरच्या जुनाट लाकडी पुलाजवळ येताच आम्ही पुलावर न जाता धप्पकन नाल्यात उडी घातली आणि अंग चोरुन पुलाखालीच बसलो. बबन्या कधी नव्हे ते मला काहीही न देताच स्वत: मात्र त्या देवदुताने खर तर मला दिलेल्या पुड्यातल्या बिस्किटांचे बकाणे भरू लागला. गेले दोन दिवस माझा खाऊ पळवणारा तो दुष्ट म्हातारा आमचा पाठलाग करत त्या पुलावरून ' अरे मुर्खा, चांडाळा काय करतो आहेस....'  असे चिरकत्या आवाजात काही बाही ओरडत धाड धाड पावलांनी जाउ लागला. पुलावरच्या पिवळ्या दिव्याच्या प्रकाशात मला त्याच्या छातीवर चक्क माझेच चित्र रंगवलेले दिसले.


पण महत्वाची गोष्ट म्हणजे आज त्या सैतानाच्या डोळ्यातून पाणी वहात होते. आम्ही डाव जिंकला होता. मी विजयोन्मादाने बबन्याकडे पाहीले, त्याचे डोळे विस्फारले होते आणि त्याच्या काळ्यानिळ्या झालेल्या तोंडातून भसा भसा फेस बाहेर पडत होता. मी भयंकर घाबरलो आणि शेपटी पायात घालून न भुंकता तसाच उभा राहिलो.


 


 ---*---