वुडहाऊससारखा राजकपूरही एकतर संपूर्ण आवडावा लागतो, नाहीतर अजिबात नाही. 'दे गयी धोखा हमें नीली नीली आंखे' हे एकतर संपूर्ण पटते किंवा अजिबात नाही 'तुम्हारा कसूर नही है रीटा, मेरी सूरत ही ऐसी है' यावर पूर्ण विश्वास बसतो, किंवा अजिबात नाही!
पैशाच्या राक्षसी जबड्यात आदर्शवादाचा बळी जाणे, हे आपण किती वेळा पाहिले आहे! 'श्री ४२०' काढणारा राज कपूर 'राम तेरी गंगा मैली' काढू शकतो याला काय म्हणावे? 'केलेवाली, अगर मैने तुम्हारा पैसा नही दिया तो?' 'तो हम समझेगा, हमारा बेटा खा गया' हा प्रसंग चित्रीत करणारा हळवा दिग्दर्शक झीनत अमानसारख्या नायिकेला घेऊन सिनेमा काढतो हा कुणाचा पराभव म्हणायचा? 'मोती कुत्ता नही है...' यामागची वेदना तुम्हाला कळत नाही, तर मग घ्या लेको डिंपलपासून सोनिया सहानीपर्यंत सगळ्यांचे वस्त्रहरण केलेला आंबटशौकीन 'बॉबी'!' हा कुणी कुणावर उगवलेला सूड म्हणायचा?
पण ते असो. तो संवेदनशीलतेची भळभळती जखम वागवणारा राज कपूर आपल्याला आठवायचा नाही. ही जखम होण्याआधीचा, तळहातावर हृदय घेऊन प्रेमाच्या शोधात वावरणारा राज कपूर आपण आठवू. 'आज गरीब भी गरीब को नही पहचानता' ही व्यथा बाळगणारा, 'ये घर तो ईट पत्थर का है, लेकिन उस सोने के घर से तुम हम को कैसे निकालेगा मिस डिसा?' अशी माया लावणारा, 'दिलपे मरनेवाले, मरेंगे भिखारी' म्हणत हसणारा...
प्रेमभंग आणि विरह यातच धन्यता मानण्याच्या त्या जमान्यात राज कपूरकडं दु:ख आणि वेदना व्यक्त करण्यासाठी एक अमोघ अस्त्र होतं ते म्हणजे हास्य. एकीकडे खुरटलेली दाढी आणि वर्षानुवर्षे बरा होत नसणारा बद्धकोष्ठ असल्यासारखा चेहरा घेऊन ' टूटे हुवे ख्वाबोंने' म्हणत 'दलीप' फिरत होता. दुसरीकडे चुकून दोन वेळा कायम चूर्ण घेतल्यासारखा चेहरा घेऊन 'दुखी मन मेरे' म्हणत देव आनंद प्रेमाचे 'गली कूंचे' धुंडाळत होता. त्यात 'टूटा जिस तारे पे नजर थी हमारी' म्हणून राज कपूर हसला आणि देवदास होण्याची तमन्ना बाळगणारी एक पिढी ' अपना आदमी है, भिडू...' म्हणत गारद झाली. 'ऐ दिल की लगी क्या तुझ को खबर, एक दर्द उठा भर आई नजर' म्हणत हातातल्या चाकूनं त्यानं नारळाच्या झाडावर प्रियेच्या नावाची अक्षरं खोदत स्मित केलं आणि लोकांचे डोळे पाणावले. 'जाण्याआधी मला तुझे न रडणारे डोळे पाहू दे' असं त्या रशियन पाहुणीनं म्हणताच त्यानं डोळ्यावरचा काळा चष्मा काढला आणि तो हसला.... असा हसला की व. पु. काळ्यांच्या शब्दात सांगायचं तर त्यापेक्षा त्यानं एखादा हुंदका दिला असता, तर जास्त बरं झालं असतं!
राज कपूरचं हेच हास्य कधीकधी कमालीचं जहरी आणि कडवट होत असे. 'ओ मेरे सनम...' या गाण्याच्या वेळी
'सुनते थे प्यार की दुनिया में दो दिल मुश्किल से समाते है
क्या गैर वहां, अपनों तक के, साये भी न आने पाते है
हमने आखिर क्या देख लिया
क्या बात है क्यूं हैरान है हम"