ह्यासोबत
- अमेरिकायण! (भाग -१: नवीन)
- अमेरिकायण! (भाग २: घर देता का कुणी घर..)
- अमेरिकायण! (भाग ३: न्यूयॉर्कशी भेट)
- अमेरिकायण! (भाग ४: खाद्यपंढरी)
- अमेरिकायण! (भाग५ : जर्सी सिटी, मुक्काम पोस्ट भारत)
- अमेरिकायण! (भाग ६: नूतनवर्षाभिनंदन)
- अमेरिकायण! (भाग ७: राजधानीतून१ [प्रथमदर्शन आणि सकुरा])
- अमेरिकायण! (भाग८ : राजधानीतून२ [म्यूझियम्स आणि निरोप] )
- अमेरिकायण! (भाग ९ : जागीच अडकवणारा हिवाळा)
- अमेरिकायण! (भाग १०: द्युतक्षेत्री)
- अमेरिकायण! (भाग११ : वॉल स्ट्रिट)
- अमेरिकायण! (भाग १२: शिकागो[१- आगमन])
- अमेरिकायण! (भाग १३ : शिकागो२ - शहराच्या अंतरंगांत)
- अमेरिकायण! (भाग १४: शिकागो ३)
- अमेरिकायण! (भाग १५ : धोबीघाट)
- अमेरिकायण! (भाग १६ : धबाबा!)
- अमेरिकायण! (भाग १७ : वेडे खेळ)
- अमेरिकायण! (भाग १८ : मध्य-न्यूयॉर्क-१)
- अमेरिकायण! (भाग १९ : मध्य-न्यूयॉर्क- २)
- अमेरिकायण! (भाग २० : लास वेगास १ - तोंडओळख)
- अमेरिकायण! (भाग २१ : लास वेगास २ - कसिनोंच्या शहरात)
- अमेरिकायण! (भाग २२ : लास वेगास ३ - हुवर डॅम आणि ग्रँड कॅन्यन)
- अमेरिकायण! (समारोपः कोलाज)
न्यूयॉर्क बाहेरची अमेरिका... इथे आल्यावर मला पहिल्यांदा भारतापासून एका वेगळंच जीवनमान जगणाऱ्या देशात आपण आहोत याची जाणीव झाली. ही अमेरिका फ़ार फ़ार वेगळी आहे; शांत, स्वच्छ, आपल्याच गतीत, धुंदीत रममाण! मी इथल्या सामाजिक म्हणा अथवा व्यवस्थापकीय म्हणा अश्या व्यवस्थेविषयी जाणून घ्यायचा प्रयत्न केला. फ़ार वेगळ्या प्रकारची व्यवस्था मला इथे आहे असं कळलं. सध्या मुंबईमध्ये "वॉर्ड सभा" नावाचा प्रकार (प्रयोग) चालला आहे ना त्याच्याशी साधर्म्य असणारी. प्रत्येक विभाग हा त्या विभागशी निगडित बाबींशी पुर्ण स्वायत्त असतो. प्रत्येक विभागाला स्वतःच्या शाळा, जलतरण तलाव, विक्रिकेंद्र (मॉल), मैदान, बाग, चित्रपटगृह इ. गोष्टी असतात. आणि त्याबाबतच्या निर्णयाचे अधिकार पुर्णपणे त्या विभागाचा असतो. त्यामुळे गरजांची जाणीव आणि त्यांचं निराकरण लवकर होतं असं मला वाटलं
असो. तर आज खुद्द राजधानी फ़िरायचा दिवस होता. इथे मी साकुरा बघायला आलो आहे असं मी आधीच घोषित केलं होतं पण तरीही, 'म्यूझियम' नावाच्या रटाळ गोष्टीत मला बराचसा वेळ घालवावा लागणार असं चित्र दिसत होतं (आणि आश्चर्य म्हणजे सगळ्यांना म्यूझियमचं आकर्षणही होतं. ) खरंतर मला म्यूझियम या गोष्टीचा कंटाळा आहे. कोणत्या तरी राजाची कवटी, त्याची चिलखतं, तोफा, काही लाख वर्षांपुर्वीचे दगड (ते आताच्या दगडांसारखेच दिसतात), कुठल्यातरी राणीचा कंगवा, विड्याचं तबक, कोणाचा तरी केस असलं काहीतरी बघत पाय दुखवून घेण्यापेक्षा छानपैकी साकूरा रिव्हर राईड घेऊया अश्या मताचा मी होतो. पण हा प्रस्ताव एक वि. सगळे अश्या घसघशीत मताधक्याने पडल्या नंतर मला माघार घ्यावी लागली. जर मला कंटाळा आला तर मी सबंध म्यूझियम फिरावं असा आग्रह करायचा नाही ही अट मी तितक्यातल्या तितक्यात मान्य करून घेतली.
आमची गाडी, सुंदर साकूराने डवंरलेल्या एका रस्त्याला वळसा घालून एका मोठ्या स्थापत्यासमोर उभी राहीली. "नॅचरल हिस्टरी म्यूझियम!" असा फ़लक वाचला. "चला, भुसा भरलेले प्राणी बघुयात! त्यापेक्षा झू पाहिला असता" असं अगदी निरुत्साह करणारं वाक्य टाकून पाहिलं. पण माझ्या भवतालची सगळी मंडळी कुतूहलाने आत काय काय असेल यावरच चर्चा करत होती. मला अगदी अनुल्लेखाने मारलं म्हणा ना . आत समोरच डायनासॉरचे सांगाडे ठेवले होते (म्हणजे लाखो नाही तर कोट्यावधी वर्षांचा इतिहास पहावा लागणार होता). अबब! काय अजस्र प्रकार होता हा प्राणी म्हणजे. तिन मजली उंच, चांगला फ़र्लांगभर लांब आणि दोन खोल्या रुंद!! कॅमेऱ्याचे डोळे कितीही आकसले / विस्फरले तरी हा प्राणी मावतच नव्हता, कधी शेपूट येत नसे तर कधी मान. शेवटी 'पॅनरोमा' (मराठी?) सुविधा वापरून तीन फ़ोटो जोडून एक फ़ोटो तयार केला.
मला मजा वाटली ती इकडच्या चिमुरड्यांची त्यांना डायनासॉर, ऱ्हायनोसॉर.. इ. प्रजाती पूर्ण माहित होत्या, अगदी त्यांच्या काळासकट. "मॉम!!! (माऽऽऽऽऽम) धिस'स नाऽऽऽऽट ऍस्ट्रॉईड, इटस जस्ट ऍन ओल्ड स्टोऽन. सी द सल्फर लेयऽर" असं काहीसं दटावून मुलं आपल्या पालकांना "कसं हो इतकं साधं साधं तुम्हाला कळत नाही" अश्या आविर्भावात माहिती देत होते, आणि त्यांचे आई-वडिल काही तरी महत्त्वाचं शिकावं इतक्या तन्मयतेने हे ज्ञान त्यांच्याच मुंलांकडून मिळवत होते. मला हे चित्र अगदीच नवीन होतं. आपल्याकडे "ढग का गडगडतायत?" म्हटलं की "म्हातारी सुत काततेय" हे उत्तर पालकांनी अगदी तिसरी-चौथीच्या मुलाला दिलेलं मी ऐकलं आहे. किंवा एखादा मुलगा "बाबा, हा कॉर्बोरेटरचा प्रॉब्लेम नाहि आहे..." असं काही सांगू लागला तर किती पालक त्याचं म्हणणं तन्मयतेने ऐकून घेतील? ह्या म्यूझियम्समध्ये चाललेले हे नैसर्गिक शिक्षण बघून मला तर या मुलांचा हेवा वाटला. मी इथे एका ठिकाणी देवमासे बघत असताना एक १०-१२ वर्षाची मुलगी सतत काहीतरी वहीत लिहून घेत होती, हातात गतीमापक घड्याळ (स्टॉप-वॉच) होतं. मी न रहावून तिला विचारलं की काय करतेय? तर ती मुलगी देखील, "काय त्रास आहे.." वगैरे कोणताही आवेश न आणता माहिती सांगू लागली. तिला तिच्या शाळेत सांगितलं होतं की देवमासे साधारण ८-१० मिनिटांनी श्वास घेण्यासाठी पाण्यावर येतात तर तिने आंतरजालावर शोध घेतला असता हेच प्रमाण ४-५ मिनिट असं आलं.. आली स्वारी स्वतःच शोधून काढायला. माझा या मनापासून शिकणाऱ्या मुलांबद्दलचा आणि त्यांच्या पालकांबद्दलचा आदर दुणावला.
इथे पुढे 'होप डायमंड' नावाचा हिरा ठेवला आहे. हा मुळ भारतातला, हा मिळाला आणि भारतावर पारतंत्र्याची सावली पडू लागली. पुढे तो इंग्रजांकडे गेला, आणि त्यांचा कधीही न मावळणारा सूर्य मावळू लागला. आता हाच होप डायमंड अमेरिकेत आहे (पुढचं मी काही बोलत नाही.. ). असो. पण हा हिरा मात्र जबरदस्त होता. त्याचे पैलू तर इतके झकास होते की त्याने हिऱ्याचा दिमाख भलताच वाढला होता. चांगला सुपारीइतका हा हिरा, कसा तेजाने लखाखत होता. त्यात पर्यटकांच्या क्लिकक्लिकाटाची साथ होतीच. इथून पुढे पुन्हा एकदा दगड, जमीनीतले थर, इ. चालू झलं आणि माझीही "चला चला, इतरही म्यूझियम्स बघायची आहेत ना?" अशी वाक्यं चालू झाली. मंडळी एकदाची या म्यूझियममधून बाहेर पडली.
आमचा पुढचा टप्पा होता "नासा एरोस्पेस म्यूझियम". खरंतर आदल्या दिवशीच नासाचच म्यूझियम पाहिलं असल्याने त्यात काही नाविन्य वाटलं नाहि. पण एका कोपऱ्यात बरीच लोकं रांग लाऊन उभी होती. म्यूझियम्समधे प्रवेश फ़ुकट असल्याने तिकिटांची रांग असण्याचा प्रश्नच नव्हता. पुढे गेल्यावर कळलं, ही रांग चंद्राचा तुकडा बघायसाठी आहे. झालं!! मंडळी चंद्राच्या तुकड्याला बघायला, त्याला हात लावायला रांगेत उभी. इतका सुंदर चंद्र, पण त्याचा तुकडा असा ओट्याच्या कडप्प्यासारखा?!? माझा अगदीच भ्रमनिरास झाला. निदान संगमरवरासारखा तरी हवा हो.. असो, चंद्रावरच्या खड्यातून घेतला असेल अशी मी समजूत करून घेतली . तर त्या चंद्रस्पर्शानंतर मजल दरमजल करत एकदाच हे ही म्यूझियम संपवलं. "आपण बाकी म्यूझियम्स नंतर बघायची का? म्हणजे व्हाईट हाऊस वगैरे नंतर.." इ. प्रश्नांनी मला जाणवू लागलं की बाकी मंडळीही थकली आहेत (एकदाची
).
आणि तसही सगळ्यांनाच आता पोटोबांची हाक ऐकू येऊ लागली होती. आम्ही एका मॅकदादाच्या खानावळीत डेरा जमवला. तिथे एक काकू जरा गडबडलेल्या अवस्थेत होत्या. त्यांना यात व्हेज काय आहे ते माहित नव्हतं. आम्ही मराठी आहोत हे पाहून आम्हाला विचारलं. मग त्यांच्यासाठी व्हेजी विदाऊट मीट असा बर्गर मागवला. त्या एकट्याच असल्याने त्यांना म्हटलं आमच्या बरोबरच बसून खा. "एकट्या कशा?" असं विचारलं तर कळलं की त्यांचा मुलगा इथे रहातो, तो म्हणाला "आम्ही हजारदा ती म्यूझियम्स बघून कंटाळलोय, असं कर तुच बघ मी येतो संध्याकाळी परत न्यायला". बिचाऱ्या! मुलासाठी इतक्या दूरवर आलेल्या, आणि तो गेला होता स्कीईंगला .. आईला म्यूझियम्स मध्ये सोडून.. मुलांना पाळणाघरात सोडावं तसं.. त्यांना मी आमच्याबरोबर फिरायला आवडेल का विचारल्यावर त्या माऊलीच्या डोळ्यात पाणी तरारलं. कोणाला तरी न मागता काहीतरी दिल्याचा आनंद काही न्याराच असतो हे त्या दिवशी मला जाणवलं.
आता आमचा कळप (नॅचरल हिस्टरी म्यूझियम नंतर मला जिथे तिथे प्राणीच असल्याचा भास होत होता. त्यामुळे आमचा ग्रुपही माझ्यासाठी कळप ) कॅपिटल हाऊस समोर उभे होतो. ही इथली संसद. एक छान वास्तू.. भव्य, शुभ्र. पण ती त्या दिवशी बंद असल्याने नेत्यांची लगबग, मिडिया आदी गोष्टी नसल्याने, नुकतच एखादं मंदीर बांधलं आहे, छान आहे, पण आत देव बसवायचा आहे किंवा झोपला आहे असं काहीसं वाटलं (असा कसा देव झोपतो असं मी एकदा विचारल्यावर गप्प! नसत्या शंका काढू नकोस असं दटावण्यात आलेलं आठवतंय मला) . नंतर व्हाईट हाऊस या जगाच्या तिर्थक्षेत्री गेलो. अमेरिकेच्या राष्ट्रपतीचं घर इतकं छोटं असेल असं वाटलं नव्हत. आपल्या राष्ट्रपती भवनाच्या एक अष्टमांशही नाही आहे. तेही बघायचं फ़र्लांगभर अंतरावरून!
हे पाहिल्यावर त्या म्यूझियम्स मधे गर्दी का आहे हे समजलं. राष्ट्रासाठी एक महत्त्वाची इमारत म्हणून बघतात झालं! (अगदी वर्मावर बोट ठेवायचं तर त्या भेटलेल्या काकू बोलल्या तसं, "हे क्कायऽऽ! पुण्यातला मस्तानीचा महालही यापेक्षा मोठा आहे... आणि हा राजाचा राजवाडा.. शोभत नाहि हो या अमेरिकेस!! " ). तरीही लोकलाजेस्तव फ़ोटो काढलेच म्हणा!
आता सूर्यास्त व्हायला सुरवात झाली होती. अजून ३-४ म्यूझियम्स शिल्लक होती. पण आम्ही घाईघाईने साकूरा असलेल्या भागात गेलो. सूर्यकिरणांनी साकूराच्या कडा तेजाळून निघाल्या होत्या. ती झाडं रुपेरी तेजाने न्हाऊन निघाली होती. मनाला मुग्ध करणारं ते रुप आणि ते रूपं मनात अधाशा सारखं साठवून घेतलं. राजधानी म्हणून जरी फार भावलं नसलं तरी इथल्या साकूराने मनात शहराला एक वेगळच स्थान प्राप्त करून दिलं होतं. आणि मुख्य म्हणजे न्यूयॉर्क बाहेरही वेगळी परंतु मनस्वी अमेरिका आहे याची जाणीव या शहराने करून दिली. खरंतर अमेरिकेचे खरे रंग बघायला आता कुठे सुरवात झाली होती! त्या अमेरिकन रंगांचा आस्वाद घ्यायचा असं अमोमन ठरवून आम्ही "गुड बाय डिसी! म्हटलं" आता अमेरिकेच्या नव्या रंगाच्या शोधाला सुरवात झाली होती!!
साकूरा (पूर्ण फुललेला):
वॉशिंग्टन डि.सी. तला साकूरा