कामथे काका(भाग चौदावा)

काका सकाळी उशिरा उठले. जवळ जवळ दहा वाजले होते. नीताच्या चेहऱ्यावर नापसंती होती. पण तरीही तिने चहा दिला. साडेबारा एकला जेवणं झाली. ते थोडावेळ श्रेयाशी खेळले. त्यांना जरा बरं वाटलं. सहज म्हणून गॅलरीत डोकावले, तर त्यांना पाटकर येताना दिसला. त्याचा अगदी सुकट बोंबील झाला होता. पुष्पा गेल्यापासून त्याची तब्येत ठीक नसावी. त्याने अजूनही पोलिस कंप्लेंट केली नव्हती. याचं काकांच्या दृष्टीने कारण अगदी साधारण होतं. म्हणजे, तो घाबरला असेल, किंवा उगाच कशाला कटकटी? म्हणूनही स्वस्थ बसला असेल. आपल्याला काय करायचय म्हणा. आपल्याला काही धोका नाही. काकांसारखी माणसं असं म्हणतात, तरीही विचार करतातच. त्यांना स्वस्थ बसवेना. एकदा केव्हातरी रघुमलला विचारलं पाहिजे. त्याच्याकडे बातम्या असतात. हाताच्या वाटीत हनुवटी ठेवून ते विचार करू लागले. जेवले तरी त्यांचं डोकं चढलेलंच होतं. रात्रीचं जागरण, हिडीस पार्टी आणि जीवनरामचा छळ, यांनी ते मरगळले. त्यांना एकदम "सोल्या " आठवला. कोण हा सोल्या? ते मनातल्या मनात म्हणाले. एकेक नग आहेत झालं. आज त्यांना कामावर जावंसं वाटत नव्हतं. जीवनचा छळ काय पाहायचा? एखाद्याला त्रास देणं तर दूर, पण त्याचा त्रास ऐकण्याचीही सवय नसलेल्या काकांना यात अजिबात रस नव्हता. मग त्यांना आपण या लोकांमध्ये राहायलाच पाहिजे का, असं वाटू लागलं. दुसरी एखादी लहानशी नोकरी आपण पाहावी का? पेपरात कितीतरी जाहिराती येतात. मागे एकदा हा विचार त्यांच्या मनात आला होता. त्याप्रमाणे त्यांनी पेपरातली जाहिरात वाचून ते एका सोसायटीच्या ऑफिसमध्ये, अकौंटंटच्या जागेसाठी गेले होते. तिथल्या सेक्रेटरीने त्यांना हिशेबाची काम सोडून इतर कामांचीच मोठी यादी सांगितली, ज्यात, पाण्याचा पंप चालवणं, त्याचा पुरवठा वेळेवर करणं, पैसे चुकवणाऱ्या सभासदांविरुद्ध कारवाई करणं, सगळा पत्रव्यवहार करणं, अशा सभासदांवर कोर्टात केसेस दाखल करणं, त्यासाठी लागल्यास वकिलाकडे किंवा कोर्टात जाणं शिवाय हिशेब लिहिणं इत्यादी कामं पाहून ते घाबरले. परत ते वकील, कोर्ट वगैरे त्यांना नको होतं. दुसऱ्यासाठी असलं तरी. इतकी त्यांनी दहशत घेतली होती. तसंच त्यांना पूर्वीच्या अनुभवा बाबत खोटं बोलावं लागलं होतं. नाहीतर त्यांना कोण काम देणार होतं. त्यांना काम मिळत होतं पण आवडलं नव्हतं, आणि पैसेही कमी होते. सध्यातरी त्यांना दुसरा पर्याय नव्हता. कंटाळून ते सोफ्यावर स्वस्थ बसले. हळू हळू पाच वाजत आले.

मग ते सहा वाजायच्या सुमारास ऑफिसला जायला निघाले. नीताला त्यांनी जातो असे सांगितले पण तिच्या चेहऱ्यावर त्यांना आश्चर्याचे भाव दिसले. तिकडे लक्ष न देता ते निघाले. नेहमीप्रमाणे ते ऑफिसला पोचले. आल्या आल्या त्यांना दादाने आत बोलावले. दादाच्या समोरच्या खुर्चीत एक उंच माणूस पाठमोरा बसला होता. त्याच्या डोक्यावर पांढऱ्या रंगाची हॅट होती. जणू काही त्याला ऊन लागत होतं. अंगात एक पांढऱ्या रंगाचा हाफ शर्ट होता. त्यातून त्याची सडसडीत पण लोखंडी कांबेसारखी शरीरयष्टी डोकावत होती. माणसात चिवटपणा फार असावा असं त्यांना वाटलं. शर्ट हिरवट दगडी रंगाच्या पँटमध्ये खोचला होता व पँटचे पट्टे गळ्यात अडकवले होते. पँटचे पाय गुडघ्या पर्यंत येणाऱ्या कातडी बुटांमध्ये खोचले होते. काकांना तो एखाद्या मासेमारी करायला निघालेल्या ख्रिश्चन माणसासारखा दिसला. हातात फक्त मासे पकडण्याचा गळ नव्हता. त्याचा चेहरा उभट, उंच कपाळ, त्याखाली असलेले तपकिरी रंगाचे डोळे, ज्यात क्रौर्याची झाक होती. पण जगाला पिळून काढण्याचा भाव तोंडावर होता. लोकांना मी माझ्या तालावर नाचवीनच, असं त्याच्या मनात असावं. अधून मधून त्याच्या तोंडावर एक प्रकारचा दुःखी भावही यायचा, जणू काही त्याचं बालपण उपासमारीत हरवलं असावं. पण तो हसला की लहान लहान दात आणि त्यावरच्या मोठाल्या हिरड्या दिसत आणि त्याच्या वरच्या ओठाची कमान होत असे. मग गालाच्या गोट्या डोळ्यांपर्यंत सरकल्याने, डोळे अर्धवट झाकले जात. आणि तोंडातून खुनशी हास्य बाहेर पडे. डोळे मात्र क्रूर काम करायला मिळणार या भावनेने मोठे होत..... तो नक्कीच " सोल्या" होता. काकांच्या मनात आलं, हे काय नाव आहे? त्याचा खुलासा पुढे दादाने केलाच. " आईये काकाजी,.... " असं दादाने म्हटल्याबरोबर सोल्याने आपली मान डाव्या बाजूला वळवली. तो वर वर्णन केल्याप्रमाणे तो हसला. "........ ये है, सोल्या, और, सोल्या ये हमारे काकाजी, साला एकदम झाटलीमन आदमी " असं म्हटल्यावर सोल्याने आपला उजवा हात त्यांच्यापुढे केला. काकांनी हात मिळवला. त्यांचा हात एका घट्ट पकडीत अडकल्या सारखा त्यांना वाटला. हातातून त्यांना जरब जाणवली. विशेष म्हणजे, हाताची नखं जास्त जाड, रुंद, मोठी आणि मुद्दाम आणि वरचे भाग टोकांमध्ये रूपांतरित केलेले होते. त्याचा उपयोग काकांना कळेना. काकांच्या चेहऱ्यावरील भाव पाहून दादा म्हणाला, " डरना नही, ये तो अपना यार है. इसका असली नाम सोलकर है, लेकीन ये आदमीको बढिया तरीकेसे छीलता है इसलिये हम इसे सोल्या बोलते है̮. लेकीन साला मराठीमे बात करता है. वो ऐसाच है. इसका काम अभी आपको देखनेको मिलेगा. " समोरच्या कोपऱ्यात बांधलेल्या अवस्थेत जीवन उभा होता. तो थरथरत होता. हातातलं पिस्तूल बाजूला ठेवून सूर्याने त्याचे हात सोडले. आणि त्याला सोल्याकडे ढकलला. पण घाबरून तो जवळच्या एका भिंतीजवळ उभा राहिला. त्याला निरखित सोल्या म्हणाला, " दादा तुला तर माहीत आहे, आपल्याला कामाशिवाय बोलावलेलं चालत नाय. आपन काम झालं नाही झालं, तरी ठरलेले पैसे घेतोच. पैसा तयार आहे ना? "..... दादा म्हणाला, " अरे यार, तू भी क्या पैसा पैसा करता है? पैसेको तो साला कुत्ताभी मूंह नही लगाता. देख, ज्यादा टाईम खाना नही, ये आदमीने गद्दारी की है, इससे क्या करना है, तूही कर ले..... " सोल्याने जीवनरामकडे भक्ष्याकडे पाहतात तशा पद्धतीने हसून पाहिलं आणि म्हणाला, " म्हणजे नक्की काय केलं. माज्या जवल पण टाइम नाय. मी नेहमी जरुर तेवढंच काम करतो. सोल्यासमोर कोणी टिकला नाय. " अरे सालेने पुलिसको इघरकी जानकारी दी. मतलब फोन घुमाया. "..... विचार करून सोल्या म्हणाला, " याचा कान सोलू, का जीभ फाडू, नाहीतर ज्या हातानी फोन लावला तो हात सोलू. " दादा वैतागून म्हणाला, " शुरुवात तो हाथसे कर. " जीवनराम परत घाबरून ओरडला, " तुम लोग मुझे मार डालो, लेकीन ये मत करना मेरे साथ. अरे तुम लोग जानवर हो क्या? " त्याची भीती पाहून आनंदित झालेला सोल्या म्हणाला, " बघतो त्याच्याकडे ".... आणि तो जागेवरून उठला.

अजून सोल्याने काही केलं नाही तरी जीवनराम घाबरून ओरडला, " ए. ऽ. ऽ मेरेको हाथ मत लगाना. तुम लोग जानवर हो क्या? " असं म्हणून त्याने गाफीलपणे बाजूलाच उभा असलेल्या सूर्याला जोरात धक्का दिला. तो दुसऱ्या कोपऱ्यात जाऊन धडपडला. जीवनराम केबिनच्या दरवाज्याकडे धावला. मग खुनशीपणे हसत सोल्या लांब लांब टांगा टाकीत त्याच्याकडे धावला आणि पाठमोऱ्या जीवनरामच्या खांद्याला जोरात फिरवून त्याला आपल्या समोर आणून तुच्छतेने म्हणाला, " किती घाबरतोस रे कुत्र्या? गद्दारी करताना नाही घाबरलास. डरपोक साला. मी फक्त कोशिश करणार आहे. या हातानेच फोन घुमवलास ना? " त्याचा उजवा हात धरून तो म्हणाला. त्याच्या मनगटावर आपल्या डाव्या हाताची पक्की पकड ठेवून ते वर केले व आपल्या उजव्या हाताच्या अंगठ्याचे आणि पहिल्या बोटाचे टोकदार नख त्याच्या आत घुसवायला सुरुवात केली. जीवनरामने अक्षरशः लोळण घेतली. पण सोल्याच्या हातून त्याचा हात सुटला नाही. जीवन जिवाच्या आकांताने ओरडत होता, " ए, छोड दे मुझे. मत करना...... " जीवनरामचे डोळे वेदनेने पांढरे झाले. सोल्याच्या हातावर रक्ताचं कारंजं उडाल आणि त्याचा हात रक्ताळला. काकांचेही डोळे भीतीने वटारले गेले. त्यांनी पटकन डोळ्यावर हात ठेवला आणि तोंड फिरवले. दादाला म्हणाले, " बस करो ये सब. मै नही देख सकता. मै बाहर बैठता हूं. रक्ताने माखलेला हात बाजूला करीत सोल्या थांबला. मग दादाने चिडून काकांना विचारले, " फिर गद्दारीकी क्या सजा होनी चाहिये, बोलिये. ".... काका काकुळतीने म्हणाले, " कुछ भी हो, ये बंद कीजिये. चाहिये तो उसे भूखा पेट रखिये, लेकीन मेरे सामने ये मत करना... " दादा पुन्हा चिडून म्हणाला, " बडा तरस आ राहा है आपको, आपका भाई है क्या? आपको मालूम है, आज आप सब लोग अंदर जाते, अगर आपने उस दिन सुना नही होता तो. फिर भी आपको ऐसा लगता है? " सोल्या म्हणाला, " दादा, मी काम करू का नको? मला काय पन फरक पडत नाय. मला पैसे तर पूरे मिलनार हैत...... दादाचे डोळे तांबारले, तो भडकून म्हणाला, " अरे तू तो पैसा पैसा करता है. पैसा कभी देखा नही क्या? " दादाच्या डोळ्यातला विखार पाहून सोल्या घाबरला, पण सावरून म्हणाला, " टाइम फुकट जातोय. "..... दादाने थोडा विचार केला. "ठीक है, काकाजी आप घर जाओ, आगे क्या करना, वो हम देख लेंगे. आप कल सुबे आना. " सूर्या तापून म्हणाला, " ये भी कोई बात है दादा? काकाजीको भी यहां रहना चाहिये, सबक तो सबके लिये है. मेरा पाव तो सबके सामने छिला था. " पण दादा म्हणाला, " तू चुप कर. तू नही समझेगा. आप जाईए काकाजी. " असं म्हटल्यावर काका बाहेर आले बरोबर आणलेला रिकामा थर्मास घेऊन ते घाईघाईने एकदाचे रस्त्यावर आले. रात्रीचे आठ वाजत आले होते. तरीही रस्त्याला गर्दी होती. ते स्टेशन कडे निघाले. ते चांगलेच भडकले होते आणि घाबरलेही होते. या असल्या कामावर जाण्यात काय अर्थ आहे? ते स्वतःशी म्हणाले. आता त्यांना किशाचा राग यायला सुरुवात झाली. सूर्यनारायण तर त्यांना पहिल्यापासूनच आवडला नव्हता. मग आस्ते आस्ते त्यांच्या लक्षात आलं, की आपण कशात अडकलोय. ही एक मोठी टोळी आहे. आपल्या हातून काही चूक झाली तर हे लोक सोल्याला बोलावतील. विचार करता करता त्यांनी घाबरून आपल्या हाताकडे पाहिलं. ते शहारले..... जीवनच्या वेदना जणू त्यांना होत होत्या. घाईघाईने त्यांनी आपल्या शर्टाच्या बाह्य बंद केल्या. मी काही झालं तरी माझ्या शर्टाची बाही वर करू देणार नाही. ते स्वतःशी म्हणाले. त्यांचा चेहरा उत्तेजित झाला होता. ते पुन्हा स्वतःशी बडबडू लागले. जीवनरामने काय कमी विरोध केला? त्यांना पश्चात्ताप होऊ लागला. पण "आता काही उपयोग नाही " हे वाक्य त्यांनी दहा पंधरा वेळा तरी आतापर्यंत उच्चारले असेल. प्रतिध्वनी सारखं ते वाक्य त्यांच्या मनाच्या सर्व कोपऱ्यांतून परत येऊ लागलं. परत परत सांगून मन काही वेगळी उत्तरं देणार नव्हतं. त्यांच्या समोरून येणाऱ्या लोकांकडे त्यांचं अर्धवट लक्ष होतं. मग त्यांना एकदम भीती वाटू लागली....... " पण उपयोग काय? " ते मोठ्याने म्हणाले. वाक्याची फक्त रचना बदलली होती. मनाच्या उत्तेजित अवस्थेमध्ये त्यांना समोरून येणारी स्त्री दिसली नाही. तिच्या बरोबर तिची मुलगीही हात धरून चालली होती. ते सरळ त्या स्त्रीला जाऊ धडकले. घाबरून ते तिला सॉरी म्हणाले आणि पुढे जाऊ लागले.

त्या स्त्रीने त्यांना वळून चिडक्या आवाजत विचारले, " ओ मिस्टर, जरा इकडे या, काय झोपेत चालता की काय?..... असं म्हटल्यावर आजूबाजूचे लोक त्यांच्याकडे धावले. काहींनी म्हटलं सुद्धा "साला बुढ्ढा है फिर भी औरत को छेडता है. " काकांनी थांबून चेहरा वळवला आणि तिच्याकडे पाहिले. ती साधनाबेन होती. तिनेही त्यांना ओळखले. चिडक्या आवाजाचं रूपांतर आश्चर्यात झालं आणि ती म्हणाली, " अरे तुम्ही?.... तुम्ही आहात होय? (जणू काही त्यांनी धक्का दिला तरी हरकत नाही असं कोणालाही वाटलं असतं ) काकांनी तिला हात जोडले. आजूबाजूची माणसं निराशेने निघाली. नाही तर एका स्त्रीला धक्का मारून वयस्कर माणूस पुढे जातोय, याच्यासारखी मसालेदार घटना काय असू शकते?.... तमाशा करायला?....

साधना म्हणाली, " तुम्ही एवढे घाईघाईने का चाललाय? काही झालंय का? " काका स्वतःला सावरून म्हणाले, " छे! छे! काही नाही! ". तरी ती म्हणाली, " काही नाही कसं, तुमचा चेहराच सांगतोय आणि केवढा घाम आलाय तुम्हाला. "..... मग काकांनी लगबगीने चष्मा काढून चेहऱ्याबरोबर तोंडावरच्या भावनाही पुसल्या. अचानक साधनाबेन भेटल्याने त्यांना थोडं लाजल्यासारखं झालं. त्यावर ती म्हणाली, " अरे, आपली अशी भेट अचानक दोनदा झाली, नाही?. म्हणजे आपण तिसऱ्यांदा असेच नक्की भेटणार..... पण असं भेटण्यापेक्षा तुम्ही असं का करीत नाही, येत्या रविवारी घरीच या ना. " काका तिच्या चेहऱ्या कडे पाहत राहिले. ती त्यांना परत आकर्षक वाटली. त्यांना आयतं बोलावणं मिळाल्यावर ते कशाला सोडती ल? मग त्यांनी तिला पुन्हा एकदा पत्ता विचारला आणि ते निघाले. नैराश्याच्या विचारांनी ग्रस्त असताना साधनाबेन भेटणं म्हणजे उन्हातून आल्यावर तोंडावर कोणीतरी गुलाबपाण्याचा फवारा मारल्यासारखं त्यांना वाटलं. त्यांची अस्वस्थता तात्पुरती तरी कमी झाली. पुन्हा त्यांना तिच्या अंगाचा येणारा वास रोहिणीच्या अंगासारखा वाटला...... ते सु खा व ले... कितीतरी वेळ ते तो वास आठवीत राहिले. त्या नशेतच त्यांनी गाडी पकडली. ते मनानेच साधनाबेनच्या घरी जाऊन आले. तिचे होणारे काल्पनिक संवाद त्यांच्या डोक्यात फिरत राहिले. ते जेव्हा घराजवळच्या गल्लीच्या तोंडाशी आले तेव्हा "काकाजी, काकाजी " या हाकेने ते भानावर आले. तो रघुमल होता...... ते सावकाश पायऱ्या चढत त्याच्या दुकानात शिरले. तो म्हणाला, " अरे काकाजी तुमी तो दुकानवर येतेच नाही. आओ जरा गपशप लगाव नि. आज आपको देरी कैसे हुई. " काकांना एकदम पाटकराची आठवण झाली.......

पण त्याच्याबद्दल थेट विचारणं बरं वाटलं नाही. मनात शब्दांची जुळवाजुळव चालू होती. ताकाला जाऊन भांडं कसं लपवायचं त्यांना कळेना. रघुमल बोलत होता तिकडे त्यांचं अर्धवट लक्ष होतं. रघुमल त्यांना त्याच्या सून आणि मुलाबद्दल सांगत होता. " काकाजी, ये साला जवान बच्चा लोगला काम नको. मेरा सोकरा ना बहू, दोनोंको मैने राजस्थान भेज दिया. बहुत तक्रार करता था. ये लोगोंको बडे लोगसे बात करनेका ढंगहीच नही है........ " तो पुढेही बोलत होता. पण काकांचं लक्ष तिकडे नव्हतं. त्यांना रमेशची आठवण झाली. मी थोडाच त्याला कुठे पाठवू शकतो? तोच मला घराबाहेर जायला सांगेल. त्यांना पाटकरचा विचार स्वस्थ बसू देईना. रघुमल म्हणाला, " अरे काकाजी, थोडा चाय तो पिओ नि. ".... असं म्हणून तो वळला आणि त्यांनी हो नाही म्हणायच्या आतच समोरच्या भटाला त्यांनी चहा सांगितला. मग ते बसले. थोड्याच वेळात चहा आला. अर्धा अर्धा करून दोघांनी पिण्यास सुरुवात केली. काका चुळबुळत होते. त्यांनी सहज वाटण्यासारखा प्रश्न फेकला. "समोरच्या चाळीची काय खबर? बिल्डिंग कधी होते. " हे खरं तर त्यांनी उगाच विचारलं. त्यांना बिल्डिंगमध्ये बिलकूल रस नव्हता. त्यांना पाटकरची माहिती हवी होती. चहा झाल्यावर चहाचं भांडं बाजूला ठेवून तो चहाच्या पोऱ्यावर उगाचच भडकला, " अरे ए, भाय तेरेको क्या उठानेके लिये बुलाना पडेगा क्या? हमारी बाते सुनना चाहता है क्या? चल चल.... जल्दी उठा चल. " तो गेल्यावर तो म्हणाला, " अरे काकाजी हे चालचा काय पन होनार नाय. तू गुस्सा मत कर हां. पण हे मराठी माणसला चांगला जिंदगी नको असते. " आता काकांनी विचारलं, " का! पाटकर काय म्हणतो? ".... रघुमलने इकडे तिकडे पाहत दबक्या आवाजात म्हटलं, " हे साला पाटकर है ना, लई चालू मानस. तेनी पोलिसच्या धमकी दिला होतानी....? " तो पुढे बोलण्याच्या आधीच काकांनी धडधडत्या छातीने त्याला विचारलं, " का... काऽ य झालं? " त्यांचा हात हातात घेऊन तो म्हणाला, " तु सांबळ तो, ते काय पोलिसमध्ये जानार नाय, साला पोताच्या सोकरीलाच हात लावते, बाप है.... या जानवर?. ते काय नाय करत "....... काका सुन्न झाले,.

मग त्यांना आठवलं, पुष्पा त्यांच्याकडे झोपण्याचा आग्रह त्या रात्री का करत होती ते. त्यांचं रक्त उसळल्यासारखं झालं. ते झटकन उठले. काही न बोलता बाहेर पडले. रघुमल घाबरला त्याने ओरडून सांगितलं, " तू आता घरी जा हां. काय पण बोलू नको. " ते भडकलेल्या अवस्थेतच घरी आले. त्यांचं लक्ष लागेना. पुष्पाच्या मृत्यूला पाटकरच जबाबदार होता तर,... शी! स्वतःच्या मुलीलाच........ " पुढचे शब्द मनात यायला शरमत होते...,,, यांत्रिकपणे त्यांचं जेवण झालं. आज रमेशही काही बोलला नाही. ते आज बिछान्यावर लवकरच लवंडले. जेमतेम दहा वाजत होते. त्यांच्या डोक्यातून पुष्पा जाईना. बराच वेळ ते तसेच पडले. त्या रात्री आपण पुष्पाला थोडं समजून घेतलं असतं तर, कदाचित आज ती जिवंत असती. आणि नाही म्हटलं तरी अधून मधून तिच्याशी "संपर्क " ठेवता आला असता. मनाने "संबंध" ऐवजी दिखाऊ शब्द पुढे केला..... हळूहळू त्यांचे विचार स्थिरावले. अस्वस्थता थोडी कमी झाली. पण त्यांच्या मनातून पाटकर कायमचाच उतरला. त्याच्या विरुद्ध त्यांच्याजवळ सबळ पुरावा होता.. मग त्यांना साधनाबेनची आठवण झाली. रविवारची वाट पाहण्यात आता गंमत होती. रविवारला अजून दोन दिवस होते. तिच्या घरी जाऊन तिच्याशी जवळीक साधल्याची स्वप्न पाहत ते झोपी गेले.......... सकाळ झाली. नेहमीप्रमाणे ते तयार झाले. ते निघाले. तिकडे जीवनचं ह्या लोकांनी काय केलं असेल कुणास ठाऊक? ते ऑफिसमध्ये शिरले आणि त्यांना दादाने आत बोलावलं. त्याला माहीत होतं, की ते जीवन बद्दल विचारणार, पण तो मुद्दामच काही बोलला नाही. त्याने आता एक वेगळीच योजना आखली होती. त्यात त्याला काकांची मदत हवी होती. ती योजना होती, " बँकेवरील दरोड्याची " ती त्यांना कशी सांगावी या विचारात तो होता. काकांना वाटलं, जीवनबद्दल कसं सांगावं असा त्याला प्रश्न होता. ते काही तरी बोलणार त्तेवढात तो थंड आवाजात म्हणाला, " काकाजी आपको 'श्रीकांत बँक मालूम है क्या? " काकांनी नाही म्हटलं, म्हणून त्याने त्यांना पत्ता सांगितला.

मुंबई सेंट्रलला "प्रीतम " बिल्डिंगच्या तळमजल्यावर ती बँक होती. त्यांना तो पत्ता कुठेतरी ऐकल्यासारखा वाटला. पण त्यांनी तसं काही दर्शवलं नाही. त्याने काकांना बसायला सांगितलं आणि म्हणाला, " सिर्फ हाथपर हाथ रखकर तो कुछ होने वाला नही, है ना? आप अंदर जाके सब देखके आना. खाता खोलनेके बहाने आप वहां जाइये. फिर इघर आकर आपको नक्शा बनाना है. सेफ, मॅनेजरका केबीन, आने जानेके लिये कितने दरवाजे है, चिपकके कौनसी दुकान है क्या, बँकका टाइमिंग, किधर अर्धा माला है, किधर सेफ डिपॉझिट व्हॉल्ट है, कॅश कब बाहर जाती है, जानेका तो एक दो बार जाकर देखना. वहां बारबार नही जाना. सोच समझके जाओ. ज्यादा पूछताछ नही करना. लेकीन सब जगह ध्यान रखना. कितने लोग काम करते है, जरा होशियारीसे काम करना. ये काम आपको अकेलेही करना है. जितना जल्दी होगा उतना अच्छा होगा. "..... ते बाहेर आले. त्या दिवशी काही खास मेसेज आले नाहीत. आजकाल सूर्या आणि दादा कायम आत बसलेले असायचे. एक दिवस सूर्या म्हणाला, "दादा, ये काकाजीके बारेमे सोचो ये अपने लाईनका आदमी नही है. त्यावर विचार करून दादा म्हणाल, " मुझे मालूम है, लेकीन तेरेको इसकी वजह नही समझेगी. तेरे पास ऐसी चीजे समझनेका दिमागही नही है. तू अपना काम कर. परसू एक मेसेज डायरेक्ट तेरे पास आया, वो क्या था? "....... थोडा विचार करून दादा खूष होईल असं समजून सूर्या म्हणाला, " अपनेको सिर्फ एक पार्सल पहुचाना है, दस लाख मिलेगा. अगर हम हाँ बोलते है तो वो अपना नाम बतानेको और अगला प्लान बताने को तैयार है. सोचो. " दादाने डोळे मिटले, काही वेळ विचार केला. सूर्याला काही अंदाज येईना. दादा म्हणाला, " तेरे दिमागमे भूसा भरा है. इतना पैसा वो देता है, इसका मतलब कुछ तो भी डेंजर पार्सल पहुंचाना है. सोचना अगर उस पार्सलमे कुछ विस्फोटक भरा होगा तो सबके साथ पहुंचानेवाला भी गया कामसे. कितने लोगोंकी जान जा सकती है, अंदाजा है तुम्हे? अपून साधारण आदमीका दुष्मन नही है. ये साले टुच्चे पैसेवालेके साथ अपना दुष्मनी है. पहले ही पुलिस अपने पीछे है. फिर पब्लिक भी अपने पीछे लगेगी. "..... "लेकीन दादा ये काम काकाको करनेको बोलनेका और पैसे पर थोडाही अच्छा या बूरा काम करके आया ऐसा लिखा रहता है? पैसा पैसा है. और फिर ये काकाजी अपने कितने काम आयेगा ये भी समझेगा. "

.... त्याच्याकडे रोखून पाहत दादा म्हणाला, " दिमाग तो बडा जोरसे दौड रह है रे तेरा. " देख, अब तेरेको बोलता है, ध्यान से सून. काका जैसे पढे लिखे साधारण आदमीके पीछेसे हम अपना बहोत सारा धंदा कर सकते है. पुलिस को काकापर कभी शक नही होगा और उसके पीछे हम भी सेफ रहेंगे. ".... सूर्या विचारात पडलेला पाहून दादा म्हणाला, " अव समझ गये ना, काका अपने लाईनका आदमी नही तो भी क्यूं चाहिये...... " त्याच्या डोक्याला हात लावून दादा म्हणाला, " सोच, सोच.... अछी तरहसे सोच. अब जा अपने काम पे लग जा. मेरा मगज मत खाना. "

शनिवार उजाडला. बँकेच्या कामाला सध्या तरी हात लावण्याची जरूरी नव्हती. काकांनी साधनाबेनचा पत्ता पाहिलाः

साधना व्ही मेहता

प्रीतम बिल्डिंग, दुसरा मजला,

फ्लॅट नं. १४, श्रीकांत सहकारी बँकेच्या वर.

बाबासाहेब बोजेवार मार्ग,

मुंबई सेंट्रल, मुंबई.

म्हणजे साधनाच्या बिल्डिंगमध्येच ही बँक आहे तर. उद्या साधनाने बोलावलं आहे. एका दगडात दोन पक्षी मारता येतील. असा विचार करून ते ऑफिसला आले. ते खुर्चीत स्थिरावले आणि अचानक दारावरची बेल वाजली. नक्कीच कोणीतरी नवीन असणार. दार उघडायला जायची गरज नव्हती. येणारी व्यक्ती एखाद्या राजघराण्याच्या चिटणिसासारखी दिसत होती. डोक्यावरच्या फेट्याचा पंख्यासारखा केशरी रंगाचा तुरा काढलेला होता. माणसाचा चेहरा किंचित लांबट लालसर आणि चांगलंचुंगलं खाल्लेला दिसत होता. तसंच त्याला पैशाचीही मुबलकता असावी असं दिसत होतं. जाड पण पांढरटपणाकडे झुकलेल्या भुवया, गरूडासारखं नाक कोठेही खुपसण्याची तयारी असल्या सारखं दिसत होतं. बेडकासारखी लांबट जिवणी दुसऱ्याची खुशामत करताना रुंद झाली असावी. तपकिरी रंगाचे डोळे, दुसऱ्याची किंमत करणारे, वाटत होते. अंगात जुन्या पद्धतीचा सोनेरी पिवळट रंगाचा सिल्कचा कुर्ता, खाली रेशीम काठी धोतरावर शोभून दिसत होता. खिशात जुन्या पद्धतीचं साखळीवालं घड्याळ जिचं एक टोक एका बटणात अडकवलेलं होत. उंची उत्तम, पण वयानुसार आणि सतत वाकण्याची सवय असल्याने झुकलेले खांदे. नेहमीच नमस्कार करण्याची सवय असावी. स्वागतिकेसारखं खोटं हसू तोंडावर दिसत होतं. आतली कवळी हसल्यावर चमकत होती. पान खाऊन ओठ पोपटासारखे लाल झालेले. एका हातात सोनेरी मुठीची काठी धरून थोडा ताठा आणून तो उभा होता. पायातले लाल मखमल लावलेले राजेशाही चढाव ज्याच्यावरचं सोनेरी नक्षीकाम चमकत होतं. एकूण म्हातारा चांगलाच "हुलबुजका " दिसत होता. आतून सुर्या आला, त्याला आणि काकांना लवून नमस्कार करीत तो माणूस म्हणाला, " दादासाब है? मुझे हिज हायनेस प्रिन्स जयसिंगजी महाराजने भेजा है. "

(क्र म शः)