ह्यासोबत
- आखाती मुशाफिरी (१)
- आखाती मुशाफिरी (२)
- आखाती मुशाफिरी (३)
- आखाती मुशाफिरी (४)
- आखाती मुशाफिरी (५)
- आखाती मुशाफिरी (६)
- आखाती मुशाफिरी (७)
- आखाती मुशाफिरी (८)
- आखाती मुशाफिरी (९)
- आखाती मुशाफिरी (१०)
- आखाती मुशाफिरी (११)
- आखाती मुशाफिरी ( मध्यंतर )
- आखाती मुशाफिरी (१२)
- आखाती मुशाफिरी (१३)
- आखाती मुशाफिरी (१४)
- आखाती मुशाफिरी (१५)
- आखाती मुशाफिरी (१६)
- आखाती मुशाफिरी (१७)
- आखाती मुशाफिरी (१८)
- आखाती मुशाफिरी (१९)
- आखाती मुशाफिरी (२०)
- आखाती मुशाफिरी (२१)
- आखाती मुशाफिरी (२२)
- आखाती मुशाफिरी (२३)
- आखाती मुशाफिरी (२४)
- आखाती मुशाफिरी (२५)
- आखाती मुशाफिरी ( २६ )
- आखाती मुशाफिरी ( २७ )
- आखाती मुशाफिरी ( २८ )
- आखाती मुशाफिरी ( २९ )
- आखाती मुशाफिरी ( ३० )
या ’लहान’ माणसाने मला पहिल्याच भेटीतच जिंकलं होतं.
गोर्यांबद्धलचा माझा पूर्वग्रह आता मला तपासून पहावा लागणार होता.
--------------------------------------------------------------------
त्यादिवशी दुपारी चार वाजेपर्यंत बॅटी कामाच्या जागेवरून जराही इकडे तिकडे हलला नाही. एरवी सतत बडबड करणारा हा माणूस कमीत कमी पण मोजक्या शब्दांत कामाच्या सूचना देऊन काम करवून घेत होता. सावंत आणि सुर्वे या दोघांनाही बॅटीची कामाची पद्धत अत्मसात कारायला वेळ लागला नाही. कांबळी आणि महाडिक भारावल्यागत मदनिसाचे काम करत होते. संध्याकाळ व्हायला आली तसा बॅटीला पाहून गायब झालेला इदीही आता तिथे हजर झाला होता. स्वत: शिडीवर चढून झपाट्याने कामात मदत करणारा बॅटी पाहून इदी हरखून गेला. माझ्या कानाशी इदी हळूच कुजबुजला.
" हे माकड (चिंपांझी) या पूर्वीच आलं असतं तर किती बरं झालं असतं नाही?"
खरं म्हणजी इदी हे इतकं हळू बोलला होता की बॅटीच्या कानावर ते जाऊ नये.पण बॅटीचे कान भलतेच तिखट असावेत. तो झर्रकन खाली उतरला आणि आमच्या समोर येऊन उभा राहिला. आता हा काय बोलतो या भीतिने मी जरा भांबावलोच. पण सांवरून मी बॅटीची इदीशी ओळख करून दिली. इदीशी बॅटी हस्तांदोलन करीत म्हणाला,
" हो, माझ्या मित्रा, मला जरा उशीर झाला खरा. मी या आधीच यायला हवं होतं खरं. पण कांही हरकत नाही. अगदीच नसल्यापेक्षा उशीर चांगला. नाही कां मित्रा! पण मला एक सांग मित्रा. तू इथे काय करतोस?"
" खरं सांगायचं तर कांहीच नाही. इथे फारसे कैदीही नाहीत त्यामुळे मलाच काय पण माझ्या इतर सहकार्यांनाही म्हणावं तसं काम नाहीए. पण नौकरी म्हटली की नौकरी! काम असो वा नसो वेळ तर घालवावाच लागतो ना!"
" बरं मग, मी तुला कांही काम संगितलं तर तू करशील? क्षमा कर मला. तुला काम सांगण्य़ाचा मला कांही अधिकार नाही पण एक विनंती मात्र करावीशी वाटते. चालेल कां?"
" कां नाही? अवश्य. बोल."
" मला एक दोन मोठाले दोर हवे आहेत. देऊ शकशील तूं?"
" दोर? आणि तेंही कारागृहांत?" म्हणत इदी हंसायला लागला.
" क्षमा कर मित्रा. इथे दोरच काय पण पायजम्याची नाडीही मिळणार नाही. कारण माहितीए? असलं कांही इथे कोणाला सांपडलं तर गळफास घेऊन जीव नाही देणार तो?"
दोर मिळू शकणार नाही इतके समजताच बॅटी पुन्हा शिडीवर चढण्याच्या बेतात होता पण पुन्हा मागे वळाला. मला म्हणाला,
" इथली सुटीची वेळ, मला म्हणायचं आहे, कामाची वेळ काय आहे?"
" तशी सकाळी आठ ते दुपारी चार अशी आहे पण आम्ही त्यानंतरही एखादा तास थांबतो. निदान अंधार होईतो तरी थांबतोच."
"कां? त्याची काय गरज आहे?" मला त्याच्या या प्रश्नाचा थोडा रागच आला. मी म्हणालो,
" कां म्हणजे काय? काम दिलेल्या मुदतीत संपायला नको? उशीर झाला तर विलंब शुल्क (penalty) भरावे लागेल. माहितीए!"
" अरे माझ्या मित्रा, तूं म्हणतोस तें बरोबर असेलही. काम तर वेळेत झालंच पाहिजे पण त्या साठी जादा वेळ खर्चून काम केले पाहिजे हें कांही मला पटत नाही. आणि मला एक सांग, या कामगारांना आपण जादा कामाचे पैसे देत आहोत कां? किंवा देणार आहोत कां? आपण कामाचे नियोजन नीट केले तर जादा वेळ न थांबताही काम वेळेत व्हायला कांही अडचण नसावी."
आता मात्र माझा पारा चढायला लागला. शेवटी हा गोराही त्याच्या मूळ वळणावरच गेला म्हणायचा. हे काम गेले पंधरा दिवस मी सांभाळतो आहे तो काय वेडा म्हणून. हेंच काय पण या आधीही मी अशी अनेक कामे माझ्या पद्धतीने केली आहेत आणि ती व्यवस्थित पारही पडली आहेत. आणि आता आला हा मला अक्कल शिकवायला. असें विचार माझ्या मनांत यायला लागले. मी शक्य तितके संयत रहात म्हणालो,
" तूं म्हणतोस ते बरोबर असेलही. पण आजपर्यंत मी या पद्धतीने काम करत आलो आहे आणि अजून तरी मला कांही अडचण आलेली नाही. हां, आता तुला माझी पद्धत चुकीची वाटत असेल तर तूं ती बदलू शकतोस. माझी कांही हरकत नाही." माझा स्वर कडवट झालेला आहे हे माझ्या लक्षांत आले. पण माझा नाईलाज होता.
" हेय् हरून! तुझा कांहीतरी गैरसमज होतो आहे. मला वाटतं रागावलास तूं. विश्वास ठेव माझ्यावर, मी तुला कांही शिकवायला किंवा त्रास द्यायला आलो नाही. मी अशा कामाचा योजक (task master) म्हणून खूप काम केले आहे आणि अशा अनेक अडचणीतूनच शिकत आलो आहे. मी जे शिकलो त्याचा लाभ इथेही आणि तुला आवडेल तर, तुलाही मिळावा असे मला वाटते. इथे येण्यापूर्वी माझे अब्राहमशी (मुदीरशी) बोलणे झालेले आहे. खरें पाहू जातां तूं एक वातानुकूलित यंत्रांचा कुशल तंत्रज्ञ-अभियंता आहेस आणि केवळ नाईलाजाने तुला हे डक्ट उभारणीचे काम करावे लागत आहे की ज्याचा तुला फारसा अनुभव असण्याची शक्यता नाही, पण तरीही तू दिली गेलेली जबाबदारी खूपच चांगल्या तर्हेने पार पाडत आहेस, याची मला कल्पना मला अब्राहमने दिलेली आहे. उद्याच कदाचित या कामासाठी मागवलेले संयंत्र येऊन ठेपेल. ते तुलाच उभे करायचे आहे. तू त्यातला तज्ञ (expert) आहेस. त्या कामात मी दखल देणार नाही. हे आंतले काम मी बघेन, तूं संयंत्राचे काम बघ. काय? चालेल की नाहीं? "
मला राग आलेला आहे हे बॅटीच्या लक्षांत आलेले होते आणि तो माझी समजूत काढीत होता. तो जें म्हणत होता तें अगदी बरोबर होते आणि मला ते पटतही होते. पण कां कुणास ठाऊक मी अस्वस्थ झालो होतो. बहुदा माझा अहंकार दुखावला गेला होता. कारण बॅटीला इथे पाठवण्यापूर्वी, त्याला माझ्याविषयी, कामाविषयी सांगण्यापूर्वी मुदीरने माझ्याशी बोलायला हवे होते. मी या कामाचा खरोखर प्रधिकारी (incharge) होतो कां? तसेंच मी मनातून खजीलही झालो होतो. बॅटी जें कांही बोलला होता तें चुकीचे नव्हतेंच. शिरस्त्राणे आणि दोर इत्यादि तर मूलभूत गोष्टी होत्या. त्या कां मला सुचूं शकल्या नाहीत?
कामाची सुटी करून मी खिन्न मनाने माझ्या निवासाकडें परतलो. जाऊन पोहोचलो तर वश्या डोंगर्या माझी वाट पहात फाटकापाशीच उभा होता. त्याला पाहतांच मला फार बरें वाटले. आज खरोखर मला त्याचीच गरज होती. नाही तरी तो फार दिवसांनी भेटत होता. मी चेहरा शक्य तितका सरळ ठेवत विचारले,
" काय गुरु, आज काय गुरुपौर्णिमा आहे की काय? गुरुमाऊली आज स्वत: दर्शन द्यायला आली?"
" कायले चापलुशी करतं बे? दोन हप्ते झाले. कोठे मरून पडला होता तूं? साला, तूं आमची बी कोणाची वास्तपुस्त करून नै राह्यला. तुला काय वाटते, असा सोडून देऊ आमी तुले! मरशीन तं राखेतून वडून काडू आमी तुले. आणि काय बे, तुझा चेहरा कां असा दिसून राह्यला मैताला गेल्या सारखा ?"
" सांगतो माऊली. सगळं सांगतो. आधी आंत तर चला " असं म्हणत मी दार उघडलं आणि वश्याला घरांत घेऊन गेलो.
क्रमश: