"वळू" बघा

उमेश कुलकर्णी यांचा "वळू" हा मराठी चित्रपट २५ जानेवारीला प्रदर्शित होईल. या चित्रपटाचा प्रदर्शनपूर्व प्रीमिअर बघायला मिळाला. या चित्रपटाविषयी थोडेसे...

लहानपणापासून अगदी नाकासमोर चालणारा गावातील बैल एकदा पिसाळतो आणि गावामध्ये विध्वंस सुरु करतो. वळूला पकडण्यासाठी वन-अधिकार्‍याला बोलावले जाते. बिबट्यासारख्या हिंस्र प्राण्यांना पकडण्याचा अनुभव असलेल्या वनअधिकार्‍याला हे काम फारच सोपे वाटते. किंबहुना कुसवड्यासारख्या अगदी अंतर्भागात असणार्‍या गावात असे पोरकट काम करायला यायलाच तो नाखूष असतो पण काय करणार. “वरून" ऑर्डर आल्यामुळे त्याला जावेच लागते. वनअधिकार्‍याचा लहान भाऊ वळूला पकडण्याच्या कार्यक्रमाची एखादी डॉक्युमेंटरी करता येईल या विचाराने त्याच्यासोबत येतो आणि सुरु होतो एक धमाल चित्रपट.

"वळू" ही महाराष्ट्रातील अगदी पन्नास कुटुंबांचे म्हणता येईल अशा कुसवडे गावाची कथा. गावात नेतृत्व करणारे आण्णा सरपंच आहेत. त्यांचे वर्चस्व मान्य नसणारे गावचे तरूण नेते आबा आहेत. वनअधिकार्‍याला मदत करण्यासाठी सदैव एका पायावर तयार असणारा जीवन्या आहे. बुडाखाली फटफटी आल्याने इंप्रेशन मारणारा शिवा आहे तर त्याच्यावर मनापासून फिदा असणारी संगी आहे. संगीचे जमलेले पाहून मत्सर वाटणारी तानी आहे तर आपल्या अवघडलेल्या गायीचे काय होईल या विवंचनेत असणारी जीवन्याची आई सखुबाई आहे. गावचे भटजी, त्यांची बायको, भटजींना नेहमी चिडवणारा सत्या आहे. या सर्वांना साथ देणारे पोपट्या, शंकर्‍या, गण्या, मारत्या आणि संपतराव आहेत. आणि या सर्वांच्या नियमित, शांत आयुष्यात खळबळ माजवणारा चित्रपटाचा नायक डुरक्या वळू आहे.

 “बैल दिसला की 'ब्लोअर' किंवा 'गन' वापरून त्याला इंजेक्शन द्यायचे. बेशुद्ध बैलाला दोरीने बांधून घेऊन यायचे" असा दोन ओळींचा सोपा कार्यक्रम मनाशी धरून गावात वन-अधिकारी ऊर्फ 'फॉरेष्ट' (अतुल कुलकर्णी) येतो. पण आपण मनाशी आखलेला कार्यक्रम वाटतो तितका सोपा नाही हे त्याला समजू लागते. माहितीपट करण्यासाठी सोबत म्हणून आलेला त्याच्या जोडीदाराचे डॉक्युमेंटरीचे काम हे बैलाला पकडण्यापेक्षाही गावकर्‍यांना जास्त पसंत पडते. चित्रपटात काय काय होते हे सांगणे हा या लेखाचा उद्देश नाही. शिवाय हा चित्रपट "डुरक्या" ला पकडताना झालेला गोंधळ व त्यातून उलगडणारे गावकर्‍यांचे भावविश्व यापुरताच असल्याने हे सर्व येथेच सांगण्याचे कारणही नाही.

अतुल कुलकर्णी, मोहन आगाशे, दिलीप प्रभावळकर, निर्मिती सावंत, अमृता सुभाष सर्वांनीच झकास काम केले आहे. म्हटलं तर साईड हीरोची पण सर्वात जास्त भावखाऊ अशी जीवन्याची भूमिका करताना गिरीष कुलकर्णींनी तर धमाल उडवली आहे. नंदू माधव आणि सतीश तारे हे असेच फारसे प्रकाशात नसणारे वीर चित्रपटात धमाल करुन जातात. सतीश तारे हा खरे तर अगदी गुणवान कलाकार. ज्यांनी त्याचे "विच्छा माझी पुरी करा" पाहिले असेल त्यांना या विनोदवीराच्या अचूक टायमिंगची प्रचिती नक्कीच आली असेल. पण दुर्दैवाने त्याला सवंग विनोदाच्याच भूमिका जास्त मिळाल्या आहेत. मात्र या चित्रपटातील छोट्याशाच भूमिकेत त्याने बहार आणली आहे. नंदू माधव आणि मोहन आगाशे यांच्या तिरकस संवांदातून एकमेकांवर चाललेली कुरघोडी पहायला तर फार मजा येते. अतुल कुलकर्णी आणि सतीश तारे यांना जास्त मोकाट सोडले तर आवरणे फार कठीण जाते पण या चित्रपटात त्यांचा तोल कुठेही सुटलेला नाही.

चित्रपटात खटकणार्‍या गोष्टी कमी आहेत पण तरीही काही न पटलेले. चित्रपटाच्या केंद्रस्थानी असलेल्या "डुरक्या" वळूचे पात्र थोडेसे गोंधळवणारे आहे. "ज्युरासिक पार्क" च्या पद्धतीने वेगवेगळ्या प्रसंगांतून आधी शेपूट, मग पाठ, नंतर वशिंड, शेवटी कपाळ असे दाखविल्यानंतर "डुरक्या"ची एक लार्जर दॅन लाईफ इमेज मनामध्ये तयार होते. अतुल कुलकर्णीच्या "काय सांगता, डुरक्या समोर दिसतो त्या बैलापेक्षा कितीतरी मोठा आहे" अशा संवादांनी त्या इमेजला खतपाणीच घातले जाते. मात्र "डुरक्या" संपूर्ण दिसतो तेव्हा भ्रमनिरास झाल्यासारखे वाटते. अर्थात वळू म्हणजे काही डायनासॉर नव्हे पण तरीही टीव्हीएस हन्क च्या जाहिरातीत दिसतो तसा उग्र रानरेडा असेल असे वाटले होते.

दुसरं म्हणजे डुरक्याचे पात्र फारच अंडरप्ले करुन रंगवल्यासारखे वाटते. डुरक्याच्या विध्वंसांचे केवळ अवशेष दिसत राहतात. पण प्रत्यक्ष हल्ला करणारा डुरक्या कधीच दिसत नाही. त्याचा हिंस्रपणाही केवळ एकदोन डुरकावण्यांमधूनच ऐकू येतो. एरवी डुरक्या अगदी प्रेमळ स्निग्ध डोळ्यांचा एक घरगुती बैल वाटत राहतो. याशिवाय डुरक्याचे भोळ्या प्रेमातून, अंधश्रद्धेतून समर्थन करणार्‍या बायका पाहून ही प्रतिमा अधोरेखितच होते. ;)

आणखी एक म्हणजे अतुल कुलकर्णीच्या भावाचे काम करणारा कलाकार अगदी पुस्तकात वाचल्याप्रमाणे कृत्रिम संवाद म्हणत राहतो. नशीबाने त्याला अगदीच कमी भूमिका आहे. इतकेच.

चित्रपट तुलनेने लहान आहे. चित्रपटात एकही गाणे नाही. त्यामुळे चित्रपट कुठेही रेंगाळत नाही. ग्रामीण जीवनातील रसरंगगंधाने नटलेल्या या चित्रपटात मराठी चित्रपटातील नेहमीचेच 'अ'यशस्वी कलाकार असलेले तमाशे आणि लावण्या, एकमेकांच्या जीवावर उठलेले पाटील, अंगविक्षेप आणि द्वयर्थी, अश्लील विनोद, अर्धवस्त्रांकित कलाकारांचे आयटम सॉंग हे प्रकार नाहीत, घासून गुळगुळीत झालेला, प्रेमकहाणीसारखा विषय अगदीच तोंडी लावण्यापुरता आहे. कोणीतरी जोड्याने मुस्कटात मारल्याप्रमाणे सदैव सुतकी, गंभीर चेहरे करून वावरणार्‍या आणि दोन जांभया देऊन झाल्या तरी पुढचा डायलॉग म्हणतील तर शपथ असल्या कलाकारांची तथाकथित कलात्मकता नाही. मात्र हे सर्व नाही म्हणून चित्रपट चांगला आहे असे म्हणणे चित्रपटासाठी फारच अन्यायकारक ठरेल. चित्रपटाचे मुख्य यश आहे ते अगदी चुरचुरीत, चटपटीत ग्रामीण मराठीतील संवाद. एकही शब्द खाली पडू न देता हजरजबाबीपणाने मिळणारे प्रतिटोले. या संवांदातून उलगडणारे गावकर्‍यांचे भावविश्व. त्यांची निरागसता, डॉक्युमेंटरी व वन-अधिकार्‍यांच्या कामाबद्दलची उत्सुकता, आण्णा आणि आबांमधली स्पर्धा आणि गावकर्‍यांची भोळी श्रद्धा. एका वाक्यात सांगायचे झाले तर शंकर पाटलांच्या एखाद्या कथेप्रमाणे अगदी "जमलेला" हा चित्रपट आहे.

निखळ मनोरंजन - पैसे वसूल - करण्यात हा चित्रपट अगदी यशस्वी होतो. चित्रपटातील विनोदाची जातकुळी वेगळी असल्याने अगदी सात मजली हास्य वगैरे प्रकार अनुभवायला मिळणार नाहीत पण मनापासून खळखळून हसवण्यात चित्रपट कुठेही कमी पडत नाही. वेगवान हाताळणी, वेगळा विषय, प्रत्येक फ्रेममध्ये नवेपणा, ताजेपणा असलेला असा कुठेही तोल न जाणारा एक निर्मळ विनोदी चित्रपट पाहिल्याचा आनंद हा चित्रपट पाहिल्यावर नक्की मिळेल.

चित्रपटाविषयी अधिक माहिती दुवा क्र. १ येथे पहा.