अरे! कोण भेकड?

तनामनाचा अंतर्बाह्य थरकाप उडवून देणारा दहशतवादी हल्ला काल रात्रीपासून मुंबईवर सुरू आहे. युद्धसदृश नव्हे युद्धाचीच परिस्थिती आहे. हेमंत करकरे, विजय साळसकर, शशांक शिंदे, अशोक कामटे आणि अज्ञात नावागावांच्या शेकडो लोकांचा बळी गेला आहे. त्यांना हौतात्म्य/ शहादत प्राप्त झाल्याचे पोवाडे सुरू झालेच आहेत.

त्यांच्या कर्तव्यनिष्ठेला सलाम परंतु हौतात्म्याचे गोडवे गाणाऱ्यांना गप्प करण्याची वेळ आली आहे.

चूक कोणाची? कोणी माहिती पुरवूनही दुर्लक्ष केलंय? वगैरे चर्चेलाही काही अर्थ नाही.

मुंबईकरांनो आम्ही तुमच्या सोबत/पाठीशी/दुःखात सहभागी आहोत हे राजकारण्यांनी म्हणणं म्हणजे तर एक मोठ फार्स आहे.

एक भयंकर उदाहरण बघा. पुण्याच्या महापौर राजलक्ष्मी भोसले यांची यावरील ३० सेकंदांची प्रतिक्रिया रेडिओ मिरचीवर सकाळी ऐकवली. त्या कदाचित यापेक्षा जास्त काही बोलल्या असतील. पण जे मी ऐकलं ते शब्दशः असं होतं :

"खरंतर सगळ्यांत पहिल्यांदा मी या हल्ल्याचा अगदी मनापासून निषेध करते. अतिशय भेकड असे हे हल्ले आहेत. मी हे सांगू इच्छिते की पुण्यात आता काहीही प्रॉब्लेम नाही. पुणं शांत आहे. आणि सर्व पुणेकरांच्या वतीने मी असं सांगू इच्छिते की सर्व मुंबईकरांनो आम्ही सगळे पुणेकर अगदी तुमच्या पाठीशी उभे आहोत."

अरे! कोण भेकड? २५-३० जण येऊन शेकडोंना संपवून जातात ते? जगातल्या दुसऱ्या सर्वोत्तम पोलिस यंत्रणेला आणि सर्वोत्तम सैन्याला गुंगारा देत २-२ दिवस जेरीस आणतात ते? पोलिसांचीच वाहनं पळवून चौखूर उधळतात आणि मुंबईबाहेरच्यांच्या उरात धडकी भरवतात ते? वारंवार देशाच्या तळागाळात कुठेही कधीही कशीही दहशत पसरवू शकतात ते? हे भेकड आहेत? Come on, get real folks!

"हे भेकड आहेत, यांना समोरासमोर लढायची भीती वाटते" वगैरे भाकडकथांनी किती दिवस आपण आपलं समाधान करून घेणार आहोत? ते नियोजनबद्ध हल्ले करतात. ते त्यांचं मिशन पूर्ण करतात. आणि आपण अगदी मनापासून निषेध करतो. करायलाच हवा हो, त्यात दुमत नाही पण प्रतिक्रिया व्यक्त करताना अवेळी अशी भयंकर विनोदनिर्मिती कशाला पाहिजे?

पुण्यात अफवा पसरू नयेत, दक्षता राहावी म्हणून पुण्यात समस्या नाही हे सांगणे काही चूक नाही. पण ते सांगताना सुटकेचा निःश्वास आणि पुण्यात असलं काही नाही होत कधी अशी प्रौढी आवाजातून/टोनमधून जाणवू नये एवढी मफक अपेक्षा आहे.

राजलक्ष्मी भोसल्यांची ती प्रतिक्रिया ऐकून चीड आली.  एक प्रसंग आठवला. दोन वर्षांपूवी ११ जुलैला जेव्हा मुंबईच्या लोकल गाड्यांत बाँब स्फोट झाले तेव्हा पण पुण्यातून अशीच काहीशी गुळमुळीत प्रतिक्रिया व्यक्त झाली होती. तेव्हा सात्त्विक संताप येऊन माझा एक मित्र म्हणाला होता- अरे पाहिजे कोणाला यांचा पाठिंबा? तिथे तीन तासांत मुंबई सावरली पण...... (मुंबईचं सावरणं हा एका स्वतंत्र चर्चेचा विषय आहे. त्यात इथे शिरत नाही!)

पण आज मात्र मुंबईला सावरायला वेळ लागणार आहे, तिला पाठिंब्याची गरजही आहे कदाचित पण पाठिंबा देणारेच जर फक्त स्वतःवर खूष असतील, भ्रमाच्या दुनियेत जगत असतील, आपण अमर असल्याच्या गोड समजुतीत असतील, हल्लखोरांना भेकड म्हणून स्वतःचा भेकडपणा लपवत असतील तर आजही मुंबई तेच म्हणेल कदाचित- अरे, पाहिजे कोणाला यांचा पाठिंबा?

(काही भाग वगळला. : प्रशासक)