निमित्त ८ मार्च ..........

( मार्च महिन्यातील ८ तारखेला विशिष्ट महत्त्व प्राप्त झाले आहे. ८ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून मानला जातो. अर्थात ३ऱ्या जगातील देशातील महिलांना त्याची माहिती आणि महती किती असेल हा एक प्रश्नच आहे. पण आता वर्षातील ३६५ दिवसां मधील एक दिवस महिलांना देण्यात आला आहे.            
भारताचाच नाही तर जगातील प्रगत अशा युरोपियन देशांचा किंवा अमेरिकेचा  इतिहास पाहिला तर सगळीकडे महिलांना नेहमीच दुय्यम स्थान दिले गेले आहे. त्यांना आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी खूप मोठा लढा द्यायला लागलेला दिसतो... अर्थात त्याला काही अपवाद आहेत. पण ते फक्त नियम सिद्ध करण्यापुरतेच..
तर या जागतिक महिला दिना निमित्त.... )

निळ्याभोर आकाशात चमचमणारी एकच चांदणी.. माझी नजर तिच्यावरून बाजूला होत नही. विश्वाच्या या प्रचंड पसाऱ्यात कशी राहिली ही एकटी? आणि नुसतीच राहिली नाही तर दिमाखाने चकतेय ती...... तिच्याकडे पाहताना अनेक विचार मनात येत आहेत.

माझा भारत देश --- त्याच्या महान संस्कृतीचे जगभरात गोडवे गायले जातात. आज या देशाच्या सर्वोच्च पदावर एक महिला विराजमान आहे. देशाची सत्ता ज्या पक्षाच्या हातात आहे त्या पक्षाची सर्वेसर्वा एक स्त्री आहे. पण तरीही.....

आपला समाज म्हणे प्रगती करतो आहे.   प्रगती म्हणजे काय? आधुनिक तंत्रज्ञान? निरनिराळ्या उत्पादनांनी भरून वाहणाऱ्या बाजारपेठा?, प्रगत वैद्यकीय ज्ञान? का संचार साधनांमुळे जवळ आलेले जग?.. हा आणि एव्हढाच अर्थ आहे का प्रगतीचा?
ही तर फक्त भौतिक प्रगती झाली. पण समाजाची मानसिकता कुठे प्रगत झाली आहे? त्यात कुठे बदल झाला आहे?   अजूनही रुपकॅवर सारख्या कोवळ्या मुली सती जातातच. अजूनही रोज किती बायकांचे पदर पेटतात आणि किती मुली शाळेचा रस्ता सोडून चुलीसमोर बसतात? अजूनही मुलगी झाली तर तीच्या जन्मदात्रीला अपराधी वाटत आणि मुलगा होण्यासाठी नवस बोलले जातात.

अर्थात याला काही तेजस्वी स्त्रिया अपवाद आहेत.. इंदिरा गांधी, किरण बेदी, कल्पना चावला... या स्त्रियांनी आपल्या कर्तृत्वाने दाखवून दिले की बुद्धिमत्ता, साहस ही काही फक्त पुरुषांचीच मक्तेदारी नाहीये. पण दुर्दैवाने अशा स्त्रिया फक्त अपवादच आहेत. नाहीतर या २१ व्या शतकात सुद्धा तस्लिमा नसरीन सारख्या लेखिकेला लपत-छपत फिरायला का लागतं आहे? तिचा अपराध काय.. तर एक स्त्री असूनही तिने अन्याय्य समाजपद्धती बद्दल लिहिण्याचे धाडस केले. भारतासारख्या प्रगतिशील देशात सुद्धा तिला मोठ्या मुश्किलीने आश्रय मिळतो.. आणी तोंड बंद ठेवलं तरच या देशात राहता येईल नाहीतर जगात कुठेही जा असे सांगण्याची वेळ भारत सरकारवर येते... असं का व्हावं? मग कसली प्रगती झाली आपली?

या प्रश्नाला खरोखरच अजूनही उत्तर नाही. हे असच चालणार असं सगळ्यांबरोबर आपणही म्हणायचं.

माणूस निसर्गाकडून काहीच का शिकत नाही? ती चमचमणारी चांदणी अवकाशात एकटी राहू शकते, घार आपल्या पंखांच्या बळावर आकाशात भरारी घेते. मग आपल्यालाच हे का रुचत नाही? का बाईने नेहमी घरालाच महत्त्व द्यायचं? कदाचित तो तिचा नैसर्गिक स्वभाव आहे म्हणून असेलही.. पण तिच्या या स्वभावाचा गैरफायदा घेऊन अनेक स्त्रियांचे कर्तृत्वाचे पंख छाटले गेले आहेत. किती सौदामिनी आकाशात न तळपताच जमिनीवर शिला होऊन पडल्या आहेत.... आपण जन्माला आलो याची खंत करत, आणि मनोमन म्हणताहेत... " अगले जनम में बिटीयॉ न की जो --- "

निसर्गाने स्त्री पुरुष यांत भेद केला, पण ती सृजनाची गरज म्हणून. त्याने दोघांनाही एकमेकांना पूरक बनवले. प्रकृती आणि पुरुष -- एकमेकांशिवाय दोघही अपूर्ण आहेत. यात श्रेष्ठत्वाचा विचारच नाही.   निसर्गाने पुरुषाला रक्षणकर्त्याची भूमिका दिली. म्हणून कणखरपणा दिला. तर स्त्रीला सृजनाची शक्ती दिली, संगोपन आणि संवर्धनाचे काम दिलं --- म्हणून कोमलता दिली मातृत्वाचं वरदान दिलं. एक संवेदनाशील मन दिलं, बुद्धी दिली.

मग तिचं मन आणि बुद्धी दुर्लक्षित का राहिली? शरीरालाच एव्हढं महत्त्व का आलं? जे सहज आणि सुंदर आहे, अशा मातृत्वाचे देव्हारे का माजवले गेले? स्त्रीच्या निष्ठेचा उपयोग.. तिलाच गुलाम करण्यासाठी का केला गेला?

फार फार वर्षांपूर्वी स्त्रीला पुरुषाच्या बरोबरीचा दर्जा होता. त्या काळातील स्त्री विद्वान होती, युद्धकुशल, राजकारणपटू होती. अनेक कला आणि विद्या ती मध्ये सामावलेल्या होत्या. मग हळू हळू हे बदललं. का आणि कसं माहिती नाही, पण स्त्री ला दुय्यम दर्जा प्राप्त झाला. एक उपभोगाचं साधन या पलीकडे तिची किंमत राहिली नाही. प्रत्येक संघर्षाच्यावेळी स्त्री पणाला लावली गेली. तिच्या भावना, तिचे विचार याला महत्त्व द्यावं असं कोणाला वाटलंच नाही.

सीतेचे स्वयंवर केले गेले.   ती रामाच्या मागून वनवासात गेली. तिथे सुद्धा रामावर सूड उगवण्याचे साधन म्हणून रावणाने तिचे अपहरण केले. रावणाचा वध करून तिला सोडवल्यावर राम म्हणतो.. " आता तू कुठेही जा, तू परघरी इतके दिवस राहिलीस, म्हणून मी तुझा स्वीकार करणार नाही. " स्वीकार..... "  हा शब्दच कसा काळजाला घरं पाडणारा आहे , नाही का? सीतेच्या  त्यागाची हीच किंमत झाली. नंतर सुद्धा तिची अब्रू पुनः पुन्हा जगासमोर मांडली गेली..

द्रौपदी तर पाच भावात वाटली गेली. तिला एखाद्या वस्तू सारखी पणाला लावली, आणि दोन राजांच्या आपापसातील कलहात तिच्या वस्त्राला हात घातला गेला. केव्हढा हा पुरुषी उद्दामपणा? की अहंकार?

प्रत्येक पिढीतील स्त्री आपल्या दुर्दैवाचा वसा पुढच्या पिढीला देत गेली. मग कितीतरी कथा... किती इतिहास घडले?
महाराणी पद्मिनी बरोबर हजारो रजपूत स्त्रियांनी जोहार केले, मुगल बादशहांच्या अनेक शहजाद्या जनानखान्यात उसासे सोडत कबरीआड गेल्या. डॉ. आनंदीबाई जोशी, रमाबाई रानडे, सावित्रीबाई फुले.. इथपर्यंत या सर्व कथा येऊन पोहोचतात, पण अजूनही त्यांचा अंत दिसत नाही. अजूनही रूपकॅवर सती जातातच, अजूनही अनेक शरद सारडा आपल्या पत्नीच्या चितेभोवती दुसऱ्या विवाहाचे फेरे घेतात...........

हे कधी संपणार?   स्त्रीला नेहमी देवी, त्यागमूर्ती इ. विशेषणे दिली जातात, आणि तिच्याकडून तशाच वागणुकीची अपेक्षा केली जाते. पण स्त्री ने सतत त्यागच का करायचा? आपल्या इच्छा, आकांक्षांना   बळी का द्यायचे? स्त्री ला एक माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नाहीच का? जो पर्यंत ती समाजपुरुषाच्या अपेक्षांनुसार वागते तो पर्यंत ती देवी... आणि त्या विरुद्ध जाऊन जर तिने स्वतःच्या इच्छेनुसार आयुष्य जगण्याचा प्रयत्न केला तर ती व्यभिचारी, कुलटा इ. ठरवली जावी? स्वैराचार म्हणजे स्वातंत्र्य नाही हे जितकं खरं आहे, तितकंच पुरुषी वर्चस्व मान्य करून (न पटणारी ) सामाजिक बंधने पाळून जगणे म्हणजेच काही सद्वर्तन नाही.

घरातली मोलकरीण कधी सांगते.. नवऱ्याने मारले म्हणून, आपण तिला सहानुभूतीचे काही शब्द ऐकवतो, आपल्या घरी बसून तिची कर्मकहाणी सांगायला आणि रडायला थोडा वेळ देतो.. बस्स.. इतकंच. एखादी बाई एकटी राहत असेल तर अनेक नजरा तिच्यावर रोखल्या जातात, शंका-कुशंकांचे बाण तिला घायाळ करतात... आणि हे सगळं करण्यात आपण बायका सुद्धा सामील असतो.

मग भौतिक प्रगती बरोबरच समाजाची मानसिकता कुठे प्रगत झाली ?  हे असच चालणार म्हणून  सहजपणे आपण ते स्वीकारतो.. त्याचं आपल्याला वैषम्य वाटत नाही. आपल्या वैयक्तिक आयुष्यातील बेरीज, वजाबाकी करताना या प्रश्नाची उकल करायला वेळच राहत नाही का आपल्याला?

पिढ्या न पिढ्या हेच चालत आलं आहे. समाजात काय चांगलं काय वाईट, काय चूक अन काय बरोबर हे अजूनही परंपरा, संस्कृती इ. प्रमाणेच ठरवले जाते. ज्या रुढी, परंपरा आहेत त्याला आधुनिक समाजातील वैचारिक, वैज्ञानिक निकष लावले जात नाहीत. स्त्रिया शिकल्या, मिळवत्या झाल्या तरीही त्यांची मानसिक गुलामगिरी संपलेली नाही. आणि जो पर्यंत ही मानसिक गुलामगिरी संपत नाही तो पर्यंत हे भयचक्र असच फिरत राहणार..

या चक्राला  रोखण्यासाठी फार मोठ्या हिमतीची जरुरी असते. काही जणींकडे ती असते. अशा स्त्रिया आपली सारी ताकद एकवटून या चक्राची गती रोखतात. मग त्यातूनच एखादी मेधा पाटकर होते, एखादी लता मंगेशकर होते. ज्या आपल्या तेजाने चमकतात. त्यांच्या अस्तित्वाने सारा आसमंत झळाळून जातो.

अशा कितीतरी तेजस्वींनी आहेत. अनुताई वाघ, मीरा बोरवणकर, सुनीता विल्यम्स. या सगळ्या बाई 'माणूस' म्हणून जगल्या/ जगत आहेत. त्यांनी आपल्या उदाहरणांनी जगाला दाखवून दिले की स्त्री ही फक्त मोहिनीच नाही, तर ती सरस्वती आहे, लक्ष्मी आहे, आणि प्रसंगी दुर्गा सुद्धा आहे.