मी शिवाजीराजे भोसले बोलतोय ... माझी मते व आपल्या मतप्रदर्शनाची विनंती.

मागील याच विषयावरील चर्चाप्रस्तावावर मत देताना मी हा चित्रपट पाहिलेला नव्हता. काल पाहिला म्हणून फ्रेश मते मांडत आहे.

 चित्रपटात खालील गोष्टी प्रामुख्याने दाखवल्या आहेत.

* मराठी म्हणून निर्मात्याने नाकारलेल्या आपल्या मुलीला त्याच चित्रपटात काम मिळवून देण्यासाठी निर्मात्याला फक्त मुस्काट फोडण्याची धमकी देणे.

* डोनेशन मागणाऱ्या आपल्या पुर्वाश्रमीच्या मित्राला ( जो आता राजकीय नेता असून कॉलेज काढून शिक्षणाचा बाजार मांडून बसला आहे ) 'आपल्या गुणवान मुलाला पैशासाठी प्रवेश नाकारल्याने' त्यचे राजकीय भवितव्य 'मोबाईल'वर त्याच्या बोलण्याचे रेकॉर्डिंग करून धोक्यात आणणे

* पोलीस चौकीत जाऊन एका अधिक्षकाची कान उघाडणी करणे व त्यावेळेस पत्रकार शूटिंग घेत आहेत म्हणून त्या अधिक्षकाने स्वस्थ बसून राहणे

* महापालिकेच्या दोन अधिकाऱ्यांचा त्यांच्याच कार्यालयात जाऊन नुसता पाण उतारा करणे व त्यांनी त्यातून आमुलाग्र बदलणे व सभ्य होणे

* गुंड घरी आला असता महाराजांच्या सहाय्यकाने मागून टप्पल मारणे व तो अदृश्य असल्याने गुंड काहीही करू न शकणे

* महाराजांनी थेट रायगडावरून मुंबईत येऊन नायकाच्या मुलाला अपघात घडवून आणण्याच्या प्रयत्नात गुंड असताना ट्रक पासून मुलाला वाचवणे

* गोसालिया या बिल्डरने प्राणघातक हल्ला केल्यावर त्याच्यावर भवानी तलवारीने वार करणे.

* नुसत्या वक्तृत्वावर अनेक लोकांना आमुलाग्र बदलवणे व सभ्य नागरिक किंवा मराठीचा अभिमान असणारे बनवणे.

या सर्व प्रसंगात 'चित्रपट' असल्याने येणारी एक महत्त्वाची काल्पनिकता ही की 'श्री शिवाजी महाराजांचे अस्तित्व'! पण ती समजण्यासारखी आहे कारण चित्रपटाचा विषयच तो आहे.

पण हे कसे पटू शकेल की नुसत्या 'बोलण्याने' काही माणसे बदलली? हे कसे पटू शकेल की पोलीस चौकीत पोलीसाने पाण उतारा सहन केला? हे कसे पटू शकेल की जिथे डोनेशन मागतात त्या कार्यालयात मोबाईलसकट प्रवेश मिळाला? हे कसे पटू शकेल की नुसता मराठी असण्याचा अभिमान बाळगल्याने व तो समर्थपणे प्रदर्शित केल्याने काही लोक प्रचंड घाबरले व नतमस्तक झाले?

तर्कशास्त्राप्रमाणे ज्या गोष्टी माणूस प्रत्यक्षात करूच शकणार नाही त्या करून या चित्रपटातील नायक सर्व लढाया जिंकला आहे.

हे दाखवणे म्हणजे फक्त करमणुक आहे असे माझे म्हणणे आहे. त्यातील संदेश व्यवहारी मार्गाने पोचवलेला दिसत नाही.

'मराठी असण्याचा अभिमान नष्ट झाला असेल तर त्याची पुनः प्रतिष्ठापना करणे योग्य आहे हे मला मान्यच आहे'! पण, जो मार्ग चित्रपटात दाखवला आहे, एक तर तो बाणता येणार नाही व तसे करायला गेलोच तर आपल्यालाच प्रॉब्लेम्स येऊ शकतील.

बाकीः महेश मांजरेकर महाराजांच्या भूमिकेत अगदीच फिक्का पडला आहे.

माझ्यामते भरकटलेले दिग्दर्शन हे या चित्रपटाला भोवले आहे. फक्त इतकेच, की ज्वलंत विषयावर चित्रपट असल्याने तो चालणार यात वादच नाही.