तिला सगळे माहीत होते

मी लहान असताना माझ्या बाबांनी आमच्या घरात टेलिफोन आणला. आमच्या आळीत आलेला तो पहिलाच टेलिफोन होय. मला अजूनही भिंतीवर लटकवलेले ते सुरेखसे चकाकणारे टेलिफोनचे यंत्र आठवते. एक लखलखीत झळाळता रिसीव्हर त्या चौकोनी यंत्राशेजारी लटकत असे. मी इतका लहान होतो की माझा हातच तिथपर्यंत पोहोचत नसे. पण मी आई त्यात बोलत असताना भारावल्यासारखा ऐकत असे.

एके दिवशी मला अनपेक्षितपणे शोध लागला - की त्या अद्भूत यंत्रात कोणीतरी एक आश्चर्यजनक व्यक्ती राहते. तिचे नाव होते "माहिती द्या" आणि तिला माहित नव्हते असे ह्या जगात काहीच नव्हते. ती कोणाचाही फोन नंबर देऊ शकत असे आणि कधीही बिनचुक वेळ सांगू शकत असे.

एकदा माझी आई शेजाऱ्यांकडे गेली असता अचानकपणे माझा संबंध ह्या जादुच्या दिव्यातील परीशी आला. तळघरात हत्यारांशी खेळताना चुकून माझ्या बोटावर माझ्याच हातून हातोडी बसली. खरेतर वेदनेने अगदी कळवळायला झाले पण रडत बसण्यात काहीच अर्थ नव्हता कारण माझे डोळे पुसायला (सांत्वन करायला) घरात कोणीच नव्हते.

माझे ठुसठुसणारे, दुखरे बोट चोखत घरभर फिरताना अखेर मी जिन्यापाशी - टेलिफोनपाशी आलो!

मी तडक देवघरातील चौरंग आणायला धावलो आणि तो चौरंग ढकलत टेलिफोनखाली आणला. त्यावर चढून मी रिसीव्हर काढला व कानाला लावत म्हणालो, "माहिती द्या".     
         
एक दोन बटने दाबली गेल्याचा आवाज आला आणि एक किनरा पण सुस्पष्ट आवाज ऐकू आला, "माहिती घ्या".

"माझे बोट दुखत आहे" - मी हुंदके देत म्हणालो. ऐकणारे कोणीतरी असल्यामुळे डोळ्यातून लगेच अश्रू बाहेर पडायला लागले.

"तुझी आई घरात नाही का? " प्रश्न आला.

"घरात मी एकटाच आहे", मी रुद्ध कंठाने म्हणालो.

"बोटातून रक्त येत आहे का? "

"नाही", मी उत्तरलो, "माझ्या बोटावर चुकून हातोडी बसली आणि आता खूप दुखत आहे. "

"तू फ्रिझ उघडून बर्फ काढू शकतोस का? ", तिने विचारले.

"हो"

"मग एक बर्फाचा तुकडा त्या दुखऱ्या बोटावर दाबून ठेव",   ती म्हणाली.

त्यानंतर मी नेहेमीच सगळ्या काही गोष्टींसाठी "माहिती द्या" ला फोन करायला लागलो. मी तिला भूगोलाविषयी विचारले आणि तिने मला अरुणाचल कुठे आहे ते सांगितले, मी तिला गणिताविषयी विचारले. तिने मला मी नुकतीच बागेत पकडलेली खार फळे आणि शेंगदाणे खाते हे पण सांगितले.

मग एके दिवशी माझी आवडती पाळीव मैना गेली. मी "माहिती द्या" ला फोन करून ही दु:खद गोष्ट सांगितली. तिने ती गोष्ट शांतपणे संपूर्ण ऐकली व मोठी माणसे लहान मुलाची समजुत घालण्यासाठी जे काही बोलतात त्या पद्धतीचे ती बरेच काहीतरी म्हणाली.

पण माझे समाधान काही होईना.   'त्या सुस्वर आणि आमच्या सर्व कुटुंबाला आनंद देणाऱ्या आकर्षक पक्षिणीचा असा दु:खद अंत का व्हावा? का तिने असे पिसे झडलेल्या अवस्थेत पाय वर करून पडावे? '
 
तिला माझ्या दु:खाचे गांभीर्य जाणवले असावे.   ती पटकन म्हणाली, "पिंटू, लक्षात ठेव,   इतरही अनेक जगे आहेत जिथे गाणे म्हणण्याची आवश्यकता आहे". मला आत कुठेतरी बरे वाटले.

नंतर एकदा मी फोन उचलून म्हणालो, "माहिती द्या" आणि आता तो ओळखीचा झालेला आवाज म्हणाला, "माहिती घ्या".

मी विचारले, "स्टेशन शब्द इंग्रजीत कसा लिहायचा? ".

हे सर्व घडले भारताच्या पूर्वेला एका छोट्याश्या शहरात. मग मी ९ वर्षांचा असताना आम्ही सुरतेला राहायला गेलो. मी
खरोखरच माझ्या प्रिय मैत्रिणीला मुकलो.

"माहिती द्या" केवळ त्याच जुन्या टेलिफोन यंत्रात राहात होती. सुरतेत आल्यावर कधीही चुकूनसुद्धा माझ्या मनात आमच्या दिवाणखान्यातील टेबलावर विराजमान झालेल्या नव्या टेलिफोनचा वापर करावा असे आले नाही.
                 
पुढे जरी मी तारुण्यात प्रवेश केला तरीही मी त्या सुखद संवादाच्या मोहक आठवणी कधीही विसरू शकलो नाही. गोंधळलेल्या आणि शंकाकुल मनस्थितीत नेहेमी मला त्या प्रसन्न सुरक्षित करणाऱ्या संभाषणाची आठवण येत असे. मला आता जाणवत होते की एखाद्या लहान मुलाच्या निरागस पण बालिश शंकांना उत्तरे देण्यासाठी वेळ देताना ती किती संयत, समजुतदार आणि प्रेमळ असणे गरजेचे होते ते.

नंतर काही वर्षांनी गुवाहाटीला उच्च शिक्षणासाठी जाताना मला कोलकत्याच्या विमानतळावर १५-२० मिनिटे थांबण्याची वेळ आली. मग मी सध्या तिथे राहात असलेल्या माझ्या बहिणीशी गप्पा मारल्या आणि तो फोन संपल्यावर नकळत पुन्हा फोन उचलून विचार न करता सहज म्हणालो, "माहिती द्या".  

१-२ दा बटणे दाबली गेल्याचा आवाज आला आणि चमत्कार घडला, मी तोच ओळखीचा किनरा पण सुस्पष्ट आवाज पुन्हा ऐकला - "माहिती घ्या". मी काही ठरवले नव्हते पण सहज माझ्या तोंडून शब्द बाहेर पडले, "स्टेशन शब्द इंग्रजीत कसा लिहायचा?".

२ मिनिटे नि:शब्द शांततेत गेले आणि मृदू आवाजात उत्तर ऐकू आले, "एव्हाना तुझे दुखरे बोट बरे झाले असेल ना... "

मला हसू फुटले. "म्हणजे ती तूच आहेस अजूनही", मी म्हणालो, "तुला काही कल्पना आहे का तुझे माझ्याशी बोलणे हे त्या काळात माझ्यासाठी किती महत्त्वाचे होते ते? " 

"तुला काही कल्पना आहे का? " ती म्हणाली, "तुझे माझ्याशी बोलणे हे त्या काळात माझ्यासाठी किती खास होते ते? मला कधीच मुलबाळ झाले नाही. मी आतुरतेने तुझ्या फोनची वाट पाहात असे. " मी तिला सांगितले की कशी वारंवार मला तिची आठवण येत असे आणि मी तिला गहिवरून विचारले की परत कोलकत्याला येईन तेव्हा मी तिला फोन करू शकतो का?

ती म्हणाली, "जरूर कर आणि मी नसले तर सरोजिनी आहे का ते विचार".   नंतर ३ महिन्यांनी मी काही कामानिमित्त कोलकत्याला परत आलो, ह्या वेळी एक वेगळाच आवाज माहिती देण्यासाठी पुढे आला. मी सरोजिनी आहे का असे विचारले.

"तू तिचा मित्र आहेस का? "

"हो, अगदी जुना मित्र".

"मला सांगायला वाईट वाटते पण सरोजिनी गेले काही महिने आजारपणामुळे आमच्याकडे अर्धवेळ नोकरी करीत होती. ती गेल्या महिन्यात वारली".

मी फोन ठेवणारच होतो पण तो आवाज म्हणाला, "एक मिनिट, तुझे नाव पिंटू आहे का? " मी हो म्हटले.

"असे असेल तर तुझ्यासाठी एक निरोप आहे. सरोजिनीने तो लिहून ठेवला आहे. मी वाचून दाखवते - त्याला सांगा, पिंटू, लक्षात ठेव, इतरही अनेक जगे आहेत जिथे गाणे म्हणण्याची आवश्यकता आहे. मला काय म्हणायचे ते त्याला नक्की कळेल".

मी तिचे आभार मानून फोन ठेवला. मला नक्कीच माहित होते की सरोजिनीला काय म्हणायचे होते ते.     


मी जरी अनुवाद क्षेत्राशी संबंधित असले तरी आता पावेतो कधीही मराठी ललित साहित्याचा अनुवाद केलेला नव्हता.
मात्र आज एक प्रयोग म्हणून एक अग्रप्रेषित हृद्य लघुकथा अनुवादित करत आहे. हा अनुवाद करताना थोडेसे
स्थानिकीकरणाचे स्वातंत्र्य सुद्धा घेतले आहे. मूळ कथा दुवा क्र. १ इथे वाचता येईल. आपल्यापैकी कोणालाही जमले
तर मी दिलेली कथा शब्दरचना, विशेषनामे आपल्या कल्पनेप्रमाणे, आवडीप्रमाणे बदलून इथे प्रतिसादात संपूर्ण घालावी
व चांगला अनुवाद कसा करता येईल ह्याचा वस्तुपाठ घालून द्यावा ही विनंती.