४४. (दोन) : साधक, साधना आणि साध्य!

साधना निवडीचा पर्याय हा व्यक्तिगत चॉइस आहे आणि ते तुमचं स्वातंत्र्य आहे. एखाद्या गायकानं अभिव्यक्तीसाठी एखादं घराणं निवडावं किंवा एखाद्या चित्रकारानं स्वत:ला एक्सप्रेस करायला एखादी स्टाइल निवडावी तशी ती हृद्य प्रक्रिया आहे.

नामस्मरण या सकृद्दर्शनी सोप्या वाटणाऱ्या प्रक्रिये विषयी इथे लिहावंस वाटतंय.
____________________________________

आपलं मन ही रेकॉर्डिंग आणि आयडेंटिफिकेशन करणारी प्रोसेस आहे, म्हणजे मनामुळे आपण विविध घटना, वस्तू, प्रक्रिया, व्यक्ती वगैरे लक्षात ठेवून त्यांचं पुन्हा रिट्रायवल करू शकतो. ही प्रोसेस जगायला अत्यंत उपयोगी आहे आणि मानवाकडे सर्वात प्रगल्भ मन किंवा रेकॉर्डिंग सिस्टम आहे.

पण मानवी मन अनकंट्रोल्ड झालंय हा मानवी जीवनातला सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे म्हणजे मनाची प्रक्रिया अनैच्छिक झालीये. तुम्हाला हवं असो की नसो ती प्रक्रिया प्रत्येक स्टिम्युलंटनी असंख्य स्मृती किंवा रेकॉर्डिंग्ज सुरू करते आणि ती प्रक्रिया इतकी अनिर्बंध झालीये की तिनी सर्व जीवनावर नियंत्रण मिळवलंय.

उदाहरणार्थ, घड्याळ दिसायचा अवकाश की किती वाजलेत, मग आता काय करायला हवं, बापरे! इतका वेळ गेला किंवा अजून झोप कशी आली नाही, आता उठायला हवं, आता जेवायला हवं किंवा तत्सम विचार आणि लगोलग शारीरिक हालचाली सुरू होतात. वेळ हा भास आहे हे आपण विसरूनच जातो आणि जाणीवेकडे दुर्लक्ष करून, म्हणजे शारीरिक हालचाल (विहार किंवा व्यायाम) करावा अशी सूक्ष्म जाणीव होत असून देखील आपण जेवायला बसतो!

अध्यात्मात मनाच्या नियंत्रणातून मुक्त होणं हे प्रार्थमिक मानलं गेलंय. आता बोधाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर मनाचं नियंत्रण हे विविध धारणांमुळे आहे, म्हणजे वेळ वास्तव आहे या धारणेमुळे जाणीवेकडे दुर्लक्ष होऊन किती वाजले हे मानसिक इंटरप्रिटेशन आपण काय करणार याचं निर्णायक होतं.

जात, पत्रिका, कुंडली या मानसिक कल्पनांमुळे विवाह, व्यक्तीची पारख, पारस्परिक अनुकूलता आणि एकमेकातलं आकर्षण या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी ऐवजी भलत्याच निकषांना प्राधान्य देऊन होतो आणि मग सहजीवनातली मजाच संपून जाते.

आता बोध असेल तर विवाहा सारखा दूरगामी परिणाम करणारा निर्णय संपूर्ण व्यक्तीगत जवाबदारी घेऊन आणि सहजीवनाला पूरक असणाऱ्या गोष्टी लक्षात घेऊन घेता येतो.

अशा तऱ्हेनं मनाच्या अनिर्बंध प्रक्रियेतून सुटका आपल्याला वस्तुनिष्ठ बनवते, आपण वर्तमानात राहून अत्यंत समर्थपणे प्रसंग किंवा परिस्थिती हाताळू शकतो म्हणून अध्यात्मात मनाच्या नियंत्रणातून मुक्त होणं अगत्याचं मानलं गेलंय. कृष्णमूर्ती म्हणतात त्याप्रमाणे आपण ‘दॅट वीच इज’ या फॅक्च्युअल स्टेटला येऊ शकतो किंवा ओशो म्हणतात तसे ‘हिअर अँड नाऊ’ मध्ये येऊ शकतो.
_____________________________________

तर या मानसिक बंधनातून किंवा अनैच्छिक मानसिक प्रक्रियेतून मुक्ती साठी मन एकाच दिशेनं नेणं, त्याचं इंटररिलेटेड कोऑर्डिनेशन असलेल्या स्मृती प्रवाहातून स्वैर भ्रमण थांबवणं यासाठी साधकाला नामस्मरण ही प्रक्रिया सांगितली जाते. म्हणजे तुमचं मन एकच प्रक्रिया ऐच्छिकपणे प्रदीर्घ कालावधीसाठी करू शकेल अशी अपेक्षा असते.

पण नामस्मरण ही इतकी ढोबळ प्रक्रिया आहे की गाडी चालवताना जसं आपण एकीकडे गाडी चालवतोय आणि दुसरीकडे विचार करतोय असं लीलया करू शकतो तशी परिस्थिती सहज निर्माण होते आणि त्या प्रक्रियेचा काहीही उपयोग होत नाही.

त्यात एखाद्यानं फारच मनावर घेऊन एकाजागी बसून अत्यंत परिश्रमपूर्वक नामसाधना प्रलंबित काळ केली तर पुनरुक्ती आणि मोनोटोनीनी त्याचा मेंदू बधिर होऊन त्याला वेगवेगळे भास व्हायला लागतात. म्हणजे ‘दॅट वीच इज’ या फॅक्चुअल रियालिटीला येण्या ऐवजी तो एका भ्रामक विश्वात जायला लागतो, त्याला जे नाही ते दिसायला लागतं आणि काहीबाही ऐकू यायला लागतं!

त्यामुळे साधना निवडताना सजग राहणं अनिवार्य आहे.

______________________________________

आता, मन म्हणजे अनिर्बंध चालू असलेला दृकश्राव्यपट आहे आणि त्याचं कौशल्य म्हणजे तुमची इच्छा असो नसो तो तुमचं लक्ष वेधून घेतोयं. हे सतत मनाचं व्यवधान आपल्याला जराशी सुद्धा उसंत मिळू देत नाही.

 सर्व आध्यात्मिक साधना (ध्यानाचे सर्व प्रकार), आपलं लक्ष पुन्हा स्वतःकडे वळवायच्या विविध प्रक्रिया आहेत. हे लक्ष पुन्हा स्वतःकडे वळवण्याची सर्वात सोपी पद्धत म्हणजे स्वतःचं स्मरण!  सेल्फ रिमेंबरींग.

आपण स्थिर आहोत आणि मन किंवा हा दृकश्राव्य सतत चलायमान आहे हा अत्यंत महत्त्वाचा फरक लक्षात आला की ही प्रक्रिया एकदम सोपी, सहज आणि तत्काळ अनुभव देणारी आहे.  

_____________________________

बोधाच्या दृष्टीनं बघितलं तर स्पेस किंवा शून्य हे सर्वव्यापी आहे आणि ती निर्विवाद वस्तुस्थिती आहे. स्पेस नाही अशी कोणतीही जागा नाही किंवा प्रत्येक आकाराच्या आत-बाहेर स्पेस आहेच.

ही स्पेस किंवा शून्य अंतिम आहे कारण आकारांचं प्रकटीकरण, अस्तित्व आणि विघटन यानी ती अनाबाधित राहते.

सत्य शोधणं म्हणजे प्रथम या स्पेस, व्हॉईड, निराकार किंवा शून्याची दखल घेणं आणि मग ती स्पेस किंवा तो निराकार हेच आपलं देखील मूळ स्वरूप आहे हे जाणणं आहे.

बोधाच्या दृष्टीनं ही स्पेस इतकी शाश्वत आहे की आपण जरी तिला आपलं स्वरूप मानत नसलो तरी त्यामुळे तिच्या शाश्वततेवर कोणताही परिणाम होत नाही आणि  ही अगदी गोष्ट उघड आहे.

त्यामुळे बोध किंवा सांख्ययोग म्हणतो की या स्पेसची निव्वळ दखल, केवळ स्मरण तुम्हाला स्वस्थ करेल! आपणही शाश्वत आहोत याची प्रचिती देईल.

कोणत्याही प्रसंगात किंवा परिस्थितीत किंवा अस्वस्थ मन:स्थितीत केवळ या निराकाराच्या असण्याचं स्मरण किंवा स्वत:चं स्मरण तुम्हाला स्वस्थ करेल, मानसिक उहापोहातून मुक्त करेल कारण सरते शेवटी तुम्ही आणि स्पेस एकच आहात!

संजय

जे जगतो तेच लिहितो

सत्य समजणं आणि आपण स्वत:च सत्य आहोत हा बोध होणं यात अंतर नाही

पूर्वप्रकाशन : दुवा क्र. १