स्त्रियांचा पोषाख

    शाळेतील मुलींच्या मिनिस्कर्टस वापरावर ब्रिटनमध्ये बंदी घालण्यात आली अशी बातमी नुकतीच वाचली. याचे कारण सांगताना शाळेच्या व्यवस्थापनाने
मुली मिनिस्कर्टची लांबी योग्य तेवढी ठेवत नाहीत त्यामुळे स्कर्टची लांबी
किती असावी याविषयी शाळेच्या व्यवस्थापनाने दिलेल्या सूचनेप्रमाणे
पालकांनी आपल्या मुलींचे स्कर्ट शिवले तरी शाळेत जाईपर्यंत त्या कमरेपाशी
ते वर खोचून त्यांची लांबी अतिशय कमी करतात आणि त्यामुळे त्यांच्याबरोबरीच्या मुलांचे चित्त विचलित होतेच पण शिक्षकांनाही
शिकवण्यावर लक्ष केंद्रित करणे कठीण जाते, यासाठी स्कर्टवरच बंदी घालून त्यांना पॅंटस घालाण्याची सक्ती करण्यात आली आहे.
     याच प्रकारची बन्दी कामावर जाणाऱ्या स्त्रियांवरही घालण्यात आली आहे ही
गोष्ट फक्त ब्रिटनपुरती मर्यादित नाही तर इटली, रशिया येथेही याच प्रकारचे
आदेश काढण्यात आलेले आहेत असे आंतरजालावर पाहिले असता आढळले.टोरांटो येथील
पोलिस अधिकारी मायकेल संगिनेट्टी याने " आपल्या सुरक्षिततेसाठी
स्त्रियांनी "स्लट"(या शब्दाला योग्य मराठी पर्याय देता येत नाही)सारखे
कपडे घालणे टाळावे.असे उद्गार काढले व त्यावर गदारोळ उठून ठिकठिकाणी अगदी
भारतातही "स्लटवॉक" आयोजित करण्यात आले.
   या घटनामधून दोन प्रकारचे प्रश्न उद्भवतात. एक म्हणजे अशा प्रकारे बंदी
घालणे व्यक्तिस्वातंत्र्याच्या दृष्टीने योग्य आहे काय ? दुसरी गोष्ट
स्त्रियांच्या अशा कपडे वापरण्यामुळेच त्यांच्यावर बलात्कार होतो असे
म्हणता येईल का ? व्यक्तीस्वातंत्र्याचे पुरस्कर्ते यावर निश्चितच गदारोळ उठवणार. तसेच  स्त्रियांनीही आपल्या स्वातंत्र्यावर अशा प्रकारे आरोप करणाऱ्याचा निषेधच जणू स्लटवॉकच्या माध्यमातून नोंदवला आहे.
    पण शेवटी एक प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की आपल्या व्यक्तिस्वातंत्र्याचा आविष्कार करण्यासाठी आखूड कपडे किंवा स्लटसारखे कपडे घालणे हा एकमेव पर्याय स्त्रियांना उपलब्ध आहे काय? व असे कपडे घालणे स्त्रियांनाच एवढे आवश्यक का वाटते?