५५. मी

आत्मविश्वास, अहंकार आणि अभिव्यक्ती हा ट्रायो उलगडून तुमच्यासमोर मांडताना मला अतिशय आनंद होतोय, मनःपूर्वक वाचा.

____________________________________

आपलं व्यक्तिमत्त्व प्रभावी असावं, आपलं वागणं आणि बोलणं आत्मविश्वासपूर्ण असावं ही प्रत्येकाची आस आणि अहंकार या दोन परस्परविरोधी मानसिकतेतला गोंधळ दूर झाला की स्वास्थ्य प्राप्त होतं.

आपण ज्याला ‘मी’ म्हणतो किंवा जो आपल्याला सतत जाणवतो तो निर्वैयक्तिक आणि निराकार ‘मी’, आपल्या सगळ्यांचा एकच आहे ही अत्यंत मूलभूत वस्तुस्थिती आहे.

तुम्ही कुणीही असा, स्त्री-पुरूष, सधन-निर्धन, युवा-जर्जर, सामान्य-असामान्य, यशस्वी-अपयशी; तुमची शारीरिक अवस्था कितीही विकलांग असू द्या, तुमची मानसिक स्थिती कशीही असू द्या, तुम्हाला जो ‘मी’ जाणवतोय तो आपल्या सर्वांचा एकच आहे.

हा ‘मी’ सनातन आहे, म्हणजे कृष्णाचा काय की दुर्योधनाचा काय, की पातंजलीचा काय की तुमचा काय, हा ‘मी’ तेव्हापासून आतापर्यंत जसाच्या तसा आहे, तो सदा सर्वकाल एकच आहे. अस्तित्वाच्या प्रकटीकरणा पासून ते अंतापर्यंत आणि अंता नंतरही तो तसाच राहील. कालातल्या कोणत्याही प्रकटी कारणानं किंवा लयीनं तो अनाबाधित आहे.

हा ‘मी’ शरीरबद्ध वाटण्याच कारण आपण स्वत:ला शरीर समजतो. तो कालबद्ध भासतो त्याचंही कारण आपण स्वत:ला शरीर समजतो आणि त्यामुळे आपल्याला मृत्यू आहे असं वाटतं पण हा ‘मी’ यत्र-तत्र सर्वत्र सारखा आहे, तुम्ही घरी असलात काय, ऑफिसमध्ये असलात काय आणि चंद्रावर जरी गेलात तरी तो तसाच राहील. व्यक्तीला जन्म आणि मृत्यू आहे पण या ‘मी’ ला काहीही होत नाही.

हा ‘मी’ व्यक्तिगत नाही, ती एक ‘स्थिती’ आहे आणि या वस्तुस्थितीचा उलगडा म्हणजे आपण व्यक्ती नसून सत्य आहोत हा बोध आणि अहंकार मुक्ती!
______________________________

आत्मविश्वास आणि अहंकार या दुहीत मानवी मन अनंत कालापासून दोलायमान आहे. आत्मविश्वास ही प्रत्येकाची आंतरिक चाहत आहे कारण आत्मविश्वास असलेली व्यक्ती लौकिक जीवनात यशस्वी होते आणि स्वस्थ वाटते पण आत्मविश्वास दुर्लभ वाटतो; याचं खरं कारण मोठं मजेशीर आहे.

जेव्हा एखाद्या व्यक्तीला कोणत्याही कारणानं समाजमान्यता मिळते किंवा संपन्नता मिळाल्यामुळे तिच्याकडे पाहण्याचा जो सर्वांचा दृष्टिकोन बदलतो त्यामुळे अशी व्यक्ती सर्वांचं अवधान खेचून घेऊ लागते. या अवधानामुळे त्या व्यक्तीला आंतरिक ऊर्जा मिळते आणि ती व्यक्ती ‘निर्वैयक्तिक मी’ च्या स्थिरत्वाप्रत पोहोचते. त्या व्यक्तीचं वागणं, बोलणं, निर्णय सर्वच त्या स्थिरत्वातून येऊ लागतात, अशी व्यक्ती वास्तविकात इतरांच्या ऊर्जेमुळे किंवा अवधानामुळे त्या स्थैर्याला पोहोचलेली असते पण या गोष्टीची त्या व्यक्तीला किंवा इतरांना कल्पनाच नसते.

ट्राय टू अंडरस्टँड धिस, जेव्हा एखादा प्रथितयश गायक, वादक, सिनेकलावंत, राजकीय नेता किंवा एखादी अत्यंत संपन्न हस्ती व्यक्तिसमूहा समोर येते तेव्हा समूहाचं अवधान हीच त्याची शक्ती असते. आपण ती व्यक्ती काय गाणार, वाजवणार, बोलणार, किंवा करणार या विषयी उत्सुक असतो आणि आपली ही उत्सुकता त्या व्यक्तीची जाणीव मेंदूकडून नाभीकडे नेते. ती व्यक्ती त्यामुळे व्यक्तित्वातून मोकळी होऊन स्थितीला येते. त्या व्यक्तीच्या जाणीवेचं हे नाभीकडे वळणं तिला स्थिरत्व देतं, याला इंटिग्रेशन ऑफ कॉन्शसनेस म्हटलंय. या स्थिरत्वामुळे ती व्यक्ती उत्स्फूर्त होते आणि तिचं कौशल्य तिला लीलया साथ द्यायला लागतं, आपल्याला वाटतं ‘याला म्हणतात आत्मविश्वास’!

आपण जेव्हा समूहासमोर जातो तेव्हा नेमकी विरुद्ध स्थिती होते, आपली जाणीव प्रथम समूहाकडे जाते, समूह आपलं ऐकायला उत्सुक आहे म्हटल्यावर आपण बावरून जातो मग आपली जाणीव (नाभीऐवजी) मेंदूकडे वळते त्यामुळे स्मृती तुफानी सक्रिय होते त्यानं व्यक्तिमत्त्वाला उधाण येतं आणि आपल्याला साधं बोलणं, जे आपण एरवी बिनदिक्कत करत असतो ते मुष्किल होतं, शब्द आठवेनासे होतात, त्याचा परिणाम शरीरावर होतो, घसा कोरडा पडतो, शरीराला कंप सुटतो, त्यानं परिस्थिती आणखीनच बिकट होते आणि आपल्या अभिव्यक्तीचा संपूर्ण बाजा वाजतो!  

अगदी अशीच परिस्थिती समूहाचा रिस्पॉन्स मिळाला नाही किंवा मिळेनासा झाला तर प्रथितयश व्यक्तीची होते. जर एखादा नेता प्रचंड मोठ्या फरकानं  हरला, एखाद्या कलावंताचे सिनेमे सतत फ्लॉप व्हायला लागले, एखादी सिनेतारका प्रेक्षकांना मोहवेनाशी झाली, एखादा खेळाडू पुन्हापुन्हा अपयशी व्हायला लागला, एखाद्या गायकाचा गळा त्याला साथ देईनासा झाला (ही शक्यता वादकात कमी असते), की त्या व्यक्तीचा सेल्फ ऍनॅलिसिस सुरू होतो त्यामुळे त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्त्व सक्रिय होतं. ती व्यक्ती स्थितीऐवजी व्यक्तिमत्त्वातून परफॉर्म व्हायला लागते, लोकांना काय आवडेल याचा विचार करायला लागते, तिची सगळी उत्स्फूर्तता हरवून जाते आणि त्या व्यक्तीला वाटतं ‘आपला आत्मविश्वास हरवला’! मग ती व्यक्ती समूहाचं चित्त वेधून घेईनाशी होते आणि आपल्याला वाटतं तिचा तो रुबाब, ते कौशल्य, ती जादू संपली, पण नेमकं काय झालेलं असतं? व्यक्ती तीच असते फक्त समूहाचं अवधान मिळेनासं झालेलं असतं!
___________________________

अध्यात्मात गफलत अशीये की अहंकाराची व्याख्याच नाही आणि अहंकार मुक्तीचा उद्घोष आहे. अहंकार सोडा असं सांगितलंय आणि त्यावर उतारा म्हणून विनम्रता अंगी बाणा असा सल्ला दिलाय. आता खरी परिस्थिती नेमकी उलटी आहे, प्रथितयश माणूस विनम्र असतो कारण आपली सर्व दारोमदार जनमान्यतेवर आहे याची त्याला पूर्ण कल्पना असते, त्याला आतून काहीही वाटो सर्वांसमोर नम्रपणेच वागायला लागतं पण अध्यात्मानं याचा अर्थ असा काढलाय की तुम्ही विनम्र व्हा म्हणजे तुम्हाला सत्य गवसेल. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही आचरणात बदल घडवत गेलात तर दिवसेंदिवस बेगडी होत जाल, तुमचा अंतर्कलह वाढत राहील आणि तुम्हाला स्वरूपाचा उलगडा होणं दुरापास्त होईल.

कुणीही धुरंधर काहीही म्हणो आचरणातला बदल फक्त व्यक्तिमत्त्वाची डागडुजी करतो आणि परिणामी ते सघन करतो, असा बदल व्यक्तिमत्त्वातून सोडवणूक करू शकत नाही कारण तुमच्या जाणीवेचा रोख स्वत:कडून वर्तणुकीकडे वळलेला असतो. आचरण सुधारणेच्या प्रयत्नात जाणीव स्वत:कडे उन्मुख होणं, ती परत तिच्या मूळ निराकार स्थितीला येणं अशक्य होतं.

इट इज द अदर वे, तुम्हाला स्वरूप गवसलं तर तुमचं आचरण आपसूक बदलेल, तुम्ही प्रामाणिक व्हाल, तुमच्या वागण्यात आणि बोलण्यात   एकरूपता येईल, तुम्ही निश्चिंत व्हाल. या निश्चिंततेनं तुम्हाला आत्मविश्वास वाटायला लागेल, तुम्ही स्वच्छंद व्हाल.

या निश्चिंतपणात तुम्ही जाणाल की देह स्त्रीचा लाभणं किंवा पुरुषाचा, संपती किंवा विपत्ती, यौवन किंवा वृद्धत्व, लोकमान्यता किंवा विन्मुखता, यश आणि अपयश, या सर्व प्रासंगिक घटना आहेत त्या अस्तित्वातल्या अक्षरश: अब्जावधी घटकांवर अवलंबून आहेत आणि आपल्या सर्वस्वी आवाक्या बाहेर आहेत.

यशस्वी माणूस स्वतःच्या कष्टाचं कितीही गुणगान करो, तो पोस्ट ऍनॅलिसिस असतो, वास्तविक संपन्नतेसाठी किंवा संपन्नता मिळतेय म्हटल्यावर कष्ट करायला सर्वच राजी असतात पण प्रत्येक जण समृद्ध होत नाही. अभिनेते अनेक आहेत पण केव्हा कोण आणि कशामुळे क्लिक होईल सांगणं मुष्किल आहे, एकदा तो लाईम लाइटमध्ये आला की मग त्याचे सर्व दोष झाकले जातात. प्रत्येक राजकारणी जनतेला स्वप्न दाखवण्यात माहीर असतो पण कुणाच्या कलेला जनता भुलेल हे सांगता येत नाही, एकदा तो पदच्युत झाला की त्याच्या एकेक भानगडी बाहेर यायला लागतात.

थोडक्यात, लोकमान्यतेमुळे किंवा इतरांच्या सपोर्टनं तुमची जाणीव नाभीप्रत येत असेल, तर तुम्ही व्यक्तिमत्त्वातून कधीही मोकळे होऊ शकणार नाही. आहे त्या परिस्थितीत, तुम्हाला कुणीही मानो अगर न मानो, तुम्ही स्वतःप्रत म्हणजे ‘निराकार, निर्वैयक्तिक ‘मी’ प्रत’ येऊ शकलात तर तुम्ही स्वस्थ व्हाल.  

हे जर तुम्हाला कळलं तर त्या बोधासरशी तुम्ही जे प्राप्त आहे त्या प्रती कृतज्ञ व्हाल, तुमची जाणीव जी सदैव कारणमीमांसेत गुंतली होती ती फिरून स्वत:प्रत येईल, मेंदूकडून नाभीकडे येईल. तुम्ही कमालीचे स्वस्थ व्हाल कारण तुमची जाणीव व्यक्तित्वाकडून स्थितीकडे आलेली असेल.

ही स्थिती खरा आत्मविश्वास आहे, तो जनमतावर, यशापयशावर, सांपत्तिक, दैहिक किंवा मानसिक स्थितीवर अवलंबून नाही. या स्थितीतून तुम्ही जे वागाल ते निरहंकारी असेल कारण तुम्ही व्यक्तिमत्त्वाकडून स्थितीकडे आलेले असाल.
____________________________

निराकार आणि निर्वैयक्तिक मी निरालंब आहे, त्याला कोणत्याही सपोर्टची गरज नाही. दुसऱ्याचं अवधान, त्यांची प्रशंसा, आपली सांपत्तिक किंवा शारीरिक स्थिती अथवा अजोड बुद्धिमत्ता या कशावरही ‘मी’ चं असणं अवलंबून नाही. ते सर्वांसाठी सर्वकाल सहज उपलब्ध आहे कारण ते आपलं स्वरूप आहे, आपण त्यापासून वेगळे होऊ शकत नाही.
 
अहंकार ही काही फार मोठी चीज नाही आणि तो दूर करणं सायासपूर्णही नाही, आपण आकार आहोत असं वाटणं म्हणजे अहंकार. ‘लोकलाईज झालेली जाणीव’ म्हणजे अहंकार आणि तिची किमया काय? तर ‘स्थितीला’ किंवा शून्याला आपण व्यक्ती आहोत असा होणारा भास हे कळलं की झाली अहंकार मुक्ती!

संजय

मेल : दुवा क्र. १