अभिनंदन , मी तुझ्यापुढे नतमस्तक आहे.

"मिग २१ "
१९७१ च्या युद्धात गाजलेली ही विमाने. १९७१ च्या अगोदरच्या रशियन तंत्रज्ञानावर आधारित विमाने. अगदीच जुने तंत्रज्ञान. पाकिस्तानच्या एफ्१६ पुढे तर अगदीच खेडवळ.

ही विमाने जलद हालचालींना उपयुक्त असली तरी वारंवार होणारे अपघात व त्यामुळे मृत्युमुखी पडणारे वैमानिक यामुळे "उडत्या शवपेट्या" या नावाने ही विमाने फारच बदनाम झाली असली तरीपण भारताच्या ताफ्यात अजून आहेत. आजही आपण सरावासाठी ही विमाने वापरतो. असो.

अस असताना पाकिस्तानच्या एफ्१६  शी मुकाबला करण्यासाठी आपण ही विमाने का पाठवली? त्याऐवजी आधुनिक अशी सुखोई पाठवली असती तर आपला एक वैमानिक शत्रुराष्ट्राच्या ताब्यात गेला नसता?

सर्वसामान्यांना पडणारा प्रश्न मलाही पडला. पण कुठेतरी हे लिहून पचकण्यापेक्षा आपणच थोडा शोध घ्यावा असे वाटले. त्यातून मिळालेली माहिती खरंच आश्चर्यकारक व अभिमानास्पद वाटली म्हणून इथे लिहीत आहे.

तर झालं अस की, पाकिस्तानच्या ३ हवाईतळावरून दहा एफ्१६ विमाने उडाली. नौशारा भागाकडे त्यांची वाटचाल सुरू झाल्याचे लक्षात आल्यावर आपल्या तेथील ब्रिगेड मुख्यालय व सैन्याच्या तळावर हल्ला करण्याचा त्यांचा बेत उघडकीस आला.

आपल्या सुखोईंनी अवकाशात झेप घेतली. पण त्यांना पोहोचायला थोडा वेळ लागणार होता. तोपर्यंत त्यांना कोणीतरी थोपवायला पाहिजे होते. हाताच्या बोटावर मोजण्याइतकी काही मिनिटे मिळाली तरी चालणार होते.

हल्लेखोर विमाने जिथून भारतीय हद्दीत घुसणार होती तिथून सर्वात जवळ असलेला भारताचा हवाईतळ हा श्रीनगरचा होता आणि तिथे होती चपळ हालचालींसाठी प्रसिद्ध असणारी पण जुन्या तंत्रज्ञानाची मिग२१ विमाने.  पण पाकिस्तानी विमानांचा हल्ला होण्याअगोदर तीच घटनास्थळी पोहोचू शकणार होती.

कोणताच दुसरा पर्याय नसल्याने त्यातील दोन विमानांना पाठवले गेले. 

पाकिस्तानला भारताची ही दुबळी बाजू माहीत असणार. म्हणूनच त्यांनी राजौरी सेक्टर निवडला असणार. याबाबतीत त्यांच्या गुप्तहेरांना मार्क दिलेच पाहिजेत. असो.

एफ्१६ सारख्या आधुनिक विमानांशी लढायला मिग२१ सारखी जुनी विमाने पाठवायची म्हणजे चक्क हाराकिरी असल्याने भारत तसे काही करणार नाही; आणि समजा तरीही भारताने ती पाठवलीच तर त्यांचे वैमानिक जेव्हा एफ्१६ समोर पाहतील तेव्हा पळूनच जातील अस कदाचित पाकिस्तानने गृहीत धरले असावे. 

भारताचे वैमानिकपण असेच करतील असे त्यांना वाटणे अजिबात चुकीचे नव्हते. त्यांच्या वैमानिकांनी २४ तासांपूर्वी असेच शेपूट पायात घालून पलायन केले होते. 
शेवटी माणूस आपल्या अनुभवांचा आधार घेऊनच निर्णय घेत असतो.

म्हणजे त्याचे झाले असे की,
भारताने बालाकोटला केलेल्या हल्ल्याचेवेळी पाकिस्तानच्या विमानांनी आकाशात झेप घेतली होती. पण भारतीय विमानांची युद्धरचना पाहता त्यांनी घाबरून चक्क माघार घेतली होती. कोणीतरी अंधार होता अशीही सबब सांगितली होती!!

तसेच काहीतरी घडेल व आपण हल्ला करून सुखरूप परत येऊ अशा स्वप्नात असलेल्या पाकी वैमानिकांनी जेव्हा मिग२१ विमाने हल्यासाठी आली आहेत हे पाहिल्यावर त्यांना जरा आश्चर्यच वाटले. पण आपल्याला पाहून पळून जायच्या ऐवजी ती आपल्याच अंगावर येताहेत म्हटल्यावर आश्चर्याची जागा भितीने घेतली.

या भितीने आपले काम केले. आपल्याला हल्ला करायला पाठवलंय हे विसरून एफ्१६ चक्क वळून पाकिस्तानी हद्दीत पळायला लागले आणि त्याच्या मागे भारताचे मिग२१. सगळेच विस्मयकारी. 

लांडगा सशाला पाहून घाबरतोय. पळून जायला बघतोय. तर ससा आणखीनच जोरात मागे लागलाय. सगळंच खतरनाक. शेवट तर फारच खतरनाक. सशाने लांडग्याला उडवले. 

मिग२१ ला आर७३ नावाची लघुपल्ल्याची क्षेपणास्त्रे बसवली आहेत. पण ती काही राफेल विमानावर बसवलेल्या क्षेपणास्त्रासारखी नाहीत. राफेलचे ठीक आहे हो. आरामात ४०-५० किलोमीटरवरून डागायची. शत्रूच्या हद्दीत जायलाच लागत नाही. 

तर सांगायचा मुद्दा असा की, ही क्षेपणास्त्रे डागण्यासाठी लक्ष्याच्या जवळ जायला लागते. आणि इथे लक्ष्य तर घाबरून पळतेय पाकिस्तानच्या हद्दीत. पण सशाने गाठले की हो लांडग्याला आणि डागले की हो आर७३. तेही अचूक पणे. पण तोपर्यंत मिग २१ ने सरहद्द ओलांडली होती. एफ्१६ च्या दोन्ही वैमानिकांनी विमानातून उड्या मारल्या व वाचले. कारण ते त्यांच्या हद्दीत उतरले होते.

इकडे आपले मिग२१ ही कोसळले. साहजिकच आहे हो.
फॉर्च्युनरला गाठण्यासाठी एखाद्या जुन्या मारुती ८०० ने जीव खाऊन १५० चा स्पीड घेतला व एकदाची फॉर्च्युनर गाठली तरी नंतर त्या मारुतीच इंजिन मान टाकणारच की हो.

पण या सगळ्यात गोची झालीय ट्रंप साहेबांची. १९६० च्या रशियन तंत्रज्ञानावर आधारीत विमान अमेरिकन एफ्१६ सारख्या आधुनिक विमानाचा पाठलाग करून ते पाडत म्हटल्यावर अमेरिकेची शान काय राहिली? कोण घेणार हो ते विमान? युद्ध चाललंय भारत पाकिस्तानात आणि फटका बसतोय अमेरिकेच्या विमान धंद्याला. कस काय परवडणार हो.

हे पाकडे आपल्या एफ्१६ ची इज्जत घालवणार म्हटल्यावर ट्रंप साहेबांनी शेवटी पाकिस्तानला सांगून टाकलं की अतिरेकींवर हल्यासाठी तुम्हाला एफ्१६ दिली आहेत, भरताविरुद्ध लढण्यासाठी नाही.

अमेरिकेकडून घेतलेली शस्त्रे आम्ही भरताविरुद्ध वापरणार नाही अस पाक अमेरिकेला लिहून देते पण प्रत्यक्षात ती भरताविरुद्ध वापरली जातात" ही तक्रार आपण १९६५ च्या युद्धापासून अमेरिकेकडे करतोय. पण अमेरिका ऐकतच नाही किंवा बहिऱ्याच सोंग घेतीय.  

तेही उद्दिष्ट साध्य झालंय आज. भले त्यासाठी ५४ वर्षे लागली असतील. आपल्या एका शूर वीर पायलटने भारताला काय काय साध्य करून दिलेय हे पाहिले की नतमस्तक व्हायला होतंय.

ही विमानाची लढाई इतिहासात नेहमीच आश्चर्यकारक म्हणून नोंदली जाणार हे नक्की. विमान युद्धाच्या कथांमध्ये अभिनंदन वर्धमानचे नाव कायम सुवर्णाक्षराने नोंदवले जाईल.

दुवा क्र. १  या बातमीवर आधारीत स्वैरलेखन