नमस्कार,
सध्या मनोगतावर चाललेल्या चर्चा वाचल्या. काही विचार मांडते, अनेकांना त्याचा राग येईल, हे समजूनही लिहिते. मी परत मनोगतावर काही लिहीन असे वाटत नाही. मी ज्ञानी आणि बाकी सर्व अज्ञानी असे समजत नाही, तरीही, राहून राहून वाटते, की आपल्या मराठी लोकांमध्ये खूप अज्ञान आहे. आणि खूप भेकडपणा आहे. अगदी वेगळया नावांआडून लिहिताना देखील. नशिबाने सर्व मनोगती सुरक्षित आहेत. पण नुसते, "जपा", "काळजी घ्या" वगैरे दिलेले सल्ले वाचून उद्विग्नता आली - त्या प्रेमाच्या शब्दांमुळे नव्हे, पण त्यापलीकडे जाऊन चर्चा न करण्याचा एकंदर प्रकार पाहून या चर्चास्थळाची मर्यादा कळली. काही बाबतीत, ज्याला त्याला आपापल्या उद्द्योगांना लागले पाहिजे हे खरे असले तरी, मला हा सर्व फारच मर्यादित प्रकार वाटू लागलाय.
मिलिंद भांडारकरांनी चर्चेचा जो प्रस्ताव ठेवला तो वगळता, बाकी नव्या अर्थहीन चर्चा सुरूच आहेत. त्यातही "सहमत" असणाऱ्यांचीच संख्या जास्त. गंभीर विषयाला उत्तरे देतानाही कंपूबाजी, काही लिखाणाकडे दुर्लक्ष करणे, आणि प्रसंगी बालीशपणा याचे सारखे नमुने बघायला मिळतायत. अर्थात हा दोष फक्त मनोगतावरच्या मराठी माणसाचा नाही, तो आपल्याला घडवणाऱ्या सर्वच समाजाचा आहे. तेव्हा जास्त काही बोलण्यात अर्थ नाही. नमस्कार.