या वर्षी डिसेंबरमध्ये पुण्याला जागतिक चित्पावन महासंमेलन भरणार असल्याचे 'संवाद' या कार्यक्रमावरून समजले. "हा जातीय मेळावा नाही, हे एका मोठ्या कुटुंबाचे एकत्र जमणे आहे. निरनिराळ्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या चित्पावनांचे 'नेटवर्किंग' (हा आंग्ल शब्द त्यांचाच) करून त्याचा राष्ट्राच्या उन्नतीसाठी अधिकाधिक उपयोग करून घेण्याचा हा उदात्त प्रयत्न आहे." इत्यादि खुलासा या मुलाखतीत करण्यात आला. तसेच "समाजसेवेपासून ते संगणक क्रांतीपर्यंत सर्व क्षेत्रात चित्पावन लोक अग्रेसर होते आणि आजही आहेत." हे अनेक सन्माननीय उदाहरणांसह या मुलाखतीत दाखवले गेले. त्यामुळे हे संमेलन तक्रारी किंवा मागण्या मांडण्यासाठी नक्कीच नसणार. या निमित्ताने कांही मूलभूत प्रश्न मनात आले. ते विचारण्याइतका वेळ श्री.राजू परुळेकर यांना कदाचित मिळाला नसेल. या महासंमेलनासाठी पांचशे कार्यकर्ते कामाला लागले असल्याचे या मुलाखतीत सांगण्यात आले. त्यातील कांही मनोगताचे सभासदही असतील. त्यांनी शक्य असल्यास थोडे शंकानिरसन करावे.
१. चित्पावनांच्या यादीमधील आडनाव असलेले बरेच लोक जातपात मुळीसुद्धा मानत नाहीत, रोजच्या व्यवहारातल्या कोठल्याच बाबतीत धर्म, भाषा, प्रांत वगैरेवरून ते भेदभाव करत नाहीत. सगळे पदार्थ मनमोकळेपणाने खातात व पितात. आजच्या परिस्थितीत ते स्वतः तरी 'चित्पावन' अशी वेगळी ओळख करून देण्यास उत्सुक आहेत काय?
२. या कारणामुळेच आंतर्जातीय, आंतरधर्मीय व आंतर्देशीय विवाह करण्यात चित्पावन आडनांवांचे लोक आघाडीवर दिसतात. बिगरचित्पावन पुरुषांबरोबर लग्न केलेल्या महिला किंवा चित्पावन पुरुषांबरोबर लग्न करून आलेल्या स्त्रिया आणि हा मिश्रविवाह केलेल्या दांपत्यांची संतती या महासंमेलनात भाग घेऊ शकतील काय?
३. या संमेलनासाठी शंभरावर परदेशातून प्रतिनिधी येणार आहेत अशी अपेक्षा आहे. बहुतेक सर्वच आप्रवासी भारतीयांची परदेशात वाढलेली मुले आपापसात इंग्रजीतच बोलतात. फार तर "हंग्री झालो की केक ईट करतो आणि थर्स्टी झालो की कोक ड्रिंक करतो." अशा प्रकारची भारतीय भाषा बोलतात असा माझा अनुभव आहे. त्यांच्यातील 'चित्पावनां'ची गणना यात होते काय?
४. हे संमेलन फक्त निमंत्रितासाठी मर्यादित आहे की कोणालाही (स्वतःला चित्पावन समजणाऱ्या व्यक्तीला) इच्छा असल्यास तो त्यात भाग घेऊ शकेल?
या संमेलनाच्या निमित्ताने विचारावेसे वाटते की आजच्या काळात चित्पावन म्हणजे नक्की कोण? त्याची कोणती 'आयडेंटिटी' (हा इंग्रजी शब्द माझाच, कारण सुयोग्य पर्यायी शब्द लगेच सुचला नाही) आज राहिली आहे?
व्यक्तीशः मला नेहमी नव्या युगाचे स्वागतच करावेसे वाटते. या चर्चेच्या मागे कोणावर टीका करण्याचा माझा हेतू नाही. तसेच "त्या संमेलनाचे प्रयोजन काय आहे? त्याचे काय परिणाम होतील?" अशासारखे प्रश्न उपस्थित करू नयेत असे मला वाटते. आज कोणालाही संमेलन भरवण्याचे स्वातंत्र्य नक्कीच आहे. संयोजकांनी अशा प्रश्नांचा विचार केला असणारच. 'चित्पावन' या संज्ञेची व्याप्ती 'अमुक अमुक वैशिष्ट्ये सांभाळणारे' अशी संकुचित ठेवावी की हवी तेवढी विस्तृत करावी यावर मत मांडले गेले तर त्यातून विचारांना चालना मिळेल असे मला वाटते. मनोगतावर बहुतेक लोक टोपणनांवानेच लिहीत असल्यामुळे ते कोणत्या व्यक्तीचे विचार आहेत ते समजणार नसल्याने सर्वांना मोकळेपणाने लिहिता येईल असेही मला वाटते.