निळ्या काचेचे पेन - भाग २

मी घरी पोचून आंघोळ उरकली. आई वरच्या देवघरात कालिंदीकाकूंबरोबर काम करत होती. मग मी तांब्याभर पाण्यात साबणाची वडी घालून चांगले खळबळवले आणि ते साबणपाणी अंगावरून घेतले. मग उरलेल्या बादलीतले पाणी भसाभस डोक्यावर ओतले आणि आंघोळ संपवली. आई न्हाणीच्या आसपास असली की उगाचच सगळ्या अंगाला साबण लावा, तो जाईस्तोवर त्यावर पाणी ओता असले प्रकार करायला लागत. गणपती आणायला मला बरोबर न्यायला पुरुषोत्तम काकांनी अजिबात हरकत घेतली नाही. मला बाहेर पाठवायला (नेहमीप्रमाणे) आईचा नकाराचा सूर उमटणार तोच "चला निखिलपंत" अशी हाक मारून त्यांनी आईचे तोंडच बंद केले. त्यांना इंग्रजी येत होत की नाही माहीत नाही, पण ते माझ्याहून खूपच उंच होते. त्यामुळे मुकाट त्यांचे बोट धरले. माझे सबंध नाव इंग्रजीत सांगण्याचा हातखंडा प्रयोग केल्यावर ते खूषच झाले आणि परत त्यांनी मला खांद्यावर घेतले. विमानात बसून जावे तसा मी तळ्याकाठच्या त्या देवआळीतून (हे 'आळी' प्रकरण इथे आल्यावरच कळले होते) रामधरण्यांच्या घरी निघालो. वाटेत कितीतरी माणसे "बाप्पा मोरया" करीत पाट घेऊन निघाली होती. झाडून सगळ्या पुरुषांच्या डोक्यावर टोप्या होत्या पुरुषोत्तमकाकांच्या डोक्यावरही माझ्या मांड्यांना गुदगुल्या करणारी जरीची टोपी होती) आणि बायकांच्या नाकात नथी. एकूण किती माणसांनी टोप्या घातल्या हे मोजावे म्हणून मी आकडे म्हणायला सुरुवात केली. सदतीस-अडतीस नंतर काहीतरी गफलत झाली. मी मधले एकदोन आकडे गाळले बहुतेक. मी गप्प का म्हणून पुरुषोत्तमकाकांनी विचारले तर मी खरे ते सांगून टाकले. "हात्तिच्या. त्यापेक्षा किती लोकांनी टोप्या घातल्या नाहीत हे मोज ना!" त्यांनी फटक्यासरशी सगळे चित्र सोपे करून टाकले.

हे सोपे होते. तळ्यावर म्हशी धुणारा नामू, कोपऱ्यावरच्या मोहनलाल वाण्याच्या दुकानातला नोकर संतोष आणि स्वतः मोहनलाल एवढे तीन जणच बिनटोपीचे निघाले. गणित जमले.

गणपतीची मूर्ती मी एवढ्या जवळून पहिल्यांदाच बघत होतो. पुरुषोत्तमकाकांनी तर मला त्या सोंडेला हातही लावून दिला. मला गणपतीची गोष्ट माहीत होती. पार्वतीच्या साबणाने हत्तीला आंघोळ घातली असे काहीसे. ही मूर्ती साबणासारखीच लख्ख होती. कपाळावरचे सोनेरी रंगातले गंध तर झकास चमकत होते. आणि डोळे.. किती बारीक डोळे. पण रोखून माझ्याकडेच बघणारे. मी पटकन पुरुषोत्तमकाकांच्या मागे दडलो.

त्यांनी पाटावर मूर्ती घेतली. "चला निखिलपंत, सकाळी खाणं झालंय ना भरपूर? आता म्हणा 'गणपतीबाप्पा मोरया'". मोठ्यांदा ओरडायची सरळसरळ परवानगी? माझ्या पहिल्या आरोळीने रामधरणेकाका टाणकन उडाले. मग आमची मिरवणूक परत घराकडे निघाली. माझ्या किंकाळण्यावर अजिबात न डाफरता "अरे वा" "झकास" असे उत्तेजन देत पुरुषोत्तमकाका चालत होते. घर येईपर्यंत माझा तर घसाच बसला.

वरचे देवघर ओळखू येऊ नये एवढे बदलले होते. सगळ्या खिडक्या उघडल्यामुळे छान लखलखीत दिसत होते. त्यात फुलांचा (जास्त करून केवड्याचा), पानांचा, उदबत्तीचा, गंधाचा असले सगळे वास एकत्र होऊन एक छान मिश्रण झाले होते. मी डोळे मिटून हुंगत बसलो.

पुरुषोत्तमकाका पूजेला बसले. पूजा सांगायला लोंढेभटजी आले होते. त्यांचे तासलेले डोके आणि त्यावरची पांढरी शेंडी मजेशीर दिसत होती. काहीतरी अगम्य भाषेत बडबडत ते मधूनमधून कळेलसे "आता गंध लावा", "आता पळीने पाणी घाला" असे सांगत. जयूताई काय लागेल ते देण्यासाठी धावपळ करीत होती. तिने एक गुलाबी रंगाची झकास साडी नेसले होती. ती अगदी परीसारखी दिसत होती.

"निखिलराव, ते पत्रीचे ताट द्या जरा इकडे" तिने दबक्या आवाजात मला म्हटले. मी बुचकळ्यात पडलो. मला पत्रा माहीत होता. कात्री माहीत होती. पत्र्याची कात्री? पण ती काही कुठे दिसत नव्हती. माझ्या बाजूला तर झाडाची पाने ठेवलेले ताट होते. मी तिकडे बघताच "हो, तेच ते. पत्री म्हणजे पाने" असे तिने समजावले. या इथल्या लोकांची भाषा 'घाटावरच्या' लोकांपेक्षा मधूनच अगदी वेगळी वाटे.

पूजा झाल्यावर आरत्यांचा जल्लोष उडाला. एरवी मला "ओरडू नकोस" असे दरडावत हिंडणारी आई भेदरून एका कोपऱ्यात गप्प उभी होती. आरत्यांना शेजारच्या सहस्त्रबुद्ध्यांचा शिरीषही आला होता. पण सगळ्यात मोठा आवाज पुरुषोत्तमकाकांनी लावला होता. आणि किती त्या आरत्या? एकामागून एक आपल्या चालूच. गणपतीसमोर दणकावून विठ्ठल, शंकर अशा मंडळींच्याही आरत्या झाल्या. आणि आरत्या संपल्यावर लोंढेभटजींनी आपल्या खरखरत्या आवाजात "ॐ गणानांत्वा गणपतीं हवामहे..." असे म्हणायला सुरुवात केल्यावर मला तर पोटात खार तुरतुरल्यासारखे वाटू लागले. शेवटी पूजा संपली.

जेवायला आम्ही सगळे नेन्यांकडेच होतो. फक्त खाली बसलो होतो. मोदक होते. मला तर खूप आवडले. मोदकाची शेंडी उडवून मग त्यात मोठ्ठा चमचा भरून तूप घालायचे आणि खायचे. वा! वा! शिवाय तूप वाढायला स्वतः जयूताई. नाहीतर आईच्या हातून चार थेंबांहून जास्त तूप सुटणे कठीण. फक्त अख्खा मोदक एका घासात खाण्याच्या प्रयत्नात एकदा तो अर्धा तोंडात आणि अर्धा बाहेर असा फुटला आणि हनुवटीवर तूप आणि गूळखोबऱ्याच्या सारणाचा लेप बसला. आई सुदैवाने आत होती. जयूताईने पटकन तिच्या पदराने माझे तोंड पुसून काढले. मला परत तिची पापी घ्यावीशी वाटली.

अशा जेवणानंतर झोप काढणे गरजेचे होते. पण जयूताईची शिकवणी जास्त महत्त्वाची होती. कारण ती दुसऱ्या दिवशी सकाळीच परत जाणार होती. काहीतरी कॉलेजचे काम होते म्हणे.

मग झोपाळ्यावर बसून आम्ही उंच उंच झोके घेतले. झोपाळा खाली येताना पोटात कुणीतरी शिट्टी वाजवतेय असे वाटू लागले. जयूताईच्या अंगाला केवड्याचा वास लागला होता. हळूहळू सरकत तिच्या मांडीवर डोके ठेवून मी झोपून गेलो. तीपण आपल्या लोण्यासारख्या हातांनी मला थोपटत राहिली.

त्यानंतर थेट नेनेमंडळी आली ती दिवाळीतच. तोवर जयूताईला शिकवण्यासाठी माझे इंग्रजीही अजून पक्के झाले होते.

पण त्या दिवाळीत शिकवणी झालीच नाही. कारण आमच्याही घरी आणि नेन्यांच्याही घरी पाहुणेच पाहुणे जमले. आमच्याकडे आधी वामनकाका त्यांच्या कुटुंबासकट आले. भाऊबीजेला सोलापूरची मथूआत्या आणि पुण्याहून नानूमामा. नेन्यांकडे पुरुषोत्तमकाकांचे भोपाळला असणारे मोठे भाऊ आबाकाका. या आबाकाकांना चांगल्या कोथिंबिरीच्या जुडीसारख्या भरघोस मिशा होत्या. ते एवढे गोरेही नव्हते. आणि मुलांशी वागण्याची त्यांची पद्धत सर्वसाधारण मोठ्या माणसांसारखीच होती. म्हणजे दुर्लक्ष करण्याची.

त्या सुटीत आम्ही जेमतेम तीनचार वेळेला बोलण्याइतके भेटलो. एकदा नानूमामा बरोबर होता. मी तिच्याशी बोलून परत आलो तर तो त्याचे मातकट डोळे रोखून मला बरेच काही विचारू लागला. मला नानूमामा मुळीच आवडत नसे. एक तर त्याच्या तोंडाला बहुतेक वेळेला विडीचा करपट वास येई. दुसरे म्हणजे सदानकदा मला "आत पळ" असे बजावून तो बाबांबरोबर शास्त्री, ताश्कंद, संस्थानिक, तनखे, बँका असले काहीतरी बडबडत बसे. बाबाही कंटाळून हो हो करत बसत. नानूमामा पुण्याला कुठेतरी नोकरी करीत होता. शिवाय बीए की काहीसे करतो असे दोन वर्षे तरी सांगत होता. मला त्याने जयूताईबद्दल काही बोलावे हे मुळीच सहन झाले नाही. हिसडा मारून मी पळून गेलो.

एकदा आबाकाकांबरोबर ती कुठेशी चालली होती. "मीपण येऊ" असे विचारायला मी पुढे झालो तोच तिने नजरेने आबाकाकांकडे खूण केली आणि 'नको' अशी मान हलवली. मी हिरमुसला होऊन मागे झालो.

एकदा मात्र विहिरीपाशी ती एकटी सापडली. "अशी अळंटळं केली तर इंग्रजी शिकण्याचे काही खरे नाही. किमान मला तरी ते जमणार नाही" हे मी स्पष्ट सांगितले. शिवाय "इंग्रजी शिकणे म्हणजे खायचे काम नाही" हे परत एकदा बजावले. मुकाट खाली मान घालून तिने ऐकून घेतले. "पण मी घरी अभ्यास करीन ना. बघा ना, मला आता ए ते झेड सगळे पाठ येते" असे म्हणून तिने सगळी अक्षरे बिनचूक म्हणून दाखवली. पण तेवढ्यात मथूआत्याने मला काहीतरी कामाला हाक मारली. शिकवणी तेवढ्यावरच राहिली.

पण त्याची कसर आम्ही पुढच्या उन्हाळ्याच्या सुटीत भरून काढली. एक तर आमच्याकडे काहीच पाहुणे नव्हते. आणि नेन्यांकडे फक्त आबाकाका एकटेच. विमलकाकू भोपाळलाच थांबल्या होत्या. मग आम्ही दोघांनी धूम उडवून दिली. एक तर करवंदे हा प्रकार मला नवीनच होता. शिवाय तोरणे, पेटारे, आळूची फळे असे विस्मयकारक पदार्थही मला चाखायला मिळाले.

दररोज दुपारी जेवण झाले की झोपाळ्यावर शिकवणी चालू होई. एव्हाना माझे इंग्रजी आणि गणित बरेच पुढे गेले होते. मग पाढ्यांची घोकंपट्टी चाले. सात, नऊ, तेरा, असल्या आडनिड्या पाढ्यांच्या वेळेला हळूच किणकिणत्या आवाजात जयूताई मला साथ देई. अंधारात जिना उतरताना हाताला कठडा लागावा तसे मला वाटे.

तिने मला बाहेरही खूप हिंडवले. घराजवळच्या तळ्याजवळ तर आम्ही रोज सकाळ संध्याकाळ चक्कर मारत असू. एकदा तर मोठा बेत करून आम्ही सतरंज्या वगैरे घेऊन तळ्याकाठच्या वडाखाली बसलो आणि जयूताईने केलेली भेळ खाल्ली. बरोबर उसाचे कापलेले कर्वे. फक्त ऊस खाल्ल्यावर चुकून मी त्यावर पटकन पाणी प्यायलो आणि जीभ चांगलीच चरचरली आणि डोळ्यात पाणी आले. पण मी अजिबात रडलो नाही. मोठी माणसे रडत नाहीत. मग जयूताईने हलक्या हाताने माझ्या जिभेवर लोणी लावले.

जयूताई आता बी एस सी का काहीसे संपवून बी एड असे काहीतरी करणार होती म्हणे. एवढी मोठमोठी ही माणसे, दोनचार इंग्रजी अक्षरे शिकण्यासाठी वर्षानुवर्षे कशाला लावतात? बाबांना विचारण्यात अर्थ नव्हता. जगात इंजिनियरिंग सोडून काही शिकण्यासाठी असते हे त्यांना मान्य नव्हते. जयूताईला विचारले तर ती म्हणाली युनिव्हर्सिटीला विचारून सांगते. हे युनिव्हर्सिटीचे झेंगट मला माहीत नव्हते म्हणून गप्प बसलो.

त्या उन्हाळ्यात मला घाटावर कधी न झालेली आपदा अंगावर आली - घामोळे. विशेषतः पाठीवर. सदरा घालणे अशक्य वाटू लागले. त्यावर इलाज म्हणजे अंगाला कोकमाचे पाणी लावणे आणि जिऱ्याचे पाणी घोटघोट पिणे एवढे सांगून जयूताई थांबली नाही, तर तिने ते सगळे सव्यापसव्य केले. कोकमाचे पाणी जरा चुरचुरे. आणि जिऱ्याचे पाणी काही मुद्दामहून प्यायला जावे असे नव्हते. पण जयूताईने केले असते तर मी अंगाला वाटलेली मिरची लावून घेतली असती आणि त्रिफळाचूर्णही आनंदाने सकाळसंध्याकाळ खाल्ले असते. सुदैवाने ते घामोळे प्रकरण थोडक्यात मिटले.

अशी मजेत सुटी चालली होती आणि अचानक मलकापूरची आज्जी आमच्याकडे येणार असे कळले. मला ही आज्जी अजिबात आवडत नसे. एक तर तिच्या डोक्यावर लाल पदर चिकटवून ठेवल्यासारखा  कायम असे. एकदा तिने तो पदर काढला तर मी भेदरून पळूनच गेलो. आणि तिच्या अंगाला सदानकदा अमृतांजनचा वास येत असे. ही माझ्या बाबांची चुलत आत्या की काहीतरी. पण तिला मधूनमधून आमच्याकडे येण्याची सवय होती. "मुले विचारत नाहीत, हिडीसफिडीस करतात. त्यांना सदैव आमच्याकडे ठेवून उगाच त्यांच्या मुलांची कुरापत कशाला काढा? पण दोनचार दिवस येतात म्हणाल्या तर तेवढीच सेवा हातून" असे आई दबक्या आवाजात कालिंदीकाकूंना सांगत असलेली मी चाफ्याच्या झाडाआडून ऐकले. म्हणजे काय देव जाणे.

मी तणतणत झोपाळा गाठला. जयूताई एकटीच मंद आवाजात गुणगुणत बसली होती. मी माझी तक्रार थेट तिच्यासमोर मांडली. जयूताईने मला एकदम जवळ घेतले. तिच्या धडधडत्या छातीवर डोके ठेवल्यावर मंद पावडरचा सुगंध मला चक्कर आणू लागला. "निखिलराव, असे नाही म्हणायचे. जर का समजा तुमच्या पायाला लागले, तर जवळ घेऊन औषध लावण्याऐवजी मी जर तुम्हाला 'लंगडा' म्हणून दूर केले तर?" मला तर टचकन रडूच आले. मग हळूहळू थोपटीत जयूताई बरेच काही बोलली. सगळे काही कळले नाही. पण मलकापूरची आज्जी आली तेव्हा मी मुकाट तिचा हाडांवर चामडी ताणलेला तिचा हात माझ्या तोंडावरून फिरू दिला, तिने दिलेली चिकट खडीसाखर तुळशीच्या कुंडीत न टाकता खाल्ली, आणि तिला मी कुठल्या शाळेत जातो, कितवीत शिकतो हे सगळे गडबड न करता सविस्तर सांगितले. मला जवळ घेताना आज्जीला हुंदका का आला कळले नाही.

अखेर जयूताईच्या जाण्याचा दिवस उजाडला. सकाळपासून मला हुरहूर लागली होती. त्यात दुसऱ्या दिवसापासून शाळा सुरू होणार होती. त्याची तयारी, नवीन दप्तर, नवीन पुस्तके... जयूताई बरोबर असती तर सगळे कसे झक्क झाले असते. आणि जयूताईने जाणे एक दिवसाने लांबवले! बाबांच्या ऐवजी स्वतः माझ्याबरोबर येऊन सगळी खरेदी करून, दप्तर नीट लावून, वह्या-पुस्तकांना सुरेख कव्हरे घालून, त्यावर टपोऱ्या इंग्रजी अक्षरात (एव्हाना मी तिला बरेच इंग्रजी शिकवले होते) माझे नाव घालून तिने मला खूष करून टाकले. वर "निखिलराव, आता णपतीत परत भेटूच. तोवर आरत्या जरा पाठ करून ठेवा" (गेल्या वर्षी मी आरत्या येत नसल्याने वेडीवाकडी तोंडे हलवत नुसताच उभा होतो हे तिला समजले होते तर) असे म्हणून ती गेली.

शाळा सुरू झाली आणि दोन दिवसांतच पावसाने मुक्काम टाकला. इथला पाऊस एकंदरीत घाटावरच्यापेक्षा जास्त होता हे खरेच. पण या वर्षी काही वेगळेच चित्र होते. हे मी म्हणत नाही, बाबांच्या हापिसातले उकिडवेकाका आले होते ते बाबांना सांगताना मी ऐकले. दिवस दिवस सूर्य दिसेना. कपडे वाळेनात. शाळेची खाकी चड्डी तर चांगली जाडजूड. मग ती आंबटओली चड्डी आई पाणी तापवायच्या बंबाला बाहेरून लपेटून ठेवी. पावसाने गारठा चांगलाच जाणवत होता. त्यात ती कोमट वाफाळती चड्डी घालणे अतीव आनंदाचे वाटे.

श्रावण आला. पाऊस जरासा उणावला. गेल्या वर्षी आम्ही इथे नवीन होतो म्हणून असेल, किंवा माझी मुंज (बाबांच्या विरोधाला न जुमानता) दोन वर्षांपूर्वीच कोल्हापूरला झाली आहे हे आत्ता इथल्या लोकांना कळले म्हणून असेल, ब्राम्हण म्हणून जेवणाची भरपूर आमंत्रणे आली. श्रावण सोमवार तर ठरलेलाच. पण आमच्या समोरच्या दातारकाकू संतोषीमाता की काहीसे सांगून शुक्रवारीही बोलवायच्या. आणि भटकाकू तर श्रावणात कुठल्याही दिवशी ब्राम्हणाला जेवायला घातले तर पुण्य लागते अशा विचारांच्या असल्याने त्या रोजच बोलवायला तयार असत. प्रत्येक जेवणाबरोबर अखंड वीस पैसे दक्षिणा. अहो, तेव्हा पाच पैशाला भलेथोरले आईसफ्रूट किंवा दोन ओंजळीभरून बोरांचा वाटा मिळे! एकंदरीत मी चांगलाच श्रीमंत झालो. जयूताई आली की तिला खूप खूप खाऊ द्यायचा म्हणून मी त्यातल्या एका पैशालाही हात लावला नाही. बाबांना हे बाहेर जेवत हिंडणे अर्थातच पसंत नव्हते. मी हे पैसे त्यांच्याजवळ द्यावेत आणि ते मग हे पैसे बँकेत टाकतील असे काहीसे ते म्हणाले. पण मी ठाम नकार दिला. कधी नव्हे ते आईनेही, "अहो असू देत त्याच्याजवळच. आता काही लहान नाहीये तो" अशी रदबदली केल्याने माझे पैसे सुरक्षित राहिले.

पण श्रावण संपायच्या दोनचार दिवस अगोदरच कालिंदीकाकू एकट्याच आल्या. आईबरोबर त्यांची काही खलबते सुरू झाली. का कुणास ठाऊक, त्या फारच उदासलेल्या दिसत होत्या. आणि मी जवळपास दिसलो की त्या दोघीही घुम्यासारख्या गप्प बसून रहात. दोन दिवसांनी पुरुषोत्तमकाका आले. त्यांच्या मागोमाग आबाकाका आले. सर्व कसे शांत शांत होते. मला काहीच कळेना. आई देवाजवळ जास्त जास्त बसायला लागली. बघावी तेव्हा आपली देवघरासमोर. एकदोनदा तिला डोळे पुसतानाही पाहिले. बाबा हापिसातून येताच खुंटीला कोटटोपी लावून शेजारी जात ते थेट जेवायलाच घरी येत. जेवण झाल्यावर मला गोष्ट सांगणे नाही, माझा अभ्यास घेणे नाही, काही काही नाही.

एकदा चाफ्याच्या झाडामागे मला कोणीतरी झपकन गेल्याचा भास झाला. पण संध्याकाळची वेळ होती आणि चांगलेच अंधारून आले होते. पुढे होऊन बघायची मला भीती वाटली.

ही मोठी माणसे सतत काहीतरी खुसफुसत असत. "आता दोन आठवडेच राहिले. येईलच त्यांचे पत्र" असे एकदा पुरुषोत्तमकाका बाबांना म्हणत होते. "तिकडे वर्ध्याला की कुठेसा आहे म्हणे आश्रम" असे बाबा आईला दबक्या आवाजात सांगत होते. एकदा कालिंदीकाकू मुसमुसत होत्या आणि आई त्यांचा हात धरून गप्प कानकोंडली बसली होती हे मी नेन्यांच्या खिडकीतून पाहिले. कधीही बंद न असणारे नेन्यांच्या घराचे दरवाजे आता सदैव बंद बंद राहू लागले.

भरीत भर म्हणून नानूमामा हजर झाला.

यावर्षी नेन्यांचा गणपती बसला खरा, पण पूजा करायला एकटे पुरुषोत्तमकाका आणि सांगायला लोंढेभटजी. आरत्यांचा कल्लोळ नाही, काही नाही. मूर्तीही त्यांनी मला न सांगता गुपचूप आणली.

मला फारच गुदमरल्यासारखे वाटू लागले.

अचानक मला एक दिवस जयूताई नेन्यांच्या घराच्या माडीवरच्या खिडकीत ओझरती दिसली. त्या दिवशी माझ्या पोटात खूप दुखत होते म्हणून शाळेला सुट्टी करून आईने मला ओव्याचा जळजळीत अर्क चमचाभर पाजला होता आणि आल्या-लिंबाच्या रसाचे चाटण एका छोट्या वाटीत मला देऊन ती नेन्यांकडे गेली होती. मी मागच्या आंगणात येराझाऱ्या घालत होतो आणि वरच्या खिडकीत जयूताई दिसली. किती तर अगदी क्षणभरच. मी वाटी थेट अंगणात भिरकावली आणि नेन्यांच्या घराकडे धाव घेतली. दार बंद होते. मी दणादणा दार वाजवून हात लालेलाल करून घेतले. आबाकाकांनी दार उघडले. का कुणास ठाऊक, त्यांचा चेहरा जुडीमिश्या असूनही एवढा उग्र वाटला नाही. पुरुषोत्तमकाका लोडाला टेकून बसले होते. त्यांचा चेहरा लाल झाला होता आणि डोळे चमकत होते.

"जयूताई कुठे आहे?" मी रोख सवाल टाकला. या मोठ्या माणसांच्या खेळाचा मला अगदी अगदी वीट आला होता.

पुरुषोत्तमकाकांनी चेहरा गडबडीने कोरा केला. "निखिलपंत, ती तर मुंबईलाच आहे. तिला काम आहे काहीतरी".

मला उमाळे येऊ लागले. "खोट्टं खोट्टं बोलताय तुम्ही. जयूताई इथेच आहे. तिला कोंडून ठेवली आहे तुम्ही. तुम्ही दुष्ट आहात" हुंदक्यांमध्ये माझे शब्द विरघळू लागले.

"अरे, तिला जरा ना, बरं नाहीये म्हणून झोपलीय ती माडीवर" पुरुषोत्तमकाका इतक्या हळू बोलले की मला जेमतेम ऐकू आले.

"साफ खोटं. आजारी व्हायला काय झालंय तिला? पोट दुखतंय का? तर मी ओव्याचा अर्क आणून देतो. आल्या-लिंबाचा रस आणून देतो. पाहिजे तर गावात कुलकर्णी डॉक्टरांकडे जाऊन येतो. पण जयूताई कुठंय?" मला आता रडू अनावर झाले होते.

पुरुषोत्तमकाकांनी मला जवळ घेण्याचा प्रयत्न केला पण मी त्यांना हिसडून लावले. "तुम्ही दुष्ट आहात. तुम्ही पापी आहात. आणि हे आबाकाका राक्षस आहेत. तुम्ही छळताय माझ्या जयूताईला..." मला आता शब्द फुटेना. स्फुंदून स्फुंदून मी रडू लागलो. त्वेषाने पुढे झालो आणि पुरुषोत्तमकाकांना चांगले ओरबाडून काढले. आणि हाताला कडकडून चावलोही. ते शांतपणे ओठावर दात गच्च रोवून बसले होते. शेवटी त्यांच्या ओठातून रक्ताचा थेंब उमटला.

आतून आई बाहेर आली आणि शब्दही न बोलता मला घरी घेऊन गेली. मला मांडीवर घेऊन ती दिवसभर देवघरासमोर रामरक्षा म्हणत बसली. जेवायची शुद्ध कोणालाच नव्हती. नानूमामा एकटाच टरक्या डोळ्यांनी बघत बाहेरच्या खोलीत पेपर धरून बसला होता.

संध्याकाळी चारच्या सुमारास का कोण जाणे, मला विहिरीवर जाण्याची इच्छा झाली. काही चमत्कार होईल आणि कदाचित जयूताई भेटेलही.

चाफ्याच्या झाडामागे जयूताई होती! पण तिचा चेहरा खूपच उतरला होता. तिचा सशासारखा गोरापान रंग रोगट पिवळ्या बल्बच्या प्रकाशासारखा दिसत होता.

"निखिलराव" मला अगदी भडभडून आले. "मी किनई जरा गावाला जातेय बऱ्याच दिवसांसाठी. आता भेट बघू या... हे किनई एक पेन आहे तुम्हाला द्यायला आणलेले. पण थोडे मळले आहे, आईकडून साबणपाण्याने धुऊन घ्या हं न विसरता" तिने ब्लाऊजमधून एक निळ्या काचेचे पेन काढले आणि माझ्या हातात ठेवले. मी तिच्या कमरेला कडकडून मिठी मारली. वादळातल्या झाडासारखी ती गदगदत होती. अचानक दोरा तोडावा तसे तिने मला बाजूला केले. मी सर्व ताकद पणाला लावून तिला धरून ठेवले होते, पण तिच्या अंगात एवढी शक्ती असेल असे वाटले नव्हते. वाऱ्यासारखी ती त्यांच्या घराच्या मागीलदारातून गेली आणि तिने खाडकन दार लावले.

उंच कड्यावरून अंधारात लोटून द्यावे तसे मला झाले. कसाबसा चालत मी आमच्या मागीलदारी आलो. तेवढ्यात नानूमामा तिथे टपकला. "काय रे ते तुझ्या हातात बघू?"

मी डोके खाली घालून मुसंडी मारली आणि त्याच्या पकडीतून सुटून आत पळालो.

"कशाला ठेवतात कोड फुटलेल्या मुली घरात कुणास ठाऊक" नानूमामा बडबडला.

"नान्या" आईचा आवाज चाबकासारखा कडकडला. "धाकटा भाऊ म्हणून आत्तापर्यंत गप्प राहिले. पण आत्ताच्या आत्ता तुझी पिशवी उचल आणि चालू लाग. परत या जन्मात मला तोंड दाखवू नकोस". नानूमामा चमकला. पण तो पिशवी भरून बाहेर पडेपर्यंत आई कमरेवर हात ठेवून उभी राहिली. भोकाड पसरून रडतानाही मला आईचा खूप खूप अभिमान वाटला. रडत रडत तिच्या गोधडीतच मी झोपी गेलो. रात्री कधीतरी कुठल्यातरी दरवाजाला कुलूप लावल्याचा आवाज आला किंवा तसा भास झाला.

दुसऱ्या दिवशी उठल्या उठल्या मी ते पेन बघितले. मुळीसुद्धा मळलेले नव्हते. मला परत रडू यायला लागले.

बाहेरच्या खोलीत आई बाबांशी बोलत होती. "ऐकलंत हो, आता इथे नको रहायला. तुमची बदली होत असेल तर बघा नाहीतर मी जाते निखिलला घेऊन माहेरी. गंगावेशीच्या शाळेत आत्ताही घेतील त्याला". बाबांनी तिच्याकडे फक्त एकदा बघितले आणि ते बाहेर पडले. ते आले ते थेट हापिसाची जीप घेऊनच. स्वतः गाडी चालवत त्यांनी आम्हाला संध्याकाळी कोल्हापुरात सोडले आणि ते परतले. आठवड्याभरातच आम्ही अहमदनगरला दाखल झालो.

त्यानंतर मी कोकणांत कधीही गेलो नाही.

ते निळे काचेचे पेन माझ्याकडे अजूनही आहे.