२१. संगीत

आईन्स्टाईननी असं म्हटलं आहे की 'स्पेस इज द फोर्थ डायमेन्शन ऑफ टाइम', अवकाश हे कालाचे चतुर्थ परिमाण आहे. व्यक्त जग त्रिमिती आहे ते प्रकट होण्यासाठी लागणारी वेळ किंवा ज्यात ते प्रकट होते ते अवकाश ही प्रत्येक प्रकट आकाराची चवथी मिती आहे. 

जीजसला विचारलं की 'व्हॉट विल बी सो स्पेशल इन युअर किंगडम ऑफ गॉड'? तर जीजस म्हणाला 'देअर विल बी नो टाइम'!

एकहार्ट म्हणतो 'यू फिनिश विथ द टाइम अँड यू आर फिनीश्ड विथ द माइंड'. ओशो म्हणतात ' मनसे मुक्ती ही तो दरअसल मुक्ती है' 

या सर्व विधानांचा एकत्रित अर्थ संगीत आहे! तुम्ही ज्यावेळी मनापासून किंवा वेळेपासून मुक्त होता तेव्हा तुम्हाला अवकाश किंवा मुक्त्तता जाणवते, तुम्ही आकारा पासून वेगळे होता, तुम्ही तरल होता आणि गाऊ लागता.

आरती अंकलीकरनी म्हटलं आहे की ज्यावेळी तुम्हाला गाणं साधतं त्यावेळी तुम्ही गात नसता, तुमचं मन गात असतं. सुरेश वाडकरांनी त्यांच्या गुरुजींची आठवण सांगताना म्हटलं होत की त्यांचे गुरुजी म्हणायचे 'सुरुवातीला गाणं पुढे असतं आणि तुम्ही मागे असता, ज्या दिवशी तुम्हाला गाणं साधतं त्या वेळी तुम्ही आणि गाणं एका जागी आलेले असता'.

मी ज्या वेळी संगीत शिकायला सुरुवात केली त्या वेळी मला अनेकांनी अनेक सल्ले दिले. मला की बोर्ड वर गाणी वाजवायला शिकायचं होतं. मला बहुतेक सर्वांनी शास्त्रीय संगीत शीक म्हणजे सगळं जमेल असा सल्ला दिला. मला राग शिकण्यापेक्षा गाणं, जे रागाचं ऍप्लिकेशन आहे, ते शिकण्यात रस होता. एकदा एक राग हार्मोनियमवर शास्त्रीय पद्धतीनं शिकताना मी शिकवणाऱ्यांना त्या रागातलं गाणं वाजवून दाखवायला सांगितलं तर त्यांना ते जाम जमलं नाही. मी क्लास सोडला आणि विचार करायला लागलो की काय सोपी युक्ती असेल, कारण मला एक गोष्ट नक्की माहिती आहे की जीवनात जे काय रम्य आणि सुंदर आहे ते सोपं आणि सहज आहे.

मग मी एक नामी शक्कल लढवली, माझ्या असं लक्षात आलं की बँडमध्ये वाजवणारे कुठे शास्त्रीय संगीत शिकलेले असतात आणि ते काय सफाईनं आणि सुरेखपणे कुठलीही गाणी वाजवतात. त्यांना सोहोनी रागाचा गंध नसतो पण ते 'कुहूकुहू बोले कोयलिया' ऐकत राहावं असं वाजवतात, त्यांना यमन माहिती नसतो तरी त्याच गाण्यातलं 'शरद रात मन भाए प्रियतमा' हे कडवं काय सुरेख वाजवतात किंवा त्याच गाण्यातल्या जौनपुरी किंवा बहार मधल्या 'काहे घटामे बिजली चमके' किंवा 'पिया चंद्रिका देख छाई' या रचना कशा वाजवतात? 

जीवनातली कोणतीही सहजता आणि कौशल्य हे मन आणि शरीर यांच्या समन्वयावर अवलंबून आहे. थोडक्यात जे तुम्हाला करायचं आहे त्याचं स्मरण आणि शारीरिक क्रिया यात समय शून्यता हवी किंवा स्मरण आणि अनुसरण एकाच वेळी घडायला हवं. त्यामुळे कोणत्याही वादनात जे तुम्हाला वाजवायचं ते पूर्णपणे स्मरणात हवं आणि मग त्या स्मरणा बरहुकूम वाजवणं हा रियाज आहे.

पुढेपुढे माझ्या असं लक्षात आलं की ज्यावेळी मन आणि शरीर पूर्णपणे एकसंध असतात त्या वेळी आपण शरीरा पासून वेगळे आहोत ही जाणीव सहजच उपलब्ध झालेली असते, म्हणजे तुम्ही अवकाश या परिमाणात असता. अवकाश हे परिमाण आनंदाचं निधान आहे त्यामुळे तुमच्या अभिव्यक्तीतून आनंद अतिशय सहजपणे प्रवाहीत होतो.

मी अनेकांना अनेक वेळा एकच प्रश्न विचारीत असे की संगीतात गोडवा कशामुळे येतो पण कुणीही मला समाधान कारक उत्तर देऊ शकलं नव्हत. मी जेव्हा संगीताच्या प्रक्रियेत आणखी साकल्यानं शिरलो तेव्हा कळलं की गोडवा म्हणजे तुमची स्वतःशी एकरूपता आहे. ज्यावेळी तुम्ही वादनात पूर्णपणे तल्लीन होता तेव्हा तुमच्या जाणीवेत काहीही राहत नाही, तुमची जाणीव एका शांत आणि अनिर्बंध अवकाशा सारखी होते ज्यात कुणीही नसतं फक्त गाणं वाहत असतं आणि त्याला गोडवा सहज प्राप्त झालेला असतो. 

ज्यावेळी आईन्स्टाईन 'स्पेस इज द फोर्थ डायमेन्शन ऑफ टाइम' म्हणतो त्यावेळी त्याला ही आकाराची निराकार स्थिती अपेक्षीत असते. जीजस जेव्हा 'देअर वील बी नो टाइम इन माय किंग्डम ऑफ गॉड' म्हणतो त्यावेळी त्याला अवकाशाची ही आनंदघन स्थिती अपेक्षीत असते. जीजसच्या क्रॉसचा तो मध्य बिंदू असतो! क्रॉसची आडवी रेघ ऐकणे दर्शवते आणि उभी रेघ बघणे दर्शवते ज्या क्षणी तुम्ही ऐकणं आणि बघणं याचा तुमच्या भ्रूमध्यात असलेला मध्य साधता आणि संगीतात उतरता तेव्हा तुमच्या संगीताला निराकाराचा स्पर्श झालेला असतो. एकहार्ट आणि ओशो म्हणतात तसे तुम्ही मनापासून मुक्त झालेले असता. तुमचं एकसंध झालेलं मन आणि शरीर त्यांच्या मुळात अस्तित्वाशी असलेल्या एकरूपतेला उपलब्ध झालेलं असतं आणि तुमच्या गाण्याची मजा काही औरच झालेली असते. सुर, लय आणि ताल या परिमाणां पलिकडे जाऊन तुमच्या गाण्याचे शब्द अवकाशात तरंगायला लागलेले असतात!

संजय