आखाती मुशाफिरी (२४)

आता उद्यापासून संयंत्र कार्यान्वित करण्याचे (commissioning)  आणि नवीन डक्ट्सचे उभारणीचे काम सुरु होणार होते. संयंत्र कार्यान्वित करण्याच्या कामी मला एक नवीन मदतनीस मिळणार होता.
---------------------------------------------------------------------
काल संयंत्र हलविण्याच्या कामात माझी जी धावपळ झाली होती त्याचे परिणाम त्यावेळी आज सकाळी जाणवत होते. खांदे,मान, पाठ, आपले निराळे अस्तित्व दाखवीत होते. सकाळी बिछान्यातून अगदी उठवत नव्हते. एकदा वाटले, कार्यालयाला फोन करून आजची सुटी घ्यावी. पण धीर होत नव्हता. लहानपणी माझी आजी म्हणायची, राजाला आणि मोतद्दाराला कधी सुटी घेता येत नाही. राजा तर मी नव्हतो. मोतद्दार मात्र असेन कदाचित्‌. कसाबसा उठलो, सकाळची आन्हिके उरकली आणि तयार झालो. घड्याळाचे कांटे आज फार भर भर चालत होते. उशीर झालाच होता. रोजच्या प्रमाणे जेवणच काय पण न्याहारी करायलाही सवड नव्हती. शीतकपाटात डोकावले. एक केकचा तुकडा शिल्लक होता आणि खोक्यात थोडे दूध. अडीअडचणीला उपयोगी पडावे म्हणून मी एखादा दुधाचा खोका आणून ठेवीत असें. दूध गारच प्यायलो, केकचा तुकडा घशांत कोंबला आणि वर एक वेदनाशामक गोळी ढकलली. घरातुन बाहेर पडतांना टेबलावरचे घड्याळ माझ्याकडॆ डोळे वटारुन पाहात होते.

गाडी सुरु करतांना समोर लक्ष गेले तर मोटारीची इंधन-मात्रा दर्शविणार्‍या सुईने मान टाकलेली. इंधन-भरण-स्थानकावर (gas filling station) पोहोचलो तर तिथेही एक लहानशी कां होईना रांग लागलेली. नेमक्या घाईच्या वेळीच अशा अडचणी कां येतात? चरफडणे या शब्दाचा अर्थ सार्थ करीत इंधन भरून होताच त्या इंधन भरणार्‍या पोर्‍याच्या हातात मी नोटा कोंबल्या आणि उरलेली सुटी चिल्लरही न घेता गाडी पिटाळली ती थेट कारागृहाकडे.

" काय रे, उशीर केलास. बरा आहेस ना तूं?" पहिली सलामी इदीनेच दिली.
" झक्कास! जिवंत आहे अजून."
" जिवंत तर तुला राहावेच लागेल. निदान तो अब्राहम (मुदीर) तुला शवपेटिकेत बंद करेपर्यंत तरी."
" कां ? काय झालं? फोन आला होता की काय त्याचा?"
" त्याचा नाही. त्याच्या बायकोचा आला होता. म्हणत होती अब्राहम हल्ली झोपेत सुद्‌धा हरूऽन, हरूऽन म्हणून  ओरडत  असतो. त्यामुळे तो तिच्या वाट्यालाही येत नाहीए. "
" गप्प बैस इदी. कृपा करून चेष्टा नको. "
" बरं. आता गंभीरतेने सांगतो. अब्राहमचा तीन वेळा फोन आला होता. तुला त्याने फोन करायला सांगितले आहे."
" धन्यवाद. मी त्याला जरा वेळाने फोन करतो. आधी कामाचे पाहातो."
  मी हातावरच्या मनगटी घड्याळाकडे पाहात उत्तरलो. सुमारे सव्वातास उशीर झाला होता. मी डक्ट्स काढण्याच्या कामाकडे वळालो. शेवटच्या टप्प्यासाठी बॅटीने परांचा (scafolding) लावलेले होते. तो त्याचावरती बसून विजेवर चालणार्‍या करवतीने डक्ट्चा एक मोठा भाग कापून काढण्याच्या प्रयत्‍नात होता आणि महादू त्याला मदत करीत होता. माझी चाहूल लागताच त्याने करवत बंद केली.

" शुभप्रभात बॅटी !"
" शुभप्रभात हरून. कसा आहेस तूं?"
" मी छान आहे. काम कसें चालले आहे?"
" झाले. आता संपतच आले आहे. हा शेवटचा तुकडा उरला आहे. तुझ्या बाकी तीन माणसांना मी जुन्या डक्ट्स घेउन   जाणार्‍या माल मोटारीबरोबर कारखान्याकडे पाठवले आहे. ते नवीन डक्ट्स घेऊनच येतील.मला क्षमा कर मित्रा. तुझी परवानगी न घेता ते मी केले."
" छे, छे ! तुला माझी परवानगी मागण्याची कांही गरज नाही‘. तु केले तें योग्यच केलेस."
 " अरे हो! तिकडे एक पाहुणा आला आहे तुला भेटायला. संयंत्राजवळ थांबला आहे. जा त्याला भेट."
" धन्यवाद ! मी तिकडेच जाणार आहे. आज संयंत्राची चांचणी घेता येईल कां? अर्थात्‌ ते काम तूच करणार आहेस.  मी फक्‍त लागेल ती मदत मात्र करीनच."
" काळजी करु नकोस. मी आहेच मदतीला. लागेल तेंव्हा मला बोलव. माझे आतील काम संपत आले आहे."

मी संयंत्राच्या गाळ्याकडे जाऊन पोहोचलो तेंव्हा तिथे एक पाठमोरा तरूण मोजफितीने (measuring tape) संयंत्राजवळ कांहीतरी मोजत असलेला दिसला. माझी चाहूल लागताच तो सामोरा झाला. मी या तरुणाकडे पाहातच राहिलो. केवळ ’अप्रतिम मर्दानी सौंदर्य’ हे शब्दही अपुरे पडावे इतका तो देखणा होता. सहा फुटाच्या आतबाहेर उंची. गौर वर्ण. शिडशिडीत पण मजबूत बांधा. आणि त्यावर कडी म्हणजे उत्तम रंग संगतीचे नीटनेटके ल्यालेले कपडे. माझ्या भाव समाधीचा भंग करीत तो उद्‍गारला,

" शुभप्रभात सर. "
" शुभप्रभात. तूं..."
" सर, मी इम्‍तियाज. इम्तियाज अख्तर. इलेक्‍ट्रिशियन. रजेवर गेलो होतो. आजच हजर  झालो. नवीन यंत्राची जोडणी करण्यासाठी मला पाठवले गेले आहे. "
" खूपच छान. मी हरून. इथल्या कामाचा भार माझ्याकडे आहे. तुझं स्वागत असो.  काय पाहिलंस तूं? "
" सर, इथे एक जुना वीज-जोडणीचा संच (isolater) लावलेला आहे. पण  तो    तितक्याशा चांगल्या अवस्थेत नाही. बदलावा लागेल. आणि शिवाय जोडणीसाठी पुरेशी  वीजवाहिकाही (cable) लागेल."
" छान. तूं माझ्याबरोबर चल. तुला लागणारे बहुतेक साहित्त्य आलेले आहे. ते मी  तुला  दाखवतो. ते तू पाहून  घे.  त्याशिवाय आणखी कांही लागणार असेल, तर तसे  सांग.  त्याची लगेचच व्यवस्था होईल. मात्र हे संयंत्र आज सुरु  होईल असें पहा."
  " सर, आणखी एक गोष्ट लागेल. "
 " ती कोणती? "
 " तापमान-नियंत्रकासाठी (thermostat) तार (wire) लागेल. "  मला त्याच्या बुद्धीच्या तत्परतेचं कौतुक   वाटलं.
" ते आपण नंतर पाहाणार आहोत. तापमान-नियंत्रकाची जागा अजून निश्चित झालेली नाही. "
" तरी पण सर, ते जोडल्याशिवाय संयंत्र चालूच होणार नाही."
" तु कामाला सुरुवात तर कर. संयंत्र चालू करतेवेळी आपण तापमान-नियंत्रक तात्पुरता जोडून चांचणी घेऊ."

 तापमान-नियंत्रक जोडल्याशिवाय संयंत्र चालूच होणार नाही याची इम्‍तियाजला त्याची कल्पना होती तर. त्याला   बरीच माहिती असावी. तो खरोखर इतका हुशार असेल एक  चांगला मदतनीस म्हणून मला त्याचा उपयोग होऊ शकला असता. पण मी भानावर आलो. त्याच्ची माझी अजून पुरती ओळख झालीही नव्हती आणि मी चांगल्या मदतनिसाची स्वप्नं पाहायला लागलो होतो. एकदम मला मुदीरला फोन करायचा आहे याची आठवण झाली.
मी इम्तियाजला आमच्या तेथील तत्पुरत्या वापराच्या भांडाराकडे घेऊन गेलो. त्याला लागणारे साहित्त्य काढून घ्यायला सांगितले आणि मुदीरला फोन करण्यासाठीं इदीच्या कक्षाकडे वळालो.

मी मुदीरशी बोललो. तो मला इतक्या तातडीने कां शोधत होता त्याचा उलगडा झाला. आमचे काम एव्हाना जवळ जवळ साठ टक्क्यापेक्षा अधिक झालेले होते. शिवाय संयंत्रही येऊन ठेपलेले होते. तेंव्हा संबंधित खात्याला चालू देयक (progressive bill)  सादर करून अदायगी (payment) मिळवावयाची होती. त्यासाठी आत्तापर्यंतच्या   कामाचा जो गोषवारा तयार करावा लागणार होता, तो मी तयार करावा अशी त्याची सूचना होती. खरं म्हणजे मला असली कारकुनी करण्याचा मनस्वी कंटाळा. पण मला ते फरसे जड जाणार नव्हते. रोज झालेल्या कामाची नोंद एका रोजनिशीत लिहून ठेवण्याची संवय मी स्वत:ला लावून घेतली होती. तिचा नेहमीप्रमाणे उपयोग होणार होता. तरी मी दोन दिवसांची मुदत मागून घेतली.

बॅटीच्या कामाकडे एक नजर टाकावी म्हणून मी तिकडे गेलो तो बॅटी अजून वरतीच लटकलेला होता. पण त्याचे हातातले काम जवळ जवळ संपत आले होते. त्याच्याशी थोडे बोलुन मी इम्तियाज कडे वळालो. संयंत्रापासून वीज जोडणी संचापर्यंतची वीजवाहिका बसविण्याचे त्याचे काम चालु होते. त्याची कामातली सफाई कौतुकास्पद होती. किंचित्‌ काम थांबवत त्याने विचारले,

" स्रर, एक विचारू? "
" हां. विचार."
" सर, तुम्ही कुठून आलात."
" भारतातून! तूं ? "
" भारत ! वाह्‌ ! मी पाकिस्तानातून आलो "
" तूं भारत, वाह्‌ म्हणालास. तें कां ? तुला भारताबद्धल कुतुहल आहे वाटातं ?"
" नुसतंच कुतुहल नाही सर, भारताबद्ध्ल मला थोडीफार माहितीही आहे. आणि कां   नसावी. माझा जन्म भारतातच झाला आहे."
" अरे व्वा! तें कसं काय?"
" ती एक फार मोठी कथा आहे, सर. भारत पाकिस्तान फाळणी पूर्वी माझे आजोबा    कांच सामानाचा व्यापार करण्यासाठी भारतात सियालकोटला गेले ते तिकडेच स्थायिक  झाले. फाळणीच्यावेळी आजोबा पाकिस्तानात आले पण माझे वडील भारतातच राहिले.  एकोणीसशे सत्तावन्न साली माझा जन्म झाला आणि त्यानंतर दोन वर्षांनी वडील  अपघातात गेले. माझ्या आजोबांचे त्यांच्या सुनेवर, माझ्या आईवर फार प्रेम होते. ते   तिला मुलीप्रमाणेच मानीत. त्यांनी नंतर खूप प्रयत्‍न करून आम्हाला पाकिस्तानात  नेले. आजोबा गेले आणि त्यानंतर जणू आभाळच कोसळले. घरदार, जमीनजुमला  यांच्या वाटण्या झाल्या. आजोबांना नऊ भाऊ होते. माझ्या आईच्या वाट्याला जेमतेम   उदरनिर्वाहाला पुरेल इतकीच जमीन आली. तीही बटाईने दिलेली. ...."

 तो बोलता बोलता अचानक थांबला.

" माफ करा सर. मी आपला बोलतच सुटलो. ते जाऊ द्या. सर तुम्हाला डिंपल कपाडिया  माहिती आहे?"

त्याच्या चेहर्‍यावर मघाशी पसरू लागलेली विषण्णता नाहीची झाली होती आणि पुन्हा एक लोभसवाणे हास्य उमलले होते.

" नाही. ती डिंपल कोण आहे ते मला माहिती नाही. "
" केवढं आश्चर्य आहे, तुम्हाला डिंपल माहिती नाही ते. भारतातली खूप मोठी सिने  तारका आहे ती. माझी फार आवडती आहे. परमेश्वराची इध्छा असेल आणि ती जर हो  म्हणाली तर मी लग्न करीन तिच्याशी. हा पहा तिचा फोटो. "

असं म्हणत या भाबड्या मुलाने खरोखरच त्याच्या बटव्यातून एक छायाचित्र काढून मला दाखवले. त्याछायाचित्रात खरोखर या इम्तियाज सारखीच एक भाबडी मुलगी घराच्या चौकटीला हात देऊन उभी होती. ती बहुदा स्वयंपाकघरातून कणीक मळण्याचे काम अर्धवट टाकून आली असावी. कार्ण तिच्या उजव्या हाताच्या बोटांना आणि गालाला ओली कणीक लागलेली होती. मी प्रश्नार्थक मुद्रेने इम्तियाजकडे पाहिले तर तो मिश्किल चेहऱ्याने गुणगुणला,

" चंद तस्वीरे बुतां, चंद हसीनोंके खुतूत, बाद मरनेके मेरे घरसे ये सामां निकला. "

मी गप्पांचा तास आवरता घेतला. इम्तियाजचे काम पूर्ण होतांच संयंत्राची चांचणी घ्यवयाची होती.

क्रमश: