गोपालकाला: एक आगळावेगळा चित्रपट

 

'नुने बनवलेला चित्रपटांचा लगदा' उर्फ ए. बी. सी. एल. आता सादर करीत आहोत आमचा आगामी, चाकोरीबाहेरच्या, मनोरंजक, अप्रतिम, मनातल्या अनेक भावतरंगाचा वेध घेणार्‍या,सर्व प्रकारच्या तांत्रिक करामतींनी खच्चून भरलेल्या इ.इ. असा चित्रपट : 'गोपालकाला'. हा चित्रपट शोले, दि. दु. ले.जा. ,धू१, धू२, ल. र. मु. भा. आदी चित्रपटांचा उच्चांक मोडेल अशी आमची पुरेपूर खात्री आहे. चित्रपटाची कथा ही अशी:

सुरुवात एका रम्य खेड्यात. इथे आपला नायक 'गोपाल' जंगलात एका दगडावर बसून  मग्न होऊन जत्रेतली फुग्याची पिपाणी वाजवतो आहे. (नायकांनी वाजवण्याची चावून चावून चोथा झालेली पावा, बासरी, गिटार, व्हायोलिन,पेटी इ. वाद्ये आम्ही मुद्दामच टाळली आहेत.) शेजारी बसून एक गाढवीण आणि एक कावळा धुंदपणे ऐकत आहेत. इतक्यात आकाशातून मंगळावर जाणार्‍या एका अंतराळयानातून एक कॅमेरा कावळ्याच्या डोक्यावर पडतो आणि कावळा मरतो. हा कावळा 'इच्छाधारी कावळा' म्हणजेच कावळ्याचे रूप घेतलेला यक्ष असतो आणि तो गाढविणीच्या रूपात असलेल्या यक्षिणीबरोबर 'म्युझिक हिअरिंग' करत असतानाच हा व्यत्यय आलेला असतो. त्यामुळे मरताना तो चिडून शाप देतो की अंतराळयानातल्या मनुष्याला पण आपल्या प्रियजनाशी असाच विरह सहन करावा लागेल. आपला नायकही संतप्त होतो आणि प्रतिज्ञा करतो की 'जोपर्यंत मी या अंतराळयानातल्या व्यक्तीचा बदला घेत नाही तोपर्यंत मी या भूतलावर कोणत्याही पिपाणीला हात लावणार नाही'.  आता पडद्यावर लाल हिरव्या पिवळ्या अक्षरात आणि मराठी, हिंदी, इंग्लिश, बंगाली, गुजराती, काश्मिरी, तुळू, उर्दू,तमिळ, तेलुगू,कन्नड या भाषांत 'गोपालकाला' नाव धावत असते आणि वर कावळे उडत असतात,खाली गाढवे धावत असतात. या नावांच्या आणि कावळ्या-गाढवांच्या ऍनिमेशनसाठी आम्ही खास हॉलिवूडहून पाच तंत्रज्ञ बोलावले आहेत. 

दृश्यबदल. आता कॅमेरा आधी आकाशातला ठिपका दाखवतो..मग ठिपका मोठा मोठा होत होत अंतराळयान दिसते..मग त्याचा आतला भाग. इथे आपल्या नायिकेचा कथानकात प्रवेश. तिने अंतराळात जाण्यासाठी विशेष कापडाचा मिनिस्कर्ट आणि लहानसे झबले घातले आहे. 'तुझा अंतराळयानातला एखादा फोटो पाठव' असे तिच्या प्रिय 'डॅडी'नी सांगितल्याने ती कॅमेरा व्यवस्थित आपोआप फोटो निघेल अशा सेटिंगवर लावून समोर उभी असते तितक्यात जोराची हवा येते, अंतराळयान तिरके होते आणि कॅमेरा खिडकीतून खाली पडतो..कॅमेर्‍याशिवाय मंगळावर जाऊन उपयोग नाही म्हणून ती यान फिरवून परत अमेरिकेत वळते..

इथे नायक परत आपल्या झोपडीवजा घरी जातो. त्याची माँ शिवणयंत्रावर काहीतरी शिवत बसलेली असते. तिला गोपाळ सांगतो की 'आई, मला अमेरिकेत जायचं आहे.' माँ बरं म्हणते आणि कपडे शिवायला लागते.गोपाल झोपल्यावर माँ देवापाशी उभी राहते. देवाला म्हणते, 'देवा, मी आजपर्यंत तुझ्याकडे जे मागितलं त्यातलं काहीच तू अजून दिलेलं नाहीयेस.मागच्या वेळी माझ्या पोराला पल्सर फटफटी घ्यायला पैसे हवे होते तेव्हापण तू दिले नाहीस. आयपॉड घ्यायचा होता तेव्हापण दिले नाहीस. पण आज जर तू माझ्या लेकाला अमेरिकेला जाण्यासाठी पैसे मिळवून दिले नाहीस तर माझा तुझ्यावरचा विश्वास कायमचा उडेल आणि मी नास्तिक बनेन. बोल देतोस पैसे का करू धर्मांतर?? बोल!बोल!' प्रत्येक 'बोल' बरोबर  देवाची मूर्ती उभी आडवी थरथरतेय..बाहेर विजा चमकतायत.ढग गडगडतायत..आणि अचानक मूर्तीच्या हातातून माँच्या डोक्यावर 'पुणे सेंट्रल' या भव्य दुकानातले किमतीचे लेबल पडते. विजा इ. थांबतात. माँ रात्रभर जागून एकदम सुंदर कपडे शिवते आणि सकाळी ते 'पुणे सेंट्रल' ला विकते आणि गोपालला नोटांची चळत हातात देते. ती म्हणते, 'जा बाळा, परदेशात जाऊन आपल्या देशाचं नाव उज्ज्वल कर आणि येताना माझ्यासाठी चांगलंसं 'ऍलो व्हेरा मसाज क्रीम' आणि चॉकलेटं पण घेऊन ये!' नायक पाया पडून घरातून निघतो.

आपला [float=;]हा अर्धे धोतर, बंडी आणि गाठोडे वाला नायक विमानात बसतो आणि विमान उडते. एका गोर्‍या हवाई सुंदरीकडे हा उसाचा रस मागतो आणि त्यांचे भांडण होते.[/float] पण वाटेत विमानाच्या पंखाला छिद्र पडते आणि गोपाल आपले लाखेचे कडे वितळवून ते बुजवतो आणि विमान वाचवतो. हवाई सुंदरी त्याच्या प्रेमात पडते. नायक अमेरिकेत उतरतो आणि चार पाच माणसांना पत्ता विचारून 'मासा' (मराठी एरो स्पेस असोसिएशन) पाशी येतो. तिथे त्याला गेटावरून आत सोडत नाहीत. पण नायक पिझ्झावाल्या पोर्‍याचे रूप घेऊन आत घुसतो आणि एका खोलीत जातो. ती खोली असते 'मासा' च्या प्रमुखांची. गोपालला पाहून ते आनंदाने त्याला मिठी मारतात. पाच वर्षापूर्वी ते भारतात आले असताना जंगलात त्यांच्यावर वाघाने हल्ला केलेला असतो आणि आपल्या गोपालने पिपाणी वाजवून वाघाला झोपवून त्यांचा जीव वाचवलेला असतो. गोपालला लगेच मासात नोकरी मिळते आणि त्याला योगायोगाने नायिकेबरोबर मंगळावर पाठवले जाते. अंतराळयानात गप्पा मारता मारता गोपालला कळते की आपल्या सूडाचे 'टार्गेट' हीच आहे. म्हणून तो नायिकेला अंतराळयानातून ढकलून देण्याचा प्रयत्न करतो. नायिका खिडकीला लटकते आणि त्याला आपण कॅमेरा मुद्दाम नाही टाकला हे समजावते. गोपाल आपले मन बदलून तिला आत घेतो. ते मंगळावर उतरतात आणि यानातलं पेट्रोल संपून ते तिकडे अडकतात. पाऊस पडायला लागतो आणि नायिका पावसात भिजून गाणं म्हणते. 'आय नो माय गोपाल इज काला, बट आय लव्ह हिम बिकॉज ही इज दिलवाला, मंगलपर हमारे प्यार को लगा है ताला, पहनादो मुझे हिरोंकी माला, आय हॅड अ क्रश ऑन धोतरवाला, जोइये नथी हमे पेट्रोल टँकरवाला'(गाण्यात हिंदी व इंग्रजीबरोबरच 'धोतर' हा मराठी शब्दही वापरून आम्ही महाराष्ट्राचा जाज्वल्य अभिमान दाखवला आहे. तसेच दोन गुजराती शब्द वापरून गुज्जू बांधवांनाही चित्रपट आपला वाटेल अशी व्यवस्था केली आहे. या गाण्यासाठी आम्ही २ कोटी रुपये खर्च केला आहे. अंतराळपोशाखातल्या शंभर सुंदर विदेशी नृत्यांगना मंगळावर साल्सा नाचताना दाखवल्या आहेत. चित्रपटातील हे महत्त्वाचे गाणे आणि शीर्षकगीत आहे आणि हे खूप गाजणार आहे.) पाऊस संपल्यावर नायिका अंतराळयानातले सीटकव्हर पांघरून आपला ओला झालेला अंतराळपोशाख काढून वाळत टाकते. आणि मग मंगळावर रात्र होते. शेजारी नायकाचा अंतराळपोशाख पडला आहे.पृथ्वीवरून नेलेला बॅटरीवर चालणारा दिवा लुकलुकत राहतो. (पुढचे दर्शकांच्या कल्पनाशक्तीवर सोडले आहे.आम्हाला 'इश्श/अव्वा' दृश्ये दाखवून चित्रपटाचा बाल प्रेक्षकवर्ग गमवायचा नाहीय.)

दृश्यबदल. नायकाची आई रस्त्यावरून डोक्यावरून कपड्यांचे गाठोडे घेऊन 'पुणे सेंट्रल'कडे जात आहे. इतक्यात एक गाढवीण(आठवा चित्रपटाची सुरुवात!) भरधाव धावत येते आणि 'माँ' ला खाली पाडते. 'माँ' ची दृष्टी आणि स्मृती दोन्ही जातात. मोटारीतून कपडे खरेदीसाठी पुणे सेंट्रलला जात असलेली हवाई सुंदरी 'माँ' ला वाचवते आणि घरी आणते. ती 'माँ' ची खूप सेवा करते. डोक्यावरच्या तापाच्या घड्या रात्रभर जागून बदलत असते. (कृपया 'गाढविणीने लाथ मारल्यावर ताप येतो का' असे मूर्खासारखे प्रश्न डोक्यात आणू नये. ताप येतो. शंका असेल तर स्वतः गाढविणीकडून लाथ मारवून घ्या.) हवाई सुंदरी स्वतःची सोन्याची साखळी विकून ऑपरेशन करवून नायकाच्या आईची दृष्टी परत आणवते.योगायोगाने दवाखान्यातून घरी येताना रस्त्यावरच्या खड्ड्यात पडून नायकाच्या आईच्या डोक्याला लागते आणि स्मृतीपण परत येते. नायकाची आई आपली सून म्हणून हवाई सुंदरीला पसंत करते. हवाई सुंदरीला पण पिपाणी वाजवणार्‍या नायकाचा फोटो पाहून 'हा चालेल' याची खात्री पटते. आणि ती तिच्या मागे घुटमळणार्‍या पायलटला बाणेदारपणे नकार देऊन नायकाच्या घरीच राहायला जाते.

चिडून हा पायलट हवाई सुंदरी आणि एक अंतराळयान चोरून मंगळावर निघून जातो. मंगळावर एका बाजूला गोपाल आणि आपली नायिका.. दुसर्‍या बाजूला पायलट आणि तोंडात बोळा घातलेला असतानाही 'ऑ जॉ रे मॉय तेरी रॉह मे तॉडॉपती हॉ व्हेन ऑर यू गाँइंग टू किस मी' (आम्ही सर्वच गाणी बहुभाषीय ठेवली आहेत, यायोगे आम्हाला परदेशी प्रेक्षकवर्गही लाभेल.)असे विरहगीत म्हणणारी हवाई सुंदरी.

[float=side:right;]इथे 'मासा' मध्ये गदारोळ झालेला आहे. पेट्रोलपंपांचा बेमुदत संप असल्याने पेट्रोल लवकर पाठवणे शक्य नाही. तितक्यात यांना व्हिडिओफोनवर मंगळावरचा पायलट दिसतो.[/float] त्याने हवाई सुंदरीला सोडण्याच्या बदल्यात पेट्रोल आणि दोन कोटी डॉलर्स मागितलेले असतात. 'मासा' प्रमुख ते द्यायचे कबूल करतात. सर्वजण त्यांना विरोध करतात. इथे चित्रपट भूतकाळात जातो: (आणि चित्रे रंगीत ऐवजी 'श्वेत-श्याम' उर्फ ब्लॅक अँड व्हाईट होतात..)

'मासा' प्रमुख तरुण असतानाची गोष्ट. त्यांचं एका स्वित्झरलँडच्या तरुणीवर प्रेम असतं. (आम्ही स्वित्झरलँड मध्ये एक बाग भाड्यानेच घेऊन ठेवली आहे. दरवेळी चित्रपटात माफक बदल करून तीच दाखवतो.) आणि ते लग्न करणार असतात. स्वि. तरुणी 'माँ.' बनणार असते. तितक्यात लग्नमंडपात असतानाच त्यांना हपिसातून फोन येतो आणि चंद्रावर जावे लागते. वाटेत पहिल्यांदाच चंद्रावर जात असल्याने ते वाट चुकून शुक्रावर जातात. तिथून परत वळून त्यांना चंद्रावर जावे लागल्याने परत यायला उशीर होतो. मधल्या काळात तरुणी 'माँ' बनून तिला एक मुलगी झाली आहे. (सुज्ञ दर्शकांनी ओळखलंच असेल की तीच ही हवाई सुंदरी.) आणि तरुणीचे आई वडील तिचे दुसर्‍या तरुणाशी लग्न लावून द्यायला बघतात. ती 'मासा' च्या विमानाखाली जीव देते. आणि मासा प्रमुख दु:खी होऊन एका मराठी मुलीबरोबर लग्न करतात आणि ती लहान मुलगी दत्तक घेतात. ही मुलगी मोठेपणी हवाई सुंदरी होते. तीच ही!! (इथे चित्रपट परत रंगीत होतो.)

दरम्यान आपण आपले नायक नायिका जे मंगळावर अडकले आहेत त्यांच्याकडे वळू. नायिका नायकाला आपण 'माँ' बनणार असल्याची बातमी देते. नायक आपल्या आईला फोन करून ही बातमी कळवतो. (कृपया मंगळावर फोन जोडणी कोणी दिली वगैरे असंबद्ध प्रश्न विचारू नयेत. आमचा चित्रपट प्रगत आहे.) आई त्याला हवाई सुंदरीशीच तू लग्न कर 'नही तो मै तेरा लाया क्रीम नही लगाउंगी' अशी धमकी देते. गोपाल मोठ्या पेचप्रसंगात पडतो. नायिका हे संभाषण ऐकते आणि हवाई सुंदरीच्या ताब्यात नायकाला देण्याचं ठरवून स्वतः त्याग करते. नायकाचा गैरसमज घडवून आणण्यासाठी ती अचानक समोर आलेल्या पायलटला मिठी मारते आणि त्याच्यावर प्रेम असून मूलही त्याचंच आहे असं जाहीर करते. नायक दु:खी होऊन दाढी वाढवतो आणि मंगळावरच फिरायला जातो. नायिका आधी तिनेच मिठी मारलेल्या पायलटाला ढकलून देते आणि त्याला सांगते की तिने नाटक केलं होतं. कुठूनसा तरी एक कावळा अचानक उडत येऊन अंतराळयानातल्या टेपरेकॉर्डरच्या बटणावर बसतो आणि नायिकेचे संभाषण टेप होते. आता हा कावळा उडत उडत नायकाकडे जातो आणि त्याला चोची मारून मारून अंतराळयानात आणतो आणि ते संभाषण ऐकवतो. पण उशीर झालेला असतो. पायलटाने आता नायिकेला पण पळवलेले असते.

दृश्यबदल. 'मासा'मध्ये आपल्या मुलाची चौकशी करत गोपालची 'माँ' येते आणि तिला तिथून अपमान करून बाहेर काढलं जातं. ती एका खिडकीसमोरून जात असताना तिच्या कानावर पेट्रोलची समस्या पडते. 'माँ' आत जाऊन त्यांना पेट्रोल ऐवजी समोर झाडूवाला वापरत असलेलं फिनेल घालून अंतराळयान चालवून बघण्याचा सल्ला देते. आणि अंतराळयान चालतं. सर्वजण माँ ची स्तुती करत असतात आणि परत चित्रपट भूतकाळात नेऊन आपल्याला दाखवलं जातं की 'माँ' अमेरिकेत शास्त्रज्ञ होती. आणि तिच्या  बरोबरच्या शास्त्रज्ञाने तिच्यावर चोरीचा खोटा आळ आणून अमेरिकेतून हद्दपार करवले. म्हणून भारतात येऊन (तेव्हा 'माँ' नसलेली)'माँ' चरितार्थ चालवण्यासाठी कपडे शिवायला लागली. तिचे लग्न एका शिंप्याशी झाले आणि त्यांना गोपाल नामक (सध्याचा महान पिपाणीवादक) मुलगा झाला.

फिनेलची टाकी मंगळावर पाठवली जाते.पायलट मुसक्या बांधलेली नायिका  आणि हवाई सुंदरी यांच्यासह पृथ्वीवर जायला निघतो. गोपाल आणि त्याची हाणामारी होते. गोपाल खाली पडतो. पायलट त्याला गोळी मारतो पण मध्येच हवाई सुंदरी येते आणि गोळ्या स्वतःवर झेलते. मरता मरता ती तिच्याजवळची पिपाणी नायकाला देते नायक आपल्या प्रतिज्ञेमुळे नकार देतो आणि तिला प्रतिज्ञा सांगतो. ती त्याला त्यातला 'भूतलावर' हा शब्द सांगून मंगळावर पिपाणी वाजवायला हरकत नाही असे सांगते आणि मरते. गोपाल पटकन पिपाणी वाजवून पायलटला झोपवतो. नायक नायिका सुखरूप पृथ्वीवर येतात आणि लग्न करतात. झालेले मूल हुबेहूब कावळ्यासारखे दिसते आणि यक्षाची नायिकेला शापातून मुक्त केल्याची आकाशवाणी होते. पायलटचा प्रेमभंग होऊन तो कायमचा शुक्रावर निघून जातो.

[float=;]नायिकेबरोबर आणि गाढवीण व छोट्या गाढवाबरोबर जंगलात पिपाणी वाजवणार्‍या नायकावर चित्रपट संपतो. चित्रपटाच्या शेवटी आम्ही एक भन्नाट आयटम साँग घेतले आहे.[/float](असे साँग ठेवले म्हणजे लोक चित्रपट संपल्यावर उठताना दाराशी चेंगराचेंगरी करत नाहीत.) यात नायक (डोक्याला हेअरबँड लावून), नायिका(नेहमीप्रमाणे कमीत कमी कपडे घालून आणि निळे केस रंगवून), कावळा(विवस्त्र), गाढवीण(विवस्त्र), नायकाची आई(जीन्स कुर्ता घालून), 'मासा' प्रमुख(लो वेस्ट जीन्स आणि टीशर्ट मध्ये), हवाई सुंदरी(आखूड घागरा चोळी घालून), पायलट(वेणी घालून), नायिकेचे वडील(चित्रपटात त्यांना अगदी कमी वाव असल्याने रागावून) हे सर्वजण डिस्कोत नाचत आहेत. आणि मग श्रेयनामावली इ.इ.  या गाण्याच्या सुरुवातीला आम्ही येशू ख्रिस्त,अल्ला व दत्तगुरुंविषयी एक आक्षेपार्ह दृश्य टाकले आहे आणि चित्रपट संपल्यावर चित्रपट गृहातील जुन्या खुर्च्यांची मोडतोड करण्यासाठी भाड्याने गुंड ठेवले आहेत. 'आक्षेपार्ह दृश्य खरेच आक्षेपार्ह आहे का' याविषयी 'परसों तक' या बातमी  वाहिनीवर शुक्रवारी दिवसभर सेन्सॉर बोर्डाचे चार सदस्य चर्चा करणार आहेत.

या चित्रपटाने देशभक्ती, तंत्रज्ञान, भूतदया, प्रेम, रसायनशास्त्र, संगीत, रहस्य, मराठी अस्मिता, पुण्याचे खड्डे, अमेरिकेत स्थायिक भारतीय,आंतरजातीय विवाह,विमानात दिली जाणारी पेये,मॉल्सचे वाढते महत्त्व,कुमारी मातृत्व,जगासमोरील इंधनसमस्या,दत्तकविधी,सेन्सॉर बोर्डाची तत्त्वे  अशा अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर उहापोह केला आहे. चित्रपट पटकन लोकप्रिय होण्यासाठी प्रत्येक खेळाला 'लकी ड्रॉ' ठेवून विजेत्यांना चित्रपटातील मुख्य कलाकार असलेल्या कावळा व गाढविणीबरोबर एक पूर्ण दिवस घालवण्याची सुवर्णसंधी देणार आहोत. ऑस्कर आणि 'कॅनेस फिल्म फेस्टिव्हल' ची तिकीटं आम्ही आधीच काढून ठेवली आहेत. आता फक्त येत्या शुक्रवारी चित्रपट प्रदर्शित होण्याचीच वाट पाहत आहोत.

ता. क.: गोपालकाला हा चित्रपट मूळचा एका टांझानियन चित्रपटावरून तंतोतंत उचललेला आहे अशा वावड्या आमचे काही विरोधक चित्रपट प्रदर्शित होण्याआधीपासूनच उठवत आहेत. आमचे नाणे खणखणीत असल्याने आम्हाला या अफवांचे खंडन करायचे नाही, आणि 'आम्ही फक्त रशियन चित्रपटच उचलतो' हे माहिती असलेल्या आमच्या प्रेक्षकवर्गाला आमच्या शुद्ध चारित्र्याबद्दल शंका अजिबात येणार नाही हे आम्ही जाणतो.

-समाप्त-
(शु. चि. चालत नसल्याने चुकांबद्दल चुभूदेघे.
-अनु)