नगरी पतंग महोत्सव

 

संक्रांतीला १४ / १५ जानेवारीला अहमदाबादमधे, मुंबईमध्ये जो पतंग उत्सव दिसतो, तितक्याच उत्साहात नगरामध्ये पतंगबाजी होते. ही पतंगबाजी दिवाळी संपली की, लगेच सुरू झालेली असते. पोरं कधी एकदाची शाळा सुटतेय आणि पतंग उडवायला मिळतेय ह्याची वाट पाहतं असतात. दिवसही लहान झालेला असतो त्यामुळे संध्याकाळी शाळा सुटली की, अंधार होईस्तोवर जेमतेम अर्धा-पाऊण तास मिळतो. शनवार-रवीवारी मात्र फुल्ल धमाल!

दिवाळीनंतर पतंगबाजी सुरू होण्याची काही शास्त्रीय कारणे आहेत तर काही अशीच. थंडीच्या काळात वारं ९०% वेळातरी हळुवारपणे वाहतं. दुपारी जरा वेग वाढतो व हवा वर जाऊ लागते, त्यामुळे पतंगांना चांगली थाप लागते. वाऱ्याची दिशाही खूप सोयीची असते. दिवसभरात पतंग उडवणाऱ्यासाठी योग्य असते. सकाळी उत्तरेकडे वाहणारं वारं, सूर्य डोक्यावर आला की, पूर्व, उत्तर, दक्षिणेकडे आलटून-पालटून वाहू लागतं. संध्याकाळी मात्र कधी उत्तर तर कधी दक्षिण असं स्थिरावतं. त्यामुळे पतंगबाजाच्या डोळ्याला सूर्याचा त्रास होत नाही. असे सोयीचं वारं इतर ऋतूत सहसा नसतं. 

ह्या पतंगबाजांची भाषा एकदम टरारबुंग असते. त्यातील शब्द खूप मजेदार असतात त्याचीच ही गोष्ट-

पतंगांची नावं: 

१. टुक्कल: लहान पोरं ५ पैसेवाली पतंग घेऊन उडवायचे ती ही. वीतभर रुंदीची आणि सहसा शेपूट लावल्याशिवाय न उडू शकणारी. 

२. शेपटाड: ही पतंग अशी कोणतीही की जी, शेपूट लावल्याशिवाय नाही उडू शकत. शेपूत लावण्याचं कारण म्हणजे एखादी पतंग स्थिर राहून उडू शकत नाही, गिरक्या घेत राहते, मध्येच खपते, एका बाजूला कलते. अशा पतंगीला मीटरभर लांबीची पेपरची (वर्तमानपत्राची) शेपूट लावतात. ह्या शेपटीचं वजन पतंगापेक्षा जास्त होऊ नये ही काळजी घ्यावी लागते. टुक्कलला काळजीने शेपूट लावावी लागते. 

३. बॉम्बेटॉप: ही मशिनमेड पतंग पुण्याहून विक्रीसाठी येते. महाग असल्यामुळे फारशी लोकप्रिय नव्हती. पण दिसायला रुबाबदार!

४. दाढी: ह्या पतंगाला खालील दोन बाजूला एक वाढीव ताव लावलेला असतो, जो दाढीसारखा दिसतो. ही पतंग वारं जरा जोरदार असलं की, फर्रर्र.. असा आवाज करते, त्यामुळे हिला फर्रेबाज असेही म्हणतात

५. तागाभरी: पतंग जसजसा आकाराने मोठा होतो, तसा त्याच्या तावावरील ताण वाढतो. त्यामुळे ताव खालच्या बाजूने फाटतो. असे होऊ नये म्हणून त्यास बारीक दोरी लावून ताव त्या दोरीवरून वळवून चिकटवतात. हे नक्की काय सांगितले आहे ते नुसत्या वर्णनाने डोळ्यासमोर उभे करणे अवघड आहे. 

६. रब्द्या: हा सगळ्यात मोठा पतंग, हा कापला की, एकच जल्लोष होतो. हा कापलाही जातो कारण चपळ नसतो. हत्तीसारखा संथ, पटकन वळत नाही, त्यामुळे वरची गोत घेता येत नाही व तेथेच फसतो. पण वारं चांगलं असलं की, ह्याला असा काही ताण येतो की, बाकीचे पतंग ह्याच्या जवळपास जरी फिरकले तरी सपाक्कन कापले जातात. 

मांज्याची तयारी आणि त्यासंबंधातील शब्द:

दोऱ्याची वर्णने:

१. मसरई: साड्या विणण्यासाठी जो धागा वापरतात तो. अत्यंत बारीक पण नीट सुतवून उडवला तर टुक्कल उडवायला योग्य. नाहीतर टूक्कलचे वजन इतके कमी असते की, जाड धाग्याचा मांजा वापरला तर थोडी ढील दिली की, टूक्कल खाली बसते. मसरई वाला मांजा कापायला महाकठीण. गोत फार लांब जाते व सगळा मांजा आपल्या मांज्यावर गुंता होतो. पण ह्या मांज्याने दुसऱ्याचा पतंगही कापता येत नाही. 

२. ४० नंबर: हा सगळ्यांच्या ओळखीचा शिवण्याचा धागा. एका रिळात १००० मीटर तरी मिळतो व रीळही बरीच स्वस्त त्यामुळे लहान पोरांना हाच रीळ परवडतो. हा ही नीट सुतवला की, टुक्कलपेक्षा थोडी मोठी पतंग उडवता येते. हा मांजा एका फटक्यात कापता येतो. त्यामुळे ४० नंबर वाले काटा-काटीत फारसे भाग घेत नाहीत.

३. १० नंबर: हा खरा मांजा. एका रिळात ४०० मीटर मिळतो. त्यामुळे २ रिळे तरी सुतवावा लागतो, तरच लांबच्या गोतीला पुरतो. चक्रीही मोठी घ्यावी लागते. साखळी छाप दास नंबरी खूप प्रसिद्ध धागा. तो घेऊन किल्ल्याच्या मैदानावर सुतवायला जायचं असा शनी-रवीचा कार्यक्रम. ह्या मांज्याने मोठ्यात मोठी पतंग उडवता येते. 

४. ८ नंबरी: फार जाड धागा. सहसा मांज्यासाठी नाही वापरत पण एखाद्याला हुक्की आली की, तो सुतवतो. मांज्याचे वजनच इतकं असतं की, खूप मोठा पतंग असल्याशिवाय पतंग उडतंच नाही. मांज्याला घोळ येतो. 

मांजा बनवण्याची साधने:

काच: हिरवट दिसणारी काच असलेली सरबताची बाटली म्हणजे फीट्ट! ही बाटली घेऊन, खलबत्ता घ्यायचा, जाड कापड घेऊन बत्ता जाईल असे भोक पाडायचे, खलात काचेचे तुकडे टाकून, तोंड बांधायचे आणि कुटायची. कापडामुळे तुकडे उडून अंगावर येत नाहीत. बारीक पूड होईस्तोवर कुटली की, तलम वस्त्राने गाळून घ्यायची की अगदी तोंड-पावडरसारखी बारीक करायची. 

सरस (शिरस): ही सरस २०० ग्राम पुरते. नगरामध्ये काही खास दुकानांत मिळते. ही सुद्धा बत्त्यात घालून थोडी बारीक केली की, पटकन उकळता येते. उकळली चिकट व घट्ट होते. एक बोर्नव्हीटाचा डबा घेऊन तिनं दगडाची चूल करून त्यात अर्धे पाणी भरून सरस टाकून उकळवायची. ह्यातच रंग टाकायचा. उकळ्या घेऊन घेऊन उतू जाणे थांबले की, समजायचे की सरस शिजली. थोडी थंड होऊ द्यायची पण गरमच लागते कारण थंड झाली की, पुन्हा कडक होते व पुन्हा वापरता येत नाही. 

दाभण: हा डब्यापेक्षा जास्त उंचीचा दाभण त्यात दोरा ओवून उलटा डब्यात धरायचा. रिळात एक काडी घालून एकाला रीळ धरायला बसवायचं. दुसरा दाभण आणि एक चिठ्ठी धरणार. धागा थोडा पाण्याने ओला करून ठेवायचा असतो. 

चिठ्ठी: कापडाची एक हातात मावेल अशी बारीक घडी. ही डब्याच्या सरसातून बाहेर येणाऱ्या धाग्याला लावून त्यावरील जास्तीचा सरस डब्यात पुन्हा पडेल अशी धरायची. सरस गरम असल्यामुळे हा पोरगा वैतागतो. 

आणखी एकजण बारीक काच अशाच चिठ्ठ्यात दोन्ही हातात एक-एक धरून त्यातून नुकताच सरस लागलेला धागा न्यायचा. ह्यामुळे गरम असलेल्या सरसाला लगेच धाग्याच्या सगळ्याबाजून समान काच लागली जाते. पहिल्या हातातील चिठ्ठी जरा कमी दाबाने व दुसऱ्या हातातील चिठ्ठी जास्त दाबाने धरली की, जास्त काच लागली जाऊन ती पुढच्या हातातील दाबाने काढता येते व धाग्याचा आत पर्यंत घुसते. पण ह्यातच मांज्याचे भवितव्य ठरलेले असते व ज्याला मांजा करायचा असतो तोच हे काम करतो त्यामुळे त्याला मनाप्रमाणे काच लावता येते. अशा प्रवासातून धाग्याचे बाहेर आलेले टोक चकरीला बांधायचे व एका पोराने नेमक्या वेगाने धागा चालत चालत ओढायला सुरुवात करायची. असे करतानाही नेमका अंदाज लागतो. व काच धरणारा पोरगा त्याला सूचना देत असतो. 

मांजा सुतवतांना तो सरसामुळे ओला झालेला असतो, त्यामुळे तो काचेच्या चिठ्ठीतून बाहेर आल्यानंतर कुठेही लागू न देता ओढायचा असतो, नाहीतर लागलेली काच लगेच निघून जाते. थोडावेळ उन्हात वाळला की, (२-३ मिनिटे) की, चकरी ओढत गेलेला पोरगा तो गुंडाळत-गुंडाळत परत येतो. असे करताना त्याच्या बोटाला लागलेली काच पाहून मांज्याचा मालक धागा किती वाळू द्यायचा हे ठरवतो. 

इतर मजेशीर शब्द:

सुत्तर: मांजा घेऊन हे त्रिकोणी आकाराचे सुत्तर पतंगाला बांधायचे. हे जितक्या कौशल्याने जमते तितके नेमके नियंत्रण पतंगावर करता येते. अनेकांना ह्यातील शास्त्र कळत नाही. व दोन पायातील अंतर किती ठेवायचे हे समजत नाही. गाठ कुठे मारायची हे ही महत्त्वाचे. ह्यालाच मांज्याचे टोक बांधून पतंग उडावयाला तयार होते. संक्रांतीच्या आदल्या रात्री पतंगी सुत्तर बांधून तयार ठेवल्या जातात. पतंग कटली की, लगेच थोडाही वेळ न घालवता उडवायची घाई असते.

झीलबींडा: खास नगरी शब्द! मांजाच्या अर्धा मीटरभर तुकड्याला दोन्ही बाजूला दगड बांधायचे. एखादी पतंग अरुन उडत असेल आणि तिला पळवायची असेल तर असा झीलबींडा करून तो वर फेकला जातो. अचूकतेने पतंगाच्या मांज्यावर फेकला तर तो लटकतो दगडांच्या वजनाने खाली येतो. मग मागचा मांजा तोडून टाकून पतंगावर कब्जा करायचा व खाली घ्यायचा व लपवायचा आणि दोन-चार दिवसांनी उडावयाला घ्यायचा. 

झीलबींडा टाकून पतंग पकडणे हे भांडणाला आमंत्रण असते. पतंगबाजांच्या दुनियेतील अलिखित नियम असा आहे की, झीलबींडा टाकून पतंग पकडायची नाही. कटलेला पतंग मात्र जो धरेल त्याच्या मालकीचा असतो. मांजापण बराच लुटला जातो. पतंग कटल्यानंतर मांजा खाली येतो व गच्चीवर तयारीतच उभे असलेले पोरं धरतात व दोन्ही बाजूने ओढायला सुरुवात करतात. एक-दोन लांबच्या गोतीत पतंग कटली तर एक रीळ मांजा संपायला वेळ लागत नाही. 

कन्नी: पतंग एकाच बाजूला झुकत असेल तर, त्याच्या अर्थ त्याच्या अर्धगोलाकार कामटीचे वजन एका बाजूला जास्त असते. ते संतुलन ह्या कन्नीने करावे लागते. कन्नी कापडाचा बारीक तुकडा किंवा मांज्याचाच एक छोटी अट्टी करून कामटीच्या उलट बाजूला बांधतात. एक-दोन वेळा पतंग थोडी उडवून अंदाज येतो की, कन्नी योग्य वजनाची आहे की नाही.