४८. कार्य-उन्मुखता!

तुम्हाला आश्चर्य वाटेल पण आपल्याला सत्य न गवसण्याचं एक महत्त्वाचं कारण कार्योन्मुखता आहे.

कर्मयोगाच्या नांवाखाली पब्लिक इतकं कार्योन्मुख झालंय आहे की निष्कामाची भेट अशक्य झालीये!

प्रथम कार्योन्मुखता म्हणजे काय ते पाहू. कार्योन्मुखता म्हणजे सदैव काही तरी करावं किंवा किमान ‘काही तरी घडावं’ ही मानसिकता! हे असं सततचं वाटत राहणं म्हणजे निष्कारण गाडी गिअरमध्ये टाकून ठेवण्यासारखं आहे.

जरा स्वास्थ्य लाभलं, म्हणजे कामातून थोडी उसंत मिळाली की बरं वाटतं, पण ते अत्यल्पकाळ की पुन्हा आता काय करायचं हा प्रश्न उभा! आणि काही करायला नसेल, टीव्हीवर काही करमणूक नसेल, फोनवर सगळ्यांशी सगळे विषय बोलून झाले असतील, नव्या कार्यक्रमाचे मनसुबे करायला सुट्टीचा अडसर येत असेल, कुणी येणार नसेल तर मग एकदम बोअर व्हायला लागतं. काही करायला नाही, नजिकच्या काळात काही घडण्याची शक्यता नाही म्हणजे आपण इन्वॅलिड झालो की काय असं वाटायला लागतं, आयुष्य एकदम निरस होतं.

तशात गीतेतल्या ‘कर्मयोगाची’ भर, फलाची अपेक्षा न ठेवता कर्म करत राहा असा खुद्द कृष्णानं दिलेला सल्ला!

फलाची अपेक्षा न ठेवता काम करणारी गृहिणी कामानं बेजार तर फलप्राप्तीसाठी बाहेर पडलेले स्त्रीपुरुष स्वास्थ्याच्या शोधात! एकुणात काय तर, घरात राहायचं स्वास्थ्य लाभलेले म्हणजे निवृत्त झालेले किंवा हाऊसवाइव्ज काही करायला उरलं नाही किंवा नवं काही करायला मिळत नाही म्हणून खंत काढतायत आणि कामावर जाणारे कधी एकदा कामातून सुटका होईल या आशेनं काम करतायत असा सिनॅरिओ आहे!

आपल्याला वाटतं की काम करणं किंवा काम नसणं हे आपल्या अस्वास्थ्याचं कारण आहे पण आपली सदैव कर्मोन्मुखता हे त्या अस्वास्थ्याचं खरं कारण आहे!

जप किंवा नामस्मरण हा खरं तर या अस्वास्थ्यावरचा आध्यात्मिक उपाय फार पूर्वापार प्रसिद्ध आहे पण त्यानं व्यग्रता कणभरही कमी होत नाही, वर्षानुवर्ष जप किंवा नामस्मरण करणाऱ्यांनी नुसतं नामस्मरण थांबवलं तर त्यांना इतकी कमालीची शांतता लाभेल की बोलता सोय नाही.
__________________________________

काम करणं आणि कामातला आनंद म्हणजे 'कार्यमग्नता' वेगळी आणि सततचं ओझं होऊन राहिलेली 'कार्योन्मुखता' वेगळी, ती काम नसल्यानं, कामातून सुटका हवी या अपेक्षेनं किंवा नवं काही घडत नाही या मानसिकतेतून येणारी अस्वस्थता आहे!

काम करण्यातला आनंद ही पूर्णत: वेगळी गोष्ट आहे आणि ती तीन गोष्टींवर अवलंबून आहे.

एक, कामातला तुमचा रस. इथे माणसानं प्रचंड घोळ घालून ठेवलाय म्हणून थोडं सविस्तर लिहितो.

पहिली गोष्ट, सर्व कामं सारखी आहेत, रस कामात नाही तुमच्यात आहे आणि हे लक्षात येणं अत्यंत अगत्यच आहे. आजपर्यंत आपली अशी समजूत करून दिलीये की चित्रं काढणं, वाद्य वाजवणं, नृत्य, शिल्पकला, अभिनय, कंठसंगीत, वेगवेगळे खेळ अश्या गोष्टीच रसमय आहेत आणि त्यामुळे लाखात एखादाच आपल्या कामानं आनंदून गेलेला दिसतो. काम हाच त्याचा आनंद वाटत असला तरी तुम्ही सखोल जाऊन बघितलं तर तो आनंद त्याला कामापोटी मिळणारं भरमसाठ मानधन आणि सामाजिक प्रतिष्ठेवर बेतलेला असतो मग तो प्रतिथयश उद्योजक असो, दिग्गज कलाकार असो नामवंत खेळाडू असो की जनमानसावर अधिराज्य करणारा अभिनेता असो.

वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेली एक हकीकत इथे नमूद करावीशी वाटते. एकदा भारतातले प्रसिद्ध शहनाई नवाज आणि सरोद उस्ताद यांची कलकत्त्याला एका संगीत समारोहात जुगलबंदी ठेवली होती, साधारण तासभर वाजवून झाल्यावर शहनाई नवाज भर मैफिलीतून उठून गेले. आता येतील मग येतील म्हणून सरोद नवाज वाजवत राहिले आणि नंतर त्यांना शागीर्दांनी सांगितलं की उरलेली मैफिल तुम्ही पूर्ण करा, ते घरी गेलेत, परत येणार नाहीत!

दुसऱ्या दिवशी सरोद उस्तादांनी भर पेपरात, शहनाई नवाजांनी संगीताचा अपमान केलाय, त्यांचा सर्वोच्च नागरी सन्मान काढून घ्यावा असं स्टेटमेंट केलं! मग शहनाई नवाजांनी त्यांना फोन करून सांगितलं की आयोजकांनी मला एक तासाचेच पैसे दिले होते, मी त्याप्रमाणे वाजवलं! सरोद उस्तादांनी त्यावर मन:पूर्वक दिलगिरी व्यक्त केली आणि स्टेटमेंट मागे घेतलं! तर सांगायचं असं की प्रचंड सामाजिक प्रतिष्ठा आणि बेतहाशा पैसा यातून अशा व्यक्तींना मिळणारा आनंद निव्वळ कृत्यातून मिळणाऱ्या आनंदापेक्षा कित्येक पटींनी मोठा असतो.

तुम्हाला थोडं अणखर वाटेल पण खेळ माझं सर्वस्व आहे म्हणणाऱ्याला लिलाव वगैरे न करता माफक मानधन देऊन नित्यनेमानं नेट प्रॅक्टिस करून फ्रेंडशिप मॅचेस खेळायला लावल्या तर त्याचा खेळातला रस संपून जाईल, ही वोंट प्ले जस्ट फॉर द सेक ऑफ प्ले! त्याची मानसिकता नुसता बॉल ठोकण्यातली व्यर्थता त्याला दाखवून देईल मग तो किती का कौशल्यानं टाकलेला बॉल असो आणि कुणीही टाकलेला असो. काय असेल कारण याचं? तर क्रिकेटमध्ये असलेला अफाट पैसा, त्या पैशामुळे खेळाला मिळालेली अमाप प्रसिद्धी आणि त्या प्रसिद्धीमुळे पब्लिकनी त्यात घेतलेला इंटरेस्ट! क्रिकेट हा जगातला एकमेव रंगतदार खेळ नाहीये, तुम्ही त्यात रस घेताय म्हणून तो उत्कंठावर्धक झालाय.

तर कामात मजा आणणारा पहिला पॅरामिटर आहे ‘तुम्ही कामात घेतलेला रस! ’

ऑल वर्क पर से इज न्यूट्रल, इट इज योर इंटरेस्ट दॅट मेक्स द वर्क इंटरेस्टिंग, हे लक्षात आलं की मग पुढच्या गोष्टी सोप्या होतील. किंवा असंही म्हणता येईल की ज्यात तुम्ही रस घ्याल ते तुमच्यासाठी रसमय होईल, फलाकांक्षा वगैरे गोष्टी दुय्यम आणि दिशाभूल करणाऱ्या आहेत.
___________________________________

कामात आनंद निर्माण करणारी दुसरी गोष्ट म्हणजे विकल्प किंवा कामातल्या अनिवार्यतेचा अभाव! द व्हेरी ऑप्शन नॉट टू वर्क! तुम्हाला एकदम ऍप्रिशियेट होणार नाही पण हे परिमाण रसमयते इतकंच महत्त्वाचं आहे.

किशोरी अमोणकरला एकदा मुलाखतीत विचारलं होतं की आयुष्याच्या इतक्या परिपूर्ण स्थितीला तुम्हाला काही सांगीतिक वैषम्य वाटतं का? तिचं उत्तर अफलातून होतं, ती म्हणाली ‘गाणं मी मला हवं तेव्हा चालू करते पण मला हवं तेव्हा ते थांबवता येत नाही! ’ हे समजून घेण्यासारखं आहे, याचा अर्थ गाणं अनावर होतं असा नाही तर संयोजक जुमानणार नाहीत असा आहे. एकदा संयोजकांशी झालेल्या हुज्जतीमुळे त्यांना स्वत:चा कार्यक्रम पुढची तारीख जाहीर करून विनामूल्य ठेवावा लागला होता.

मला एवढंच सांगायचंय की तुम्हाला कामातला आनंद मिळवण्यासाठी फार अलौकिक कलाकार किंवा जागतिक दर्जाचे खेळाडू होण्याची आवश्यकता नाही, समोर आलेलं काम कसं रंगतदार करायचं ही कला साधली की झालं! यात एक खुबी आहे, काम जगाच्या दृष्टीनं जितकं साधं आणि सरळ म्हणजे ज्यात आर्थिक स्टेक्स कमी तितका तुमचा कर्मबंधाचा लेप कमी म्हणजे कर्माची अनिवार्यता कमी आणि तुम्हाला ते तुमच्या पद्धतीनं करण्याची सवलत जास्त. तेच काम रोज नव्या पद्धतीनं, नव्या अंदाजानं करण्याचा विकल्प जास्त, जितका हा विकल्प जास्त तितका निव्वळ कामातून मिळणारा आनंद जास्त.

आता हे लेखन पाहा, कोणतीही अनिवार्यता नाही, काय लिहावं ते सगळे विकल्प उपलब्ध, आर्थिक स्टेक्स शून्य आणि मी जितका रस घेईन तितकी मलाही मजा आणि वाचकांनाही आनंद!

मी हे एक उदाहरण म्हणून दिलं, मला कामातल्या अनिवार्यतेच्या अभावानं येणारी मानसिकता दर्शवायची होती, ही मानसिकता तुम्ही नॉर्मल आर्थिक स्टेक्स असलेल्या कामात देखील आणू शकता आणि ते एकदा जमलं की पैसा दुय्यम होतो आणि आपण प्रार्थमिक होतो. आपण आणि हातातलं काम यांचा सरळसरळ संबंध येतो, तुम्ही रिलॅक्स्ड मूडमध्ये काम करू शकता आणि तो मूड कामातल्या आनंदाचा अनिवार्य घटक आहे.
_______________________________

तिसरी गोष्ट, अकर्त्याशी संलग्नता! ही गोष्ट सर्वोच्च आहे. ट्राय टू अंडरस्टँड....

मागच्या पोस्टवर एका प्रतिसादात मी न्यूट्रल गिअरबद्दल लिहिलं होतं. तुम्हाला ते समजलं असेल नसेल आणि ते प्रतिसादाबरोबर निघूनही गेलं असेल पण ती एक जादूमय गोष्ट आहे. कोणत्याही कर्माचं साधन शरीर आहे ही उघड गोष्ट आहे आणि मन म्हणजे मेंदूत साठवलेली सर्व माहिती, तुमची कार्यपद्धती, तुमचं कार्यकौशल्य आणि तुमचा कामाविषयीचा दृष्टिकोन ही सर्व सहसाधनं आहेत, या दोन्हीच्या समन्वयानं कोणतंही काम पूर्ण होतं.

आता कोणत्याही कामात आपला सहभाग न्यूट्रल गिअर सारखा असतो, हा न्यूट्रल गिअर कामातली विश्रांती आहे. तुम्ही जर त्याची दखल घेतली तर तुमच्या कोणत्याही कामात एक लयबद्धता येते, एक रिदम येतो. काम हा एकसंध चालणारा आयुष्याचा अनिवार्य भाग न राहता प्रत्येक कृत्याचे तुमच्या शरीराला आणि मनाला झेपतील असे खंड होतात.

तुम्ही सिनेमाचा अभ्यास केलात तर तुमच्या लक्षात येईल की संपूर्ण सिनेमा जरी एक वाटला तरी त्यात साधारण बावीस ते तेवीस फ्रेम्स (म्हणजे वेगवेगळे प्रवेश) असतात. प्रत्येक फ्रेमला एक सुरुवात, क्लायमॅक्स आणि शेवट असतो आणि अतिशय कौशल्यानं ती पुढच्या फ्रेमशी अशी काही जोडली असते की सगळं अखंड वाटतं.

एकदा तुम्हाला हा न्यूट्रल गिअरचा बोध झाला की तुमच्या संपूर्ण कार्यकालाच्या वेगवेगळ्या फ्रेम्स होतात, या फ्रेम्स मुळात असतातच पण त्या तुम्हाला स्पष्ट दिसायला लागतात, मग काम तुमच्या आवाक्यात येतं. तुम्ही एकेक फ्रेम रंगवू शकता. त्या फ्रेममधले तुमचे संवाद, त्या फ्रेममधल्या व्यक्ती आणि तिच्यात घडणाऱ्या घटनांची तुम्ही मजा घेऊ शकता, कामातली निरसता, तोच तो पणा निघून जातो. काम एक सरळ रेषा न राहता सिक्लिकल होतं.

एकदा हा न्यूट्रल गिअर सापडला की तुम्हाला रोज तेच तेच वाटणारं आयुष्य नवे रंग घेतं कारण तो गिअर भूतकाळ संपवतो, भूतकाळाचा चलतपट सारखा डोळ्यांसमोरून चालल्यानं आणि कानामध्ये घुमल्यानं प्रत्येक प्रसंगातला नवेपणा आपल्याला जाणवत नाही. खरं तर आयुष्यात रिपीटीशन नाही, प्रत्येक प्रसंग, प्रत्येक घटना काही ना काही नवं परिमाण घेऊन येत असते हे तुमच्या लक्षात येतं.

हा न्यूट्रल गिअर तुमचं काम रसपूर्ण करतो, एका अर्थानं तुमची कार्यानिवार्यता कमी करतो कारण तो कामाचे सुव्यवस्थित खंड करून तुम्हाला वेळोवेळी विश्रामात आणतो आणि तुम्ही स्वत:शी जोडले गेल्यानं कामात निवांतपणा आणतो.

हा न्यूट्रल गिअर सृजनात्मकतेचा सोर्स आहे, आपल्याला वाटतं मनाला नवी कल्पना सुचली, नाही ते तसं नसतं, ती कल्पना त्या स्वास्थ्यातून निर्माण होऊन मेंदूत प्रकट झालेली असते, आपण स्वस्थ झाल्यानं आपल्याला नवी कल्पना सुचलेली असते! मेंदूत घडलेल्या घटनांची नोंद असते आणि त्यामुळे जर स्वास्थ्य नसेल तर मेंदू तेच काम त्याच पद्धतीनं करत राहतो.

कामातून थोडी फुरसत काढा आणि ही सततची कार्योन्मुखता कायमची संपवून टाका, तुमची जाणीव फिरून तुमच्याप्रत येईल. जेव्हा आवश्यक असेल तेव्हा या न्यूट्रल गिअरच भान ठेवून कार्योन्मुख व्हा तुमचं काम, मग ते कोणतंही असो, आनंदाचं होईल.

संजय

पूर्वप्रकाशन : दुवा क्र. १