महाभारत कथा
- महाभारत कथा (१)
- महाभारत कथा (२)
- महाभारत कथा (३)
- महाभारत कथा (४)
- महाभारत कथा (५)
- महाभारत कथा (६)
- महाभारत कथा (७)
- महाभारत कथा (८)
- महाभारत कथा (९)
- महाभारत कथा (१०)
- महाभारत कथा (११)
- महाभारत कथा (१२)
- महाभारत कथा (१३)
- महाभारत कथा (१४)
- महाभारत कथा (१५)
- महाभारत कथा (१६)
- महाभारत कथा (१७)
- महाभारत कथा (१८)
- महाभारत कथा (१९)
- महाभारत कथा (२०)
- महाभारत (२१)
शकुनीमामाच्या कपट द्युताने पांडवांना बारा वर्षांचा वनवास भोगावा लागणार होता. वनवासात असले तरी पांडव क्षत्रिय होते, एका प्रबळ राजघराण्याचे वारसदार होते. त्या बारा वर्षांचा वापर पांडवांनी युद्धाभ्यास करण्यासाठी केला, नवीन शस्त्रे, अस्त्रे मिळविली, अरण्यातील जातीजमातीचे प्रमुख, देशोदेशींचे राज्यकर्ते यांच्याशी सलोख्याचे संबंध प्रस्थापित केले असे उल्लेख आहेत. बारा वर्षांनंतर हस्तिनापुरामध्ये परतल्यावर त्यांना त्यांचा न्याय्य हक्क मिळेलच याची शाश्वती नव्हती. धृतराष्ट्राचे अंध पुत्रप्रेम, दुर्योधनाची सत्तालालसा आणि शकुनीमामाची कारस्थाने यामुळे कदाचित युद्धप्रसंग निर्माण होईल असा त्यांचा कयास असणार. सरळमार्गाने हक्काचे राज्य मिळत नसेल तर रणांगणावर युद्ध करून तो हक्क मिळवायचा त्यांचा निश्चय असावा.
पांडव स्वभावत: निगर्वी आणि नीती नियमांनुसार आचरण करणारे होते. त्यांचा दिनक्रम नियमित आणि साधा होता. वनवासात असतानादेखील ते गृहस्थाश्रमाच्या नियमांचे यथायोग्य पालनही करत असत. पांडव वनात असतानाची एक कथा फार प्रसिद्ध आहे आणि ती नेहमीच सांगितली जाते.
वनवासातील आश्रमामध्ये नोकरचाकरांची मदत उपलब्ध नव्हती आणि शिधा सामग्रीची व्यवस्था करणे तितकेसे सहज सोपे नव्हते. पांडव सामान्य वनवासी नव्हते. त्यांच्या आश्रमांमध्ये अनेक अतिथी येत असत. साधू संन्यासी आशीर्वाद देऊन धर्मग्रंथावर चर्चा करीत असत. अरण्यातील जाती जमातींचे प्रमुख येत असत, देशोदेशींचे राज्यकर्ते आणि अरण्यातून प्रवासी करणारे वाटसरूसुद्धा येत असत. सर्वांचे आतिथ्य करणे आवश्यक होते परंतू द्रौपदीसाठी ते फारच दुरापास्त झालेले होते. युधिष्ठिराने परिस्थिती जाणली आणि सूर्यनारायणाची उपासना करण्यास प्रारंभ केला. सूर्याने प्रकट होऊन दर्शन दिले आणि युधिष्ठिराचे संकट दूर करण्यासाठी एक अक्षयपात्र प्रदान केले होते. ते पात्र अखंड अन्नदान करीत असे. द्रौपदीने अन्नग्रहण करून ते पात्र स्वच्छ करून ठेवले की त्यातून अन्न मिळणे बंद होत असे. दुसऱ्या दिवशीच्या सूर्योदयापासून पुनश्च अन्नदानास प्रारंभ होत असे. अक्षय्यपात्राच्या साहाय्याने द्रौपदीला गृहिणीधर्म निभावणे शक्य झाले होते.
एकदिवस मात्र अक्रीत घडले.
पांडव बारा वर्षे वनवासी जीवन व्यतीत करणार होते. राजवैभवात राहणाऱ्या द्रौपदी आणि पांडवांकरता तो काळ कष्टप्रद होता. परंतु दुर्योधन काही समाधानी नव्हता. पांडवांचा वनवास अधिक दुर्धर व्हावा, त्यांना जास्तीत जास्त अडचणींचा सामना करायला लागावा यासाठी दुर्योधन निरनिराळ्या युक्त्या वापरत होता.
दुर्योधनाला वार्ता मिळाली होती की दुर्वास ऋषी त्यांच्या शिष्यगणांसह भ्रमण करीत आहेत. दुर्योधनाने त्याच्या दूतांकरावी दुर्वासांकडे निरोप पाठवला. त्याने दुर्वासांना विनंती केली की पांडव अरण्यांमध्ये आश्रम बांधून राहत आहेत. दुर्वासांनी तिथे जाऊन त्यांना आशीर्वाद द्यावेत म्हणजे त्यांचे खडतर आयुष्य सुसह्य होईल. दुर्वासांनी त्याची विनंती मान्य केली.
दुर्वासऋषी अती कोपिष्ट म्हणून प्रसिद्ध होते. त्यांची सेवा करणे म्हणजे तारेवरची कसरतच आणि त्यांच्या समवेत शिष्यगणही होते. जरा काही मनाविरुद्ध घडले की दुर्वासऋषी शाप देतात अशी त्यांची प्रसिद्धी होती. वनवासात राहणारे पांडव त्यांचे आदरातिथ्य कसे करणार होते? ते नक्कीच दुर्वासांच्या क्रोधाला बळी पडणार या कल्पनेने दुर्योधन आनंदात होता.
पांडवांचा आश्रम दुर्वासऋषींच्या प्रवासाच्या मार्गावरच होता. खूप मोठी वाटचाल करून सूर्यास्ताच्या वेळेस दुर्वास त्यांच्या शिष्यांसह पांडवांच्या आश्रमात पोहोचले. युधिष्ठिराने त्यांचे स्वागत तर केले पण आतिथ्य कसे करावे? या चिंतेने त्याला घेरले होते. द्रौपदीसमोर मोठेच संकट आले होते. दुर्वास आणि त्यांच्या शिष्याच्या क्षुधाशांतीची व्यवस्था तिला करायची होती. द्रौपदीने तिचे अक्षयपात्र नुकतेच स्वच्छ करून पालथे ठेवले होते. सूर्योदयापर्यंत त्यातून अन्नाचा कणही मिळणार नव्हता. मोठीच समस्या उद्भवली होती. इतक्या साऱ्या अतिथींसाठी भोजन प्रबंध करायचा तर त्याकरता शिध्याची जरुरी होती. त्या घनघोर अरण्यात, मदतीला सेवक सेविका नसताना शिधा उपलब्धही होऊ शकणार नव्हता. साहाय्याकरता नेहमीच तत्पर असलेल्या श्रीकृष्णाला द्रौपदीने साकडे घातले, या संकटातून निभावून ने म्हणून विनवणी केली. श्रीकृष्णांनी अंतर्ज्ञानाने परिस्थिती जाणली आणि लगोलग ते पांडवांच्या आश्रमस्थळी पोहोचले होते.
(महाभारत कथेमध्ये अंतर्ज्ञान, दिव्यदृष्टी असे उल्लेख नेहमीच येतात. ते नक्की काय असावे त्याचे वर्णन कुठे आढळत नाही पण दूरच्या ठिकाणी असलेल्या व्यक्तीशी संपर्क साधता येत होता. तसेच विद्युत वेगाने एका ठिकाणाहून कुठेतरी दूर जाणे सुद्धा शक्य होत होते. हे सारे कल्पनेचे खेळ आहेत? की काही तंत्रज्ञान खरोखरीच उपलब्ध होते? हे कळायला मार्ग नाही. पण एक नक्की की हा जर कल्पनाविलास असेल तर त्या लेखकाची, कथाकाराची कल्पनाशक्ती अद्भुत होती. असे उल्लेख फक्त महाभारतामध्येच नाही तर रामायण आणि अन्य पौराणिक कथांमध्येसुद्धा येतात. कुणा एकाचीच कल्पना सर्व कथालेखक वापरत होते असे समजावे का? परंतु त्या काळातील लिखित साहित्याचे अत्यल्प प्रमाण, वाचन, लेखन करू शकतील अशी मोजकीच माणसे असणे आणि संचार साधनांची कमतरता हे सर्व पाहता ते असंभव वाटते.)
दुर्वासऋषी त्यांच्या शिष्यगणांसह नदीतिरी स्नानसंध्येसाठी गेलेले होते. परतल्यावर ते सर्वजण भोजन ग्रहण करतील असे सांगितलेले होते. पांडव आणि द्रौपदी संचित होते, परंतु श्रीकृष्णाच्या आगमनाने त्यांना धीर आला होता. श्रीकृष्ण या संकटातून मार्ग काढतील अशी खात्री असल्याने पांडव आणि द्रौपदी निश्चिंत झाले होते.
आश्रमात आल्यानंतर श्रीकृष्ण द्रौपदीला म्हणाले, "इतका दूरचा प्रवास करून मी आलो आहे. माझ्या क्षुधाशांतीची काही व्यवस्था करशील की नाही?"
आधीच चिंताग्रस्त असलेल्या द्रौपदीला ते बोलणे ऐकून राग आला. ती म्हणाली, "कृष्णा तू माझी परीक्षा बघणार आहेस का? तू तर सर्व जाणतोस, काय परिस्थिती आहे हे माहिती असूनही असे कसे बोलतोस?"
तरीही श्रीकृष्णांनी सांगितले, "बघ त्या अक्षयपात्रात काहीतरी असेल."
द्रौपदीने पात्र कृष्णासमोर ठेवले तर त्या पात्राच्या तळाशी एक कोथिंबिरीचे पान राहिलेले होते. त्या पानाकडे निर्देश करीत श्रीकृष्णांनी ते पान त्यांच्या मुखामध्ये ठेवले. श्रीकृष्णांनी ते पान ग्रहण करताच नदीतीरावर मावळत्या सूर्याला अर्ध्य देत असलेल्या दुर्वासऋषी आणि शिष्यगणांना आकंठ भोजनाची तृप्ती अनुभवाला आली. दुर्वास आता चिंतित झालेले होते. स्नान करून भोजनाकरता येणार असे त्यांनी युधिष्ठिराला सांगितले होते, परंतु कुणालाही भोजनाची जरासुद्धा इच्छा नव्हती. युधिष्ठिराने भोजन प्रबंध केला असेल आणि भोजनास नकार दिला तर त्याचा अपमान होईल. अशी परिस्थिती पाहून दुर्वासांनी निर्णय घेतला आणि आश्रमामध्ये परत ना जाता ते सर्व शिष्यांसह पुढील प्रवासाकरता मार्गस्थ झाले होते.
दुर्वास नदीतिरी जाऊन बराच मोठा काळ लोटला होता म्हणून युधिष्ठिर त्यांना बोलावण्याकरता तिथे पोहोचला. नदीतीरावर कुणीच नव्हते, मनोमन आश्चर्य करीत तो माघारी आला. एक मोठे संकट मात्र टळले होते. कृष्ण पाठीराखा असेल, तर संकटांचा सामना करणे कठीण नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झाले होते. दुर्योधनाचे कारस्थान अपयशी ठरले होते.
हा प्रसंग एक चमत्कार म्हणूनच वर्णन केला जातो. त्यात अनेक अविश्वसनीय घटना घडतात ज्याचे स्पष्टीकरण देता येत नाही. श्रीकृष्णांनी घडवलेल्या अशा असंख्य लहान मोठ्या चमत्कारांना कृष्णलीला म्हणता येईल.
***