हे कसले अनुयायी?

ही बातमी वाचा. या प्रसंगावरून काही मुद्दे मनात येतात.


१. विमानातून जायचे तर विमानप्रवासाचे नियम सर्वांना समान आहेत ना? मग जर चांदीचा धर्मदंड नेण्यास मनाई केली गेली तर चुकले कुठे?


२. शिवसेनेचा या प्रकाराशी काय संबंध? त्यांनी औरंगाबादेत नुकसान करण्याचे कारण काय? कुठल्याही विध्वंसक कार्यात शिवसेना आघाडीवर का असते?


३. या प्रकारात पोलिसांवर दगडफेक, रिक्षा, ट्रॉलींचे नुकसान, याची खरंच गरज होती का? याच्या उत्तरात, पोलिसांनी लाठीमार केल्यास त्यांचे काय चुकले?


४. नरेंद्रमहाराजांच्या अनुयायांनी केलेल्या नुकसानीची भरपाई कोण करणार? ही जबाबदारी कोणाची?


५. या धामधुमीत सर्वसामान्य व्यक्तींचेही नुकसान झाले असेल, ज्यांचा या सर्व प्रकाराशी काहीही संबंध नसेल. त्यांच्या नुकसानाला जबाबदार कोण?


६. अशा अनुयायांची वास्तविक नरेंद्रमहाराजांना लाज वाटायला हवी तर याउलट ते त्यांना इस्पितळात जाऊन का भेटले? त्यांनी त्या अनुयायांना केलेल्या चुकीबद्दल समज का दिली नाही?


७. या सर्व प्रकरणाची नैतिक जबाबदारी घेऊन नरेंद्र महाराज ज्यांचे नुकसान झाले अशांची माफी मागतील का? नुकसानाची भरपाई करतील का?


६. ३३कोटी देवांनंतरही आज माणसाला कोणी महाराजांची गरज का भासते?


७. स्वतः मर्सेडिज, लेक्सस गाड्यांमधून फिरणारे महाराज, बापू इतरांना त्यागाच्या गोष्टी सांगतात तेंव्हा समाजातील व्यक्तींना त्यातील भोंदूपणा दिसत कसा नाही? दिसला तरी काणाडोळा का केला जातो?


८. या महाराजांचा हा सर्व खर्च कोण सांभाळतं? एवढा निधी या संस्थांकडे कसा येतो? त्यावर आयकर खात्याचे काही नियम लागू होत नाहीत का?


माझ्या अल्पमतीला ह्या सर्व प्रकारामागचे प्रयोजनच समजले नाही. मनोगतवरील आपल्या सर्वांपुढे हे प्रश्न ठेवून त्या अनुषंगाने चर्चा करण्याचा मानस आहे.


--ध्रुव.