अडैक्कलम आणि त्याचं कुटुंब मोलमजुरी करून कशीबशी गुजराण करत होतं. त्यांना अग्रवालनं काम दिलं होतं आणि राहायला जागा पण दिली होती म्हणून बरं होतं. तो, त्याची बायको आणि दहा वर्षांचा मुलगा पोटासाठी वणवण फिरत तमिळनाडुतून इकडे मध्यप्रदेशात आले होते. त्यांना इथली भाषा येत नव्हती आणि त्यांच्या ओळखीचं पण जवळपास कोणी नव्हतं. दिवसभर दगड फोडून त्या सबंध कुटुंबाला महिन्याला फक्त पन्नास रुपये मिळत. मजुरांच्या कामाचे ठराविक तास, त्यासाठी असलेले कायदे, इतर सोयी हे शब्दही त्यांना माहीत नव्हते. उजाडल्यापासून अंधार पडेपर्यंत दगड फोडायचे एवढंच त्यांना माहीत होतं. त्यात कधी खंड नाही.