मनोगत
दीपावली २०११. वर्ष ५ वे.
आंबा चीजकेक (बिनाअंड्याचा)
या दिवाळीत काहीतरी वेगळा गोड पदार्थ करायचा असेल तर हा चीजकेक नक्की करून पाहा.
जिन्नस :
बेस -
तयार ग्रॅहम क्रॅकर पाय क्रस्ट (६ लहान वाट्यांच्या आकाराच्या घेऊ शकता किंवा एकच मोठा खोलगट बेस)
तयार बेस न मिळाल्यास पर्यायी साहित्य -
मारी/डायजेस्टिव बिस्किटे १०-१५ चुरा करून
अर्धा कप साखर
३/४ कप अनसॉल्टेड बटर
सारण-
८ औंस क्रीमचीज स्टिक
१ कप आंबा पल्प
३/४ कप साखर
वेलदोडा पूड आवडीनुसार
सजावटीसाठी -
१ कप आंब्याच्या फ़ोडी किंवा आवडीनुसार इतर फळांच्या फोडी
मार्गदर्शन :
ओवन ३५० अंश फॅ. वर तापायला ठेवा. जर बिस्किटांचा बेस करणार असाल तर बिस्किट चुरा, मऊ झालेले बटर (त्यासाठी थोडावेळ आधीच बटर फ्रिजबाहेर काढून ठेवा) आणि साखर, फूड प्रोसेसर मधून फिरवून घ्या. खुप बारीक होता कामा नये. क्रम्बस तयार झाले पाहिजेत. हे मिश्रण खोलगट बेकिंग डिशमध्ये दाबून पसरवा. ३५० डिग्री तापमानाला साधारण ५-६ मिनीटे हा बेस बेक करा ( जर तयार पाय क्रस्ट वापरणार असाल तर तो आधी बेक करायची गरज नाही.)
क्रीमचीज, साखर, वेलदोडा पूड, आणि आंबा पल्प फूड प्रोसेसरमधून फिरवून घ्या. हँड ब्लेंडर/मिक्सी वापरला तरी चालेल. मिश्रण एकजीव मऊ झाले पाहिजे. खूप फेटायचे नाही. पल्पाचे प्रमाण आवडीप्रमाणे कमीजास्त करू शकता.
आता बेक केलेल्या बेसवर हे मिश्रण सगळीकडे सारखे ओता. डिश हलक्या हाताने हलवून वरचा थर सपाट करा आणि परत ३५० डि. तापमानाला ३० मिनिटे बेक करून घ्या. हा चीजकेक होत आला की खरपूस वास यायला लागेल. वरचा थर शिजल्यासारखा दिसेल. आता चीजकेक बाहेर काढून पूर्णपणे गार करून मग फ्रीजमध्ये कमीत कमी २ तास तरी सेट करायला ठेवा. खायला देताना त्रिकोणी तुकडे करून वरून आंब्याच्या फोडी घालून सजवा.