मनोगत
दीपावली २०११. वर्ष ५ वे.
![]() |
आणि आपण गोळा होतो शहरातल्या एखाद्या जागी
आपण गळाभेट घेतो पण भिंती पडू देत नाही मनातल्या
आपण विचारतो एकमेकांची खुशाली पण तळमळ नसते पूर्वीसारखी
आपलं अडत नाही फार एकमेकांवाचून
आपण आखून घेतल्या आहेत रेषा एकमेकांच्या भोवती
आपण रेषांच्या आतूनच बोलतो एकमेकांशी
आपण बसतो दोन टेबल जोडून एकमेकांच्या समोर
एकमेकांची सिगारेट पेटवता येईल इतक्या अंतरावर
आपण ग्लासांना ग्लास भिडवतो
पण आपला जल्लोष खरा नसतो...
कितीही प्यालो तरी आपण कंट्रोलमधे असतो
पोटातलं उलटून जाईल पण मनातलं उलटत नाही
आपण बोलतो सिनेमांवर, साहित्यावर,
म्युझिकवर, शिक्षणावर,
समाजावर, राजकारणावर
आणि बोललोच वैयक्तिक पातळीवर तरी हुंदके सांडू देत नाही
जखमा दिसू देत नाही
डोळ्यातल्या आसवांच्या ग्रंथी जणू काढूनच टाकल्यात आपण
मिनिटामिनिटाला वाजत असतात आपले फोन
वेगवेगळ्या दिशांना जातात आपली तोंडं
एक शांतता भरून राहते भयानक
अस्तित्वहीन होवून जाते आपली भेट
आणि मोबाईल स्वीच ऑफ करून बसावं असं उरलंय तरी काय आपल्या बोलण्यात ?
आपण आखून घेतल्या आहेत रेषा एकमेकांच्या भोवती
आपण रेषांच्या आतूनच बोलतो एकमेकांशी...